ब्लेनी: पर्सिफॉर्मीस गणातील ब्लेनिऑइडिया या उपगणात या माशांचा समावेश होतो. यांच्या पुष्कळशा जाती ब्लेनिडी या कुलामध्ये आढळतात. हे सागरी मासे होत. क्वचितच एखादी जाती गोड्या पाण्यात आढळते. या गणातील माशांत श्रोणिपक्ष (कटिभागावरील पर पर म्हणजे हालचालींस वा तोल सांभाळण्यास उपयोगी पडणारी त्वचेची स्नायुमय घडी) गळ्याजवळ असतात. पक्ष अरांची (पराला आधार देणाऱ्या कंकालाच्या घटकांची काट्यांची) संख्या इतर जातींतील पक्ष अरांच्या तुलनेने कमी असते. ब्लेनी मत्स्यात ही संख्या अवघी पाच असते. हे सागर तटीय मासे असून जगातील उष्ण व समशीतोष्ण प्रदेशांत सर्वत्र आढळतात. हे मासे उथळ पाण्यात तळाजवळ राहतात पण त्यांना त्रास दिला, तर ते खडकाखाली किंवा पाण्यातील वनस्पतींत लपून बसतात.

या माशांचे शरीर लांब, अरुंद व जवळजवळ सर्पासारखे असते. श्रोणिपक्ष गळ्याजवळ असतात व त्यांना एक ते पाच पक्ष अर असतात. यामुळे ब्लेनी मासा ओळखणे सोपे जाते. उत्तरपक्ष (वरच्या बाजूचा पर) लांब व डोक्याच्या पाठीमागील भागापासून शेपटीपर्यंत वाढलेला असतो. या माशांच्या डोक्यावर लहान संस्पर्शक किंवा तंतू (स्पर्शज्ञान, शोध घेणे व पकडणे इ. कार्यांसाठी उपयोगात आणली जाणारी लांब, सडपातळ व लवचिक इंद्रिये) असतात. सहसा यांच्या शरीरावर खवले नसतात.

या मत्स्यकुलातील पुष्कळसे मासे अंडी घालतात. ही अंडी खडकाखाली किंवा प्रवाळाखाली ठेवतात. काही जातींत नर घरटे बांधतात व त्यांत अंड्यापासून निर्माण होणाऱ्या पिलांचे रक्षण करतात. इतर जातींत पाण्यामध्ये सहज पोहू शकणारी पिले निर्माण होतात. यूरोपमधील ईलपाऊट या वंशाचे मासे जरायुज (पिलास जन्म देणारे) असतात. ब्लेनीच्या बऱ्याचशा जाती मांसाहारी आहेत परंतु सॅलॅरिअस आणि ॲल्टिकस हे लहान मासे शाकाहारी आहेत.

  सूर्यवंशी, वि. ल.