ब्रह्मदेश : आग्नेय आशियातील एक सार्वभौम देश. १०० ते २८० ३०’ उ. आक्षांश न ९२० ते १०१० पू. रेखांश यांदरम्यान पसरलेल्या या देशाची दक्षिणोत्तर कमाल लांबी १,९२० किमी, व पूर्वपश्चिम कमाल रुंदी ९२० किमी. असून क्षेत्रफळ ६,७६,५५२ चौ. किमी. आहे. लोकसंख्या ३,५६,८४,००० (१९८२ अंदाज). ब्रह्मदेशाच्या पश्चिमेस बंगालचा उपसागर व बांगला देश, वायव्येस भारत, उत्तरेस व ईशान्येस चीन, पूर्वेस लाओस, आग्नेयीस व दक्षिणेस थायलंड हे देश व अंदमान समुद्र आहे. रंगून (लोकसंख्या ३१,८८,७८३-१९७९) ही देशाची राजधानी आहे. किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात असलेली रामरी व चेदूबा ही बेटे व अंदमान समुद्रातील मग्वीं द्वीपसमूहाचाही या देशातच समावेश होतो.भूवर्णन :  देशाचा सर्वसाधारणपणे १६०उ. अक्षांशाच्या उत्तरेकडील प्रदेश उंचवट्याचा आहे. हा भाग तिन्ही बाजूंनी नालाकृती पर्वतरांगांनी वेढलेला असून मध्यभागी इरावती, चिंद्विन व सितांग या महत्त्वाच्या तीन नदीप्रणाली आहेत. दक्षिणेकडील तेनासरीम या निमुळत्या अरुंद किनारपट्टीच्या पूर्व भागात तीव्र उताराच्या डौंगररांगा असून  त्या १०० उ. अक्षांशापासून उत्तरेस मार्ताबानच्या आखातापर्यंत पसरलेल्या आहेत. उत्तरेस व दक्षिणेस देशाचा आकार निमुळता होत गेलेला आहे. भूप्रदेशाचा उतार सामान्यपणे उत्तर–दक्षिण असून बहुतेक सर्व नद्या दक्षिणवाहिनीच आहेत.भूरचनेच्या दृष्टीने देशाचे (१) उत्तरेकडील व पश्चिमेकडील पर्वतीय प्रदेश, (२) पूर्वेकडील शानचे पठार व दक्षिणेकडील तेनासरीमची किनारपट्टी, (३) मध्यवर्ती सखल प्रदेश आणि (४) इरावती व सितांग नद्यांचा त्रिभुज प्रदेश, असे चार प्रमुख विभाग पडतात.(१) उत्तरेकडील व पश्चिमेकडील पर्वतीय प्रदेश :  देशाच्या पश्चिम सीमेवर उत्तरेकडील पूटाओ नॉटपासून दक्षिणेस आराकान द्वीपकल्पापर्यंत (नेग्राईस भूशिर) हा प्रदेश पसरलेला आहे. नेग्राईस भूशिरापासून पुढे दक्षिणेस या पर्वतरांगा सागरमग्न झाल्या असून अंदमान समुद्रात त्या अंदमान बेटांच्या रूपाने सागरपृष्ठावर आल्या आहेत. यांची निर्मिती तृतीयक कालखंडात (२,००,००,००० ते ४,००,००,००० वर्षांपूर्वी) झाली असावी. उत्तर भागातील पर्वतश्रेण्यांनी भारत–ब्रह्मदेश यांदरम्यानची सरहद्द निर्माण झाली असून त्या अनुक्रमे, पातकई, लुशाई, नागा, मणिपुर व चीन टेकडया या स्थानिक नावांनी ओळखल्या जातात. दक्षिणेकडील पर्वतीय प्रदेश मात्र पूर्णतः ब्रह्मदेशात मोडत असून तो आराकान योमा (योमा म्हणजे कणा) नावाने ओळखला जातो. आराकान पर्वतामुळे मध्यवर्ती मैदानी प्रदेश पश्चिमेकडील आराकान किनारपट्टीपासून अलग केला आहे. प्रदेशांची उंची व रुंदी उत्तर भागात जास्त असून दक्षिणेकडे ती कमीतकमी होत जाते. उंची पातकई टेकड्यांत ३,६५० मी., चीन व नागा टेकड्यांत १,८०० ते २,४०० मी व आराकान योमामध्ये ९०० ते १,५०० मी. पर्यंत आढळते. सर्व डोंगररांगा माथ्याकडे शंक्काकार असून त्या दुर्गम व दाट जंगलांनी व्यापलेल्या असल्याने पूर्व-पश्चिम वाहतुकीत अडथळा निर्माण झालेला आहे. हा पर्वतमय प्रदेश प्राचीन स्फटिक खडकांचा व पृष्ठभागी घड्यांच्या स्तररचनेचा आहे. ह्काकाबो राझी हे देशातील सर्वोच्च शिखर (५,८८१ मी.) देशाच्या उत्तर टोकाशी आहे. याशिवाय मौंट व्हिक्टोरिया (३,०५३ मी.), केनेडी (२,७०४), पेझवा टांग (१,५३१ मी.) ही या पर्वतीय विभागातील प्रमुख शिखरे होत. ताउंग्गुप ही १,१६८ मी. उंचीवरील प्रमुख खिंड आराकान योमा पर्वतात असून तिच्यामुळे आराकान किनारपट्टी इरावती खोऱ्याशी जोडलेली आहे. देशाच्या उत्तर भागात भारत–ब्रह्मदेश यांदरम्यान पांगसॉ व चौकन या दोन खिंडी आहेत. देशाच्या भागात इरावती व सितांग या खोऱ्यांदरम्यान पेगूयोमा ही कमी उंचीची पर्वतश्रेणी उत्तर-दक्षिण पसरली आहे. आराकान योमा व बंगालचा उपसागर यांदरम्यान अरुंद व जलोढीय प्रकारची आराकान किनारपट्टी आहे. या किनारपट्टीचा उत्तर भाग अधिक रूंद व पूरमैदाने असलेला, तर दक्षिणेकडील भाग अरूंद आणि डोंगररांगांमुळे ठिकठिकाणी तुटलेला आढळतो. आराकान किनापट्टी दंतुर व खडकाळ असून तेथील अनेक लहान टेकड्या बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेल्या आढळतात. अक्याब बंदराजवळचा प्रदेश मात्र बराच सुपीक आहे. शेतीच्या दृष्टीने, विशेषतः भातशेतीसाठी, ही किनारपट्टी व किनाऱ्याजवळील अनेक लहानमोठी बेटे उपयुक्त आहेत.(२) पूर्वेकडील शानचे पठार व दक्षिणेकडील तेनासरीमची किनारपट्टी : मध्यजीव महाकल्प काळात (६.५०,००,००० ते २२.५०,००,००० वर्षापूर्वी) निर्माण झालेल्या शानच्या पठाराने देशाचा पूर्वेकडील संपूर्ण भाग व्यापलेला आहे. हा चीनच्या युनान पठाराचाच दक्षिणेकडील भाग असून अधिक खडबडीत व तुटक आहे. त्याची सरासरी उंची ९०० मी. आहे. पठारावर एकमेकींना समांतर, उत्तर-दक्षिण पसरलेल्या घडीच्या पर्वतरांगा आहेत. या डौंगराळ उंचवट्याच्या प्रदेशाची उंची पठाराच्या पृष्ठभागापासून १,८३० ते २,६०० मी. पर्यंत आढळते. शान पठाराच्या मध्यातून वाहणाऱ्या सॅल्वीन नदीचे पठाराचे बरेच खनन केले आहे. तिच्या मार्गात घळ्या, धबधबे व द्रुतवाह आढळतात. पठाराचा उत्तर भाग पर्वतमय प्रदेशात व दक्षिण भाग तेनासरीम योमा डोंगररांगांमध्ये विलीन होतो.मार्ताबानच्या आखातापासून दक्षिणेस क्रा संयोगभूमीमधील व्हिक्टोरिया पॉइंटपर्यंत तेनासरीम किनारपट्टी (९७० किमी लांब व ८० किमी रुंद) पसरली आहे. तेनासरीम किनारपट्टीच्या पूर्वेस थायलंड व पश्चिमेस अंदमान समुद्र असून अंदमान समुद्रकिनाऱ्यावर अनेक बेटे व शैलभित्ती आढळतात. मर्ग्वी द्वीपसमूहही याच भागात आहे. हा प्रदेश अरूंद, खडकाळ व दंतुर आहे. मोलमाइन हे या विभागातील प्रमुख शहर व बंदर असून त्याच्या पूर्वेस देशाच्या सीमेवर दॉना पर्वतरांग व दक्षिणेस टाऊंग्मो व बिलॅउकटॅउंग या पर्वतरांगा आहेत.(३) मध्यवर्ती सखल प्रदेश : पश्चिमेकडील आराकान पर्वत व पूर्वेकडील शान पठार यांदरम्यानचा हा सखल प्रदेश इरावती, चिंद्विन व सितांग या नद्यांच्या खोऱ्यांनी व्यापलेला आहे. तृतीयक कालखंडात तयार झालेला हा प्रदेश मृदु वालुकाश्म, शेल खडक व चिकणमाती ह्यांनी युक्त आहे. येथे खोल जलोढीय मृदा आढळते. मध्यवर्ती सखल प्रदेश आर्थिक व सास्कृतिक दृष्ट्या संपन्न असून मंडाले हे या भागातील प्रमुख शहर आहे. या प्रदेशाचे भूकवच अधू असून या भागात जुलै १९७५ मध्ये भूकंपाचा मोठा हादरा बसला होता. दक्षिणेस इरावती व सितांग या नद्यांदरम्यान पेगूयोमा ही पर्वतरांग असून तिच्या उत्तर भागात सुप्त ज्वालामुखीचे शंकू आहेत. मौंट पोपा (१,५१८ मी.) हा येथील प्रसिद्ध ज्वालामुखी शंकू होय.(४) इरावती व सितांग नद्यांचा त्रिभुज प्रदेश : देशाचे दक्षिणेकडील ३१,०८० चौ. किमी. क्षेत्र या प्रदेशाने व्यापले असून भातशेतीसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. येथील लोकसंख्याही दाट आहे. रंगून हे या भागातील प्रमुख शहर व बंदर होय.मृदा : देशाच्या बहुतेक सर्व पर्वतमय प्रदेशांत लॅटेराइट प्रकारची मृदा आढळते. या मृदेत लोहाचा अंश अधिक असतो. या मृदेचा थर सामान्यतः ०.३ मी. ते २.५ मी. पर्यंत असून विदारण व उताराच्या प्रमाणानुसार त्यात भिन्नता आढळते. विदारण व स्थलांतरित शेतीमुळे या प्रदेशातील मृदा नापीक बनली आहे. सखल भागातील नद्यांच्या खोऱ्यांतील व त्रिभुज प्रदेशातील जलोढीय मृदा उत्तम पोताची तसेच गाळ व चिकणमातीयुक्त आहे. तिच्यात पोटॅश, चुना व सेंद्रीय द्रव्यांचे प्रमाण कमी असले, तरी खतपुरवठा करून तिची सुपीकता वाढविली जाते. अनेक भागांत हा मृदास्तर ३० मी. पर्यंतही आढळतो. मध्य ब्रह्मदेशातील कोरड्या टापूत असलेली जलोढीय काळी मृदा कॅल्शियम व मॅग्नेशियमयुक्त आहे. इरावती व सितांग नद्यांच्या मुखालगतची मृदा चिबड बनली आहे.


