ऑल्बनी : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यूयॉर्क राज्याची राजधानी. लोकसंख्या १,१४,८७३ (१९७०). हे न्यूयॉर्कच्या उत्तरेस २३२ किमी., हडसन नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले असून येथपर्यंत मोठ्या बोटी येतात. मूळ डच लोकांची ही वसाहत अद्यापही त्यांच्या संस्कृतीचे अवशेष येथे आढळतात. हे मोक्याचे ठिकाण असल्यामुळे १८९७ पासून येथे राजधानी आहे. वैद्यक, विधी, शिक्षण-प्रशिक्षण वगैरेंची महाविद्यालये अकादमी, वेधशाळा अशा विविध ऐतिहासिक संस्था येथे असून कागद व कागदकाम, रंग, रसायन, औषधे, हत्यारे, ओतकाम, मद्य इ. उद्योगधंदे येथे आहेत. ईअरी सरोवराशी १८९५पासून हे कालव्याने जोडले गेल्यामुळे व दळणवळणाच्या अत्याधुनिक सोयींमुळे हे व्यापाराचे केंद्र बनले आहे. तथापि न्यूयॉर्कचे सान्निध्य व येथे होणारा ट्यूलिप फुलांचा उत्सव यांमुळे हे प्रवाशांचे आकर्षण बनले आहे.

शाह, र.रु. जोशी, चंद्रहास