बेडूक : हा चतुष्पाद प्राणी उभयचर वर्गातील (जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या वर्गातील) सलाएन्शिया किंवा ॲन्यूरा या गणात आढळतो. या गणातील रॅनिडी या कुलात आढळणारे उभयचर खरे बेडूक होत पण इतर काही कुलांतील उभयचरांसही सर्वसाधारणपणे बेडूक असेच संबोधितात. या वर्गात ⇨ सॅलॅमॅंडर, ⇨ न्यूट, ⇨ सिसिलियन व ⇨ मॅक यांचाही समावेश आहे. रॅनिडी या कुलात सु. ३० वंशांचे आणि ५०० जातींचे बेडूक आहेत. यांचा प्रसार जगात सर्वत्र झाला आहे. यांपैकी एकट्या राना या वंशातच २०० जाती आहेत. रॅनिडी कुलातील फक्त राना हाच वंश उत्तर अमेरिकेत आढळतो. राना वंशातील बेडूक यूरोप आणि आशिया खंडांतही आढळतात.ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज व दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण भागात हे आढळत नाहीत. भारतात रॅनिडी या कुलातील अंदाजे ५० जाती आहेत. यांपैकी राना टायग्रिना, रा. सायनोफ्लीक्टीस व रा. हेक्झॅडंक्टिला या सर्वसाधारण आढळणाऱ्या जाती होत.
भैकेर पाण्यातील वनस्पती खातो. या कुरतडण्यासाठी त्याचा वरचा व खालचा जबडा कठीण पदार्थाचा बनलेला असतो. भैकेर जसजसा वाढतो तसतसे कल्ले एका आवरणाने झाकले जातात. भैकेराचे बेडकात रूपांतरण होताना पुढील फरक होतात: फुफ्फुसे व अवयव (पाद व बाहू) तयार होतात. पुच्छाचे (शेपटीचे) शोषण होते. अन्ननलिकेची लांबी कमी होते व डोक्याची रचना बदलते. पाश्चात्त्य प्रदेशांतील जंगलात जमिनीवर राहणाऱ्या कॉर्न्युफर या वंशातील बेडक्या अंडी घालतात व या अंड्यांपासून भैकेर निर्माण न होता लहान बेडूकच बाहेर येतात. ऑस्ट्रेलियातील ऱ्हिओबॅट्रॅकस सायलस या जातीच्या बेडकाची मादी निषेचित अंडी गिळते आणि तिच्या पोटात अंड्याचे पचन न होता अंडी उबून भैकेर तयार होतात. या काळात तिच्या पोटातील पाचक रसांची निर्मिती थांबते. हे भैकेर पोटातच वाढून त्यांचे बेडकांत रूपांतर होते व योग्य वाढ झाल्यानंतर ते मादीच्या तोंडातून बाहेर पडून जन्म पावतात. बेडकाच्या काही जातीतील नर आपल्या पाठीवर भैकेर बाळगतात. काही आपल्या ध्वनिकोशात ठेवतात, तर काही आपल्या मागील पायांवर गुंडाळलेल्या स्थितीत ठेवतात.
बेडूकाच्या शरीरात व शरीरावर काही परजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणारे) प्राणी आढळून येतात. ओपॅलायना व बॅलॅंटिडियम हे प्रोटोझोआ (आदिजीव) प्राणी असे आढळतात पण हे बेडकाला कोणताही अपाय करत नाहीत. काही वेळा शरीरातील काही भागांवर कृमी आढळतात. कधीकधी शरीरावर जळवा चिकटलेल्या असतात. बेडूक हा अत्यंत निरुपद्रवी प्राणी आहे. ⇨वर्णकीलवकांखेरीज (त्वचेतील विशिष्ट रंगयुक्तद्रव्य कोशिकांखेरीज) त्याला दुसरे स्वसंरक्षणाचे साधन नाही. ह्या कोशिकांमध्ये एक प्रकारचे रंगीत द्रव्य असते त्यामुळे त्यांचा रंग बदलू शकतो. शत्रूची चाहूल लागताच वर्णकीलवकांचा रंग बदलून तो आजूबाजूच्या पार्श्वभूमीसारखा होतो. शत्रूला त्या पार्श्वभूमीपासून बेडूक ओळखणे कठीण होते. यास अनुहरण असे म्हणतात. ह्याखेरीज दुसरे कोणतेच स्वसंरक्षणाचे साधन नसल्यामुळे बेडकास अनेक शत्रू आहेत. बेडकाला व त्याच्या डिंभाला खाणारे प्राणी म्हणजे मासे, साप, कावळे व ससाणा हे होत. स्थलचर शत्रूंपासून आपला बचाव करण्यासाठी बेडूक पाण्यात पळून जातो.
