संकोचशील रिक्तिका : पुष्कळ प्रोटोझोआ (आदिजीव), गोड्या पाण्यातील स्पंजांच्या विविधकोशिका (पेशी) आणि काही थोड्या ⇨शैवलांच्या चर अवस्था यांत एक किंवा अधिक लहान आशय (पातळ भित्तीच्या मूत्राशयासारख्या पोकळ्या) असतात. त्यांना संकोचशील रिक्तिका म्हणतात. गोड्या पाण्यातील प्रोटोझोआंमध्ये त्या असतात पण सागरी प्रकारांत त्या क्वचितच आढळतात. त्याच प्रमाणे परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणाऱ्या) प्रकारांत त्या मुळीच नसतात. सागरी आणि परजीवी सिलिएट प्राण्यांमध्ये त्या बहुधा असतात.

संकोचशील रिक्तिका हळूहळू द्रव पदार्थाने भरते आणि नंतर एकदम बसून आतला द्रवपदार्थ विसर्जन रंध्रातून (छिद्रातून) बाहेर टाकते व पूर्णपणे नाहीशी होते. नाहीशा झालेल्या रिक्तिकेच्या जागी लवकरच दुसरी उत्पन्न होते. ही क्रियासारखी चालू असते. सूक्ष्मकोशिका द्रव्यीकणात उत्पन्न झालेल्या लहान रिक्तिकांच्या एकीकरणाने नवी रिक्तिका उत्पन्न होणे संभवनीय असते.

अगदी साधी रिक्तिका अमीबात आढळते ती वाटोळ्या आशयाच्या स्वरूपाची असून तिची जागा ठराविक नसते. निश्चित आकार आणि शरीरावर तनुत्वक (जीवद्रव्यावरण) असणाऱ्या प्रोटोझोआंमध्ये रिक्तिकांची स्थाने व संख्या निश्चित असतात. थोड्या जास्त गुंतागुंतीच्या प्रकारांत एक अथवा सामान्यत: अधिक द्वितीयक संगाहक रिक्तिका असून गोळा केलेला द्रवपदार्थ त्या मुख्य आशयात ओततात. यापेक्षाही जास्त गुं तागुंतीच्या प्रकारांत कमी अधिक संख्या असणारे अनुदैर्घ्य (उभे) अरीय (त्रिज्यीय) अभिवाही नाल (अंतर्भागात वाहून नेणाऱ्या नलिका) मुख्य आशयात उघडतात.

आशयाभोवती एक जाड स्नेहाभ (चरबीयुक्त) कला (पटल) असते आणि ती मेटाझोआंच्या कोशिकांत आढळणाऱ्या गॉल्जी साधनाशी (जीवद्रव्याचा भाग असलेल्या पेशीमय अवयवाशी) समजात असते, असे मानतात.

प्रायोगिक पुराव्यावरून संकोचशील रिक्तिका शरीराच्या पृष्ठभागावरून ⇨ तर्षणाने आत शिरलेले पाणी लगेच बाहेर काढून शरीराच्या आकारमानाचे नियंत्रण करते. यामुळे जीवाला आपल्या शरीरातील द्रवपदार्थ अतिपरासारी स्थितीत (बाह्य माध्यमाच्या संबंधात) राखता येतो. काही प्राणिशास्त्रज्ञांच्या मताने संकोचशील रिक्तिका पाण्यात विरघळलेली उत्सर्जन द्रव्ये बाहेर टाकतात, पण याविषयी कोणत्याही प्रकारचा पुरावा उपलब्ध नाही. रिक्तिकेचे कार्य द्रवस्थैतिक असते, याला पुढील गोष्टी पुष्टी देतात. गोड्या पाण्यात आढळणाऱ्या प्रकारात असणारे तिचे सर्वसाधारण अस्तित्व, पुष्कळ सागरी आणि परजीवी जातींत असणारा तिचा अभाव, अमीबाच्या शरीरात ऊर्ध्वपातित जलाचे अंत:क्षेपण (इंजेक्शन) केले, तर रिक्तिकेच्या स्पंदनाचा वेग आणि बाहेर पडणाऱ्या पाण्याचे प्रमाण यांत होणारी वाढ, काही सागरी अमीबे ज्या पाण्यात राहतात त्यांचे खारेपण पुष्कळ कमी केले, तर या अमीबांच्या शरीरात संकोचशील रिक्तिका नव्याने उत्पन्न होतात.

संकोचशील रिक्तिकेच्या कार्यपद्धतीचा उलगडा तीन सिद्धांतांव्दारे मांडण्यात येतो: (१) परासरण सिद्धांत : याची कल्पना अशी की कोशिका द्रव्यातून परासरणाने (तर्षणाने) पाणी रिक्तिकेत जाते (२) निस्यंदन (गाळण) सिद्धांत : याचा दावा असा आहे की, द्रव स्थैतिक दाबाने रिक्तिकेच्या कलेतून पाणी बाहेर ढकलले जाते आणि (३) स्राव सिद्धांत : हा सिद्धांत असे गृहीत धरतो की, कलेपासून रिक्तिकेमध्ये पाण्याचे स्रवण होते.

या तिन्हींपैंकी तिसरा सिद्धांत ग्राह्य मानलेला असून उपलब्ध मूलभूत गोष्टींशी त्याचा कोठेच विरोध येत नाही.

पहा : अमीबा पॅरामिशियम.

कर्वे, ज. नी.