स्कँडिनेव्हिया : उत्तर यूरोपमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक व भाषिक प्रदेश. स्कँडिनेव्हिया प्रदेशात नॉर्वे, स्वीडन व डेन्मार्क या देशांचा समावेश होतो. यांशिवाय काही प्राधिकरणाच्या युक्तिवादांन्वये भूशास्त्रीय, ऐतिहासिक व आर्थिक दृष्टीने फिनलंडचा व मानवशास्त्रीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक व भाषाशास्त्रविषयक दृष्टिकोनातून आइसलँड व फेअरो बेटांचा स्कँडिनेव्हिया प्रदेशात समावेश करतात. यास नॉर्डेन असेही म्हणतात.

सांस्कृतिक व भाषिक संकल्पनेवरून या प्रदेशास स्कँडिनेव्हिया या नावाने संबोधण्यात येते. काही इतिहासकारांच्या मते प्रारंभीच्या भाषिक व वाङ्मयीन स्कँडिनेव्हियावादी चळवळीत सामूहिक वारसा याबाबतच्या संकल्पना रूढ व वृद्धिंगत होऊ लागल्या होत्या, तेव्हा अठराव्या शतकात या प्रदेशातील देशांना स्कँडिनेव्हिया व तेथील लोक, त्यांची भाषा व संस्कृती यांस स्कँडिनेव्हियन असे संबोधण्यात येत होते. ऐतिहासिक उल्लेखांवरून यास स्कँडिया असेही म्हटले जात असल्याचे दिसते.

भौगोलिक दृष्टिकोनातून स्कँडिनेव्हिया द्वीपकल्पाच्या सीमा निश्चित केल्यास या द्वीपकल्पाच्या पूर्वेस बॉथनियाचे आखात व बाल्टिक समुद्र, दक्षिणेस स्कॅगरॅक व बाल्टिक समुद्र, पश्चिमेस अटलांटिक महासागराचे उत्तर व नॉर्वेजियन समुद्र आहेत.या द्वीपकल्पाचे क्षेत्रफळ ७,५०,००० चौ.किमी.आहे.याची लांबी सु.१,८५० किमी.व रुंदी सु.३७० किमी.ते ८०५ किमी.पर्यंत आहे.

पहा : डेन्मार्क नॉर्वे स्वीडन.

गाडे, ना. स.