बिहार (बिहारशरीफ) : बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या १,५१,३०८ (१९८१). पूर्वी त्यास ’उदंडपुर’ म्हणत. हे गंगेच्या पंचान या उपनदीवर पाटण्याच्या आग्नेयीस ६४ किमी. अंतरावर वसलेले आहे.

पाल राजघराण्यातील (इ. स. आठवे-बारावे शतक) शेवटच्या काही राजांची राजधानी उदंडपुर येथे होती. हे राजे बौद्धधर्मीय होते. त्यांच्यापैकी या घराण्याचा संस्थापक राजा गोपाल याने येथे एक मोठा विहार बांधला. त्यावरून शहराला व राज्याला ’बिहार’ असे नाव पडले. येथील ग्रंथालय फार ख्यातनाम होते. बख्तियार खल्‌जीने ११९७ मध्ये त्यावर अचानक हल्ला केला. त्यात विहार आणि ग्रंथालय नष्ट झाले. अनेक भिक्षूंचीही हत्या करण्यात आली. सोळाव्या शतकात शेरशाहने पाटण्याचा किल्ला पुन्हा बांधेपर्यंत हे स्थानिक मुसलमान सरदाराचे प्रमुख ठाणे होते.

विद्यमान शहर प्रमुख बाजारपेठ असून राज्यातील हातमाग कापडनिर्मितीचे मोठे केंद्र आहे. शहरातच नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर संत शाह शरीफउद्दीन मख्‌दूम (चौदावे-पंधरावे शतक) याची कबर आहे. इतिहासकालीन अनेक कबरी व मशिदी शहरभर विखुरलेल्या असून सु. १२२ हे. क्षेत्र व्यापणाऱ्या जुन्या किल्ल्याचे भग्नावशेषही येथे आढळतात. हिंदु व मुसलमान यात्रेकरूंकरिता येथे एक मोठी सराई बांधलेली होती.

नालंदा (प्राचीन विद्यापीठे व बौद्धविहार), राजगीर अथवा राजगृह शहर व राजगृह टेकड्या (हिंदु, मुसलमान व बौद्ध यांची धार्मिक क्षेत्रे), पावापुरी (जैन धार्मिक स्थान) व पीर पहाडी टेकड्या (मुस्लिम संतांचे दर्गे) ही पर्यटन केंद्रे या शहराच्या ३० किमी. परिसरात आहेत.

संदर्भ : 1. Houlton, Sir John, Bihar, The Heart of India, Bombay, 1949.

पंडित, अविनाश