यंगहजबंड, सर फ्रान्सिस एडवर्ड : (३१ मे १८६३ – ३१ जुलै १९४२). हिंदुस्थानातील एक ब्रिटिश समन्वेषक व सैनिकी अधिकारी. जन्म विद्यमान पाकिस्तानातील मूरी येथे. रॉयल मिलिटरी कॉलेज, (सँढर्स्ट) येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर यंगहजबंड १८८२ मध्ये हिंदुस्थानच्या लष्करात दाखल झाला व १८९० मध्ये राजकीय विभागाकडे त्याची बदली झाली. दरम्यानच्या काळात त्याने मध्य आशियातील काही प्रदेशांचे समन्वेषण केले. ब्रिटिश सरकारचा मँचुरियातील प्रतिनिधी असताना (१८८६-८७) चीनमधील पीकिंगहून सिंक्यांगमार्गे भारतात येताना त्याने मध्य आशियातील आणखी काही प्रदेशांचे समन्वेषण केले. काराकोरममधील मुझताघ खिंडीतून येताना त्याने काराकोरम पर्वतश्रेणी हिंदुस्थान व तुर्कस्तान यांतील प्रमुख जलविभाजक असल्याचे दाखवून दिले, तसेच साल्तोरो खिंडीचा शोध लावला. १८८९ मध्ये ‘जगाचे छप्पर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामीरच्या पठारी प्रदेशाचे त्याने समन्वेषण केले व तेथील हुंझा संस्थानाचीही पाहणी केली. १८९०-९१ मध्ये पुन्हा पामीर प्रदेशाचे त्याने समन्वेषण केले. हुंझाचा ताबा १८९२ मध्ये ब्रिटिशांकडे आल्यावर हा तेथील प्रशासकीय अधिकारी बनला. त्यानंतर वेगवेगळ्या संस्थानांमध्ये राजकीय प्रतिनिधी व अधिकारी म्हणून त्याने काम केले. १८९६-९७ मध्ये लंडन टाइम्सचा ट्रान्सव्हाल व ऱ्होडेशिया येथील वार्ताहर म्हणून काम केले. रशियाचा तिबेटमधील प्रभाव वाढू लागला, तेव्हा जुलै १९०३ मध्ये हिंदुस्थानचा तेव्हाचा व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन याने तिबेटची बाजारपेठ मिळविण्याबाबत बोलणी करण्यासाठी आपला दूत म्हणून २०० शीख संरक्षकांसह याला ल्हासाकडे पाठविले. तथापि तिबेटी शासनाकडून तेथील प्रवेशास त्याला मान्यता मिळाला नाही, तेव्हा कर्नल जेम्स आर. एल्‌. मॅक्डॉनल्ड याच्या नेतृत्वाखाली एक सैन्याची तुकडी व मंडळ ल्हासाकडे पाठविण्याचा निर्णय लंडनमध्ये घेण्यात आला. अनेक अडथळ्यांवर मात करून शेवटी ३ ऑगस्ट १९०४ मध्ये सैन्याच्या तुकडीसह हे मंडळ ल्हासा येथे येऊन दाखल झाले. त्यात सु. ६०० तिबेटी लोकांच्या कत्तली झाल्या. ब्रिटिश व्यापारासाठी तिबेटची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबत ब्रिटन-तिबेट यांदरम्यान बोलणी होऊन ७ सप्टेंबर रोजी तशा आशयाच्या करारावर सह्या झाल्या. तेव्हा यंगहजबंडला लेफ्टनंट कर्नल पदावर बढती व ‘सर’ ही पदवी देऊन गौरविण्यात आले. तथापि या करारासंदर्भात यंगहजबंडने सूचनांचे पालन न केल्याबद्दल त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. याने १९०६– ०९ या कालावधीत ब्रिटिश रहिवासी म्हणून काश्मीरमध्ये वास्तव्य केले. इंग्लंडला परतल्यावर ‘रॉयल जिऑग्राफिकल सोसायटी’ चा तो अध्यक्ष झाला (१९१९), यावेळी त्याने मौंट एव्हरेस्टवर जाण्यासाठी झालेल्या पूर्वीच्या प्रयत्नांविषयीच्या माहितीचे संकलन करण्यास मदत केली व मौंट एव्हरेस्टवरील मोहिमांस उत्तेजन दिले. यंगहजबंडचा विशेष कल प्रवास, तत्त्वज्ञान व गूढवादाकडे होता. १९३९ मध्ये त्याने ‘वर्ल्ड काँग्रेस ऑफ फेथ्‌स’ची स्थापना केली. हार्ट ऑफ काँटिनन्ट (१८९९), इंडिया अँड तिबेट (१९१०), विदिन (१९१२), लाइट ऑफ एक्स्पीरिअन्स (१९२७), लाइफ इन स्टार्स (१९२७), एपिक ऑफ मौंट एव्हरेस्ट (१९२७), लिव्हिंग युनिव्हर्स (१९३३), मॉडर्न मिस्टिक्स (१९३५), सम ऑफ थिंग्ज (१९३९) ही त्याची प्रमुख पुस्तके होत. इंग्लंडच्या डॉर्सेट परगण्यातील लिचिट मिन्स्टर येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Fleming, Peter, Bayonets to Lhasa, Toronto, 1961.

2. Seaver, George, Francis Younghusband : Explorer and Mystic, Murray, 1952.

चौधरी, वसंत