मसाल्याची पिके : अन्न पदार्थांना स्वाद आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारी) तेले असलेल्या सुगंधी खाद्य वनस्पतींना ‘मसाल्याची पिके’ अशी सर्वसाधारण संज्ञा आहे (प्रस्तुत नोंदीत लागवडीखालील वनस्पतींबरोबरच नैसर्गिक रीत्या वाढणाऱ्या वनस्पतींचाही समावेश केला आहे). या वनस्पती विशेषकरून अंबलिफेरी, मिर्टेसी, लॅबिएटी व लॉरेसी या कुलांतील आहेत. या वनस्पतींची मुळे, पाने, खोड, फुले, फळे व बी यांपैकी एक अथवा जास्त अवयवांचा उपयोग मसाल्यासाठी करण्यात येतो. वनस्पतीच्या उपयोगात आणल्या जाणाऱ्या भागावर आधारित अशी महत्त्वाच्या मसाल्याच्या पिकांची अथवा पदार्थांची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे. (१) रेझीन : हिंग (२) मूलक्षोडे : [जमिनीत आडवे ⟶खोड] आले, हळद (३) कंद : कांदा, लसूण (४) खोडाची साल : दालचिनी (५) पाने : ओवा, कढिलिंब, तमाल, कोथिंबीर, पुदिना (६) कळ्या : लवंग (७) फुलातील किंजल्क : (स्त्री-केसराचे टोक) केशर (८) फळ व बी : ओवा, खसखस, जायफळ, जिरे, तीळ, धने, पिंपळी, बडीशेप, मिरची, मिरी, मेथी, मोहरी, वेलदोडा, शहाजिरे व शेपू. यांपैकी आले, पिंपळी, मिरी, मोहरी,वेलदोडा व हळद ही पिके मूळची भारतातील आहेत.
दगडफूल (अथवा धोंड फूल) याचाही वापर मसला तयार करण्यासाठी करतात [⟶ शैवक].
वरील सर्व पिकांवर विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत.
पहा : मसाले.
संदर्भ : 1. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi, 1980.
2. Parry, J. W. Spices, 2 Vols., New York, 1969.
पाटील, ह. चि गोखले, वा.पु.
“