यौवनलोपीग्रंथि : ( थायमस ग्लँड). उरोस्थीच्या ( छातीच्या पुढच्या बाजूला मध्यभागी असलेल्या चपट्या हाडाच्या) मागे वरच्या भागात अग्र व ऊर्ध्व ( वरच्या) मध्यावकाशात ( दोन्ही बाजूंच्या फुप्फुसावरणामधील पोकळ जागेत) असलेल्या ⇨  अं तः स्रावी ग्रंथी ला ‘यौवनलोपी ग्रंथी ’ म्हणतात. यौवनावस्थेत या ग्रंथीचा अपकर्ष होऊन ती आकारमानाने लहान बनते यावरून तिला हे नाव दिले आहे. जन्मवेळी तिचे वजन १० ते १५ ग्रॅ. असून यौवनारंभापर्यंत वाढत जाऊन ३० ते ४० ग्रॅ. होते. त्यानंतर ते हळूहळू कमी होत जाऊन पुष्कळसा भाग वसामय ( स्निग्ध पदार्थयुक्त) बनतो व प्रौढ वयाच्या मध्यापर्यंत वजन १० ग्रॅ. होते. कधी कधी ते २५ ते ३० ग्रॅ. पर्यंत राहते. काही विकृती या ग्रंथीच्या जलद निवर्तनास कारणीभूत असतात व म्हणून हे वजनातील फेरबदल संभवतात.

                    

शिशुवयात ही ग्रंथी गुलाबी करड्या रंगाची व मऊ असून तिचा पृष्ठभाग अनेक खंडकांचा बनलेला दिसतो. ती दोन पिरॅमिडांच्या आकाराच्या असमान खंडांची बनलेली असते आणि ते एकमेकांस  अवकाशी ऊतकाने ( ज्यातील घटक एकमेकांपासून दूरदूर असल्यामुळे पोकळसर असल्यासारख्या वाटणाऱ्या ऊतकाने म्हणजे कोशिकांच्या  –  पेशींच्या  –  समूहाने) जोडलेले असतात. वर्णनाकरिता तिचा उल्लेख एक अवयव म्हणून केलेला असला ,  तरी ती दोन स्वतंत्र भागांपासून बनलेली असून तिचे उजवा व डावा असे दोन खंड ओळखता येतात. खालच्या बाजूस ती चौथ्या पर्शुकीय उपस्थीपर्यंत ( बरगडीच्या कुर्चेपर्यंत) पसरलेली असते. वरच्या बाजूस तिची निमुळती टोके मानेत गेलेली असतात व ती कधी कधी थेट ⇨ अवटू ग्रंथी स भिडलेली असतात.

                    

यौवनलोपी ग्रंथीच्या आकारावर तिच्या जवळ असलेल्या शरीरभागांचा परिणाम होतो ,  उदा. ,  पश्चभागी परिहृदय ( हृद्रयाभोवतील पातळ पटलमय पिशवी) ,  महारोहिणी चाप व तिच्या शाखा आणि श्वासनाल ( कंठापासून फुप्फुसापर्यंत जाणारी उपास्थिमय व पटलमय नळी) हे भाग संलग्न असल्यामुळे त्यांचा ठसा उमटतो.

                 

  रचना : प्रत्येक खंड तंतुमय ऊतकाच्या पातळ संपुटात असतो. या बाह्याच्छादनापासून आत अनेक विभाजक पट जाऊन अनेक असमान खंडिका बनतात. प्रत्येक खंडिका ०·  ५-२·  ० मिमी. व्यासाची असून तिचे कोशिकांनी खच्चून भरलेला बाह्यक व आतील विरल कोशिकामय गाभा ( मध्यक) असे भाग ओळखता येतात. दोन्ही भागांत दोन प्रकारच्या प्रमुख कोशिका असतात  : ( १) शाखित अधिस्तरीय ( एकमेकींना अगदी लागून असलेल्या कोशिकांनी युक्त व आंतर-कोशिका-द्रव्य अत्यल्प असलेल्या अशा आच्छादक ऊतकातील) कोशिका आणि ( २) लसीका-कोशिका [ ⟶ लसीका तंत्र ] .  गाभ्यात अनेक कणिका विखुरलेल्या असतात आणि त्यांना ए. एच्‌. हॅस्ल या इंग्रज वैद्यांच्या नावावरून ‘हॅस्ल कणिका ’ म्हणतात.