खनिजे : प्रामुख्याने कथिल, जस्त, शिसे, टंगस्टन, चांदी यांची खनिजे येथे सापडत असून खनिज तेलसाठेही आहेत. खनिज तेलाला अधिक महत्त्व असून बहुतेक तेलखाणी ईशान्य पर्वतभागात व तेनासरीम किनाऱ्यावर आढळतात. येनान जाऊंग, चौक व सिंगू ही इरावतीच्या खोऱ्यातील महत्त्वाची तेलक्षेत्रे आहेत. कथिल आणि टंगस्टनच्या खाणी शान, काश्या व कारेन राज्यांत आणि तेनासरीमच्या किनारी भागात आढळतात. लॅश्योच्या वायव्येस ४८ किमी. अंतरावरील बॉडविन खाणक्षेत्रात उच्च प्रतीचा चांदी-शिसे-जस्त यांचा साठा आढळतो. त्याशिवाय कोबाल्ट, तांबे, निकेल यांची खनिजेही येथे सापडतात. इंद्रनील, पाचू, माणिक, नीलाश्म इ. मौल्यवान खनिजांचे साठेही देशात असून मोगांक हे त्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे.नद्या : ब्रह्मदेशातील नद्या सामान्यपणे उत्तर-दक्षिण वाहतात. इरावती, चिंद्विन, सितांग व सॅल्वीन ह्या देशातील महत्त्वाच्या नद्या होत. इरावती ह्या प्रमुख नदीने आपल्या उपनद्यांसह देशाच्या दोन-तृतीयांश भूपृष्ठाचे जलवाहन केले आहे. ब्रह्मदेशाच्या उत्तर भागातील माली व नमाई या दोन शीर्षप्रवाहांच्या संगमापासून निर्माण झालेल्या, इरावतीचा संपूर्ण प्रवाह ब्रह्मदेशातून दक्षिणेस वाहत जाऊन, नऊ मुखांनी अंदमान समुद्राला मिळतो. त्यांपैकी एका मुखावर रंगून वसले आहे. येथेच इरावती नदीचा विस्तृत त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला असून तांदूळ उत्पादनासाठी तो जगप्रसिद्ध आहे. या नदीला देशाची आर्थिक जीवनरेषा समजतात. इरावतीचा भामोपर्यंतचा १,०५० किमी. चा प्रवाह स्टीमर वाहतुकीस व म्यिचीनापर्यंतचा प्रवाह लाँच वाहतुकीस योग्य आहे. देशातील हा प्राचीन वाहतूक मार्ग होय.ब्रह्मदेशाच्या उत्तरेकडील पर्वतमय भागात उगम पावणारी चिंद्विन (८९० किमी. लांब) ही इरावतीची प्रमुख उपनदी, देशाच्या पश्चिम विभागाचे जलवाहन करून मिंज्यानजवळ इरावतीस येऊन मिळते. मांगिन पर्वतात उगम पावणारी मू ही नदी मध्यवर्ती कोरड्या भागात सगींगच्या पश्चिमेस इरावतीस मिळते. बासेन नदी दक्षिण आराकान योमाचे, तर रंगून नदी पेगूयोमाचे जलवाहन करते. या दोन्ही नद्या इरावतील त्रिभुज प्रदेशात मिळतात. पेगूयोमाच्या पूर्व भागात सितांग नदीचे खोरे आहे. यामेदिनच्या ईशान्य भागात उगम पावून सितांग नदी अंदमान समुद्राच्या मार्ताबान आखाताला मिळते.शानच्या पठाराचे जलवाहन सॅल्वीन नदीने केलेले असून ती सितांगच्या दक्षिणेस मोलामाइन बंदारजवळ मार्ताबानच्या आखातास मिळते. तिबेटच्या पूर्व भागातील टांगला डोंगररांगेत उगम पावणारी ही नदी ब्रह्मदेशात शान पठाराच्या मध्यातून वाहते व पुढे थायलंड व ब्रह्मदेशाची सरहद्द बनते. हिच्या जवळजवळ संपूर्ण प्रवाहमार्गात अनेक घळ्या निर्माण झालेल्या असल्याने पूर्व-पश्चिम वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. ‘बर्मा रोड’ व काही ठिकाणच्या फेरीमार्गांनी ही नदी पार करता येते. प्रवाहमार्गात अनेक द्रुतवाह असल्याने मुखापासून केवळ १२० किमी. प्रवाहच जलवाहतुकीस उपयोगी ठरतो. लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी मात्र तिचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो.आराकान किनाऱ्यावरील नद्या लांबीने कमी व वेगाने वाहणाऱ्या असून त्या बंगालच्या उपसागरात मिळतात. त्यांनी तेथे छोट्या त्रिभुज प्रदेशांचीही निर्मिती केलेली आढळते. नाफ, कलदन, लेमरो, आन ह्या येथील प्रमुख नद्या होत. तेनासरीम किनाऱ्यावरील नद्याही लांबीने कमी व वेगाने वाहणाऱ्या असून त्या मार्ताबानच्या आखातास मिळतात.देशातील सर्वांत मोठे इन्ले सरोवर (लांबी १९.२ किमी. व रुंदी ६.४ किमी.) शानच्या पठारावरील याँगह्वे राज्यात सस. पासून ९१२ मी. उंचीवर आहे. त्यातून नाम पिलू नदी उगम पावते. इंदॉजी हे दुसरे महत्त्वाचे सरोवर (क्षेत्रफळ सु. २५९ चौ. किमी.) देशाच्या उत्तर भागात मोगाउंगजवळ आहे. हे सरोवर तिन्ही बाजूंनी जंगलाच्छादित टेकड्यांनी वेढलेले असून उत्तरेकडे इंदॉजी नदीच्या बाजूस ते खुले आहे. याशिवाय देशात अनेक छोटीछोटी सरोवरे, विशेषतः त्रिभुज प्रदेशात, आढळतात.हवामान : ब्रह्मदेशाचे हवामान मोसमी प्रकारचे आहे. प्रदेशाची उंची व समुद्रपासूनचे अंतर या दोन्हींचा येथील तपनाम व पर्जन्य यांवर परिणाम झालेला आढळतो. देशाचा बराचसा भाग उष्ण कटिबंधात येत असूनही येथील तपमान फारसे उच्च आढळत नाही. किनारी प्रदेशात हवामान उष्ण व दमट असून पर्वतीय थंड प्रदेशात हिवाळ्यातील तपमान गोठणबिंदूपर्यंत खाली येते. देशाच्या उत्तर भागातील पर्वतीय प्रदेशामुळे मध्य आशियातील थंड वायुराशींपासून देशाचे संरक्षण होऊन बऱ्याचशा भागातील हवामान उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे बनले आहे.आग्नेय आशियातील इतर देशांप्रमाणेच येथेही उन्हाळा (मध्य फेब्रुवारी-मध्य मे), पावसाळा (मध्य मे-मध्य ऑक्टोबर) व हिवाळा (मध्य ऑक्टोबर-मध्य फेब्रुवारी) असे तीन ऋतू आढळतात. संपूर्ण देशाचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान १०० सेंमी. असून जुलैमध्ये ते सर्वांत जास्त असते. उत्तरेकडील पर्वतमय प्रदेशात तसेच आराकान व तेनासरीम किनारपट्ट्यांवर पर्जन्यमान ४६० ते ५१० सेंमी., दक्षिणेकडील सखल भागात व रंगून परिसरात २५४ सेंमी आणि मध्य कोरडया भागात व आराकान योमाच्या वातविमुख बाजूवर ६३ ते ११४ सेंमी. असते. आराकान किनाऱ्यावरील अक्याब (२१० उ. अक्षांश) येथे वार्षिक पर्जन्य ४९५ सेंमी., तर आराकान पर्वताच्या वातविमुख पर्जन्यछायेच्या बाजूस त्याच अक्षांशावरील मिन्बू येथे अवघा ७४ सेंमी. पाऊस पडतो. शान पठाराच्या उंचीमुळे तेथे १६२ सेंमी पाऊस पडतो.वनस्पती व प्राणी : देशातील जंगलाखालील क्षेत्र सु. ५७ % असून त्यातील २५ % साग वृक्षांनी व्यापलेले आहे. जास्त उंचीच्या प्रदेशात उपोष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय अरण्ये, तर कमी उंचीच्या प्रदेशात उष्ण कटिबंधीय सदाहरित व पानझडी वृक्षांची अरण्ये आढळतात. हिमरेषेपलीकडील १,०५० मी. उंचीच्या दरम्यान ओक, पाइन इ. वृक्षांची सदाहरित अरण्ये असून उत्तरेकडील पर्वतमय प्रदेशातील १,८५० मी. पेक्षा अधिक उंचीच्या भागात ऱ्होडोडेन्ड्रॉन वनस्पती आढळतात. २०० सेंमी.पेक्षा जास्त पावसाच्या भागातील टणक लाकूड असलेल्या वृक्षांची सदाहरित अरण्ये आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची नाहीत. १०० ते २०० सेंमी. पर्जन्याच्या प्रदेशात साग, आंबा, फणस, नारळ, ताड इ. मोसमी प्रकारची अरण्ये आहेत. साग, ताड, खैर, लोखंडी, बांबू हे आर्थिक दृष्ट्या महत्वाचे वृक्षप्रकार होत. यांपैकी सागाला विशेष महत्व असून  सागाची अरण्ये आराकान योमाच्या वातविमुख बाजूवर, पेगूयोमाच्या दोन्ही बाजूंवर, शान पठाराच्या उतारावर व उत्तरेकडील पर्वत प्रदेशाच्या पायथ्याकडील उतारावर आढळून येतात. १०० सेंमी. पेक्षा कमी पर्जन्याच्या प्रदेशात खुरट्या वनस्पती, तेनासरीम भागात रबराची झाडे, तर इरावती, सितांग या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात कच्छ वनश्री आढळते. जंगलतोडीमुळे शान पठारावरील वृक्षराजी कमी झालेली असून जाड्याभरड्या गवताने तिची जागा घेतली आहे.ब्रह्मदेशातील जंगलात वाघ, चित्ता, गवा, दोनशिंगी गेंडा, रानरेडा, रानमांजर, टॅपिर, अस्वल, हत्ती, विविध प्रकारची वानरे, माकडे व हरणे इ. प्राणिविशेष आढळतात. प्राण्यामध्ये हत्तीला विशेष महत्त्व असून त्याचा उपयोग लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी केला जातो. त्रिभुज प्रदेशात विषारी साप, अजगर, सुसरी, कासवे यांसारखे प्राणी आढळतात. जंगलांमध्ये तितर, हिरवा मोर, रानकोंबडा, ग्राउझ, पोपट, इ. पक्षी पहावयास मिळतात. जलाशयांमध्ये विविध प्रकारचे मासे सापडतात.                                                                                                                                                                                                                                                                                                                 चौधरी, वसंत सावंत, प्र.

   इतिहास : ब्रह्मदेशातील अतिप्राचीन लोकसमूह आणि संस्कृती यांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही पण १९६९ साली ब्रह्मी पुरातत्त्व खात्याने केलेल्या उत्खननात आणि सर्वेक्षणात सु.पाच हजार वर्षांपूर्वी इरावती नदीच्या मध्य खोऱ्यात पहिली मानवी वसाहत निर्माण झाली होती, असे पुरावे उपलब्ध झाले आहेत. तसेच नवाश्मयुगीन अवशेष आणि गुहाचित्रे यांवरूनही तेथील मानवी वसाहतींसंबंधी माहिती मिळते. या संस्कृतीला मानवशास्त्रज्ञ ‘ऑनयॅथिअन’ (उत्तर ब्रह्मदेशातील मूळ रहिवासी) ही संज्ञा देतात.ब्रह्मदेशाचा प्राचीन इतिहास ब्रह्मी आदिवासी जमाती आणि मॉन किंवा ⇨तलैंग  याच्या संघर्षाने व्यापलेला आहे.  तलैंग जमातीने तिबेटी पठारावरून प्रथम उत्तर ब्रह्मदेशात प्रवेश केला आणि हळूहळू दक्षिणेपर्यंतचा प्रदेश व्यापून पहिल्यांदा थाटोन आणि त्यानंतर पेगू येथे आपले राज्य स्थापन केले.