या मुखगुहेतच नासाद्वारांचे छिद्र असते. मुखगुहेत ग्रसनी-कर्णनलिकेची छिद्रेही आढळतात. टाळूवर हलास्थिदंत असतात. वरील जबड्यावर उत्तर इन्वस्थि-दंत असतात. या दोन्ही प्रकारच्या दातांचा उपयोग फक्त पकडलेले भक्ष्य निसटून जाऊ नये याकरिता होतो. मुखगुहेत अग्रभागास चिकटलेली मांसल जिव्हा (जीभ) असते. ग्रसनीतील छिद्र स्वरयंत्राशी जोडलेले असते. या स्वरयंत्रातील ध्वनितंतूंच्या साहाय्याने आवाजाची निर्मिती होते.
बेडकाच्या शरीरातील कंकाल (सांगाडा) इतर पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणेच असतो. अक्षीय कंकालात कवटी, पृष्ठवंश (पाठीच्या मणक्यांची मालिका) व उरोस्थी (छातीच्या मध्यावरील हाड) यांचा समावेश होतो, तर उपांगी (अथवा शाखीय) कंकालात मेखला (अग्रपादांना व पश्चपादांना आधार देणारी हाडांनी बनलेली वलये) व त्यांची उपांगे यांचा समावेश होतो. कवटी मेंदू व इतर ज्ञानेंद्रियांचे रक्षण करते. कवटीच्या मुख्य भागात मेंदू असतो. कवटीच्या बाजूस नेत्रकोटर (डोळ्याच्या खोबणी) व कर्णकोश असतात. कवटीच्या अग्रभागी घाणेंद्रियांचे कोश असतात. कवटीच्या अधर भागावर आणि वरील जबड्याच्या हन्वस्थीवर दात असतात. कवटीच्या पश्चभागी पश्चकपालास्थि-कंद असतो. हा पहिल्या मणक्याशी जुळला म्हणजे बेडकास डोके फिरविणे सोपे जाते. यावर असलेल्या बृहद्रंध्रातून मेंदूचा मेरुरज्जूशी (मणक्यातून जाणाऱ्या तंत्रिका तंतूंच्या – मज्जातंतूंच्या – दोरीसारख्या भागाशी) संपर्क होतो. बेडकाचे जबडे हा त्याच्या कवटीचाच एक भाग असतो. पृष्ठवंशात एकंदर नऊ मणके असतात. शेवटच्या मणक्यानंतर पुच्छदंड असतो. या मणक्यांच्या मालिकेतून मेंदूपासून निघालेला मेरूरज्जू पश्च भागात जातो .
उपांगि कंकालात दोन मेखला असतात. यांपैकी वक्षीय मेखला ही अग्रस्थित असते व पृष्ठवंशाय स्नायूने जोडलेली असते. या मेखलेस अग्र-उपांगांची हाडे जोडलेली असतात. या हाडांची मालिका भुजास्थी, अरास्थी-अंतरास्थी, मणिबंधास्थी, करभास्थी व अंगुलास्थी अशी असते [⟶ कंकाल तंत्र]. श्रोणीय (धडाच्या तळातील) मेखला ही पश्चस्थित असते व तिचा पृष्ठवंशाशी जास्त निकट संबंध येतो. प्राण्याच्या शरीराचे सर्व वजन या मेखलेस पेलावे लागते. या मेखलेस जोडलेल्या पश्च उपांगांच्या हाडांची मालिका ऊर्वस्थी, अंतर्जंघास्थी-अनुजंघास्थी, गुल्फास्थी, पादास्थी व अंगुलास्थी अशी असते.
