रक्तरसविज्ञान : ज्या शास्त्रात रक्तरसाचा, विशेषेकरून ⇨रोगप्रतिकारक्षमतेसंबंधी व प्रयोगशालीय विश्लेषणावर अधिक भर देऊन अभ्यास केला जातो त्या शास्त्राला ‘रक्तरसविज्ञान’ म्हणतात. वैद्यकशास्त्रात रक्तरसविज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. ⇨ रक्तक्लथनानंतर जो क्लथ (गुठळी) तयार होतो तो काही मिनिटांतच आकुंचन पावून जो द्रव उरतो त्याला ‘रक्तरस’ म्हणतात. रक्तद्रव व रक्तरस यांमधील मोठा फरक म्हणजे पहिल्यात सर्व रक्तक्लथनकारक तसेच असतात, तर दुसऱ्यात त्यांचा संपूर्ण अभाव असतो. प्रामुख्याने रक्तद्रवातील फायब्रिनोजेन रक्तरसात नसते. रक्तरसामध्ये जे ⇨प्रतिपिंड असतात ती ग्लोब्युलिने (एक प्रकारची प्रथिने) असतात. या प्रथिनांचा प्रयोगशालीय अभ्यास रक्तरसविज्ञानात प्रामुख्याने केला जातो. प्रतिपिंड अनेक प्रकारच्या ⇨प्रतिजनांविरुद्ध विशिष्ट प्रतिक्रिया करू शकतात. या प्रतिक्रिया रोगप्रतिकारक्षमतेचे महत्त्वाचे अंग असल्यामुळे या प्रथिनांना ‘इम्युनोग्लोब्युलिने’ (Ig) असेही म्हणतात. या सर्व प्रतिपिंडांचे रेणू मोठ्या आकारमानाचे असतात. सर्वांत लहान आकारमानाच्या रेणूचा रेणुभार १,५०,००० तर सर्वांत मोठ्या रेणूचा रेणुभार १० लाखांपर्यंत असू शकतो. प्रतिपिंडांचा विशेष गुणधर्म म्हणजे विशिष्ट प्रतिजनाबरोबरच प्रतिक्रिया होणे हा असल्यामुळे प्राणिशरीर दहा लाखांपेक्षा अधिक निरनिराळ्या प्रतिपिंडांची निर्मिती करू शकते.
प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रिया अतिविशिष्ट असतात. कोणताही बाह्य पदार्थ जो शरीराची रोगप्रतिकारक्षमता यंत्रणा आपला अथवा स्वकीय नसल्याचे ओळखते आणि ताबडतोब त्याविरुद्ध प्रतिकार करू लागते, त्याला ‘प्रतिजन’ म्हणतात. प्रतिजने विद्राव्य (विरघळणाऱ्या) स्वरूपात किंवा कण स्वरूपात असू शकतात आणि ती प्रथिने किंवा पॉलिसॅकॅराइडे असतात. ज्या प्रतिजनामुळे प्रतिपिंड निर्माण झाला असेल त्या प्रतिजनाशीच त्याची प्रतिक्रिया होते. आकृतीमध्ये काल्पनिक रासायनिक विन्यासाच्या (मांडणीच्या) प्रतिजन-प्रतिपिंड रेणूंची प्रतिक्रिया शक्यता दर्शविली आहे.
रक्तरसविज्ञानात रक्तरस परीक्षेकरिता या प्रतिक्रिया वैशिष्ट्यांचा उपयोग करून घेतात. सूक्ष्मजंतुजन्य रोगामध्ये सूक्ष्मजंतू (प्रतिजन) शरीरात प्रविष्ट झाल्यानंतर विशिष्ट प्रतिपिंडांची निर्मिती होते व ते प्रयोगशालीय तपासणीत ओळखता येतात. यामुळे त्या सूक्ष्मजंतूमुळे पूर्वी रोग होऊन गेला असल्याचे किंवा तपासणी काळात तो चालू असल्याचे समजते.