सम्राट अशोकाने (इ. स, पू, ३०३ ?-२३२) या प्रदेशात बौद्ध भिक्षूंना धर्मप्रसाराकरिता पाठविले. त्यामुळे मॉन व इतर ब्रह्मी जमातींना भारतीय संस्कृतीची ओळख झाली. मॉन लोकांनी आपल्या पारंपरिक संस्कृतीबरोबर भारतीय धर्म व संस्कृती आत्मसात केली. राजा, कला, काष्ठशिल्पे, स्तूपबांधणी यांसंबंधीच्या भारतीय संकल्पना त्यांनी स्वीकारल्या. स्तूप आणि मंदिरांची निर्मिती केली. यानंतर अल्प काळातच मॉन जमात प्रगत आणि आक्रमक म्हणून आग्नेय आशियात मान्यता पावली. इ. स. पहिल्या शतकापासून ते आठव्या शतकांपर्यंतचा ब्रह्मदेशाचा सुसंगत इतिहास ज्ञात नाही. या काळात तिबेट व चीनमधून विविध लोकसमूह किंवा जमाती आल्या. त्यांच्या स्थानिक लोकांशी सतत चकमकी उडत. त्यामुळे कोणताही लोकसमूह स्थिर राहू शकला नाही. या तिबेटी –ब्रह्मी जमातींपैकी प्यू आणि इतर जमातींनी टगाउन आणि हलिंग्यी या ठिकाणी स्थानिक सत्ता स्थापन केली. नंतर त्यांनी हळूहळू दक्षिणेतील आराकान पर्वतापर्यंतचा प्रदेश पादाक्रांत केला. प्यूंचा पराक्रमी राजा दूत बौंग (इ. स. आठवे शतक) याने प्रोम नगर वसविले. प्यूंनी चीन व भारत यांच्या व्यापारी मार्गावर आपले नियंत्रण ठेवून इरावतीचे संपूर्ण खोरे आपल्या वर्चस्वाखाली आणले. चिनी पुराव्यांवरून प्यूंनी अठरा राज्यांवर आपले सार्वभौमत्व प्रस्थापित केल्याची माहिती मिळते. प्रारंभीच्या काळात प्यूंनी मॉनकडून अनेक कल्पना व परंपरा उचलल्या असल्या, तरी भारतीय संस्कृतीशी प्रत्यक्ष परिचय झाल्यानंतर ते अधिक प्रगत आणि बलवान झाले. कालांतराने प्यू जमातीतील ऐक्य भावना नष्ट झाल्यामुळे आणि अंतर्गत संघर्ष सतत होत राहिल्यामुळे ते कमकुवत झाले. याउलट मॉन हे राजकीय दृष्ट्या संघटित आणि पराक्रमी असल्यामुळे त्यांनी प्यूंचा पराभाव केला. अखेर तिबेटी-ब्रह्मी जमातीचे ब्रह्मदेशावरचे वर्चस्व संपुष्टात आले. पगान कालखंड : (८४९–१२८७). ब्रह्मी नेतृत्वाने इ. स. ८४९ मध्ये पगानचे राज्य स्थापन केले. इ. स. १०४४ मध्ये अनव्रथ (कार. इ. स. १०४४–८४) हा पराक्रमी राजा सत्तेवर आला. त्याने इरावती नदीचा त्रिभुज प्रदेश आणि मॉन राजांची राजधानी थाटोन यांवर वर्चस्व प्रस्थापित केले आणि पगा येथे राजधानी वसविली. अनव्रथने भारतीय राजकन्येशी विवाह करून भारताशी मैत्रीचे संबंध वाढविले. त्याचा मुलगा क्यांझित्थ (कार. इ. स. १०८४–१११२) याने भारत व श्रीलंकेशी असलेले संबंध अधिक दृढतर केले. त्याच्या वंशजांनी मॉन संस्कृती आत्मसात करून त्यांची लिपी, धर्म, वास्तुकला इत्यादींचे अनुकरण केले. श्रीलंका व भारत यांच्या प्रभावामुळे या राजांनी हीनयान बोद्ध धर्मपंथाचा स्वीकार केला. अवा, अमरपूर, मंडाले, पगान या नगरांतून पॅगोडांच्या भव्य वास्तू उभारण्यात आल्या. मंगोल वंशातील कूब्लाईखान (कार. १२५९–१२९४) याने या साम्राज्यावर स्वाऱ्या करून इ. स. १२८७ मध्ये ते जिंकले. अनव्रथने आपल्या पराक्रमाने आणि मुत्सद्देगिरीने ब्रह्मदेशाचे एकीकरण करून पहिले ब्रह्मी राज्य स्थापन केले. पगान साम्राज्याची सर्वांगीण भरभराट पाहून इटालियन प्रवासी मार्को पोलो (१२५४–१३२४) आश्चर्याने थक्क झाला. या काळात बांधलेले भव्य पॅगोडे त्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देतात. पगान साम्राज्याच्या अस्तानंतर ब्रह्मदेशात तीन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली. त्यांपैकी उत्तर-मध्य ब्रह्मदेश हा शान वंशाच्या आधिपत्याखाली आला. शान राजांनी संघटितपणे मंगोल आक्रमकांचे उच्चाटन करून इ. स. १३६८ मध्ये उत्तर ब्रह्मदेशाचे एकीकरण केले आणि अवा येथे राजधानी स्थापन केली. ते स्वतःला अनव्रथचे वारस मानत. शान काळात ब्रह्मी साहित्याचाही विकास घडून आला. दक्षिणेत मॉन घराण्याने पुन्हा सत्ता मिळविली आणि पेगू येथे राजधानी स्थापन केली. पूर्वेकडील मध्य भागात डोंगराच्या पायथ्याशी एक छोटे राज्य सितांग नदीच्या काठी तौंगूच्या आसपास उदयास आले. राजा तार्विश्वेती (कार. इ. स. १५३१–५०) याने उत्तरेकडील शान आणि दक्षिणेकडील मॉन यांना एकत्र आणून पेगू येथे आपली राजधानी वसविली. त्याच्या मृत्युनंतर त्याचा मेहुणा बाईन्नॉग (कार. इ. स. १५५१–८५) याने मणिपूर, अवा ही शान राज्ये आणि मॉनचा प्रदेश पोर्तुगीजांकडून मिळविलेल्या आधुनिक शस्त्रास्त्रांच्या बळावर जिंकून घेतला. त्याने इ. स. १५६९ मध्ये सयामच्या (थायलंड) राजाचा पराभाव करून त्याला कैद केले पण त्याने प्रशासनाच्या दृष्टीने सुसूत्र अशी यंत्रणा निर्माण केली नाही. तसेच संरक्षणासाठी खडी फौज ठेवली नाही. पुढील काळात पेगू येथील राजधानी हलविण्यात येऊन अवा येथे नेण्यात आली. अखेरीस या राज्याचे तुकडे होऊन मणिपूर स्वतंत्र झाले व मॉन लोकांनी बंड पुकारले. पोर्तुगीजांनी ब्रह्मदेशात हस्तक्षेप केला. पुढे बाईन्नॉगचा नातू अनौकपेटलून (कार. इ. स. १६०५–२८) याने सतत युद्धे करून राज्य सुसंघटित केले. त्यानंतरच्या काळात ब्रह्मदेशात यूरोपियनांचा व्यापारानिमित्त प्रवेश झाला आणि सततच्या संघर्षामुळे ब्रह्मी राजे दुर्बल झाले. त्यांची सत्ता शेजारच्या डोंगराळ प्रदेशातील लोकांच्या हाती गेली. इ. स. १७५२ मध्ये संपूर्ण ब्रह्मदेश मॉनच्या वर्चस्वाखाली आला. त्यांचा राजा बिन्यादल (कार. १७४७–५७) याने पेगू येथे राजधानी स्थापून अवावर अंमल बसविला. मॉनविरुद्ध मुकाबला करण्यासाठी अलौंगपेया (कार. १७५२–६०) या तरुण नेत्याने इ. स. १७५२ मध्ये स्वतःला राजा म्हणून घोषित केले. त्याने प्रथम श्‍वेबो येथे राज्य स्थापन केले. त्याने मॉन सत्ताधाऱ्यांचा व फ्रेंचांचा उच्छेद केला मणिपूर जिंकले व तेनासरीम ताब्यात घेतले. सयमाच्या स्वारीवर असताना सैन्याला सूचना देताना तो गोळी लागून मृत्यू पावला. त्याने स्थापन केलेल्या कॉनबाँग वंशाने पुढे १८८५ पर्यंत ब्रह्मदेशावर आधिपत्य गाजविले. त्याच्या वंशजांनी टॅव्हाय व थायलंडवर आधिपत्य मिळविले. आणि मणिपूर जिंकले. पुढे आराकान व आसाम जिंकल्यामुळे त्यांचा इंग्रजांशी प्रत्यक्ष संबंध आला व दोघांत संघर्ष सुरू झाला. त्यातूनच पहिले ब्रह्मी युद्ध (१८२४–२६) उद्भवले. या युद्धात ब्रह्मदेशाचा पराभव झाला आणि इंग्रजांनी आसाम, मणिपूर, आराकान व तेनासरीम हे प्रदेश काबीज केले. त्यानंतर इंग्रजांना कलकत्ता ते सिंगापूर या किनारपट्टीवर वर्चस्व हवे होते. म्हणून त्यांनी ब्रह्मदेशाबरोबर दुसरे युद्ध (१८५२) करून त्याचा पराभाव केला. अखेरीला इंग्रजांनी चीनबरोबर व्यापार करण्याच्या उद्देशाने ब्रह्मदेशाबरोबर इ. स. १८८५ मध्ये तिसरे युद्ध पुकारले. त्यांच्या या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळात टीका सुरू झाली. ब्रह्मदेशचा अखेरचा राजा थिबा (कार. १८७८–८५) हा जुलमी, अनियंत्रित सत्ताधीश असून फ्रेंचांच्या चिथावणीने इंग्रजांविरूद्ध कारवाया करतो, असे तथाकथित आरोप ठेवून त्याला पदच्युत केले आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील रत्नागिरी येथे त्यास स्थानबद्ध केले. अशा रीतीने संपूर्ण ब्रह्मदेश इंग्रजांच्या अंमलाखाली आला आणि त्याचे स्वतंत्र्य नष्ट झाले आणि ब्रह्मदेश ब्रिटिश हिंदुस्थानचा एक भाग बनला. [⟶ब्रह्मी युद्धे]. ब्रिटिश अंमल : (१८८६–१९४८). १ जानेवारी १८८६ पासून ब्रह्मदेश हा ब्रिटिश हिंदुस्थानच्या साम्राज्याचा एक घटक बनला. ब्रह्मी लोकांना हिंदुस्थान व हिंदी जनता यांबद्दल आकस होता कारण ब्रह्मी युद्धांत हिंदी सैन्याने इंग्रजांबरोबर सहभाग घेऊन ब्रह्मदेशाचा पराभव केला होता. इंग्रजांची गुलामगिरी झुगारून देण्यासाठी ब्रह्मी जनतेने गनिमी युद्धतंत्र पद्धतीने संघर्ष सुरू केला. हा संघर्ष दडपून टाकण्यासाठी इंग्रजांनी अनन्वित अत्याचार केले. इंग्रजांच्या वाढत्या अत्याचाराला प्रतिकार करण्यासाठी ब्रह्मदेशात तरूणांच्या संघटना स्थापन होऊ लागल्या. पाश्चात्य आचारविचारांबरोबर तरूण पिढीवर लोकशाही, समाजवाद, क्रांती इ.गोष्टी बिंबविल्या जाऊ लागल्या. नव्या युवक नेतृत्वाने राष्ट्रवाद, राष्ट्रधर्म, संस्कृती आणि आधुनिक पाश्चात्य शिक्षण यांचा पुरस्कार करून १९०८ साली युवक बौद्ध संघटनेची (वाय्. एन्. बी. ए) स्थापना केली. या संघटनेने इंग्रजांच्या जुलमी धोरणाला प्रतिकार करून संवैधानिक कायदेकानूंची मागणी केली. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ब्रिटिशांविरूद्ध चळवळी आणि संप सुरू केले. ब्रिटिशांनी ब्रह्मदेश हिंदुस्थानपासून अलग करण्याचे ठरविले (१९३०). इ. स. १९३१ मध्ये तरूण शेतकरी व विद्यार्थी यांच्या संघटनेचा नेता एक सरकारी माजी कारकून साया सान याच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ झाली. त्यानंतर आँग सान, ऊ नू, शू माँग इ. तरूण नेत्यांनी थाकीन चळवळीला आरंभ केला. थाकीन म्हणजे मालक पण हे समाजवादी थाकीन हिंसाचारी मार्गाचा अवलंब करू लागले. पुढे १९३६ साली ⇨आँग सान (१९१६–१९४७) व ⇨ ऊ नू (२५ मे १९०७ –   ) यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिसंघटनेने संपाचे सत्र सुरू करून तेल कंपन्यातील कामगारांना संपास उद्युक्त केले व स्वातंत्र्यचळवळ अधिक तीव्र केली.  इ. स. १९३५ चा कायदा संमत झाल्यानंतर ब्रह्मदेश हिंदुस्थान पासून एक दोन वर्षांतच वेगळा करण्यात आला (१९३७) आणि त्याला ब्रिटिश साम्राज्यातील एक घटक राज्याचा दर्जा मिळाला त्याबरोबर नवे अधिकार मिळाले. १९३८ साली लॅश्यो ते कुनमिंग हा बर्मा रोड या नावाने प्रसिद्ध पावलेला राजरस्ता बांधण्यात आला. दुसऱ्या महायुद्ध काळात (१९३९–४५) ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचारामुळे राष्ट्रीय वृत्तीचे जहाल ब्रह्मी नेते ब्रिटिशांचे कट्टर शत्रू व जपानचे मित्र बनले. त्यांनी जपानच्या साहाय्याने ब्रिटिशांना ब्रह्मदेशातून हाकलून देण्याच्या योजना आखल्या. या योजनेचे वे मॉ व ऊ सान हे दोघे पुरस्कर्ते होते. आँग सान, ने विन इत्यादींनी हुकूमशाहीविरोधी स्वातंत्र्यसंघ या नावाची क्रांतिकारी संघटना (ए. एफ्.पी.एफ्.एल्.) स्थापन केली. या संघटनेने जपानकडे लष्करी सहकार्याची मदत मागितली. जपानने या संघटनेतील तीस जवानांची निवड केली आणि त्यांना गुप्तपणे लष्करी शिक्षण दिले पण जपानने ब्रह्मी नेत्यांचा विश्वासघात करून ब्रह्मदेशावरच आक्रमण केले (१९४१). आपल्या कळसूत्री प्रशासनाचा मुख्य म्हणून जपानने बे मॉ याची नियुक्ती केली आणि १९४३ मध्ये ब्रह्मदेश हे स्वतंत्र राष्ट्र झाल्याचे जाहीर केले व बे मॉला सैन्याचा मुख्य नेमले. या काळात जपानने ब्रह्मी जनतेवर अमानुष अत्याचार केले. जपानच्या या कृत्यामुळे ब्रह्मी नेत्यांचा व जनतेचा भ्रमनिरास झाला. कारेन जमातीने जपानी लष्करविरूद्ध उघड प्रतिकार सुरू केला. ब्रिटिश फौजा ब्रह्मदेशात घुसल्यानंतर थाकीनचे साम्यवादी नेते भूमिगत झाले. महायुद्धानंतर ब्रिटिश सरकारच्या घोषणेप्रमाणे ब्रह्मदेशात १९४६ च्या नोव्हेंबर महिन्यात जनरल आँग सानच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना झाली आणि त्याच्या प्रेरणेनेच ब्रह्मी घटनापरिषदेचे कार्य सुरू झाले. आँग सानच्या राजकीय शत्रूंनी त्याचा व त्याच्या सहकाऱ्यांचा क्रूरपणे २४ जुलै १९४७ रोजी बळी घेतला आणि ऊ नूची पंतप्रधानपदी निवड झाली. त्यानंतर ४ जानेवारी १९४८ रोजी ब्रह्मदेश स्वतंत्र झाला.


स्वातंत्र्योत्तर ब्रह्मदेश : सततची युद्धपरिस्थिती, राजकीय अस्थैर्य, अंतर्गत कटकारस्थाने, आर्थिक अडचणी इ. संकटांवर मात करण्यासाठी ब्रह्मदेशाला शांतता हवी होती. म्हणून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अलिप्तावादी धोरणाचा ब्रह्मी नेत्यांनी पुरस्कार केला आणि साम्यवादी चीनला मान्यता दिली. स्वातंत्र्यानंतरच्या दहा वर्षांत ब्रह्मदेशाने अंतर्गत शांतता आणि आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले पण पंतप्रधान ऊ नू व त्याचे सहकारी यांच्या संघर्षामुळे ने विन या लष्करी नेत्याच्या हाती देशाचे सत्ता गेली आणि ने विन पंतप्रधान म्हणून निवडला गेला. त्याच्या नेतृत्वाखाली ब्रह्मदेशात १९६० च्या फेब्रुवारीत सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि ऊ नू काही काळ पुन्हा सत्तेवर आला पण त्याच्या अनुयायांतील संघर्षामुळे देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. तेव्हा १९६२ च्या मार्चमध्ये जनरल ने विन यांनी ऊ नू, सरन्यायाधीश आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या निकटवर्ती सदस्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली लष्करी क्रांती करून अधिकाऱ्यांच्या साहाय्याने देशाची पूर्ण शासनव्यवस्था पुन्हा आपल्या हाती घेतली व संविधान रद्द करून लष्करी राजवट जारी केली. या सु. १९६२ ते १९७४ दरम्यानच्या लष्करी अंमलात जनरल ने विन यांनी समाजवादी धोरणांचा पुरस्कार करून शेती, व्यापार आणि उद्योगधंद्याचे राष्ट्रीयीकरण केले पण जुन्या आणि नव्या राष्ट्रीय प्रश्नांची सोडवणूक करण्यात त्याला फारसे यश आले नाही. १९७४ मध्ये त्याने नवीन संविधान तयार केले आणि ब्रह्मदेश हे समाजवादी राज्य असल्याचे घोषित करून एकपक्षीय हुकूमशाही राजवट ब्रह्मदेशात आणली. स्वतःकडे पक्षाध्यक्ष व राष्ट्राध्यक्ष ही दोन्ही पदे घेऊन विविध मंडळे नेमली. त्याच्या अध्यक्षीय कारकीर्दीत (१९७४–८१) दळणवळण, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण यांत भरीव प्रगती झाली. त्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात अलिप्तवादाचा खंबीरपणे पुरस्कार केला आणि ब्रह्मदेशाला आशियातील राजकारणात महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले तथापि अंतर्गत घडामोडींचा विचार करून ने विन याने अध्यक्ष व राष्ट्राध्यक्ष या पदांचा राजीनामा दिला (८ ऑगस्ट १९८१). त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर जनरल ऊ सान राष्ट्राध्यक्ष झाला (९ नोव्हेंबर १९८१).राजकीय स्थिती : ब्रह्मदेश ब्रिटिश साम्राज्याचा एक घटक बनल्यानंतर १८९७ मध्ये तेथे प्रथम कायदे मंडळाची स्थापन झाली. त्यावर लेफ्टनंट गव्हर्नर चार सरकारी व पाच बिनसरकारी सदस्यांची नेमणूक करीत असे. या मंडळाच्या सदस्यांत १९०९ मध्ये वाढ करण्यात आली आणि त्यात दोन लोकनियुक्त सदस्यांचा अंतर्भाव करण्यात आला. १९१५ साली ही सभासदसंख्या तीस होती. ब्रिटिश हिंदुस्थानात अंमलात असलेली द्विदल राज्यपद्धती ब्रिटाशांनी ब्रह्मदेशात १९२३ साली आणली. त्या वेळी कायदेमंडळांच्या सभासदांची संख्या १०३ होती. त्यांपैकी ८० सदस्य लोकनियुक्त असत. संरक्षण, रेल्वे, आर्थिकबाबी, पोस्ट व तार इ. महत्त्वाची खाती हिंदुस्थानच्या व्हाइसरॉयकडे असत. फक्त देशातील कायदा आणि सुव्यवस्था यांची जबाबदारी गव्हर्नर व त्याचे दोन सल्लागार यांवर होती. त्यामुळे प्रत्यक्षात कायदे मंडळाकडे कोणतेच अधिकार नव्हते. ब्रह्मदेशाला १९३५ च्या कायद्याने स्वतंत्र संविधान मिळाले आणि नंतर १९३७ मध्ये प्रत्यक्षात ब्रिटिश साम्राज्यांतर्गत घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाला. तेव्हा पूर्वीचे कायदे मंडळ रद्द करण्यात येऊन तेथे द्विगृही कायदे मंडळ व दहा मंत्र्यांचे मंत्रिमंडळ स्थापण्यात आले तथापि संरक्षण आर्थिक बाबी इ. खाती व्हाइसरॉयकडेच ठेवण्यात आली. या कायद्याने ब्रह्मदेशात संवैधानिक पद्धतीचा पाया घातला. पुढे १९४७ मध्ये ब्रह्मी घटना परिषद स्थापन करण्यात आली. या परिषदेने स्वतंत्र ब्रह्मदेशात १९४८ मध्ये पहिले संविधान कार्यवाहीत आणले. हे संविधान संघीय असून राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख असतो. द्विसदनी कायदे मंडळ आणि समाजवाद यांवर राज्यघटनेत भर देण्यात आला तथापि १९६२ मध्ये ब्रह्मदेशात लष्करी राजवट जारी झाली आणि हे संविधान रद्दबातल ठरविण्यात आले. लष्करी राजवटीने संवैधानिक हुकूमशाही राबविण्यासाठी सकृतदर्शनी ९० % मतदानाने पाठिंबा दिलेले नवीन संविधान ३ जानेवारी १९७४ रोजी स्वीकारले. या संविधानानुसार ‘ब्रह्मदेश एकपक्षीय समाजवादी राज्य’ असून लोकांचे शासनावर अंतिम नियंत्रण आहे. म्हणजे निर्वाचित प्रतिनिधी गैरकारभार करू लागल्यास राज्यघटनेप्रमाणे त्यांना परत बोलाविता येते. या संविधानाने शासनाला महत्वाच्या उद्योगधंद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला व नैसर्गिक संपत्तीवर मालकी प्रस्थापित करण्याचा अधिकार दिला. संसद ही सर्वोच्च संस्था असून तिचे ४५० सदस्य असतात. दर चार वर्षांकरिता संसद सदस्यांची निवड होते. १८ वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा हक्क आहे. राष्ट्रीय संसदेच्या पद्धतीवर प्रत्येक राज्यात, शहरात व खेड्यात लोकनियुक्त मंडळे आहेत. प्रत्येक मंडळ त्या त्या स्तरावर कार्यकारी व न्यायालयीन बाबींवर नियंत्रण ठेवते. ब्रह्मदेशाचे शासन चार स्तरीय संस्थांत विभागलेले असून राष्ट्रीय संसद निर्वाचित प्रतिनिधींतून राज्यमंडळ, मंत्रिमंडळ, न्यायमंडळ, महानिरिक्षक मंडळ इ. मंडळे नियुक्त करते. यांपैकी राज्यमंडळ ही महत्त्वाची संस्था असून तिचे २८ सदस्य असतात. त्यांच्याकडे देशाचे नेतृत्व असून त्यांतून राष्ट्राध्यक्ष निवडला जातो. मंत्रिमंडळ पंतप्रधानाची निवड करते. इतर मंडळे न्यायदान, सामान्य प्रशासन, संरक्षण, कामगार कल्याण ही खाती सांभाळतात.संविधानात नमूद केलेली तत्त्वे बाजूला सारून ब्रह्मदेशाचा काँग्रेस हा पक्षच राज्यमंडळ व राष्ट्राध्यक्ष यांकरवी प्रत्यक्षात हुकूमशाही गाजवीत आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी देशाची १४ राज्यांत विभागणी केली असून पुन्हा राज्यांचे पोट-विभाग पाडलेले आहेत. न्यायव्यवस्था : देशात प्रारंभी ब्रिटिशांची न्यायव्यव्सथाच अंमलात होती. १९६२ मध्ये लष्करी राजवट आल्यानंतर न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यात आला. पूर्वीचे सर्वोच्च व उच्च न्यायालय रद्द करून त्या जागी मुख्य न्यायालय नेमण्यात आले. हेच अंतिम अपील न्यायालय म्हणून ओळखले जाते. उरलेल्या जिल्हानिहाय न्यायालयांच्या जागी लोकन्यायालय स्थापण्यात आले आणि शासकीय अधिकाऱ्यांची दंडाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. १९७४ च्या संविधानानुसार लोक न्यायमंडळ ही सर्वोच्च न्यायदानाची संस्था ठरविण्यात आली.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  जोशी, ग. भा.