स्नायू तीन प्रकारचे असतात : (१) हृदीय (२) अरेखित व (३) रेखांकित. हृदीय स्नायू हृदयाच्या चलनवलनाचे नियंत्रण करतात. या स्नायूंचे तंतू शाखायुक्त असतात. अरेखित स्नायू शरीरात व त्यातल्या त्यात अंतस्त्यसंबंधी (शरीरातील पोकळ्यांत, विशेषतः उदरातील पोकळीत, असलेल्या) इंद्रियांत आढळतात. त्यांच्या चलनवलनावर मेंदूंचे नियंत्रण नसते. अन्नाचे पचन तंत्रातील चलनवलन या प्रकारात मोडते. रेखांकित स्नायूंचे चलनवलन मेंदूच्या नियंत्रणाखाली असते. हातापायाचे चलनवलन, उड्या मारणे वगैरे या प्रकारात मोडते. निरनिराळ्या प्रकारच्या कोशिकापासून तयार झालेले स्नायू शरीराचे निरनिराळे चलनवलन घडवून आणतात.
अंतःशारीर : बेडकाच्या अधर भागाची त्वचा बाजूस केली म्हणजे आतील इंद्रियांची रचना व परस्पर संबंध दृग्गोचर होतात (आ. ५).
पचन तंत्र : याची सुरुवात मुखापासून होते. मुखगुहेत जीभ व दात असतात. जिभेचा उपयोग लहान कीटक किंवा तत्सम अन्नकण पकडण्यास व ते मुखगुहेत ढकलण्यास होतो. दात फक्त अन्नकण निसटून जाऊ नयेत यासाठी उपयोगी पडतात. चर्वणास त्यांचा उपयोग होत नाही. मुखगुहेतील अन्न ग्रासिकेद्वारे (ग्रसनीपासून जठरापर्यंतच्या नलिकेद्वारे) उदरात ढकलले जाते. उदराच्या अग्रभागास हृदीय उदर व पश्चभागास जठरनिर्गमद्वार म्हणतात. उदरात काही प्रमाणात पचन झालेले अन्न आतड्यात जाते. आतड्याच्या पहिल्या भागास ग्रहणी म्हणतात. बाकीच्या भागास शेषांत्र म्हणतात. ग्रहणी व शेषांत्रातून अन्न जात असताना त्यात निरनिराळे अन्नरस मिसळले जातात व अन्नाचे पचन होते. या पचविलेल्या अन्नाचे आतड्याच्या भित्तीतून शोषण होते. न पचलेले व निरुपयोगी अन्न गुदांत्रात जाते व शेवटी अवस्करातून बाहेर टाकले जाते. अन्ननलिकेतून अन्न जात असताना त्यावर निरनिराळ्या एंझाइमांची (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांची) विक्रिया होत असते. तसेच यकृत व अग्निपिंड (उदराच्या वरच्या भागात असलेली ग्रंथी) यांचे स्त्रावही समाईक नलिकेद्वारे ग्रहणीत शिरतात व त्यांचीही विक्रिया अन्नावर होते.
