माकॅसर : (ऊजुंग पांडांग). इंडोनेशियातील प्रमुख नैसर्गिक सागरी बंदर, तसेच सेलेबीझ बेटावरील सर्वांत मोठे शहर आणि सुलावेसी सलाटन प्रांताची राजधानी. लोकसंख्या ७,०९,००० (१९८०). सेलेबीझ बेटाच्या अगदी नैर्ऋत्य टोकावर, बोर्निओ व सेलेबीझ या बेटांना अलग करणाऱ्या माकॅसर सामुद्रधुनीच्या आग्नेय टोकाशी हे शहर वसले आहे. १९७० पासून याचे ‘ऊजुंग पांडांग’ असे नामकरण करण्यात आले आहे. हे विषुववृत्तीय प्रदेशात असल्याने येथील हवामान उष्ण व आर्द्र असून आसमंत दलदलयुक्त व विषुववृत्तीय सदाहरित अरण्यांनी व्यापलेला आहे. शहराजवळ असलेल्या मारोस या वनाच्छादित टेकड्या व बांटीमूरूंग धबधबा ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात येथे पोर्तुगीज व्यापारी आले, त्यावेळी हे एक भरभराटीस आलेले बंदर होते. पोर्तुगीजांनी तेथे रॉटरडॅम हा किल्ला बांधला. पुढे डचांनी हे बंदर आपल्या ताब्यात घेऊन ते डच ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी केंद्र बनविले (१६०७). त्यांनी १६६८ प्रयत्न येथील सुलतानाकडून शहराचा पूर्ण ताबा घेतला. ब्रिटीश-डच सत्तास्पर्धेत ब्रिटिशांनी जरी यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी दुसऱ्या महायुद्धापर्यंत त्यांना यश मिळाले नाही. १८४८ मध्ये त्याचे खुल्या बंदरात रूपांतर झाले. १९४२ ते १९४५ या काळात हे जपानकडे होते. पूर्व इंडोनेशिया या डचांच्या अखत्यारीतील राज्याची १९४६ मध्ये ही राजधानी होती. १९५० मध्ये हे राज्य इंडोनेशिया प्रजासत्ताकाचाच एक भाग बनले. इंडोनेशिया स्वतंत्र होण्यापूर्वी माकॅसरचे ‘व्ह्लार्डिंगन’ व ‘मले’ असे दोन विभाग होते. यांपैकी व्ह्लार्डिंगन हा बंदरविभाग डचांकडे होता. आज ह्या भागात अत्याधुनिक इमारती आहेत.
शहरात सिमेंट, कागद, यंत्रे यांचे निर्मितिउद्योग आहेत. माकॅसर ही मध्यवर्ती बाजारपेठ असून यूरोपीय आणि आशियाई देशांकडून आयात केलेल्या मालाचे हे प्रमुख वितरण केंद्र आहे. येथून कॉफी, मसाल्याचे पदार्थ, खोबरे, साग, रबर, वेत, डिंक, रेझिन इत्यादींची निर्यात होते. इतर शहरांशी ते रस्त्यांनी जोडलेले असून येथे विमानतळही आहे. दक्षिणेकडील टाकलरगावाशी ते ट्राममार्गाने जोडले आहे. शहरात चिनी संख्येने अधिक आहेत. स्थानिक माकॅसरी आणि बुगी लोक म्हणजे मले लोकांच्याच शाखा आहेत यांशिवाय थोडी यूरोपियन वस्तीही आहे. येथे एक शासकीय व दोन खाजगी विद्यापीठे आहेत.
शहरात हसनुद्दीन विद्यापीठ (स्था. १९५६), वरिष्ठ न्यायालय, वस्तुसंग्रहालय असून शहराजवळच डचविरोधी जावा लोकांच्या बंडाचा (१८८५–१९३०) नेता दिपो नेगोरो याचे थडगे आहे.
चौधरी, वसंत