बेरिंग,व्हीटुस : (?१६८१ – ? १७४१). डॅनिश दर्यावर्दी आणि समन्वेषक. जन्म डेन्मार्कमधील हॉर्सन्स येथे. १७०४ मध्ये याने रशियन नौदलात लेफ्टनंट म्हणून प्रवेश केला आणि स्वीडनविरुद्धच्या लढाईत चांगली कामगिरी बजावली. पीटर द ग्रेटच्या (१६७२-१७२५) विश्वासास पात्र ठरल्यामुळे रशियन आरमारासाठी कॅमचॅटका व उत्तर सायबीरिया यांच्या किनारी प्रदेशांचे नकाशे काढण्याचे व समन्वेषणाचे काम बेरिंगकडे सोपविण्यात आले (१७२५).

बेरिंगची पहिली मोहीम(१७२७-२९) मुख्यत्वे उत्तर अमेरिका आणि आशिया भूप्रदेशाने जोडले आहेत किंवा नाहीत, हे पाहण्यासाठीच होती. तीन वर्षांच्या जय्यत तयारीनंतर सेंट पीटर्झबर्ग सोडल्यापासून ९,६५६ किमी. क्षेत्राचे संशोधन करून बेरिंग १९ महिन्यानी पॅसिफिक महासागरावरील ओखोट्स्क येथे पोहोचला. तेथे अनेक जहाजे बाजूंन घेऊन तो पुढील मोहिमेवर निघाला. उत्तरेकडे ६७ १८’ उत्तर अक्षांशापर्यंत गेल्यानंतर त्याला कोठेच भूप्रदेश आढळला नाही. त्या वर्षीचा हिवाळा त्याने कॅमचॅटकावरच घालविला. १७२८ च्या अखेरीस कॅमचॅटका ते चुकची समुद्र यांतील बऱ्याच बेटांचा त्याने शोध लावला. परतीच्या प्रवासात छोटी व मोठी डायमीड बेटे आणि बेरिंग समुद्रातील सेंट लॉरेन्स बेटाचाही शोध लावून तो सेंट पीटर्झबर्गला परत आला (१७३०).

‘ग्रेट नॉर्दर्न’ मोहिमेचा प्रमुख म्हणून १७३२ मध्ये त्याची नेमणूक झाली. १७४० मध्ये तो कॅमचॅटका येथे पोहोचला. तेथे त्याने पेत्रोपेव्हलॉफस्क शहराची स्थापना केली. ४ जून १७४१ रोजी ‘ सेंट पीटर ‘या जहाजातून त्याने कॅमचॅटका सोडली. त्यावेळी कॅ.ॲलेक्सी चीऱ्यिकाव्ह हाही ‘सेंट पॉल’ जहाजासह त्याच्याबरोबर होता. वादळामुळे ही दोन्ही जहाजे अलग झाली आणि चीऱ्यिकाव्ह स्वंतत्रपणे अल्यूशन बेटांच्या संशोधनासाठी गेला. बेरिंगने अलास्कातील सेंट एलिआस पर्वताचा शोध लावला (१६ जूलै १७४१). २० ऑगस्ट रोजी तो अलास्काच्या आखातातून प्रवास करीत असताना स्कर्व्ही रोगाची लागण तसेच वाईट हवामान इत्यादींमुळे जरीस आला. त्यातच कॅमचॅटकाजवळील एका निर्जन बेटावर त्याचे जहाज आपटून फुटले व त्या अपघातात बेरिंगचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूंनंतर ते बेट आणि समुद्र त्याच्याच नावाने ओळखले जाऊ लागले.

शाह,र.रु.