रक्तरस परीक्षेकरिता रक्त काळजीपूर्वक घ्यावे लागते. निश्चित निदानाकरिता रोगाच्या सुरुवातीस, दोन आठवड्यांनंतर आणि चार आठवड्यांनंतर रक्तरस तपासावा लागतो. नीलेतील रक्त निर्जंतुकीकरणाची काळजी घेऊनच एका निर्जंतुक परीक्षानलिकेत घेतात आणि ते क्लथित झाल्यानंतर क्लथ नलिकाभित्तीपासून अलग करून नलिका रात्रभर शीतपेटीत ठेवतात. नंतर नलिका केंद्रोत्सारकात [⟶ केंद्रोत्सारण] घालून फिरवून स्वच्छ व रक्तविलयनरहित (रक्तातील तांबड्या कोशिकांतील-पेशींतील-रक्तारुण म्हणजे हीमोग्लोबिन हे प्रथिन मुक्त न झालेल्या अवस्थेतील) रक्तरस तपासतात. जरूर वाटल्यास तपासणी करीपर्यंत —२०0से. तापमानात नलिका ठेवतात.
रक्तरस परीक्षा अनेक पद्धतींनी करतात. या पद्धती बऱ्याच क्लिष्ट असल्याने त्यांपैकी काहींच्या केवळ नावांचा उल्लेख येथे केला आहे : (१) समूहन, (२) पूरक बंधन (स्थिरीकरण), (३) ⇨विद्युत् संचारण, (४) अवक्षेपण, (५) एंझाइम-संलग्न प्रतिरक्षा अधिशोषक आमापन (एलिसा), (६) रेडिओ प्रतिरक्षा-आमापन.
रक्तरस परीक्षांचा उपयोग वैद्यकात पुढील रोगांमध्ये प्रतिजन व प्रतिपिंड यांच्या निश्चीतीसाठी होतो : ⇨रिकेट्सियाजन्य रोग, ⇨इन्फ्ल्यूएंझा, ⇨पीतज्वर, ⇨गोवर, ⇨बालपक्षाघात, संधिवाताभ संधिशोध [⟶ संधिशोध], ⇨उपदंश, रोगप्रतिकारक्षमता-न्यूनताजन्य लक्षणसमूह [एड्स ⟶ रोगप्रतिकारक्षमता-न्यूनता-जन्य रोग].
वैद्यकात वरील रोगांशिवाय काही रक्तरस परीक्षा निदानोपयोगी आहेत. रक्तरसात अनेक एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारी प्रथिने) सतत प्रवाहित असतात. उदा., ॲमिलेज नावाचे पचनोपयोगी एंझाइम पिठूळ पदार्थाच्या पचनास उपयुक्त असते (लाळ व अग्निपिंडरसात हे एंझाइम असते). अग्निपिंडशोथ [अग्निपिंडाची दाहयुक्त सूज ⟶ अग्निपिंड] या विकृतीत रक्तरसातील या एंझाइमाचे प्रमाण ६ ते २४ तासांत वाढू लागून नंतर ते मूत्रातून उत्सर्जित होते. ⇨अष्ठिला ग्रंथीच्या कर्करोगात अम्ल फॉस्फेटेज या एंझाइमाचे प्रमाण १० ते ७५% रुग्णांमध्ये रोग प्रक्षेपित झाल्यास वाढलेले आढळते. विशिष्ट उपचारानंतर (उदा., ⇨स्त्रीमदजन या हॉर्मोनाच्या चिकित्सेनंतर) या एंझाइमाची रक्तरसातील पातळी प्राकृतिक (सर्वसाधारण) बनते. अशा प्रकारे निदान व उपचारांचा परिणाम अजमावण्याकरिता रक्तरस परिक्षा उपयुक्त असतात.
एंझाइमाप्रमाणेच हॉर्मोनेही रक्तरसात असतात. त्यांच्या प्राकृतिक प्रमाणातील बदल रक्तरस परीक्षांद्वारे तपासता येतात. त्यामुळे ⇨अंतःस्रावी ग्रंथींच्या विकृतींच्या निदानास मदत होते.
पहा : प्रतिजन प्रतिपिंड रोगप्रतिकारक्षमता.
संदर्भ : 1. Krupp, M. A. and others, Physician’s Handbook, Singapore, 1982.
2. Walton, J. and others, Ed., The Oxford Companion to Medicine, Oxford, 1986
3. Widmann, F. K. Clinical Interpretation of Laboratory Tests, Singapore, 1984.
भालेराव. य. त्र्यं.
“