संरक्षणव्यवस्था : ब्रह्मदेशाला स्वतंत्र सैनिकी व संरक्षणविषयक परंपरा आहे. ब्रह्मी राजांनी राज्यविस्तारासाठी केलेल्या लष्करी मोहिमा आणि चिनी व मंगोल आक्रमाणांना त्यांनी केलेला विरोध यांतून एकोणिसाव्या शतकाअखेरपर्यंतची ब्रह्मी क्षात्रपरंपरा दिसून येते. एकोणिसाव्या शतकात देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी झालेली युद्धे व तत्कालीन बंदुलासारखे सेनापती यांच्या शौर्याचा व देशप्रेमाचा वारसा त्या परंपरेला लाभलेला आहे. भारताप्रमाणेच सैनिकी विज्ञान व युद्धतंत्र यांत कालोचित प्रगती न केल्याने ब्रिटिशांनी ब्रह्मदेशाचा पराभव केला. दुसऱ्या जागतिक महायुद्धात ब्रह्मी स्वातंत्र्य चळवळीचे नेते जनरल आँग सान व त्याचे २९ सहकारी यांनी ब्रिटिशांविरूद्ध जपानला सैनिकी साहाय्य केले होते. ब्रह्मदेशाची विद्यामन संरक्षणव्यवस्था आणि सेना यांची घडण या परंपरेतून झालेली आहे. ब्रिटिश राजवटीत ब्रह्मी लोकांना लढाऊ सेना व सैनिकी पोलीस संघटनेत अगदी अल्पसंख्येने भरती केले जाई. भारतीय व गुरखा तसेच देशातील अल्पसंख्याक गट–उदा., कारेन, कोपीन इ. – यांची मोठ्या प्रमाणावर भरती केली जाई. दुसऱ्या महायुद्धकाळात १९४१ साली ब्रह्मी राजकीय स्वातंत्र्य चळवळीच्या तीस पुढाऱ्यांनी जपानमध्ये गुप्तपणे सैनिकी शिक्षण घेतले होते. हे पुढारी ‘तीस सोबती’ म्हणून ओळखले जातात. जनरल आँग सान त्यांचे नेते होते. ब्रह्मदेशावरील जपानी आक्रमणात आँग सान यांनी उभारलेली ब्रह्मी स्वातंत्र्य सेना ब्रिटिशांविरूद्ध लढली. तथापि आपल्या देशाला जपान स्वातंत्र्य देणार नाही, हे पटल्यावर मार्च १९४५ मध्ये जपानी सैन्य माघार घेत असताना रंगूनपाशी जनरल आँग सान आपल्या सेनेसह ब्रिटिश सैन्याला मिळाला. तथापि सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेविषयी लॉर्ड माउंटबॅटन यांचा जो दृष्टिकोन होता, तोच दृष्टिकोन आँग सान व त्यांच्या सेनेबाबत होता. महायुद्ध संपल्यानंतर आँग सान यांनी ब्रिटिशांकडे ब्रह्मी स्वातंत्र्याची मागणी केली व ती मान्य न केल्यास बंडाळीची धमकी दिली. १९४८ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रह्मी भाषिकांच्या व इतर अल्पसंख्यांकांच्या वेगवेगळ्या सैनिकी व पोलीसी पलटणी खड्या केल्या. पुढे आँग सान यांची हत्या झाली. स्वातंत्र्योत्तर काळात सु. तीस वर्षे कम्युनिस्ट, अल्पसंख्यांक गट, चोरटे व्यापारी व इतर हितशत्रू यांच्या देशविघातक कारवाया मोडून काढण्यात ब्रह्मी सेना गुंतली होती. शस्त्रबळ व मानसशास्त्रीय युद्धतंत्र यांचा अवलंब करून देशांतर्गत सुव्यवस्था स्थापण्यात ब्रह्मी सेना यशस्वी झाली. काही वर्षाचा अपवाद वगळता एकूण स्वतंत्र्योत्तर काळात देशाचा राज्यशकट सैनिकी अधिकारीच चालवीत आहेत. येथील सैनिकी शासन हे हुकूमशाही बनले नाही. शासनकर्त्यांत जे बदल झाले, ते राजकीय व सैनिकी नेत्यांच्या विचारविनिमयांतून झाले. यासाठी कट, क्रांत्या व रक्तपात यांचा अवलंब करण्यात आला नाही, म्हणूनच ब्रह्मदेशात संरक्षण सेनांना गौरवाचे स्थान प्राप्त झाले आहे. राष्ट्रपती यू ने विन हे प्रसिद्ध तीस सोबत्यांपैकीच एक होते. ब्रह्मदेशाचे परराष्ट्रीय धोरण संपूर्णपणे अलिप्ततेचे असल्याने परचक्रापासून देशाचे संरक्षण करणे, हे संरक्षणव्यवस्थेचे प्रमुख उद्दीष्ट नाही. अंतर्गत एकात्मता व सुव्यवस्था राखणे, हे मुख्य उद्दिष्ट असल्याने संरक्षणव्यवस्था व संरक्षण साधने त्या दृष्टीने संघटित केलेली आहेत. याच दृष्टीने शास्त्रास्त्रसंभारही जमवलेला आहे. आजही देशात द्वितीय महायुद्धकालीन शस्त्रास्त्रे वापरात आहेत. या क्षेत्रात किरकोळ आधुनिकीकरण केले जाते. ब्रह्मी सैन्यात आक्रमक बळ नाही. देशाच्या १९७४ सालच्या संविधानानुसार संरक्षणयोजना, शांतता व युद्ध ही मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे. संरक्षणमंत्री हाच तीनही सेनांचा प्रमुख असतो. तीनही सेनादलांचे प्रमुख त्याला दुय्यम असतात. देशाचे एकूण सैन्यबळ १,६९,५०० होते (१९७९) : त्यांपैकी भूसेना : सैनिक संख्या १,५३,०००. ब्रह्मी रेजिमेंट व रायफल ९५ पलटणी, अल्पसंख्यांक जमाती ११ पलटणी, हलके पायदळ ९ पलटणी, चिलखती (टेहळणी व गस्ती) ३ रिसाले, तोफखान्याच्या ३ पलटणी असून विमानविरोधी ४० मिमी. व ७६ मिमी (डोंगरी), मैदानी २५ पौंडी व १०५ मिमी. रणगाडाविरोधी ६ व १७ पौंडी तोफाही आहेत. ब्रह्मी भूसेनेत रणगाडे नाहीत. लोकसेना : सु. ७३,०००. वायुसेना : सैन्यसंख्या ७,५०० असून लढाऊ विमाने २५ आहेत. ती अंतर्गत सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष उपयुक्त आहेत. त्याच्या शिवाय ५२ विमाने व काही हेलिकॉप्टर असून प्रशिक्षण, गस्त, टेहळणी व वाहतुकीसाठी त्यांचा उपयोग होतो. नौसेना : नौसैनिक ९,००० टेहळणी, गस्त व तोफनौका –७७, सुरुंग संमार्जन संरक्षक व कॉव्हेंट अशा पाच लहान युद्धनौका असून सागरी किनारा व नद्या यांच्या संरक्षणासाठी व वाहतुकीसाठी इतर नौका आहेत. देशात लघुशस्त्रास्त्रे उत्पादन करणारा कारखाना आहे. भारी शस्त्रास्त्रे मात्र परदेशातून विकत घेतली जातात. मेम्यो येथे संरक्षणसेना अकादमी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रगतिशील शिक्षणासाठी वेगळी संस्था नसून त्यांना सेनांतर्गत प्रशिक्षण दिले जाते. सैनिक-प्रशिक्षणासाठी भारतात ब्रह्मी अधिकारी येतात. इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून भारत, आग्नेय आशिया आणि चीन यांमधील दुवा ब्रह्मदेश आहे. ब्रह्मदेशाचा सागरी किनारा तेनासरीमपर्यंत महत्त्वाचा आहे. भारताची अंदमान-निकोबार बेटे ब्रह्मदेशाच्या किनाऱ्यापासून जवळ आहेत. भारताची बंगालच्या उपसागरातील नाविक संरक्षण व्यवस्था ब्रह्मदेशाला अप्रत्यक्षपणे उपकारक ठरली आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            दीक्षित हे.वि.


