आर्‌कॅन्सॉ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी दक्षिणेकडील, मिसिसिपी नदीच्या पश्चिमेचे एक राज्य. क्षेत्रफळ १,३६,५५७ चौ. किमी. लोकसंख्या १९,२३,२९५ (१९७०). ३३उ. ते ३६३०’ उ. व ८९४१’ प. ते ९४ ४२’ प. याच्या दक्षिणेस लुईझझिॲना, नैर्ऋत्येस टेक्सस, पश्चिमेस ओक्लाहोमा, उत्तरेस व ईशान्येस मिसूरी आणि पूर्वेस मिसिसिपी नदीपलीकडील टेनेसी व मिसिसिपी ही राज्ये असून याची जास्तीत जास्त दक्षिणोत्तर व पूर्वपश्चिम लांबी अनुक्रमे ३८४ व ४४३ किमी. आहे.

भूवर्णन : वायव्येकडून आग्‍नेयीकडे वाहात गेलेल्या आर्‌कॅम्सॉ नदीने राज्याचे बरोबर दोन भाग पाडलेले आहेत. पश्चिमेकडील उंच डोंगराळ प्रदेश पूर्वेला मिसिसिपीकडे उतरता आहे. मिसिसिपीला जेथे आर्‌कॅन्सॉ मिळते, त्याच्या अलीकडेच थोड्या अंतरावर तिला व्हाइट नदी मिळते. सेंट फ्रान्सिस ही पूर्वेकडील आणखी एक प्रमुख नदी आहे. सर्व पूर्वसीमेवर मिसिसिपी नदी असून तिच्या काठी अनेक नालाकृती सरोवरे व पूरतट आहेत. या भागात मधूनमधून मोठे पूर येतात. शीको व बिग लेक ही प्रसिद्ध नालाकृती सरोवरे आहेत. नैर्ऋत्य भागात रेड व लिटल रिव्हर या प्रमुख नद्या आहेत. आर्‌कॅन्सॉ खोऱ्याच्या उत्तरेचा ओझार्क पठार हा मिसूरी राज्यातून येणाऱ्या पर्वतांचा दक्षिण भाग होय. त्यात नद्या, तळी व वनाच्छादित टेकड्या आहेत. आर्‌कॅन्सॉ खोऱ्याच्या दक्षिणेस वॉशिटॉ पर्वताच्या पूर्वपश्चिम रांगांची उंची कित्येक ठिकाणी ७७५ मी. पेक्षा जास्त आहे. आर्‌कॅन्सॉ नदीखोऱ्यात अनेक दरडी व शिखरे असून सर्वोच्च शिखराची उंची ८६८ मी. आहे. राज्यात अनेक जलाशय असून त्यांपैकी सर्वांत मोठा वॉशिटॉ नदीवर आहे. त्याचप्रमाणे व्हाइट नदीवरील धरणाने झालेला बुल शोल जलाशयही मोठा आहे. पूर्वेकडील ‘ग्रँड प्रेअरी’ सखल गवताळ प्रदेश हजारो रान-बदकांचे निवासस्थान आहे. राज्याच्या उत्तर व मध्यभागात असंख्य झरे असून सर्वांत मोठा, उत्तरेकडील मॅमथ स्प्रिंग मिनिटाला ६,९०,००० लिटर पाणी देतो. मध्यभागात हॉट स्प्रिंग्ज शहराभोवती ४७ गरम झरे आहेत. राज्याच्या उत्तरभागात चुनखडी, वालुकाप्रस्तर व शेल असून दक्षिण भागात रेताड माती व सुपीक गाळ जमीन आहे. क्रोलीज रिज भागात लोएस माती आहे. देशातील ९५ टक्के बॉक्साइट (ॲल्युमिनियम धातुक) या राज्यातून निघते. त्याशिवाय बेरियम सल्फेट, मँगॅनीज, शिपिचंद (पाऱ्याचे धातुक), शिसे, जस्त, शाडू, ग्रॅनाइट, संगमरवर, स्लेट, चुनखडी ही खनिजे येथे आहेत. हिरे सापडत असलेले देशातील एकमेव क्षेत्र याच राज्यात होते. सरासरी वार्षिक पाऊस ११८ सेंमी. असून तो पश्चिमेकडे कमी व पूर्वेकडे जास्त आहे. तपमान ५·६से. व २७·८से. यांच्या दरम्यान असते. नित्यवारे नैर्ऋत्येकडून येतात. हिमपात बहुधा वायव्य भागात होतो. आर्द्रता सामान्यतः ४० टक्के ते ६० टक्के असून ती हिवाळ्यात अधिक असते. राज्यातील ५५ टक्के भूमी वनाच्छादित आहे. लघुपर्णी व लॉबलॉली पाइन, दक्षिणेत सायप्रस, टुपेलो, गम, ओक, ॲश, हिकरी इ. वृक्ष असून राज्यात वनस्पतींचे ५०० प्रकार आहेत. ऑपॉस्सम, स्कंक, सिव्हेटकॅट इ. २५ जातींचे प्राणी टर्की , बदके वगैरे ३०८ जातींचे पक्षी व नद्यांच्या पाण्यात २०० जातींचे मासे आढळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : गोऱ्या लोकांच्या आगमनाआधी येथे कॅडो, ऑसेज व क्वापॉ या इंडियन आदिवासी जमाती होत्या. स्पॅनिश आक्रमक डीसोटो १५४१ मध्ये मिसिसिपी ओलांडून आला होता. नंतर १६७३ मध्ये झाक मार्केत व लूई जोलिएत या फ्रेंच प्रवाशांनी क्वापॉ जमातीला भेट दिली. १६८२ मध्ये मिसिसिपी खोऱ्यासह आर्‌कॅन्सॉवर ला सालने फ्रान्सतर्फे हक्क सांगितला. त्याचा सहाय्यक ऑरी द तांतो याने आर्‌कॅन्सॉ नदीमुखाशी गोऱ्यांची पहिली वसाहत स्थापली. फ्रान्सच्या पराभवानंतर हा मुलूख स्पेनकडे जाणार होता पण नेपोलियनने गुप्तपणे तो फ्रान्ससाठी परत मिळविला. १८०३ मध्ये ‘लुइझिॲना खरेदी’ द्वारा अध्यक्ष जेफर्सनने तो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांसाठी विकत घेतला. प्रथम लुइझिॲना प्रदेशाचा भाग, मग मिसूरीचा, नंतर १८१९ मध्ये केंद्रशासित प्रदेश या अवस्थांनंतर १८३६ मध्ये आर्‌कॅन्सॉला राज्याचा दर्जा मिळाला. १८६१च्या यादवी युद्धात दक्षिणेच्या बाजूने सामील झाल्याने राज्यात सहा लढाया झाल्या. १८६८ मध्ये संयुक्त संस्थानांत पुन्हा प्रवेश केल्यावर पुनर्रचनेच्या कटु-कालखंडानंतर १८७४ मध्ये केंद्रीय हस्तक्षेप होऊन संविधानाप्रमाणे शासन सुरू झाले. तेव्हापासून वेळोवेळी संविधानात पुष्कळ दुरुस्त्या करून घेण्यात आल्या. १९५७ मध्ये गोऱ्या-काळ्यांच्या सहशिक्षणाविरुद्ध राज्याने केंद्राशी निकराचा लढा दिला तंग परिस्थिती निर्माण झाली राष्ट्राध्यक्षाने सैनिक पाठवले, राष्ट्रीय संसदेने वर्णविग्रह घटनाबाह्य ठरविला, तरी राज्याने शिक्षण खाजगी संस्थांकडे सोपवून गोऱ्या-काळ्यांच्या वेगवेगळ्या शाळांचा हट्ट कायम ठेवला. राज्याचा गव्हर्नर व पाच खातेप्रमुख दर दोन वर्षांनी निवडण्यात येतात. विधिमंडळापैकी सीनेटचे ३५ सदस्य पाळीपाळीने चार वर्षांसाठी व प्रतिनिधीसभेचे १०० सदस्य दोन वर्षांसाठी निवडून जातात. सर्वोच्च न्यायालयाने ७ न्यायमूर्ती ८ वर्षांच्या मुदतीसाठी निवडलेले असतात. राष्ट्रीय काँग्रेसवर २ सीनेटर व ४ प्रतिनिधी राज्यातून निवडून पाठवण्यात येतात.