रोहिणी तंत्र: हृदयापासून निघाल्यावर रोहिणी शंकूच्या दोन शाखा होतात. यांपैकी प्रत्येक शाखेस तीन उपशाखा निर्माण होतात. यांतील सर्वात पश्च शाखा फुफ्फुस-त्वचीय रोहिणी होय. मध्यशाखेस दैहिक रोहिणी म्हणतात व अग्रशाखेस ग्रीवा रोहिणी म्हणतात. दैहिग रोहिणी व ग्रीवा रोहिणी यांतील रक्त ऑक्सिजनमिश्रित व शुद्ध असते आणि ते सर्व शरीरस पुरविले जाते. फुफ्फुस-त्वचीय रोहिणीतील रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. यातील रक्त फुफ्फुस व त्वचा यांकडे शुद्धीकरणाकरिता पाठविले जाते. हृदयात येणाऱ्या रक्ताचा विचार केल्यास असे आढळून येईल की, निलयात शुद्ध (ऑक्सिजनमिश्रित) व अशुद्ध (ऑक्सिजनरहित) असे दोनही प्रकारचे रक्त येते, तर निलयाच्या अंतर्रचनेमुळे या दोन्ही रक्तांचे मिश्रण होत नाही किंवा झालेच, तर अत्यल्प प्रमाणात होते. डाव्या अलिंदात जमा झालेले शुद्ध रक्त निलयात आल्यावर दैहिक रोहिणीतून महारोहिणीत व तेथून सर्व इंद्रियाकडे जाते आणि काही शुद्ध रक्त ग्रीवा रोहिणीतून डोके व मेंदू याना जाते. रोहिणीच्या शाखा व उपशाखा विभागून त्यांचा शेवट केशवाहिन्यांत(अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यात) होतो. रोहिणीच्या नलिकेच्या भित्ती जाड स्नायूयुक्त असतात, तर केशवाहिन्यांच्या भित्ती पातळ असतात आणि त्यांतून अन्नद्रव्य व इतर द्रव्यांचे अभिसरण होऊन ही द्रव्ये रक्तात मिसळतात. शेवटी या केशवाहिन्यांचे संयोजन होऊन त्यातूनच नीलांची उत्पत्ती होते.
नीला तंत्र : सर्व शरीरातील रक्त हदयाकडे नेणे हे नीलांचे कार्य होय. फुस्फुस नीला आणि त्वचा नीला यांतील रक्त सोडून इतर सर्व नीलांतील रक्त ऑक्सिजनरहित असते. फुस्फुस नीला ऑक्सिजनयुक्त रक्त फुस्फुसाकडून डाव्या अलिंदात ओतते, तर त्वचीय नीला ऑक्सिजनयुक्त रक्त त्वचेकडून आणून नीला कोटरात ओतते, बेडकात दोन प्रकारची प्रवेशिका नीला तंत्रे असतात. एक यकृत प्रवेशिका नीला तंत्र व दुसरे वृक्कीय प्रवेशिका नीला तंत्र. या तंत्रांत रक्तवाहिंन्याचा उगम व अंत केशवाहिन्यातून होतो. नीला कोटरात तीन मुख्य नीला रक्त आणतात. अग्रभागातून उजवी व डावी मुख्य नीला व पश्च भागातून पश्च मुख्य नीला या त्या नीला होत. अग्र मुख्य नीलेत तोंड, जीभ, खांदे, डोके,उंपागे वगैरे भागांतून रक्त जमा केले जाते, तर पश्च मुख्य नीलेत शरीराचा पश्च भाग, वृक्क (मूत्रपिंड), जननेंद्रिय व पश्च उपांगे या भागांतून रक्त जमा केले जाते.
लसीका तंत्र: रक्तातील द्रव्य पदार्थात कोशिकंस लागणारे अन्न, खनिजे वगैरे द्रव्ये असतात आणि या रक्तद्रवातूनच ती ऊतकातील कोशिकापर्यंत पोहोचविली जातात. ऊतकाजवळ असलेल्या या द्रव पदार्थास ऊतकद्रव म्हणतात. यातून कोशिकांस लागणारे पदार्थ कोशिकांनी घेतल्यानंतर जो द्रव बाकी राहतो, त्याला लसीका म्हणतात. निरनिराळ्या नलिकांद्वारे आणि गुहाद्वारे ह्या लसीकेचे सर्व शरीरभर अभिसरण केले जाते व शेवटी हा द्रव पदार्थ रक्तात मिसळतो.