आर्थिक स्थिती : ब्रह्मदेशाची अर्थव्यवस्था शेतीप्रधान असून तांदूळ निर्यात करणारा देश म्हणून त्याची ख्याती आहे. राष्ट्रीय उत्पन्नापैकी ३.६ % हिस्सा शेतीतून मिळतो. देशातील प्रमुख उत्पादन तांदूळ असून ते परकीय चलनप्राप्तीचे व रोजगाराचे एक प्रमुख साधन आहे. १९७८ मध्ये ब्रह्मदेशातील दरडोई उत्पन्न ९५ डॉलर (१०००.५ कीयाट) होते. हे उत्पन्न म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थांतील नीचांक समजला जातो. शेती : देशातील ७० % श्रमशक्ती शेतीत गुंतलेली असून पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. इरावती व सितांग नद्यांच्या खोऱ्यांत व त्रिभुज प्रदेशात भातशेती केली जाते. मंडालेच्या आग्नेय बाजूच्या प्रदेशात तसेच मध्य इरावतीचे खोरे, चिंद्विन नदीचे खोरे ह्या कोरडवाहू विभागांत कापूस, भुईमूग, ऊस, कडधान्ये, तीळ, तंबाखू इ. पिके घेतली जातात. डोंगराळ प्रदेशात फिरती शेती केली जाते. त्रिभुज प्रदेशात तागाची लागवड प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आलेली आहे. दक्षिणेस सागरकिनाऱ्यालगतच्या प्रदेशात रबराचे मळे आहेत. शान प्रांतात बटाटे व चहा ही नगदी पिके घेतली जातात. पारंपरिक तंत्र, खतांची व कीटकनाशकांची कमतरता हे शेतीच्या विकासातील प्रमुख अडथळे होत. ब्रह्मदेशाचे भूक्षेत्र (आकडे लक्ष हेक्टरांत) ६,७५५.५ असून लागवडयोग्य क्षेत्र ९५.१४, कायम पिकाखाली असलेले ४.८५, गावताळ कुरणांखाली ३.६०, जंगलव्याप्त ४,५२७.४, इतर जमीन, १,०२३.३ व अंतर्गत जलव्याप्त क्षेत्र १७६.७ होते (१९७७). ब्रह्मी सरकारने अनुपस्थित व परकीय जमीनदारी नष्ट केली आहे. ग्रामजन परिषदा (व्हिलेज पीपल्स कौन्सिल्स) शेतकऱ्यांना तहहयात कसण्यासाठी जमीन देतात. देशात अल्पभूधारकांची संख्या अधिक आहे. सु. ८६.६ % शेतकरी कुटुंबाकडे ४ हेक्टरपेक्षा कमी धारणक्षेत्र आहे. १९७८च्या अंदाजानुसार प्रत्येक शेतकरी कुटुंबाकडे सरासरी १.७५ हे. धारणक्षेत्र होते. एकूण शेतजमिनीपैकी ६४.५ % क्षेत्र भातशेतीखाली होते (१९७७-७८). १९७९-८०) मधील तांदळाचे उत्पादन १०५ लक्ष टन होते. एकूण उत्पादनापैकी ३२ ते ३५ टक्के तांदूळ सरकार खरेदी करते. एकूण खरेदीपैकी २० % तांदूळ निर्यात केला जातो. तांदळाच्या निर्यातीत सरकारची मक्तेदारी आहे. ‘द युनियन ऑफ बर्मा अँग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्ड’ १९६४ मध्ये स्थापन करण्यात आले असून हे मंडळ तांदळाची खरेदी व निर्यात करते. उत्पादनवाढीसाठी बीजसुधार व वाटप, शेतजमिनीचे राष्ट्रीयीकरण, पुनःप्रापण प्रकल्प, कृषी बँका व पतपुरवठा, पाणीपुरवठा इ. गोष्टींना चालना देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. तांदळाच्या नव्या जातींमुळे दर हेक्टरी उत्पन्न वाढत आहे. ब्रह्मदेशात केवळ १ टक्का म्हणजे १३.७ ल. हे. जमीन दुबार पिकाखाली होती. कोरडवाहू पट्ट्यात पाणीपुरवठा होण्यासाठी मू खोरे प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला असून त्याद्वारे सु. २४.२ ल. हे. जमीन भिजते. १९७९ मध्ये सेदावग्यी धरण (मंडालेच्या उत्तरेस ४० किमी.) आणि नेविन धरण (प्रोमजवळ) तसेच काइया राज्यातील मोबी येथील लहान धरण यांद्वारे एकूण ५८,२०० हे. जमीन भिजते. १९५५ पर्यंत तांदळाच्या जागतिक निर्यातीत ब्रह्मदेशाचा २८ % हिस्सा होता पण हेच प्रमाण १९७० नंतर २ % पर्यंत घटले आहे. भातशेतीचे क्षेत्र वाढविण्यासाठी १९५५ ते १९६५ ह्या काळात सु. ८,३९० हे. जमिनीचे पुनःप्रापण करण्यात आले. खतांची कमतरता, ही तांदळाची उत्पादकता वाढविण्यात येणारी महत्त्वाची अडचण आहे. भूईमूग, तीळ, गहू, मका, कापूस, तंबाखू, घेवडे, ज्वारी, बाजरी ही इतर पिके घेतली जातात. १९७९ मधील विविध पिकांचे उत्पादन पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्ष मे. टनांत) : भुईमूग ४.३३, तीळ २.२४, ऊस १८.००, ताग ०.८५, कापूस ०.१७१४, तंबाखू ०.८१, गहू ०.६३, मका ०.६९, कांदे १.०६, घेवडे ४.५५, कडधान्ये १.०६. शेतीकामात बैल व रेडे यांचा उपयोग केला जातो. शेळ्या, कोंबड्या, बदके, डुकरे सर्वत्र तर कोरडवाहू पट्ट्यात गाई पाळल्या जातात. १९७९ मध्ये पशुधन पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्षांत) : गाई ५५.६, म्हशी १९.०, डुकरे २४.०, मेंढ्या २.३७, शेळ्या ६.४२, कोंबड्या १७६.२ व बदके ३५.५. देशाच्या एकूण भूक्षेक्षापैकी ५७ % क्षेत्र जंगलव्याप्त आहे. त्यापैकी ५० % क्षेत्रात सागवान आणि कठीण लाकडांची वृक्षसंपदा आढळते. जगातील सु. ७५ % ते ८५ % सागवान –साठा एकट्या ब्रह्मदेशात आहे. तांदळाची निर्यात घटली असून सागवानी लाकडांच्या निर्यातीकडे अधिक लक्ष पुरविण्यात येत आहे. १९३६ ते १९४० ह्या काळात प्रतिवर्षी सरासरी २.२७ लक्ष टन सागवानी लाकूड निर्यात करण्यात आले (१ टन = ६३.६६ घन फूट). तथापि १९७६-७७ मध्ये फक्त ७५ हजार घन टन सागवानाची निर्यात करण्यात आली. निर्यात घटली असली, तरी सागवानाच्या आंतरराष्ट्रीय किंमती वाढल्यामुळे ब्रह्मदेशाला अधिक उत्पन्न मिळत आहे. १९७८-७९ मध्ये केवळ सागवान लाकडाच्या निर्यातीद्वारे १,२१४ लक्ष डॉ उत्पन्न मिळाले. १९७९-८० मध्ये सागवानाचे तसेच इतर टणक लाकडांचे उत्पादन अनुक्रमे ४ लक्ष व १०.४९ लक्ष घन टन झाले. १९७७-७८ मधील इतर लाकडांचे एकूण उत्पादन ३८.७ लक्ष घ. मी. झाले त्यापैकी कापीव व लोहमार्ग तळपाटासाठी १२.२ लक्ष घ. मी. औद्योगिक उपयोगासाठी १० लक्ष घ. मी., सरपणासाठी १७ लक्ष घ. मी. होते. उत्तर भागातील नद्यांच्या प्रवाहांतून तसेच हत्तींकडून लाकडाची वाहतूक केली जाते. सागवानाचे उत्पादन वाढविण्यासाठी देशातील लाकूड निगम प्रयत्नीशील आहे. पशुसंवर्धन व मत्स्योद्योग ह्या क्षेत्रांत १.३ % कामगार काम करतात. ह्या दोन्ही क्षेत्रांचा राष्ट्रीय उत्पन्नातील संयुक्त वाटा ७% होता (१९७८). ह्या क्षेत्रांत २.६ % शासकीय भांडवल गुंतलेले होते. ह्या क्षेत्राची १९६३ ते १९७४ ह्या काळात सरासरीने प्रतिवर्षी ३.३% प्रमाणे वाढ होत गेली. मासेमारीपैकी ९५ % उत्पादन खासगी क्षेत्रात होते. १९७८ मध्ये देशांतर्गत मत्स्योत्पादन १.४४४ लक्ष मे. टना व सागरी मत्स्योत्पादन ३. ९६१ लक्ष मे. टन एवढे झाले. एकूण उत्पादनापैकी १.६ % मासे निर्यात करण्यात आले. मर्ग्वींजवळील उथळ समुद्रात मोती सापडतात. विद्युतशक्ती : स्वातंत्र्योत्तर काळात रंगून येथे पहिला औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यात आला व पुढे तीन जलविद्युत् प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. द. शान प्रांतात सॅल्वीनच्या वालू चाऊंग ह्या उपनदीवर एका प्रकल्पामुळे रंगून व इतर ५३ गावांना व १४५ खेड्यांना वीजपुरवठा होतो. बालू चाऊंग प्रकल्पाची स्थापित क्षमता १.६८ लक्ष किवॉ. आहे. लॉपिता नदीवर लॉईकॉव येथे जपानी अर्थसाहाय्याने १९६० मध्ये धरण बाधण्यात आले असून लॉपिता ते मंडालेदरम्यान ३९१ किमी. प्रेषण मार्ग उभारण्यात आला आहे. पेगूजवळील तेकाई येथे एक धरण बांधण्यात आले आहे. १९७९ मध्ये ब्रह्मदेशातील विद्युत् प्रकल्पांतील एकूण स्थापित क्षमता ६,४२,२३० किवॉ असून त्यांपैकी १,६८,५०० किवॉ जलविद्युत् व १.५८,८५० किवॉ वायुटरबानविद्युत् असून त्यांद्वारे २६४ शहरांचे व ७०९ खेड्यांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. उद्योगधंदे : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ब्रह्मी शासनाने कच्च्या मालावर आधारित असलेल्या अर्थव्यवस्थेचे रूपांतर औद्योगिक अर्थव्यवस्थेत करण्याचे ठरविले. १९५० ते १९६० पर्यंत अमेरिकेची संयुक्त संस्थाने व यूरोपीय राष्ट्रे यांकडून यंत्रसामग्री आयात करण्यात आली. १९६२ मध्ये जनरल ने विनच्या क्रांतिकारी सरकारने ‘समाजवादाचा ब्रह्मी मार्ग’ स्वीकारला. उत्पादन वाढविणे, राहणीमान उंचावणे, बेकारी निर्मूलन, रोजगार उपलब्धता, आर्थिक विषमता निरसन ही उद्दीष्टे साधण्यासाठी शेती, उद्योग, वितरण, वाहतूक, निर्यात व्यापार यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले, तसेच उत्पादनातील परकीय हस्तक्षेप थाबविण्यात आला. शेती विकासाच्या धोरणामुळे औद्योगिक क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा फारसा वाढला नाही. १९५० ते १९६५ ह्या कालावधीत तो १०.३ % वरून १५ % पर्यंतच वाढू शकला. ब्रह्मदेशात शेती, जंगल व खनिज उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग प्रामुख्याने निर्माण झाल्यामुळे औद्योगिक विकास मर्यादित क्षेत्रापुरताच राहिला. १९५२ मध्ये औद्योगिक विकास निगम स्थापन करण्यात आला. १९६१ मध्ये आर्थिक विकास निगम स्थापन झाला. मार्च १९६३ मध्ये हा निगम सरकारच्या नियंत्रणाखाली आला. रंगून येथे पोलद, औषध, कापड, स्पिरिट म्यिंजान व मंडाले-कापड आराकान-कागद थायेटम्मो-सिमेंट चौक-रासायनिक खत प्रकल्प थामिन-साखर, ताग, फरशा अशा विविध उत्वादनांची निर्मिती करणारे कारखाने स्थापन करण्यात आले आहेत. मध्य ब्रह्मदेशात भातसडी, लाकूड कापणी व अन्नप्रक्रिया उद्योग उभे राहिले आहेत. पेगू हा प्रमुख औद्योगिक विभाग असून देशातील एकूण २,२५० औद्योगिक उपक्रमांपैकी १,१५३ उपक्रम तेथे आहेत. १९६२–७२ ह्या काळात औद्योगिक विकासाकडे अधिक लक्ष देण्यात आले. ह्या काळात प्रतिवर्षी सरासरी २.८ % उत्पादनवाढ झाली. १९७० नंतर अन्नप्रक्रिया व्यवसाय वेगाने वाढला. बहुसंख्य कामगार ह्या व्यवसायात आहेत. तांदळावरील प्रक्रिया, साखर, मद्यार्क, तंबाखू ह्यांचे उत्पादनमूल्य एकूण ओद्योगिक उत्पादनमूल्याच्या ६० % आहे. सागवानाचे उत्पादन घटल्यामुळे लाकूड कापणीच्या गिरण्यांची संख्या कमी होत आहे. १९६८ मध्ये प्लायवुड प्रकल्प सुरू करण्यात आला. रत्नांना चकाकी आणणे, कातडी कमविणे, सिगार व सिगारेट निर्मिती अशा प्रकारचेही उद्योग सरकारी क्षेत्रात सुरू झालेले आहेत. १९७८-७९ मध्ये सरकारी मालकीचे १,५२५ कारखाने होते व ७१ कारखान्यांची उभारणी जारी होती. उद्योगांचे राष्ट्रीयीकरण हे शासनाचे धोरण असले, तरीही देशात खासगी मालकीचे उद्योग अद्यापही मोठया प्रमाणात आहेत. ऑगस्ट १९७७ मध्ये खासगी उपक्रम सुरू करण्याबाबतचे विधेयक संमत करण्यात आले. १९७८–७९ मध्ये खासगी मालकीचे ३४,५८७ व सहकारी मालकीचे १,५२५ कारखाने होते. ३४,५७४ उद्योगसंस्थांत दहापेक्षा कमी कामगार होते. उत्पादन व प्रक्रिया क्षेत्रांचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा १०.८ %होता. त्यापैकी ५५.५ % सरकारी व ४.९ % सहकारी क्षेत्राचा वाटा होता. १९७७-७८ मधील काही उत्पादनांचे मौद्रिक मूल्य पुढीलप्रमाणे होते : (लक्ष कीयाट) अन्न व पेय – ९७,१५७ कापड – १५,०६६ खनिजे – ११,१९६ औद्योगिक कच्चा माल – ७,७१२ बांधकाम साहित्य–६,५८३ वाहने – ३,३०३ विद्युत् साहित्य – १,५२८ शेतीची अवजारे – १,४२३. १९७९-८० मधील प्रमुख वस्तूंचे उत्पादन पुढीलप्रमाणे होते (आकडे १,००० टनांत) : सूत –१२.७ मीठ –२६३ साखर – ३६ सिगारेट–२५,९१० लक्ष नग साबण – ३६.६ सिमेंट-३७० खनिज तेल-७१,१०० गॅलन रॉकेल – ३४,७०० गॅलन.