आर्थिक व सामाजिक स्थिती : कृषिउद्योगात कपाशी, भात आणि सोयाबीन या पिकांच्या उत्पादनात आघाडीच्या राज्यांपैकी आर्‌कॅन्सॉ एक आहे. शिवाय गहू, टोमॅटो, फळे, मका, गुरे, कोंबड्या, अंडी, दुधदुभत्याचे पदार्थ यांचेही उत्पादन होते. उद्योगधंद्यांत लाकूडकाम, फर्निचर, कागदी व चामडी माल तयार करणे, कापूस पिंजणे व दाबणे, फळे व भाज्या डबाबंद करणे, सरकीचे तेल काढणे, तांदळाच्या व पिठाच्या गिरण्या, कापडगिरण्या, यंत्रे, विटा, कौले, काच, भांडी इ. तयार करणे, हे प्रमुख आहेत. १९७० मध्ये राज्यात लोहमार्ग ५,७३४ किमी., रस्ते १,२६,१९८ किमी., जलमार्ग ४,८०० किमी., आणि सरकारी व खाजगी मिळून १३५ विमानतळ होते. ३५ दैनिके व १३६ इतर नियतकालिके, ८३ नभोवणी व ६ दूरचित्रवाणी केंद्रे असून १९७० मध्ये लोकसंख्येपैकी ५७ टक्के ग्रामीण आणि २५ टक्के प्रजा निग्रो होती. राज्यात कायदे करून निग्रोंसाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक सोयी वेगळ्या ठिकाणी केल्या आहेत. गोऱ्यां-काळ्यांमध्ये लग्‍नाला या राज्यात बंदी आहे. लिटल रॉक हे राजधानीचे शहर ॲल्युमिनियम व लाकूडकामाच्या कारखान्यांचे केंद्र, फोर्ट स्मिथ जस्त भट्ट्यांचे व व्यापाराचे, पाइन ब्‍लफ कृषिव्यापाराचे व एल् डोरॅडो तेलविहिरीचे केंद्र आहे. ख्रिस्ती धर्मपंथांपैकी चर्च ऑफ ख्राइस्ट, मेथॉडिस्ट, रोमन कॅथलिक, सदर्न बॅप्टिस्ट व प्रेस्बिटेरियन यांचे अनुयायी जास्त. राज्यात दक्षिण व पश्चिम राज्यांच्या संस्कृतींचा संगम दिसून येतो. डोंगराळ प्रदेशातील मूळच्या स्कॉटिश नागरिकांच्या पद्धती वेगळ्या दिसतात व सपाट प्रदेशात लोक वेगळ्या संस्काराचे दिसून येतात. राज्यातील लोकांना कला, इतिहास, संशोधन अशा विषयांत वाढती गोडी आहे. शिकार, गोल्फ, मासे पकडणे हे आवडते करमणुकीचे प्रकार असून बेसबॉल हा लोकप्रिय खेळ आहे. शिक्षण ७ ते १७ वयापर्यंत मोफत व सक्तीचे आहे. शाळांतून १९६९-७० मध्ये ४,६३,३५८ विद्यार्थी होते. एक विद्यापीठ, शासकीय व खाजगी मिळून १८ महाविद्यालये, चार वस्तुसंग्रहालये असून सर्वत्र ग्रंथालये आहेत. उत्तरेकडे ‘डिव्हल्स डेन’ गुहा, जुनी हिऱ्यांची खाण, मध्यभागात गरम झऱ्यांचा प्रदेश प्रेक्षणीय असून निसर्गसौंदर्यासाठी व सहलींसाठी राज्यभर राखीव वने आहेत.

ओक, शा. नि.