युंगफ्राऊ : स्वित्झर्लंडच्या दक्षिण-मध्य भागातील एक निर्सगरम्य शिखर. बर्नीज आल्प्समधील हे शिखर सस.पासून ४,१५८ मी. उंचीचे असून इंटरलाकेन या रम्य ठिकाणाच्या आग्नेयीस सु. १९ किमी. वर आहे.

हे शिखर वर्षातील बराच काळ हिमाच्छादित असते. इ. स. १८११ मध्ये व्हॉलेइसकँटनच्या बाजूने मायर या स्विस बंधूंनी हे प्रथम सर केले. त्यानंतर १८६५ मध्ये पश्चिमेकडील अत्यंत अवघड बाजूने सर यंग जॉर्ज व एच्‌. बी. जॉर्ज या ब्रिटिश गिर्यारोहकांनी जिंकले. १९२७ मध्ये दक्षिण बाजूनेही यशस्वी चढाया झाल्या. याच्या परिसरातील सृष्टिसौंदर्यामुळे हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनले आहे. आयगर व मंक शिखरांदरम्यान सु. ७ किमी. लांबीचा बोगदा काढण्यात आला असून त्यातून युंगफ्राऊ या खिंडीपर्यंत (उंची ३,५५७ मी.) लोहमार्ग नेण्यात आला आहे (१८९६ ते १९१२). ही खिंड युंगफ्राऊ व मंक शिखरांदरम्यान असून लोहमार्ग असलेले यूरोपातील हे सर्वांत उंच ठिकाण मानले जाते. येथे पर्यटकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असून सृष्टिसौंदर्य व हिवाळी खेळांसाठी ते प्रसिद्ध आहे. येथे एक अल्पाइन संशोधन केंद्र आहे. युंगफ्राऊच्या जवळच असलेले स्फिंक्स हे शिखर ३,५७६ मी. उंचीचे असून तेथे एक वातावरणविज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे.

क्षीरसागर, सुधा चौंडे, मा. ल.