खनिजे : कथिल, टंगस्टन, शिसे, चांदी, इंद्रनील मणी, पाचू इत्यादींच्या खनिजांचे साठे देशात आहेत. खनिज तेलाचे उत्पादन १८८७ पासून सुरू झाले असून याबाबतीत हा देश स्वयंपूर्ण झालेला आहे. १९७० मध्ये एका अमेरिकन तेल कंपनीच्या सहकार्याने रंगूनजवळच्या सागरतळाखालील तेलाच्या साठ्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. विविध प्रकारच्या खनिज उत्पादनांसाठी चार महामंडळे स्थापन करण्यात आली आहेत. एका जपानी उद्योगसंस्थेच्या सहकार्याने सिरीअँम येथे तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा अभिकल्प तयार करण्यात आला. १९७९-८० मधील खनिज उत्पादन पुढीलप्रमाणे होते : पेट्रोल ७१० लक्ष गॅलन अशुद्ध तेल ११६.७ लक्ष पिंपे रॉकेल ३४७ लक्ष गॅलन कोळसा ३८,६०० लाँग टन शिसे ५,५८२ लाँग टन नैसर्गिक वायु ३६,३७,४७,३६६ घ. मी. अँटिमनी १२५ लाँग टन जस्त ६,००० लाँग टन कथिल १,३७२ लाँग टन टंगस्टन ३६८ टन शुद्ध चांदी ४.१ लक्ष टन. मौल्यवान माणके व रत्‍ने यांचे उत्पादन अल्प प्रमाणावर होत आहे. खनिज पदार्थ व तेले यांचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा १९६३ ते १९७४ ह्या काळात केवळ १.९ % होता, तो १९७४ ते १९७८ मध्ये १०.५ % पर्यंत वाढल्याचे आढळते. देशातील खनिज संपत्तीचा पुरेपूर शोध घेऊन तिचा उपयोग करण्याचे कार्य मात्र पुरेशी गती घेऊ शकलेले नाही. कामगार कल्याण : ब्रह्मदेशात कामगार संघटना नाहीत. कामगारांना संप करण्यास बंदी आहे. कामगार तंटे समेट मंडळाकडे सोपविले जातात. ह्या मंडळात निवडक कामगार व अधिकारी असतात. वेतनविषयक व कामगारविषयक शासकीय धोरण राबविण्यासाठी स्थानिक समेट मंडळांना पूरक अशी कामगार मंडळे देशभर स्थापण्यात आली आहेत. ब्रह्मदेशाने शेतीतील प्रमाणित तसेच किमान वेतन, बालकामगार, सुरक्षा व आरोग्य ह्यांबाबत कायदे केलेले आहेत. आठवड्याचे कामाचे तास ४० ठरविण्यात आले आहेत. औद्योगिक कामगारांना १० दिवसांची वार्षिक सुटी, १४ दिवस धार्मिक व राष्ट्रीय सुट्या, ६ दिवस किरकोळ  रजा दिली आणि ३० दिवसांची वैद्यकीय रजा दिली जाते. देशातील एकूण श्रमशक्ती १९७८-७९ मध्ये १२९.३५ लक्ष असून तीपैकी ८६.२७ लक्ष लोक शेती, मृगया, मासेमारी व जंगल उद्योग यांमध्ये १२.३९ लक्ष व्यापार व हॉटेल व्यवसाय यांमध्ये ९.६८ लक्ष निर्मितिउद्योगांत १.८९ बांधकाम उद्योगांमध्ये ४.३० लक्ष वाहतूक व संदेशवहन क्षेत्रात ७.६० लक्ष अर्थकारण, विमाव्यवसाय व सामाजिक सेवांमध्ये गुंतलेले होते. व्यापार : १९६२ मध्ये देशांतर्गत व्यापारचे राष्ट्रीयीकरण केल्यामुळे १९६१–६१ मधील खाजगी व्यापाराचे प्रमाण ६८ % वरून १९६५–६६ मध्ये १५ % पर्यंत घटले. भारतीय व चिनी व्यापाऱ्यांकडून व्यापार काढून घेण्यात आलेला आहे. १९७६ मध्ये राज्य व्यापार मंडळाकडे सर्व व्यापार सोपविण्यात आला. ब्रह्मदेशाचा आंतरराष्ट्रीय व्यापारही सरकारी यंत्रणेमार्फत होतो.निर्यातीत कृषी, वन व खनिज उत्पादनांचे प्रमाण अधिक आहे. १९७९–८० चा निर्यात व्यापार अंदाजे १८,५२७ लक्ष कीयाट मूल्याचा होता. प्रमुख ग्राहक देश सिंगापूर, इंडोनेशिया, बांगलादेश, श्रीलंका, जपान, हाँगकाँग, मॉरिशस, यूरोपीय आर्थिक समुदाय असून निर्यातीमध्ये तांदूळ ३६ %, सागवान २७ %, फळे व भाजीपाला ७ % असे प्रमाण होते. तांदूळ व खनिज तेल निर्यात करणारे ब्रह्मदेश हे एकमेव अविकसित राष्ट्र आहे. १९७९–८० मध्ये अंदाजे ७ लक्ष टन तांदळाची निर्यात झाली. आयातीत प्रामुख्याने भांडवली वस्तूंचा समावेश होतो. यंत्रसाम्रगी, वाहतूक साधने, बांधकाम साहित्य यांचे एकूण आयातीतील प्रमाण ७९ % असून उपभोग्य वस्तूंचे प्रमाण ८ % आहे. १९७९–८० मध्ये ३०,१२३ लक्ष कीयाट मूल्याची आयात करण्यात आली. यंत्रे व त्यांचे सुटे भाग, संरक्षण साहित्य, औद्योगिक कच्चा माल, उपभोग्य वस्तू इत्यादींची आयात अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जपान, ग्रेट ब्रिटन, चीन, पाकिस्तान, बांगला देश, प. जर्मनी,रशिया, ऑस्ट्रेलिया ह्या देशांकडून करण्यात आली. १९७५ ते १९७८ ह्या वर्षात ब्रह्मदेशाचा व्यवहारशेष तुटीचा होता. ब्रह्मदेशाचे अधिकृत चलन ‘कीयाट’ हे आहे. १९५२ पूर्वी ब्रह्मी रुपया अस्तित्वात होता. ‘प्या’ हे लहान नाणे असून १०० प्या म्हणजे १ कीयाट होतो. १, ५, १०, २०, २५, ५० व १०० कीयाटच्या कागदी नोटा आणि १ कीयाटची व १, ५, १०, २५ व ५० प्याची नाणी प्रचारात आहेत. १९८० मधील कीयाटचा विनिमय दर पुढीलप्रमाणे होता : १ स्टर्लिंग पौंड = १४.८३ कीयाट १ अमेरिकी डॉलर = ६.८४ कीयाट त्याच वर्षीचा विनिमय दर १०० कीयाट = ६.७४ स्टर्लिंग पौंड = १४.६१ अमेरिकी डॉलर असा होता. किंमती नियंत्रित केल्यामुळे १९६१–६९ या काळात भाववाढ टाळण्यात शासनाला यश मिळाले. १९७० नंतर मात्र चलनवाढीचे परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू लागले. सरकारचा भांडवली खर्च वाढल्यामुळे तुटीचा अर्थसंकल्प करावा लागत आहे. १ एप्रिल १९८० ते ३१ मार्च १९८१ ह्या वर्षाच्या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न २,४९६.८० व खर्च २,७१०.४० कोटी कीयाट होता. वस्तू व सेवांवरील कर, सीमाशुल्क हे सार्वजनिक उत्पन्नाचे प्रमुख मार्ग आणि उत्पादन, प्रक्रिया, व्यापार, संरक्षण, वाहतूक व दळणवळण ह्या खर्चाच्या मुख्य बाबी आहेत. ३१ मार्च १९७९ अखेर ३०८.४० कोटी कीयाट एवढी अंतर्गत कर्जे उभारण्यात आली होती. ब्रह्मदेश हा संयुक्त राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय चलन निधी, जागतिक बँक, आशियाई विकास बँक इत्यादींचा सदस्य आहे. आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटनेत (आसिआन) ब्रह्मदेश अद्याप सामील झालेला नाही. बँकिंग : ब्रह्मदेशातील सर्व बँकांचे व विमासंस्थांचे २३ फेब्रुवारी १९६३ रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्यांचे विलीनीकरण करून नोव्हेंबर १९६९ मध्ये ‘पीपल्स बँक ऑफ द युनियन ऑफ बर्मा’ स्थापण्यात आली. एप्रिल १९७२ मध्ये तिचे नाव ‘युनियन ऑफ बर्मा बँक’ असे ठेवण्यात आले. तिची पुनर्रचना करून एप्रिल १९७६ मध्ये ती देशाची मध्यवर्ती बँक झाली. नोव्हेंबर १९७५ मधील एका कायद्यानुसार युनियन ऑफ बर्मा बँक म्यान्मा इकॉनॉमिक बँक, म्यान्मा फॉरिन ट्रेड बँक, म्यान्मा अँग्रिकल्चरल बँक अशा सरकारी मालकीच्या चार स्वतंत्र बँका स्थापण्यात आल्या. यांशिवाय म्यान्मा विमा निगम हे शासकीय महामंडळ विमा व्यवसाय पाहते. ब्रह्मदेशात शेअरबाजार नाही. आर्थिक नियोजन : ब्रह्मदेशाने १९७१ मध्ये आर्थिक नियोजनास प्रारंभ केला. १९७१ मध्ये वीस-वर्षीय योजना तयार करून ती पाच चतुर्वार्षिक योजनांमध्ये विभागण्यात आली. ऑक्टोबर १९७१ मध्ये पहिली चतुर्वार्षिक योजना कार्यान्वित झाली. १९७२ मध्ये धोरणात्मक बदल झाले. लोकसंख्यावाढीचा दर आर्थिक विकासाच्या दरापेक्षा जास्त असल्यामुळे ही योजना १९७३ मध्ये रद्द करण्यात आली. दुसरी चतुर्वार्षिक योजना १९७४–७५ ते १९७७–७८ ह्या काळात पूर्ण झाली. ह्या योजनेत स्थूल राष्ट्रीय उत्पादन ४.८ % नी वाढले. तिसरी योजना १९७८-७९ मध्ये सुरू झालेली असून दरडोई उत्पन्न ६.६ व निव्वळ उत्पादन मूल्य ५.९ टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ब्रह्मदेशाच्या आर्थिक विकासात मदत करण्यासाठी ‘ब्रह्मदेश साहाय्य मंडळा’ची (बर्मा एड ग्रुपची) स्थापना नोव्हेंबर १९७६ मध्ये झालेली आहे. १२ राष्ट्रे व ५ आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था त्याचे सदस्य आहेत. वाहतूक व संदेशवहन : रंगून ते प्ये (प्रोम) हा पहिला लोहमार्ग १८७७ मध्ये, तर १८८६ साली रंगून ते सितांग खोरे जोडणारा लोहमार्ग बांधण्यात आला. रंगून–मंडाले–म्यिचीना हा प्रमुख मार्ग असून त्याला जोडणारे इतरही लोहमार्ग आहेत. खनिज तेल क्षेत्रापर्यंत लोहमार्गांचा विस्तार करण्यात आलेला आहे. आराकान योमा व तेनासरीम विभागांत लोहमार्ग नाहीत. १९४८ मध्ये लोहमार्गाचे राष्ट्रीयीकरण झाले. १९७२ मध्ये ब्रह्मी रेल्वे निगम सरकारने ताब्यात घेतला. १९७८ मध्ये ब्रह्मदेशात ४,४७३ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. १९७९-८० मध्ये, ३,६६५ लक्ष प्रवासी किमी. वाहतूक व ४,९२० लक्ष टन किमी. मालवाहतूक करण्यात आली १९८० मध्ये ३,१३७ किमी. लांबीचे मीटरमापी मार्ग होते. ब्रह्मदेशात दुसऱ्या महायुद्धकाळात तीन आंतरराष्ट्रीय महामार्ग होते. ब्रह्मदेशातील लॅश्यो ते चीनमधील कुनमिंग ही शहरे जोडणारा ‘बर्मा रोड’ नावाने ओळखला जाणारा रस्ता १९३७-३८ मध्ये बांधण्यात आला. ह्या रस्त्याची लांबी सु. १,१५४ किमी. असून त्यांपैकी ५७९ किमी. रस्ता पर्वतातून जाणारा रस्ता ‘स्टिलवेल रोड’ १९४३-४४ मध्ये बांधण्यात आला. आसाममधील लेडो ते उत्तर ब्रह्मदेशातील म्यिचीना ही शहरे ह्या रस्त्याने जोडण्यात आली. शान पठारावरील केंगतुंग ते उत्तर थायलंडमधील लांपांग ही दोन्ही शहरे जोडणारा आंतरराष्ट्रीय महामार्गही बांधण्यात आलेला होता. दुसऱ्या महायुद्धकाळात दोस्त राष्ट्रांनी ह्या मार्गाचा वापर केला. सध्या हे मार्ग आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खुले नाहीत.