                 

  रक्त व तंत्रिका पुरवठा : आंतरिक उरोरोहिणी व अधो-अवटु-रोहिणी त्यांच्या शाखांमार्फत या ग्रंथीला शुद्ध रक्त पुरवतात. ग्रंथीपासून निघणाऱ्या नीला ह्या शीर्ष भुजा नीला ,  आंतरिक उरोनीला व अधो-अवटु-नीला यांमध्ये अशुद्ध रक्त वाहून नेतात. अनुकंपी तंत्रिका तंत्र व प्राणेशा तंत्रिका ह्या या ग्रंथीला तंत्रिका पुरवठा करतात [ ⟶  तंत्रिका तंत्र ] .  यांशिवाय मध्यपटल तंत्रिकेच्या काही शाखा संपुटात गेलेल्या असतात.

                 

  कार्य : अनेक वर्षे या ग़्रंथीच्या कार्याविषयी अत्यल्प ज्ञान होते. अलीकडील नव्या संशोधन पद्धतीमुळे तिच्या कार्याविषयी बरीच नवी माहिती मिळाली आहे. ( १) लसीकाभ ऊतकाशी ( उदा. ,  ग्रंथीशी) साम्य असणारी ही ग्रंथी लसीका-कोशिकांच्या उत्पादनावर नियंत्रण ,  रक्त प्रवाहातील एकूण लसीका-कोशिकांची संख्या कायम ठेवणे ,  तसेच त्यांना अनेक प्रतिजनजन्य उद्दीपनांना तोंड देऊन प्रतिक्रियात्मक क्रियांकरिता नेहमी तयार ठेवणे ,  ही महत्त्वाची कार्ये करते. ( २) नवजात अर्भकावस्थेत लसीकाभ ऊतकाची योग्य वाढ होण्याकरिता ही ग्रंथी आवश्यक असते. या वयात ग्रंथीचे उच्छेदन केल्यास परिसरीय लसीकाभ ऊतकाचा ऱ्हा स होत जाऊन क्षीणता व संसर्गजन्य रोग निर्माण होतात. ( ३) तरुणपणी ग्रंथीचे उच्छेदन केल्यास अज्ञात प्रतिजनाविरुद्ध झगडण्याची शरीराची शक्ती ( परिणामकारक प्रतिक्रिया) नाहीशी होते. ( ४) लिम्फोपोइटीन नावाचे हॉर्मोन ( उत्तेजक अंतःस्राव ) मध्यकातील कोशिका निर्माण करीत असाव्यात आणि ते लसीका-कोशिकाच्या उत्पादनासाठी ग्रंथीच्या बाह्यकातील कोशिकांना उद्दीपित करीत असावे. नव्याने निर्माण झालेल्या लसीका-कोशिकांमध्ये प्रतिक्रिया क्षमता निर्माण करणारा समर्थता-उत्तेजक पदार्थही या ग्रंथीतच उत्पन्न होत असावा. ( ५) बाह्यकातील लसीका-कोशिका अस्थिमज्जेतील ( लांब हाडांतील व काही चपट्या हाडांतील वाहिनीयुक्त संयोजी ऊतकातील) स्कंध कोशिकांपासून ( रक्तातील इतर कोशिका निर्माण करण्याची क्षमता असलेल्या पूर्वगामी कोशिकांपासून) निर्माण झालेल्या असतात आणि निर्मितीनंतर त्या बाह्यकात येतात. त्यांपैकी जवळजवळ ९०% अत्यल्पजीवी ( ३ ते ५ दिवस) असतात. उरलेल्या दीर्घजीवी ५% कोशिका रक्तप्रवाहात शिरतात व त्या प्रतिक्रियाक्षम असतात. त्या कोणत्याही नव्या प्रतिजनाविरुद्ध क्रियाशील होऊ शकतात. ( ६) रक्तातील प्रतिजने यौवनलोपी ग्रंथीच्या बाह्यकातील कोशिकांवर परिणाम करीत नाहीत. ( ७) ग्रंथीतील लसीका-कोशिकांचे उत्पादन ,  निवर्तन व नाश सर्वस्वी आंतरिक अथवा अंगभूत असतात.

