वेस्ट ऑरेंज : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यू जर्सी राज्याच्या ईशान्य भागातील एसेक्स परगण्यातील एक नगर. लोकसंख्या ४४,९४३ (२०००). न्यूअर्कच्या वायव्येस १० किमी. ऑरेंज पर्वताच्या पायथ्याशी हे नगर वसलेले आहे. हे न्यूअर्कचे निवासी उपनगर आहे. इ. स. १८६२ मध्ये याची स्थापना करण्यात आली. तोपर्यंत ऑरेंजचाच हा एक भाग होता. १८६३ मध्ये याला वेस्ट ऑरेंज असे नाव देण्यात आले. १९०० मध्ये याला नगराचा दर्जा देण्यात आला.

या शहराच्या लूएलन पार्क या भागात प्रसिद्ध संशोधक टॉमस ए. एडिसनचे १८८७ पासून त्याच्या मृत्यूपर्यंत (१९३१) वास्तव्य होते. ग्लेनमॉंट हे २३ खोल्यांचे त्याचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखले जाते. त्यात ग्रंथालय व प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत एडिसनने ४४ वर्षे वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केले. वेस्ट ऑरेंजमधील बहुतांश उद्योग एडिसनच्या प्रोत्साहनाने उभे राहिले. विद्युत्‌ घटमाला, कार्यालयीन साहित्य, मृत्तिकाशिल्पे, ॲल्युमिनियमची भांडी, रसायने, वस्त्रे, प्लॅस्टिके, विद्युत्‌साहित्य, गणकयंत्रे, औषधे इ. निर्मितीचे उद्योगधंदे येथे आहेत. ईगल रॉक रिझर्व्हेशन ह्या ऑरेंज पर्वतातील १९६ मी. उंचीच्या मोक्याच्या स्थानाचा जॉर्ज वॉशिंग्टनने क्रांतियुद्धकाळात टेहाळणीसाठी वापर केला होता.

चौधरी, वसंत