ब्रह्मदेशात सर्व राज्ये जोडणारे महामार्ग बांधण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. १९६३ मध्ये रस्ता वाहतुकीचे राष्ट्रीयीकरण कऱण्यात येऊन राज्य वाहतूक निगम स्थापण्यात आला. १९७५ मध्ये ४,०२३ किमी. लांबीचे हमरस्ते व ९,६५६ किमी. लांबीचे मुख्य मार्ग होते. १९७८ मध्ये बारमाही मोटार लस्ते ३७,०२५ किमी. लांबीचे होते. १९७९-८० मध्ये प्रवासी बसगाड्या १,५५०, खाजगी मोटारगाड्या ५२,७००, ट्रक व व्यापारी वाहने ३२,७१४ व मोटारसायकली १०,२०० अशी वाहने होती. १९७८-७९ मध्ये १६,८२१ कोटी प्रवासी व १८.४४ लक्ष टना मालाची वाहतूक केली गेली. खाजगी मालकीच्या वाहनांद्वारेही वाहतूक होते. जुन्या मोटारगाड्या, सुट्या भागांची कमतरता व रस्त्यांची दुःस्थिती ह्या रस्ता-वाहतूक सेवेतील प्रमुख अडचणी आहेत. अंतर्गत जलवाहतूक : इरावती व तिच्या उपनद्या यांमधून होणारी वाहतूक तांदूळ व्यापारात महत्त्वपूर्ण आहे. छोट्या बोटी भातशेतांपर्यंत जाऊ शकतात. इरावती नदीतून १,४४८ किमी., म्यिचीना नदीतून उन्हाळ्यात १४४ किमी., तर चिंद्विन नदीतून ६११ किमी. वाहतूक होते. इरावतीच्या त्रिभुज प्रदेशातील अनेक प्रवाहांची एकूण लांबी १,६०० किमी. असून त्यांतून जलवाहतूक केली जाते. सितांग नदीतील गाळामुळे तिच्यातून लहान बोटीच जाऊ शकतात. सॅल्वीन नदीचा धावत्यांचा प्रदेश वगळता सु. १२० किमी. जलवाहतुकीस उपयोग होतो. आराकान, तेनासेरीम किनाऱ्यांवर लहान होड्या व स्टीमर यांद्वारे वाहतूक केली जाते. सागवान व इतर लाकडांचे ओंडके बांधून प्रवाहात सोडून दिल्यामुळे लाकूड वाहतूक सुलभपणे होऊ शकते. ब्रह्मदेशात ८ हजार किमी. लांबीच्या खोल पाण्यातून, तर ५,९२६ किमी. च्या कमी खोल असलेल्या प्रवाहांतून जलवाहतूक केली जाते. अंतर्गत जलवाहतूक प्रामुख्याने खाजगी व सहकारी संस्थांद्वारे होते. १९७७-७८ मध्ये ह्या संस्थांद्वारे २९० लक्ष टन मालाची वाहतूक समुद्र व नद्या यांमधून करण्यात आली. सरकारी संस्थांनी १९७७-७८ मध्ये २२० लक्ष प्रवाशांची वाहतूक केली. सागरी वाहतूक : रंगून हे अत्याधुनिक साधने व सुविधा असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर असून तेथे १५ हजार टनांपर्यंतची जहाजे थांबतात. १९७९ मध्ये प्रत्येकी १०० टनांहून अधिक टनभार असलेली ७८ व्यापारी जहाजे ब्रह्मदेशाकडे होती. त्यांतून ६४,४०० स्थूल टन माल वाहतूक झाली. ब्रह्मी बंदर निगमाकडे बंदराची देखभाल सोपविण्यात आली आहे. ह्या निगमाची ९ जहाजे असून त्यांचा एकूण टनभार ४,७०० टन आहे. त्यांशिवाय २० लहान जहाजेही आहेत. १९५९ मध्ये ‘बर्मा फाइव्ह स्टार लाइन कॉर्पोरेशन’ हा आंतरराष्ट्रीय जलवाहतूक निगम स्थापन झाला असून किनारी भाग तसेच यूरोपीय देश व जपान ह्यांच्याकडे ह्या निगमाची २४ जहाजे मालवाहतूक करतात. हवाई वाहतूक : रंगून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून अंतर्गत हवाई वाहतुकीसाठी ४५ विमानतळ आहेत. ‘युनियन ऑफ बर्मा एअरवेज’ ह्या ब्रह्मी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनीची १९४८ मध्ये स्थापना झाली. तथापि नोव्हेंबर १९५० पासून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवा सुरू झाली. रंगून ते डाक्का, कलकत्ता, काठमांडू, हाँगकाँग, बँकॉक अशी परदेशी हवाई उड्डाणे केली जातात. १९७९–८० मध्ये १,६१,२७३ प्रवासी मैल वाहतूक व ८ हजार टन मालवाहतूक झाली. देशात १९७८ मध्ये १,८५० लक्ष प्रवासी-किमी. हवाई वाहतूक व १४ लक्ष निव्वळ टन किमी. मालाची वाहतूक झाली. रंगून येथील मिंन्गॅलॅडन विमानतळाचा विस्तार करून ब्रह्मदेशाने जंबो जेट युगात प्रवेश करण्याची सिद्धता केली आहे. संदेशवहन : १९७७ मध्ये देशात १,१०० डाक कार्यालये व २८७ तारकचेऱ्या होत्या. १९७८ मध्ये ३२,६१६ दूरध्वनियंत्रे (त्यांपैकी एकट्या रंगून शहरात २४,४७६) होती. आशियाई राष्ट्रे तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, ग्रेट, ब्रिटन, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा इ. राष्ट्रांशी ब्रह्मदेशाचा रेडिओ दूरध्वनी व प्रत्यक्ष बिनतारी संपर्क आहे. बर्मा ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचे रंगून येथे प्रेक्षेपण केंद्र असून ब्रह्मी, आराकानी, मॉन, शान, कारेन, चिन, काचिन ह्या देशी भाषांतून व इंग्रजीतून कार्यक्रम सादर केले जातात. १९७९ मध्ये ६.७० लक्ष रेडिओ परवानाधारक होते. ब्रह्मदेशात दूरचित्रवाणी सेवा नाही. रंगीत प्रक्षेपणाची व्यवस्था पूर्ण झाली असून १९८० पासून दूरचित्रवाणी सेवा सुरू होणार होती. वृत्तपत्रे : १९६६ मध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यात येऊन केवळ ब्रह्मी व इंग्रजी भाषिक वृत्तपत्र प्रकाशनास परवानगी देण्यात आली. राजकीय पक्षांवरही वृत्तपत्र प्रकाशनाची बंदी घालण्यात आली. १९६० मधील ३९ वृत्तपत्रांवरून १९६९ मध्ये २८ वर त्यांची संख्या घटली. १९७८ मध्ये तर दैनिक वृत्तपत्रे निघू लागली. सर्व वृत्तपत्रे सरकारच प्रसिद्ध करते. रंगून येथून बोटा ताऊंग (व्हॅन्गार्ड डेली, ब्रह्मी), गार्डियन (इंग्रजी), केनॉन (ब्रह्मी),लोकेथा किथू नायझिन (ब्रह्मी व इंग्रजी) हे अधिकृत वृत्तपत्र, म्यान्मा आलिन (ब्रह्मी), वर्किंग पीपल्स डेली (इंग्रजी) तसेच मंडाले येथून हाथवाड्डी (ब्रह्मी) अशी ७ दैनिके प्रसिद्ध होतात. ह्या सर्व पत्रांचा एकूण खप ८ लाख आहे. न्यूज एजन्सी ऑफ बर्मा ही सरकारी वृत्तसंस्था असून इतर ५ वृत्तसंस्था परदेशी बातमीपत्रे देतात.                                                           

                                                                                                                                                                                                                                                                                                                      फरांदे, वि. दा. लोक व समाजजीवन : ब्रह्मदेशातील अगदी आद्य समाज व संस्कृती यांविषयी साधार माहिती उपलब्ध नाही तथापि ज्यू आणि मॉन जमातीचे लोक या देशात प्रथम स्थायिक झाले असावेत असे उपलब्ध पुराव्यांवरून दिसते. त्यांच्यानंतर तिबेटो बर्मन व पुढे द. चीनमधून शान-थाई जमातीचे लोक येथे आले. कारेन, चिन, व काचिन हे लोक ख्रिस्तपूर्व काळापासून इ. स. अठराव्या शतकापर्यंत येथे येत राहिल्याचे दिसते. अर्थात विद्यामान ब्रह्मी समाज मिश्र वांशिक परंपरेतून निर्माण झाला, हे उघड दिसते. उत्तर-दक्षिण वाहणाऱ्या नद्या व त्यांची खोरी आणि त्यांभोवतीचा पर्वतमय प्रदेश, यांमुळे सामाजिक व सांस्कृतिक अभिसरण होण्यात अडथळे आल्याने ब्रह्मी समाजात प्रत्येक जमातीचा स्वायत्तपणा टिकून राहिल्याचे दिसते. भारत-ब्रह्मदेश सरहद्दीवर मंगोलॉइड वंशातील काचिन व चिन जमातींचे लोक प्रामुख्याने स्थायिक झाले. हे लोक फिरती शेती, तसेच लाकूडतोड करतात. पूर्वेकडील शानच्या पठारावर थाई वंशातील शान जमातीचे लोक बहुसंख्येने आढळतात. त्यांचा थाई (सयामी) लोकांशी निकटचा संबंध आहे. शानच्या पठाराच्या दक्षिणेस कारेन लोकांची वस्ती असून ते थाई-चिनी वंशातील आहेत. त्यांतील अनेक लोक ख्रिस्ती धर्मीय आहेत. देशातील आदिवासी म्हणून पूर्व सरहद्दीवरील वा जमातीच्या लोकांचा निर्देश करण्यात येतो. देशातील या जमातीचा वेगळेपणा भाषाभिन्नतेतूनही दिसून येतो. तिबेटो-ब्रह्मी, मॉन-ख्मेर व थाई-चिनी अशा तीन प्रमुख भाषागटांत देशातील जमाती विखुरलेल्या आहेत. ब्रह्मदेशात धार्मिक स्वातंत्र्य आहे. बहुसंख्य लोक बौद्ध धर्मातील ‘थेरवाद’ पंथाचे अनुयायी आहेत. इतर बौद्ध प्रणालींचे अनुयायीही देशात आढळतात. बौद्ध भिक्षू संघ सर्वत्र आढळतात. तथापि बौद्ध हा देशाचा अधिकृत धर्म नव्हे. देशात इस्लाम धर्मीय सु. ४ % असून ख्रिस्ती धर्मीय ३ % आढळतात. १९६५-६६ साली ख्रिस्ती मिशनरी कार्यावर बरीच बंधने घालण्यात आली. बौद्ध मठ व पॅगोडे सर्वत्र आढळतात. मंडाले हे बौद्ध मठांचे मोठे केंद्र आहे. रंगूनच्या परिसरात उच्च अध्ययनाची बौद्ध केंद्रे १९५० नंतर विशेषत्वाने स्थापन करण्यात आली. यांशिवाय देशात हिंदुधर्मीयही आढळतात. देशातील जननमान व मृत्यूमान अनुक्रमे २८.३% व १०.१% असे होते (१९७८). इतर आशियाई देशांच्या तुलनेने येथील लोकसंख्येची घनता विरळ आहे. देशातील सु. ८५% लोक ग्रामीण भागात राहणारे आहेत. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. ४० असली, तरी सुपीक नदीखोऱ्यांतून ती १९३ पर्यंत आढळते (१९७०). लोकसंख्यावाढीचा दर १९६७ ते ७० या काळात २.२% होता. ब्रह्मी ही संज्ञा स्थूलमानाने ब्रह्मदेशातील सर्वच लोकांना उद्देशून वापरण्यात येते. देशात ब्रह्मी भाविक लोक सुमारे ६८% असून त्यांना ‘बर्मन’ अशीही संज्ञा आहे. कारेन व शान जमातींचे लोक अनुक्रमे १०% व ८% आहेत. देशातील प्रत्येक जमातीची काही शरीर-वैशिष्ट्ये ठळकपणे दिसून येतात. ब्रह्मी लोक ठेंगू, सडपातळ, गव्हाळ रंगाचे असून कारेन लोक अधिक दणकट व उजळ वर्णाचे असतात. उत्तरेकडील डौंगराळ प्रदेशातील जमाती उंच बांध्याच्या आहेत. ब्रह्मी लोकांचे सर्वसाधारणतः भात हे मुख्य अन्न आहे. मासे, मांस हेही त्यांच्या नित्याच्या आहारात असतात. चहा हे त्यांचे आवडते पेय आहे. ब्रह्मी स्त्री-पुरूषांचा वेश साधारण सारखाच असतो. कमरेला घागरा किंवा लुंगी व अंगावर पोलके किंवा अंगरखा असून स्त्रियांना फुलांची व अलंकारांची आवड आहे. स्त्रियांना समाजात पुरूषांपेक्षा प्राधान्य आहे. त्यांना मालमत्तेचे वारसा हक्कही आहेत. त्या लग्नानंतर आपले नाव बदलत नाहीत. किरकोळ व्यापारउदिमांतही स्त्रियांचे प्रमाण बरेच आहे. ब्रह्मी कुटुंब छोटे असून आई-वडील व मुले यांचाच त्यात अंतर्भाव असतो.


ब्रह्मी लोकांची घरे बांबूची असून ती जमिनीपासून १ ते १.५ मी. उंचीवर बांधलेली असतात. घराभोवती मोकळी जागा असते. सधन लोकांची घरे सागवानी लाकडाची असतात. अलीकडे सिमेंटचा वापर केलेली आधुनिक पद्धतीची घरे, विशेषतः शहरांतून दिसून येतात. शासकीय गृहनिर्माण मंडळांमार्फत गृहबांधणीचा कार्यक्रमही देशात राबविण्यात येत आहे. समाजकल्याण व आरोग्य : शासनाचे कल्याणकारी उद्दिष्ट असले, तरी समाजकल्याणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आर्थिक अडचणी आहेत. देशात सामाजिक सुरक्षा विमायोजना जारी आहे. देवी व हिवताप यांसारख्या साथीच्या रोगांना प्रतिबंधक उपाययोजना करून आळा घालण्यात पुषकळच यश प्राप्त झाले आहे. १९७७ साली देशात ५,७८७ डॉक्टर आणि २२,७५५ खाटांची सोय असलेली ५१२ रुग्णालये तसेच १,४५९ आरोग्य केंद्रेही होती. शिक्षण : देशातील पारंपरिक शिक्षणपद्धती म्हणजे बौद्ध धर्मगुरूंनी चालविलेल्या पॅगोडा शाळा. १९६६ पासून देशातील सर्व शिक्षण-पद्धती शासनाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आली. तथापि धार्मिक शिक्षणाच्या पॅगोडा शाळांना मात्र परवानगी देण्यात आली. १९६५ ते १९७० या काळात शिक्षणाची पंचवार्षिक योजना हाती घेण्यात आली तिचे उद्दिष्ट देशभर प्राथमिक शाळा स्थापन करण्याचे होते. ५ ते ९ वर्षे वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण १९८५-८६ पर्यंत सक्तीचे करण्याचा प्रयत्नट केला जाणार आहे. शालेय शिक्षणाचे माध्यम ब्रह्मी भाषा असून इंग्रजी ही दुय्यम भाषा म्हणून सर्व माध्यमिक शाळांतून आवश्यक करण्यात आली आहे. प्राथमिक, पूर्व-माध्यमिक व धंदेशिक्षण मोफत आहे. देशात १९७८-७९ मध्ये शिक्षणविषयक परिस्थिती पुढीलप्रमाणे होती : प्राथमिक शाळा  २३,०९९ शिक्षक ८४,५९३ विद्यार्थी ३७,३१,१६० माध्यमिक विद्यालये १,३०२ शिक्षक १९,९३४ व विद्यार्थी ७,५४,०७९ उच्च माध्यमिक विद्यालये ५९६ शिक्षक ११,४६९ विद्यार्थी १,७९,६६० शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये १६ शिक्षक ७८६ व विद्यार्थी ९,५७६ विद्यापीठे व महाविद्यालये ३५ शिक्षक ३,९२२ व विद्यार्थी १,१२,६७१. १९६४ च्या उच्च शिक्षणाधिनियमान्वये रंगून विद्यापीठाचे तसेच मंडाले विद्यापीठाचेही विकेंद्रीकरण करण्यात आले. याशिवाय देशात अभियांत्रिकी, शिक्षणशास्त्र, वैद्यक, कृषी, अर्थ व व्यापार, पशुवैद्यक इ. विषयांतील पदवी अभ्यासक्रम असलेल्या स्वतंत्र उच्च शिक्षणसंस्था आहेत. रंगून येथे विदेशी भाषाशिक्षणाची स्वतंत्र शिक्षणसंस्था आहे. १९७६ पासून देशात पत्रद्वारा शिक्षणाचीही सोय करण्यात आली आहे.

