रांची : भारताच्या बिहार राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण . लोकसंख्या ५,००,५९३ ( १९८१ ). हे पाटण्याच्या दक्षिणेस ३०२ किमी. आणि जमशेदपूरच्या वायव्येस ११२ किमी. अंतरावर आहे. छोटा नागपूर पठारावर सस. पासून ६४७ मी. उंचीवर रांची वसलेले आहे. थंड, कोरड्या व उत्साहवर्धक हवामानासाठी रांची प्रसिद्ध आहे. रांचीपासून पश्चिमेस सु. १६ किमी. अंतरावर सुवर्णरेखा नदी उगम पावते. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मूळच्या ‘ आर्ची ’ गावाच्या नावावरुन यास रांची नाव पडले असावे. ‘रंची नामक आदिवासीने वसविले म्हणून रांची,’ अशीही आख्यायिका आहे. शहरात १८६९ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली. १९१२–१६ या काळात रांची ही बिहार व ओरिसा प्रांतांची संयुक्त राजधानी होती. त्यानंतर १९५६ पर्यंत ती याच प्रांतांची उन्हाळी राजधानी होती. सांप्रत ती बिहार राज्याची उन्हाळी राजधानी आहे. दुसऱ्या महायुद्धकाळात तसेच पुढे १९५४ पर्यंत रांची हे भारतीय भूसेनेच्या पूर्व विभागाचे मुख्यालय होते. औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्ट्या रांचीला मोठे महत्त्व आहे. ‘राष्ट्रीय कोळसा विकास निगम,’ ‘अवजड अभियांत्रिकी निगम’ व ‘हिंदुस्थान स्टील कंपनी’ यांची मुख्यालये रांचीमध्ये आहेत. पोलाद, यांत्रिक अवजारे, कोक, लाख, रेशीम तयार करणे इ. उद्योगधंदे शहरात मोठ्या प्रमाणावर चालतात. यांत्रिक अवजारांच्या कारखान्यांसाठी तर रांची भारतात प्रसिद्ध असून ते प्रामुख्याने हतिया उपनगरात एकटवलेले आहेत. येथे रेडियम व लाख संशोधन केंद्रे आहे. परिसरात कोळशाचे साठे व चहाचे मळे आहेत. कापूस, चहा, तांदूळ, धान्य, तेलबिया, हस्तकलावस्तू इत्यादींचा व्यापार शहरात चालतो. हजारीबाग, डाल्टनगंज, छैवास व मुरी या ठिकानांशी रांची मुख्य रस्त्यांनी जोडलेले असून मुरी-लोहारदगा हा लोहमार्ग फाटा रांचीवरुन जातो. तसेच तेथे विमानतळही आहे. मोराबडी टेकडीजवळ रांची विद्यापीठ (१९६०) आहे. शहरात एकूण तेरा महाविद्यालये असून त्यांपैकी विधी, शिक्षक प्रशिक्षण आणि वैद्यक यांचे प्रत्येकी एक व एक महिला महाविद्यालय आहे. यांशिवाय अंधशाळा, मिशनशाळा, संगीतशाळा, कृषी, अभियांत्रिकी व इतर अनेक शिक्षणसंस्था शहरात आहेत. लगतच्या कांके येथे एक मनोरोग शिक्षणसंस्था व रुग्णालय आहे. ख्रिश्चन मिशनचे हे विभागीय केंद्र आहे. शहराचा विस्तार मुख्यतः छैबासकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने झालेला दिसतो. उत्तरेकडील अपर बझार व ‘रांची हाट’ भागांत घाऊक व्यापाराचे केंद्रीकरण झालेले आढळते तर प्रशासकीय कार्यालये दक्षिणेकडील दोरंडा व हिनू भागांत तसेच उत्तर भागात आढळतात. रांचीमध्ये कॅंटोनमेंटचाही समावेश होतो.
चर्च, शासकीय इमारत व इतर अनेक नव्या-जुन्या सुंदर वास्तू शहरात पहावयास मिळतात. हतिया धरण, जगन्नाथपूर मंदिर, मोराबडी टेकडी किंवा टागोर टेकडी, रांची धरण, रांची टेकडी व सरोवर ही रांचीच्या परिसरातील उल्लेखनीय स्थळे आहेत.
चौधरी, वसंत