अंतःस्त्रावी तंत्र: शरीरक्रियेत रासायनिक एकसूत्रता आणणे हे या तंत्राचे कार्य आहे. या तंत्रातील ग्रंथी आपला स्त्राव सरळ रक्तात मिसळतात व यामुळे त्याचा परिणाम सर्व शरीरावर होतो. या स्त्रावास हॉर्मोन असे म्हणतात. या ग्रंथीपैकी पोष ग्रंथी ही मध्य मेंदूच्या अधर भागावर अधिष्ठित असते. ही तीन खंडात विभागलेली असते. अग्रखंडाच्या स्त्रावाच्या परिणाम प्राण्याच्या वाढीवर,तसेच इतर अंतःस्त्रावी ग्रंथीवर होतो. मध्यखंडाच्या स्त्रावाचा परिणाम त्वचेतील वर्णकीलवकांवर होतो. अत्यंखंडाचा परिणम कात टाकणे व त्वचेतून पाणी शरीरात घेणे या क्रियांवर होतो. अवटूग्रंथी ही घशाजवळ असते. हिच्या स्त्रावाचे चयापचय (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक आणि भौतिक घडामोंडीच्या) क्रियेवर व बेडकांच्या रुपांतरणावर नियंत्रण असते. वृक्काच्या अधर भागावर अधिवृक्क ग्रंथी असतात. यांचे नियंत्रण रक्तदाब व त्वचेतील रंगाच्या गाढतेवर असते. अग्निपिंड हा पचनक्रियेस लागणारी एंझाइमेनिर्माण करीत असला, तरी त्यातील लांगरहान्स (पाउल लांगरहान्स या जर्मन विकृतिवैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणारी) द्वीपके ह्या कोशिकांचा अंतःस्त्राव (इन्शुलीन) शर्करेच्या चयापचयावर नियंत्रण ठेवतो. [⟶ अंतःस्त्रावी ग्रंथि].
मेंदू व मेरुरज्जू आतून पोकळ असून या पोकळ्या एकमेकींशी संलग्न आहेत. यांतील द्रवास मस्तिष्क-मेरुद्रव म्हणतात. मेंदू व मेरुरज्जू यांवरील आवरणांना मस्तिष्कावरण म्हणतात. यांपैकी बाहेरील आवरणास दृढतानिका व आतील आवरणास मृदुतानिका म्हणतात. या आवरणामुळे तंत्रिकांचे व मेंदूचे संरक्षण होते.
परिसरीय तंत्रिका तंत्र: मेंदूपासून उगम पावणाऱ्या एकूण दहा मस्तिष्क तंत्रिका आहेत. त्या I ते X या रोमन क्रमांकांनी ओळखण्यात येतात आणि त्या अनुक्रमे कोष्टकात दर्शविल्याप्रमाणे त्या त्या इंद्रियाशी संबंधित असतात.
मस्तिष्क तंत्रिका |
|||
क्रमांक |
नाव |
आवेग दिशा |
संबंधित इंद्रिय |
Ⅰ Ⅱ Ⅲ Ⅳ Ⅴ Ⅵ Ⅶ Ⅷ Ⅸ Ⅹ |
गंध तंत्रिका दृक् तंत्रिका नेत्र प्रेरक तंत्रिका कप्पी तंत्रिका त्रिमूल तंत्रिका अपवर्तनी तंत्रिका आनन तंत्रिका कर्ण तंत्रिका जिव्हा ग्रसनी तंत्रिका प्राणेशा तंत्रिका |
अभिवाही अभिवाही अपवाही अपवाही मिश्र अपवाही मिश्र अभिवाही मिश्र मिश्र |
घ्राणेंद्रिय डोळे डोळ्याचे स्नायू डोळ्याचे स्नायू त्वचा, जबडे डोळे जीभ, लाला ग्रंथी, चेहरा, जबडे कान जीभ, घसा, अनुकर्ण ग्रंथी अंतस्त्ये |
याशिवाय मेंदूच्या अग्र भागापासून निघणारी एक लहान तंत्रिका असते व तिला अतिंम तंत्रिका असे म्हणतात. ही घ्राणेद्रिंयाच्या श्लेष्मकलेच्या (बुळबुळीत अस्तराच्या) क्षेत्रात जाते. मेरुरज्जूपासून दहा तंत्रिका निघतात व त्या शरीराच्या निरनिराळ्या इंद्रियाकडे जातात. यांपैकी काही अभिवाही, काही अपवाही, तर काही दोनही प्रकारच्या असतात.