                                                                                                                                                                                                                                                                                                          जाधव, रा. ग. सावंत, प्र. रा. कला व क्रीडा : ब्रह्मदेशाला आग्नेय आशियातील हिंदु-बौद्ध केलचा, विशेषतः वास्तुकला व मूर्तिकला यांचा, वारसा लाभलेला आहे. त्यामागील प्रेरणा व आदर्श हे भारतीयतच आहेत. पॅगोडा सारख्या वास्तू, विविध प्रकारच्या बुद्धमूर्ती, क्वचित आढळणारी हिंदू देवतांची मंदिरे यांतून हा वारसा जाणवतो. तथापि या कलांतील स्थूल आकृतिबंध सोडले, तर ब्रह्मी वास्तू आणि मूर्ती यांत खास अशी काही ब्रह्मी कलावैशिष्ट्येही दिसून येतात. त्यामुळेच त्यांना एक व्यवच्छेदक असे ब्रह्मी स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसते. ब्रह्मदेशातील मॉन, प्यू आणि शान या तीन प्राचीन संस्कृतींच्या संमिश्र अशा प्रभावामुळेही ब्रह्मी कलेचे वैशिष्ट्य निर्माण झालेले दिसते. इ. स. पू. तिसऱ्या शतकात भारतीय बौद्ध धर्मप्रसारक ब्रह्मदेशात गेले, तेव्हा पासून ब्रह्मी-भारतीय संस्कृतिसंगम काळ सुरू झाला. ब्रह्मी संस्कृतीच्या अनेक अंगोपांगांतून भारतीय संकल्पना स्वीकारण्यात आल्या. तथापि कलेच्या क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण अशी निर्मिती इ. स. पाचव्या-सहाव्या शतकांत दिसू लागली. उत्तर-पगान कालखंडात (इ.स. १० ते ११ वे शतक) या कलेची पूर्ण विकसीत अवस्था दिसून येते. इरावती नदीच्या खोऱ्यातून ब्रह्मी राजवटींची केंद्रे उदयास आली व तीच ब्रह्मी कलेची केंद्रे ठरली. थाटोन, पेगू, रंगून, पगान, प्रोम, मंडाले, अवा, अमरपूर, सगाइंग, श्वेबो इ. इतिहासप्रसिद्ध नगरांत प्राचीन ब्रह्मी कलेचे अवशेष आढळून येतात. आग्नेय आशियातील ख्मेरसारखअया कलानिर्मितीचा पद्धतशीर अभ्यास झालेला आहे. त्यामानाने ब्रह्मी कला ही काहीशी उपेक्षितच राहिली. देशातील मोठमोठे मठ, पॅगोडे, बुद्धमूर्ती, मंदिरे आणि त्यांवरील चित्रांकन व अलंकरण यांतून धार्मिक भावनेचे प्रत्यंतर येते. देशभर पॅगोडे बांधण्यात आले असून रंगून येथील सर्वांत उंच (सु. ११२.१६ मी.) श्वे डागोन पॅगोडा तर खास ब्रह्मी अलंकरण शैलीच्या दृष्टीने जगप्रसिद्ध आहे. हा प्रचंड घंटाकृती पॅगोडा सोन्याने मढविलेला असून सु. २,५०० वर्षांपूर्वीचा आहे, असे मानतात. सण व उत्सवाच्या वेळी पॅगोड्यांमध्ये लोकांचे सामूहिक संगीत चालते. देशातील संगीत कलेला सु. १,५०० वर्षे झालेली असावीत, असे एका चिनी यात्रेकरूने इ. स. ८०२ मध्ये म्हटलेले आहे. पगान कालखंडात देशातील संगीत कलेने उत्कर्षाचा शिरोबिंदू गाठला होता. ढोलाच्या आकाराचे ‘सेंग बेंग’, घटेच्या आकाराचे की वेंग’ आणि ‘सोंग’ नामक एक प्रकारचा तंबोरा या वाद्यांमधून निर्माण होणारे मिश्र संगीत अतिशय मधुर असते. त्याचप्रमाणे बांबूची अनेक प्रकारची वाद्येही येथे लोकप्रिय आहेत. ब्रह्मी नृत्यप्रकारात मुख्यत्वे शास्त्रीय नृत्य व नृत्य नाटिका असे दोन प्रकार आहेत. त्यांपैकी नृत्य नाटिकेमध्ये भगवान बुद्धाच्या जीवनावरील अनेक कथा, प्रसंग दाखविले जातात. ‘नाटखी’ हा प्रकार एक प्रकारचे नाटकच असून ते केव्हाकेव्हा रात्रभरही चालते. यात बुद्धाच्या जीवनकहाणीबरोबरच समाजातील आधुनिक व्यंग्यांवर टीका केली जाते. ‘ईएनखी’ या नृत्य नाटिकेत सामूहिक नृत्याला विशेष महत्त्व आहे. ‘योजथेखी’ या प्रकारात माणसे पशूंच्या आविष्कारामधून नृत्य करतात. मूर्तिकलेत पॅगोड्यांमध्ये सुंदरसे नमुने पाहावयास मिळतात. त्यांत विशेषेकरून भारतीय शैलीच्या बुद्धमूर्ती अधिक आहेत. त्यांशिवाय काही चिनी ढाच्यांतील मूर्तीही आहेत. सर्व आलिशान इमारती व महाल यांच्यापुढे ब्रह्मी वाघाचे चित्र पहावयास मिळते. ग्रामीण भागात कुंभार मातीच्या मूर्ती बनवितात. त्यांत बुद्धाच्या मूर्तींचे प्रमाण अधिक असते. देशातील आधुनिक मूर्तिकला व चित्रकला यांवर आता पाश्चिमात्य संस्कृतींचा प्रभाव दिसून येतो. यांशिवाय रंगीबेरंगी कपड्यांवरील विणकाम हा देशातील पारंपरिक व्यवसाय असून तो उपजीविकेचे एक साधनही आहे. स्त्रिया घरबसल्या सूत कातणे, रंगीबेरंगी कपडे तयार करणे इ. उद्योग करतात. सोने, चांदी व लाकूड यांवरील कोरीव कामासाठी ब्रह्मदेश शेकडो वर्षांपासून सुरू आहे. यांशिवाय लाखेची भांडी, ट्रे, सिगारेटची पाकिटे तसेच लाकडी फर्निचर, हरतऱ्हेची खेळणी, बाहुल्या इ. सुंदर वस्तू देशात बनविल्या जातात. त्यांवर सोन्याचांदीची कलाकुसरही केली जाते. लाकडी खेळणी व बाहुल्यांवरील लाखेचे रंगकाम विशेष प्रसिद्ध आहे. रेशमी कापडावरील जरीकामही प्रसिद्ध आहे. ब्राँझच्या घंटा तयार करण्याचा उद्योगही प्राचीन आहे. मंडालेजवळ असलेल्या मिंगून पॅगोड्यातील घंटा सु. ९१.५ टन वजनाची आहे. देशातून आग्नेय आशियात सर्वत्र ब्राँझच्या घंटा मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातात. यांशिवाय बांबूपासून छत्र्या तयार करून त्यांवर रंगीबेरंगी अभ्रे चढविणे हाही उद्योग चालतो. परदेशी प्रवासी या छत्र्या हौसेने खरेदी करतात. देशात फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, टेनिस, गोल्फ, मुष्टियुद्ध, पोहणे, नौका शर्यती इ. खेळ खेळले जातात. तथापि ‘चिनलोन’ या पारंपरिक खेळास तेथे विशेष महत्त्व आहे. कारण या खेळास विस्तृत क्रीडांगणाची गरज लागत नाही. देशाच्या डोंगराळ भागात हा खेळ विशेष लोकप्रिय आहे. हा खेळ एक ते सहा खेळाडू खेळतात. १६ इंच (४०.६४ सेंमी.) व्यासाचा एक वेताचा पोकळ चेंडू पाय, गुडघा, डोके किंवा खांद्याने हवेमध्ये उंच उडवीत ठेवणे, हे या खेळाचे वैशिष्ट्य. हाताने चेंडूस स्पर्श करण्यास प्रतिबंध असतो. पूर्वी हा खेळ अनवाणी पायाने खेळला जाई. अलीकडे एक विशिष्ट प्रकारची पादत्राणे खेळाडू वापरतात. सरकारी कारखान्यांतून ती स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जातात. ‘अखिल बर्मा चिनलोन संघा’ द्वारे प्रतिवर्षी या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात येतात. दिल्ली येथे १९५१ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत ब्रह्मदेशाने ५ ब्राँझ पदके मिळविली होती. ब्रह्मदेशाने १९६५ च्या आग्नेय आशियाई द्वीपकल्पीय क्रीडास्पर्धांत पळण्याच्या शर्यतीत ६, फुटबॉलमध्ये १, पोहण्यात १ आणि वजन उचलण्यात ५ अशी सुवर्ण पदके प्राप्त केली होती. १९६७ मध्ये कोलंबो येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय युवा बॅडमिंटन स्पर्धेत या देशाला तिसरा क्रमांक मिळाला होता. ब्रह्मदेशात पर्जन्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे तेथे हॉकीचा खेळ फारसा खेळला जात नाही. फुटबॉल विशेष खेळला जातो. देशातील सर्वांत मोठे क्रीडांगण ‘आँग सान क्रीडांगण’ रंगून येथे असून तेथे राष्ट्रीय पातळीवरील खेळांचे सामने भरतात. याशिवाय मंडाले तसेच इतरही काही शहरांत छोटी छोटी क्रीडांगणे बांधलेली आहेत. पर्यटकांचे विशेष आकर्षण म्हणजे मंडाले येथे प्रतिवर्षी होणाऱ्या हत्तींच्या पळण्याच्या शर्यती. स्पर्धेतील विजयी हत्तीच्या मालकास ‘गज-मोती’ नामक पदक दिले जाते. यांशिवाय डोंगराळ भागांतील लोकांत कोंबडा व तितर यांच्या झुंजी लावाण्याचा खेळही लोकप्रिय आहे. जत्रा, उत्सव इत्यादींमधून अशा प्रकारच्या झुंजी विशेष पहावयास मिळतात.

                                                                                                                                                                                                                                                                                                                           संकपाळ, ज. वा.


भाषा-साहित्य : ब्रह्मी ही सिनो-तिबेटी कुटुंबाच्या तिबेटो-ब्रह्मी शाखेची भाषा असून ती ब्रह्मदेशाची प्रमुख भाषा आहे. या भाषेतील वाङ्मयाची लक्षणीय परंपरा पंधराव्या शतकाच्या मध्यापासूनची असून ह्या शतकात महाकाव्य, सार्वजनिक प्रसंगांवरील काव्ये इ. प्रकारची काव्यरचना झाल्याचे दिसते. बौद्ध धर्मीय देशांचा इतिहासही लिहिला गेला. सोळाव्या शतकात रोमान्ससदृश असे काही लेखन झाले. अठराव्या शतकाच्या आरंभी ब्रह्मदेशाचा इतिहास लिहिला गेला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरी अखेरीस ब्रह्मदेशात मुद्रणालये निघाल्यामुळे साहित्यनिर्मिती आणि साहित्यप्रसार ह्या दोन्ही प्रक्रियांना वेग आला. कथा, नाटक, कादंबऱ्या असे साहित्य निर्माण झाले. विसाव्या शतकारंभी रंगून विद्यापीठाची स्थापना झाल्यामुळेही वाङ्मयनिर्मितीत आणखी चालना मिळाली. स्वातंत्र्योत्तर काळात ‘बर्मा ट्रॅन्स्लेशन सोसायटी’ कडून वाङ्मयनिर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. [⟶ब्रह्मी भाषा ब्रह्मी साहित्य].

                                                                                                                                                                                                                                                                                                    कालेलकर, ना. गो. कुलकर्णी, अ. र.

 महत्त्वाची स्थळे : ब्रह्मदेश हा ‘पॅगोड्यांचा देश’ आहे. देशात शहरांची संख्या कमी असून ती लहान आहेत. रंगून हे राजधानीचे शहर देशातील प्रमुख बंदरही आहे. येथून देशाचा सु. ८०% व्यापार चालतो. येथील श्वे डागोन पॅगोडा जगप्रसिद्ध आहे. बौद्ध धर्मीयांचे व पर्यटकांचे हे महत्त्वाचे आकर्षण आहे. येथील बंदर-परिसर रमणीय असून नगरभवन प्रेक्षणीय आहे. मंडाले (लोकसंख्या ४,१७,२६६–१९७३) येथील बौद्ध टेकडी व थिवा राजाचा किल्ला प्रसिद्ध आहे. शहराच्या नैर्ऋत्येस आराकान (१७८४) हा प्रसिद्ध पॅगोडा आहे. लोकमान्य टिळकांना येथेच ब्रिटिश सरकारने कारावासात ठेवले होते. येथे सोन्या-चांदीचे कलाकाम मोठ्या प्रमाणात चालते म्हणून ‘सुवर्ण नगरी’ या नावाने हे शहर ओळखले जाते. पगान हे पॅगोड्यांचे शहर इतिहासप्रसिद्ध असून येथील आनंद पॅगोडा विशेष उल्लेखनीय आहे. पेगू येथे भगवान बुद्धाची सिंहशय्या प्रेक्षणीय असून तिला ‘लेटफाया’ असे म्हणतात. १०६.४ मी.×२.४३ मी. अशा आकाराच्या ओट्यावर भव्य बुद्धमूर्ती आहे. शान पठारावरील इन्ले सरोवराचा परिसर रमणीय आहे. याच पठारावरील मोगाउंग हे गाव रत्नखाणीसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय बासेन (३,५५,५८८), हेंझाडा (२,८३,६५८), म्यिंजान (२,२०,१२९), मोलमाइन (२,०२,९६७), प्रोम (१,४८,१२३), अक्याब (१,४३,२१५), टॅव्हाय (१,०१,५३६) इ. शहरे ऐतिहासिक व औद्योगिक दृष्ट्या उल्लेखनीय आहेत.                                          

                                                                                                                                                                                                                                                                                                             जाधव, रा. ग. सावंत, प्र. रा. संदर्भ :  1. Chakravarti, N. The Indian Minority in Burma : The Rise and Decline of an Immigrant Community, London, 1971.

              2. Ferguson, John, Sangha and State in Burma, Ithaca (N.Y), 1975.

              3. Headrich, D. R. The Tools of Empire, Oxford, 1981.

              4. Johnstone, W. C. Burma’s Foreign Policy : A study in Neutralism, Cambridge (Mass), 1963.

              5. Keegan, John, Ed. World     Armies, London, 1979.

              6. Moscotti, Albert, D. Burma’s Constitution and the Elections of 1974, Singapore, 1977.

              7. Silverstein, Josef, Burma : Military Rule and the Politics of Stagnation, Ithaca (N. Y), 1977.

              8. Smith, D. E. Religion and Politics in Burma, Princeton (N. J.), 1965.

              9. Spiro, Melford E. Buddhism and Society : A Great Tradition and its Burmese Vecessitudes, London, 1971.

              10. Trager, F. N. Burma : From Kingdom to Independence, London, 1966.

              11. Walinsky, Louis, Economic Development in Burma 1951-1960, New York, 1962. 12. Woodman, Dorothy, The Makong of Burma, London, 19

 


 ब्रह्मदेश

 


 

ब्रह्मी मृत्पात्री आनंद पैगोडा, पगान

श्वे डगोन पैगोडा, रंगून

पारंपारिक ब्रह्मी नृत्यप्रकार हत्तीकरवी लाकडाची वाहतूक

ब्रह्मी काठशिल्प, १७ वे-१८ वे शतक

लो. टिळकांना कारावास घडला, ते मंडालेचे कारागृह नगर भवन, रंगून

बाबूंचा अलंकृत कलश

नारळाच्या करवंटीचे ओगराळे

बाबूंचे नौकागृह