येरेव्हान : सोव्हिएट युनियनच्या नैर्ऋत्य भागातील ॲरारात पर्वताच्या पायथ्याशी असलेले प्रसिद्ध औद्योगिक शहर आणि आर्मेनिया या घटक राज्याची राजधानी. ते तुर्कस्तानच्या सरहद्दीपासून सु. २३ किमी.वर झांगा (रझदान) नदीच्या डाव्या काठावर वसले आहे. ते मॉस्कोच्या आग्नेयीस सु. १,७७० किमी.वर आहे. लोकसंख्या १०,९५,००० (१९८३ अंदाज). उंची १,०४२ मी. सस. येरेव्हान हे कॉकेशसमधील व्यापारी मार्गावरील मोक्याचे ठिकाण असल्यामुळे मध्ययुगात लष्करी व ऐतिहासिक दृष्ट्‌या त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले. भारत व ट्रान्सकॉकेशिया यांमधील व्यापारावर यामुळे वर्चस्व मिळविणे सुलभ झाले. साहजिकच या प्रदेशावर पार्थियन, रोमन, इराणी, अरब, मंगोल, तुर्क इत्यादींनी प्राचीन काळापासून अनेक आक्रमणे केली. येथील प्राचीन येर्बूनी किल्ल्यातील अवशेषांवरून इ. स. पू. आठव्या शतकात हे शहर लष्करी दृष्ट्या महत्त्वाचे होते, हे दिसते. यानंतर सातव्या शतकात ते इराणच्या अंमलाखाली गेले. आर्मेनियाच्या आधिपत्यासाठी इराणी आणि अरब यांत लढाया झाल्या. ८८६ ते १०४६ यांदरम्यान स्थानिक राजांची सत्ता या प्रदेशावर होती. चौदाव्या शतकाच्या अखेरीस तैमूरलंगाने आर्मेनिया पादाक्रांत करून येथील लोकांची कत्तल केली. त्याच्या साम्राज्यानंतर तुर्कस्तान व इराण यांनी आलटून-पालटून या प्रदेशावर अधिसत्ता गाजविली. ऑटोमन सम्राटांनी येथील किल्ल्यावर सतराव्या शतकात ठाणे ठेवले. ऑटोमन तुर्कांकडून रशियाने येरेव्हान काबीज केले (१८२७) आणि तुर्कमांचाई तहानुसार ते रशियाकडे गेले (१८२८). १८७७-७८ च्या रशियन-तुर्की युद्धात पुन्हा ते रशियाने घेतले व पहिल्या महायुद्धानंतर ते आर्मेनियासह रशियाला देण्यात आले व आर्मेनियाची राजधानी करण्यात आले (१९१८–२०).

दुसऱ्या महायुद्धानंतर या ऐतिहासिक शहराची झपाट्याने वाढ झाली आणि बाहेरचे अनेक आर्मेनियन येरेव्हानमध्ये येऊन स्थायिक झाले. येरेव्हानला देशातील एक प्रमुख सांस्कृतिक व औद्योगिक केंद्र म्हणून महत्त्व प्राप्त झाले. येथे आर्मेनियन राज्य विद्यापीठ (१९२१), तंत्रशाळा, कृषी, वैद्यक, शिक्षक प्रशिक्षण, कला, शास्त्र आदी अनेक महाविद्यालये तसेच राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, क्रांतिकारकांचे संग्रहालय, सार्वजनिक ग्रंथालय इ. शैक्षणिक-सांस्कृतिक संस्था आहेत. यांशिवाय चाळीस संशोधन संस्था असून त्यांपैकी रशियाच्या विज्ञान अकादमीची प्रमुख शाखा (१९४३), मातेनादरन अभिलेखागार (यात लाझारस गॉस्पेल (८८७) सारखी प्राचीन हस्तलिखिते), ट्रॉपिकल इन्स्टिट्यूट या मान्यवर संस्था संशोधन करतात. शहरातील जुन्या इमारतींत येर्बूनीचा किल्ला, ब्लू मॉस्क प्रसिद्ध असून आधुनिक इमारतींत पारंपरिक आर्मेनियन वास्तुशैलीची छटा दृग्गोचर होते.

येरेव्हानचा परिसर निसर्गरम्य आहे. सभोवार ज्वालामुखी टेकड्या, फळांच्या बागा आणि रस्त्यांच्या दुतर्फा झाडे असून ताग, भात, कापूस ही पिके सभोवारच्या परिसरात पिकतात.

झांगा नदीवर अनेक जलविद्युत्‌ प्रकल्प रशियाने बांधले आहेत. त्यांतील झांगा कॅस्केड प्रकल्प येरेव्हानमध्येच असल्यामुळे येथे अनेक कारखाने निर्माण झाले. त्यांतून प्रामुख्याने विद्युत्‌ उपकरणे, मोटारी, ट्रॅक्टर व त्यांचे सुटे भाग, रसायने, रासायनिक खते, संश्लिष्ट रबर, रंग, कॉस्टिक सोडा, काचेची तावदाने, घड्याळे इत्यादींचे उत्पादन होते. टायर व केबली यांच्या निर्मितीसाठी येरेव्हानची ख्याती आहे. ब्रँडीच्या उत्पादनासाठी येरेव्हान प्रसिद्ध असून इतर मद्ये व डबाबंद फळे यांचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.

देशपांडे, सु. र.