स्वायत्त तंत्रिका तंत्र : अंतस्त्याच्या कार्यातील एकसूत्रता या तंत्रिका तंत्रावर अवलंबून असते. पृष्ठ महारोहिणीच्या दोन्ही बाजूस या तंत्रिका आढळतात. प्रत्येक बाजूचया तंत्रिकेवर दहा गुच्छिका असतात. या गुच्छिकापासून तंत्रिका निघून त्या अंतस्त्याकडे जातात व अनैच्छिक रीतीने त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात. नंतर या तंत्रिका केंद्रीय तंत्रिका तंत्रात विलीन होतात अशा तंत्रिका तंत्र.
ज्ञानेद्रिंये : तंत्रिका तंत्राशी निगडित असलेल्या व बाहेरच्या परिस्थितीची प्राण्यास जाणीव करून देणाऱ्या इंद्रियाना ज्ञानेंद्रिये म्हणतात. यांच्याद्वारे स्पर्श, रुची, वास, आवाज व दृष्टी या संवेदनाचे ज्ञान होते. त्वचेत वेदना, दाब, उष्णता, शीतलता व स्पर्श यांचे ज्ञान करून देणारे आकलक असतात. हे शरीरावरील सर्व त्वचेवर असले, तरी काही विशिष्ट ठिकाणी त्याचें स्थानिकरण झालेले असते उदा., उष्णता अजमावण्याची क्षमता ओठात इतर त्वचेपेक्षा जास्त असते. एकाच उद्दीपकामुळे एकापेक्षा जास्त आकलक उत्तेजित होऊ शकतात. शरीराच्या अंतस्त्य गुहेतील काही इंद्रियावर आकलक असतात व त्यामुळे वेदनांचे आकलन होते. वास व रुची यांच्या आकलकांना रासायनिक आकलक म्हणतात. हे नाक व जीभ या इंद्रियात आढळतात. जिभेत आढळणाऱ्या या आकलंकाना रुचिकलिका म्हणतात. वासाचे आकलक नाकात असतात आणि त्याच्या कोशिका सदैव द्रव पदार्थाने आच्छादलिल्या असतात. सर्व ज्ञानेद्रिंयात डोळा हे इंद्रिय फार महत्त्वाचे आहे. बेडकाच्या डोळ्याची सर्वसाधारण रचना इतर पृष्ठवंशी प्राण्याप्रमाणेच असते. प्रकाशाचे आकलक डोळ्यात सामावलेले असतात. हे आकलन उत्तम व्हावे म्हणून त्याची योजना कवटीच्या खोबणीत केलेली असते. डोळ्याचे संरक्षण व कार्य योग्य रीतीने व्हावे म्हणून त्याच्या रचनेत पापण्या, कनीनिका (बुबुळ), भिंग, दृक पटल यांची योजना केलेली असते. प्रत्येक उपांगाचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. रंग, अंतर, आकार इ. घटकांचा समन्वय साधून दृक पटलातील आकलकांच्या (दंडाकार तंत्रिका कोशिकांच्या) साहायाने, तर रंगीत प्रतिमा शंकूच्या साह्याने होते. सर्वसाधारणपणे डोळ्याची कार्यपद्धती कॅमेऱ्याच्या कार्यपद्धतीप्रमाणे असते.
बेडकाचे डोळे त्याच्या सवयींना अनुकूल असेच आहेत. मोठे भिंग असलेले व डोक्यावर उंच अशा जागी हे डोळे असल्याने त्यांच्या दृष्टीचे क्षेत्र मोठे असते. त्यांच्या दृक् पटलातील कोशिका हालणाऱ्या वस्तूंना फार संवेदनाक्षम असतात. जर एखादा कीटक स्थिर (हालचाल न करता) समोर असला, तर बेडूक त्याची दखल घेत नाही पण तोच जर हलला, तर लगेच जीभ बाहेर टाकून त्याला गिळून टाकतो.
