रॉस्टॉव्ह−ऑन−डॉन : रशियातील आरएसएमएसआर प्रजासत्ताकाव्या रॉस्टॉव्ह ओव्लास्टचे प्रशासकीय आणि एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र. लोकसंख्या ९·९३ लक्ष (१९८६ अंदाज). हे डॉन नदीवर, मुखापासून ४८ किमी. आत वसले असून ते व्होल्गोग्राडच्या नैर्ऋत्येस ४००किमी. वर आहे.

एक सीमाशुल्ककेंद्र म्हणून रॉस्टॉव्हची १७४९ मध्ये स्थापना झाली. १७६१-६१ यांदरम्यान येथील संत दमीत्री यांच्या नावाने एक किल्ला बांधण्यात आला किल्ल्याभोवती गावाची वाढ होत गेली. १७९७ मध्ये याला शहराचा दर्जा मिळाला १८०६ मध्ये यारोस्लाव्हलमधील रॉस्टॉव्ह याच नावाच्या एका गावापासून फरक दाखविण्यासाठी या शहराचे नाव बदलण्यात येऊन रॉस्टॉव्ह-ऑन-डॉन असे ठेवण्यात आले. वाहतूक केंद्र व बंदर अशा दोन्ही दृष्टींनी मोक्याचे ठिकाण म्हणून याचे महत्त्व वाढले एकोणिसाव्या शतकातील उत्तर कॉकेशस भागात रशियाने स्थापिलेली वसाहत तसेत ट्रान्सकॉकेशियावर त्याने मिळवलेले स्वामित्व यांमुळे या शहराचा विकास होत गेला. दुसऱ्या महायुद्धात ‘कॉकेशचे प्रवेशद्वार’ म्हणून हे ओळखले जात होते. या युद्धकाळात शहराची बरीच हानी झाली.

व्होल्गा−डॉन जहाजवाहतूक कालवा १९५२ मध्ये वाहतुकीस खुला झाल्याने डॉन नदीमार्गावरील वाहतूक अंतःप्रदेशात होणे सुकर झाले. त्याचप्रमाणे व्होल्गा द्रोणीप्रदेशाशी रॉस्टॉव्ह जोडले गेले मध्य यूरोपीय रशिया व कॉकेशस विभाग यांना जोडणारे रस्ते, लोहमार्ग, तेलनळ व नैसर्गिक वायुनळ यांवर रॉस्टॉव्ह वसले असल्याने त्याची ही मध्यस्थिती व डोनेटस कोळसाक्षेपाची समीपता या दोहोंच्या योगे रॉस्टॉव्हचा औद्योगिक विकास−प्रकर्षाने अभियांत्रिकी विभागात−मोठ्या प्रमाणात घडून आला. येथील दोन शेती अवजारांच्या प्रचंड कारखान्यांमुळे रशियातील सर्वांत मोठे कृषियंत्रनिर्मितिकेंद्र म्हणून रॉस्टॉव्हची ख्याती झाली आहे. इतर उत्पादनांमध्ये काँक्रीट मिश्रण, ओतभट्टी उत्पादने, मोटारसायकली, रेडिओ, रसायने, स्वयंचलित जुळणी संसंत्रे, रेल्वे व मोटारगाड्या, सुती कापड व वस्त्रे, पादत्राणे, चामड्याच्या अन्य वस्तू, तंबाखू, मीनाकारी, भांडी आणि उपकरणे, फर्निचर, कागद, डबाबंद पदार्थ, गोलक धारवा (बॉल बेअरिंग), विजेचा व तापमानाची उपकरणे व साधने, विविध तारा, स्वयंचलित पडाव, रस्तेबांधकाम साहित्य इत्यादींचा समावेश होतो. यांशिवाय येथे लाटणयंत्रकारखाने तसेच जहाजगोद्याही आहेत.

शहरात रॉस्टॉव्ह राज्य विद्यापीठ (१९१७), सात उच्च शिक्षणसंस्था व बारा विज्ञान संशोधनसंस्था आहेत. यांशिवाय वैद्यक आणि शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये असून कला व पुरातन वस्तुसंग्राहलयही आहे.

गद्रे, वि. रा.