गुरुपौर्णिमा : आषाढ महिन्यातील पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. व्यासांनी महाभारत लिहिले. ते गुरुंचेही गुरू, भारतवर्षाचे गुरू मानले जातात म्हणून या दिवशी व्यासमहर्षींची तसेच दीक्षा गुरू व मातापिता यांची पूजा करून, त्यांना वंदन करण्याची पूर्वापार प्रथा आहे. ज्या गुरूजवळ विद्या संपादन केली जाते त्या गुरूस गुरुदक्षिणा देऊन, त्याला संतुष्ट करून त्याचा आशीर्वाद घेतल्याने विद्या सफल होते, अशी श्रद्धा आहे.

आद्य शंकराचार्य हे व्यासांचेच अवतार असल्याची धारणा संन्याशांत असल्यामुळे, ते या दिवशी व्यासपूजा म्हणून शंकराचार्यांची षोडशोपचारे पूजा करतात. तमिळनाडूत जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेस व्यासपूजा होते. दक्षिण भारतातील शंकराचार्यांच्या शृंगेरी आणि कुंभकोणम् ह्या पीठांत व्यासपूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

 

याच दिवशी गौतम बुद्धाने धर्मचक्रपरिवर्तन केले. जैन लोकही या दिवशी उपवास करून जिनपूजा करतात म्हणून हिंदू, बौद्ध व जैन धर्मांत ह्या दिवसास विशेष महत्त्व आहे.

करंदीकर, ना. स.