उत्सर्जन तंत्र : उत्सर्जनाचे कार्य मुख्यतः वृक्काकडून होते. हे लांबट व तपकिरी रंगाचे असून उदरगुहेत पश्च भागात ऊर्ध्वस्थ (उभ्या दिशेत) असतात. या गंरथीत सूक्ष्म नलिकापुंज असतो. व त्यात रक्तात असलेली अनावश्यक द्रव्ये गाळली जातात. या नलिकापासूनच मूत्रवाहिनी तयार होते. प्रत्येक वृक्कापसून निघणारी मूत्रवाहिनी शेवटी अवस्करास मिळते. या मूत्रवाहिन्यांतून येणारे मूत्र बाहेर टाकले जाते किंवा काही काळ मूत्राशयात साचून ठराविक काळाने ते अवस्करातून उत्सर्जित केले जाते.
जनन तंत्र : मादीच्या जनन तंत्रात अंडकोशाचा समावेश असतो. जेव्हा अंडी तयार होतात तेव्हा अंडकोशाचे आकारमान खूपच मोठे होते व तो सर्व शरीरगुहा व्यापतो. परिपक्व झालेली अंडी अंडकोशापासून सुटून शरीरगुहेतील द्रवात तरंगू लागतात आणि स्नायूंच्या व पक्ष्माभिकीय (सूक्ष्म केसासारख्या उपांगांच्या कंपनांमुळे निर्माण होणाऱ्या) हालचालीमुळे ती अंडवाहिनीत शिरतात. अंडवाहिनीतून ही अंडी अवस्करात पोहोचतात. अंडवाहिनीच्या अस्तरावर पुष्कळ पक्ष्माभिका असतात व यांच्या साहायाने अंड्याचा प्रवास सुलभ होतो. अंडवाहिनीच्या अवस्कराजवळील भागाचा व्यास मोठा असतो. या भागास गर्भाशय असेही म्हणतात. पक्व अंडी बाहेर पडण्याच्या अगोदर काही काळ गर्भाशयात स्थिरावतात.
नराच्या शरीरात वृक्वाजवळ दोन्ही बाजूंस पिवळट रंगाच्या ग्रंथी असतात, त्यांना वृषण म्हणतात. या ग्रंथीत असलेल्या लघुनलिकांतशुक्राणु तयार होतात व येथून ते शुक्रवाहक नलिकांत जातात. या शुक्रवाहक नलिका मूत्रवाहिनीत शुक्राणू नेऊन सोडतात. मूत्रवाहिनीचा पश्च भाग स्नायुयुक्त असतो. या भागास रेताशय म्हणतात. काही काल रेताशयात शुक्राणूंचा साठा केला जातो. समागमाच्या वेळी शुक्राणू अवस्करात सोडले जातात व तेथून त्यांचे सिंचन मादीच्या अवस्करातून बाहेर पडणाऱ्या अंड्यांवर होते. समागम काळात वृषण व अंडकोश यांत काही हॉर्मोने तयार होतात व त्यांचाही नरमादीच्या वर्तनावर परिणाम होतो. जनन ग्रंथीजवळ वसापिंड आढळतात. बेडूक शीत निष्क्रियतेत जाण्यापूर्वी हे वसापिंड मोठे होतात व शीतनिष्क्रियतेच्या काळात यांचा अन्न म्हणून उपयोग होतो. समागम काळात नर बाहेरील अन्न न घेता या वसापिंडावर जगतो, तर मादी या वसापिंडाच्यासाह्याने अंड्यात पीतकाचा (पोषक द्रव्याचा) साठा करते. समागम काळ संपल्यावर हे वसापिंड अंत्यत लघुरूपाने अस्तित्वात राहतात.
बेडकाच्या शरीरातील विविध तंत्राचे वर्णन वर दिलेले आहे. या प्रत्येक तंत्रावर तसेच प्रत्येक ज्ञानेंद्रियावर स्वंतत्र नोंदी असून त्यांत अधिक तपशीलवार वर्णन दिलेले आहे.
पहा : उभयचर वर्ग भेक वृक्षमंडूक.
2. Parker, T. J. Haswell, W. A. A Textbook of Zoology, London, 1963.
“