दून : शिवालिक पर्वतराजीच्या उत्तरेकडील सांरचनिक खोरी. ही डोंगररांगांस समांतर, डोंगरांवरून वाहून आलेल्या खडेमातीने भरलेल्या सपाट तळाची, सुपीक व दाट लोकवस्तीची आहेत. डेहरा, कोहत्री, चौखंबा, पट्टी व कोटा या प्रमुख दूनांपैकी डेहरा हे सर्वांत मोठे, सुपीक, चांगले जलसिंचित व विकसित आहे. त्यातून सोंग नदी वाहते. ते ७५ किमी. लांब, २५ किमी. रुंद व ३६० मी. पासून ९०० मी.पर्यंत चढत गेलेले आहे. डेहराडून, हृषिकेश, क्लेमंटटाउन, रायपूर ही येथील प्रमुख शहरे आहे. दूनांमध्ये सु. २२५ सेंमी. पाऊस पडतो. मे–जूनमध्ये तापमान ४३ ° से. पर्यंत जाते व हिवाळ्यात ४·४ ° से. पर्यंत उतरते. गहू, तांदूळ, रागी, जव, मका, तेलबिया, ऊस, फळे व क्वचित चहा ही येथील प्रमुख पिके होत. बराच भाग अरण्यमय असल्याने अरण्यावलंबी व्यवसाय पुष्कळ आहेत. डेहरा या दूनमध्ये अनेक महत्त्वाच्या संस्था व कारखाने निघाले आहेत.

पहा : डेहराडून हृषिकेश.

कुमठेकर, ज. व.