दावणगेरे : कर्नाटक राज्याच्या चितळदुर्ग (चित्रदुर्ग) जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,२१,११० (१९७१). हे चितळदुर्गच्या वायव्येस सु. ६० किमी. पुणे–बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरील व लोहमार्गावरील एक प्रमुख स्थानक. पूर्वीचे हे मागासलेले खेडे बेत्तूरचे उपनगर होते. मराठा सरदार आप्पाजी राम याने व्यापाऱ्यांना वसाहत करण्यास उत्तेजन दिल्याबद्दल हैदर अलीने हा गाव जहागीर म्हणून दिला होता. आप्पाजी रामानंतर टिपू सुलतानाच्या कृपेने दावणगेरेचा अधिकच विकास झाला. १८७० पासून येथे नगरपालिका आहे. पूर्वी येथून सुपारी व मिरी मोठ्या प्रमाणात निर्यात होत असे. सध्या हे कापडगिरण्यांचे केंद्र असून १९३६ पासून वस्त्रोद्योग हा येथील मुख्य उद्योग आहे. सरकी काढणे, कापसाचे गठ्ठे बांधणे, ब्लँकटे तयार करणे, हातमागावर सुती व लोकरी कापड विणणे, वनस्पतितेलावर प्रक्रिया करणे, चर्मोद्योग हे येथील इतर उद्योगधंदे आहेत. येथील कांबळ्यांना फार मागणी असते. येथील लोक मुख्यतः लिंगायत आहेत. याच्या आसमंतात होणाऱ्या कापूस, ज्वारी, भुईमूग यांची बाजारपेठ आहे. येथील कला, वाणिज्य व अभियांत्रिकी ही महाविद्यालये म्हैसूर विद्यापीठांशी संलग्न आहेत.

कांबळे, य. रा.