 यौवनलोपी ग्रंथीच्या थायमस (thymus)  या इंग्रजी नावातील टी (T)  या आद्याक्षरावरून ग्रंथीतील पूर्वगामी कोशिकांपासून तयार होणाऱ्या लसीका-कोशिकांना टी-लसीका-कोशिका ( किंवा थायमोसाइट) म्हणतात. ग्रंथीवर अवलंबून नसलेल्या व शरीरात इतरत्र ( उदा. ,  श्लेष्मपुटीत-एकमेकांवर सरकणाऱ्या दोन पृष्ठभागांच्या मधील बुळबुळीत द्रवयुक्त पिशवीत-अथवा बर्सामध्ये) तयार होणाऱ्या लसीका-कोशिकांना बी-लसीका-कोशिका (bursa  या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरावरून) म्हणतात. या दोन्ही प्रकारच्या कोशिका शरीराच्या ⇨ रोगप्रतिकारक्षमता    कार्यात महत्त्वाचे कार्य करतात. टी-कोशिकांचे कार्य भ्रूणावस्थेत ५– ७ आठवड्यापासून सुरू झाल्याचे आढळले आहे. आठ ते नवव्या आठवड्यात ग्रंथीमध्ये लसीकाभ ऊतकाचा शिरकाव होऊ लागतो व बाराव्या आठवड्यांत ती पूर्ण वाढलेल्या ग़्रंथीसारखी होते. अकाली जन्म झालेल्या मुलामध्येही त्वचा कलम अस्वीकृत झाल्याचे आढळले आहे. यावरून ही ग्रंथी गर्भावस्थेपासूनच कार्यशील असते ,  असे दिसूनयेते.

  अलीकडे औषधिविज्ञानात काही नव्या औषधांची भर पडली आहे. त्यात  ‘थायमोसीन’ हे प्रथिन हॉर्मोन प्राण्यांच्या व मानवी यौवनलोपी ग्रंथीपासून शुद्ध स्वरूपात मिळविले गेले असून ते टी-कोशिका न्यूनताजन्य विकृतीत वापरले जात आहे. पूर्वावस्थेतील या कोशिकांना ते लवकर परिपक्वता प्राप्त होण्यास मदत करते.

               

  अगदी अलीकडेच निर्माण झालेल्या ‘ॲक्वायर्ड इम्यूनो डिफिशिअन्सी सिंड्रोम ’  अथवा ‘एडस्‌’ अथवा उपार्जित रोगप्रतिकारक्षमता न्यूनताजन्य [ ⟶ रोगप्रतिकारक्षमता] या अल्पावधीत मृत्यू ओढवणाऱ्या गंभीर रोगामध्ये एचटीएलव्ही ( ह्यूमन टी-लिम्फोसाइट व्हायरस या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरांवरून दिलेले नाव) नावाचे व्हायरस टी-लसीका-कोशिकांवर दुष्परिणाम करतात. यावरून टी-लसीका-कोशिकांची जीवनावश्यकता व पर्यायाने यौवनलोपी ग्रंथीचे महत्त्व लक्षात येते.

               

  यौवनलोपी-ग्रंथि -अजनन ही विकृती जन्मजात असू शकते. क्वचित आढळणाऱ्या या विकृतीला ए. एम्‌. डी. जॉर्ज या अमेरिकन बालरोगतज्ञांच्या नावावरून ‘डी-जॉर्ज लक्षणसमूह ’ म्हणतात. तीमध्ये नवजात अर्भकात हृद् विकृती ,  विशेषेकरून मोठ्या रक्तवाहिन्यांचे दोष ,  कॅल्शियम न्यूनताजन्य आकडी इ. लक्षणे आढळतात. टी-कोशिकांचा अभाव असतो अशा काही रुग्णांमध्ये भ्रूणीय यौवनलोपी ग्रंथीचे रोपण टी-कोशिका उत्पादनास मदत करीत असल्याचे आढळले आहे.

  संदर्भ  :  1.  Petersdorf, R.G. and others, Ed., Harrison’s Principles of Internal Medicine, Singapore, 1983.

      2. Warwick, R. Williams P.L. Ed., Gray’s Anatomy, Edinburgh, 1973.

      3. Weatherall, D. J. and others, Ed., Oxford Textbook of Medicine, Tokyo, 1984.

 भालेराव ,  य. त्र्यं.