हायडल्बर्ग :जर्मनीच्या बाडेन-वर्टेंबर्ग राज्यातील प्रमुखशहर. लोकसंख्या १,५०,३३५ (२०१२). हे फ्रँकफुर्टच्या दक्षिणेस७७ किमी.वर नेकार नदीकिनारी वसलेले आहे. र्हीनिश पॅलॅटिनेट प्रदेशाची राजधानी व पॅलॅटिनेटच्या काउंटचे निवासस्थान तेराव्या शतकाच्या प्रारंभा-पासून १७२० पर्यंत येथे होते. तीस वर्षीय युद्धात (१६१८–४८) व फ्रान्सबरोबरच्या १६८९ व १६९३ च्या युद्धांत शहराची अतोनात हानी झाली होती. हे शहर १८०२-०३ मध्ये बाडेनच्या आधिपत्यात होते. दुसऱ्या महायुद्धात तुलनेने कमी हानी झालेल्या जर्मनीतील शहरांत याची गणना होते. १९४५ मध्ये हे अमेरिकन सैन्याच्या अखत्यारित होते. त्या वेळी हे अमेरिकन सैन्याचे महत्त्वाचे केंद्र होते. विसाव्या शतकात याची विशेष भरभराट झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर येथे अनेक उद्योगधंदेविकसित झालेले असून सिमेंट, कापड, विद्युत्साहित्य, वैज्ञानिक उपकरणे, तंबाखू , चामड्याच्या वस्तू , यंत्रसामग्री, लाकडी वस्तू इ. निर्मितिउद्योग येथे चालतात. पहिला रूप्रेक्ख्ट याने १३८६ मध्ये येथे हायडल्बर्ग विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाच्या भूशास्त्रीय-पुराजीवविज्ञान संस्थेत हायडल्बर्ग शहरानजीक १९०७ मध्ये सापडलेले सु. ४,००,००० वर्षां-पूर्वीचे जीवाश्म तसेच ‘हायडल्बर्ग जॉ’ (हायडल्बर्ग मानवाचा जबडा) जतन करण्यात आलेले आहे.
होली घोस्ट चर्च (१४००–३६), सेंट पीटर प्रॉटेस्टंट चर्च (१४८५), द मॅरस्टॉल (१५९०), रिनेसन्स शैलीतील घर ‘झूम रिटर’ (१५९२), नगर भवन (१७०१–०३), जेझुइट चर्च (१७१२), आल्टे-ब्रुक पूल (१७८६–८८) ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. तसेच येथील नदीकिनारी १०० मी. उंचीवर कलात्मक, लाल वालुकाश्मात बांधलेला तेराव्या शतकातील किल्ला आहे. फ्रेंचांच्या १६८९ व १६९३ मधील हल्ल्यांत व १७६४ मध्ये वीज कोसळल्याने या किल्ल्याचे नुकसान झाले. तरीही लाल वालुकाश्मातील या किल्ल्याचे बांधकाम हे शहराचे वैभव आहे. किल्ल्याच्या तळघरात १,८५,५०० लि. क्षमता असलेले १७५१ मधील मोठे ‘हायडल्बर्ग टन’ (दारूचे पिंप) आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या किल्ल्यास भेट देतात.
गाडे, ना. स.
“