मंगोलिया : आशिया खंडातील एक इतिहासप्रसिद्ध विभाग. क्षेत्रफळ सु. २७,००,००० चौ. किमी. लोकसंख्या सु. १,२९,३०,००० (१९८१ अंदाज). हा प्रदेश विद्यमान चीन व सोव्हिएट रशिया यांदरम्यान असून याच्या पश्चिमेस चीनचा सिंक्यांग-ऊईगुर हा स्वायत्त विभाग, पूर्वेस मँचुरिया हा चीनचा प्रांत, तर उत्तरेस सायबीरिया व दक्षिणेस चीनची जगप्रसिद्ध भिंत आहे. चीनच्या ताब्यातील इनर मंगोलिया, रशियाच्या ताब्यातील बुर्यात व तूव्हा आणि स्वतंत्र मंगोलिया प्रजासत्ताक अशी याची विभागणी झालेली आहे.
मंगोलियाचे पठार हे सस. पासून ९०० ते १,५२० मी. उंचीवर असून ते कँब्रियन-पूर्व काळातील व पुराजीव महाकल्पातील गॅनाइट, नीस, शिस्ट या खडकांनी युक्त आहे. स्थूलमानाने गोबी वाळवंटामुळे याचे इनर मंगोलिया व औटर मंगोलिया असे दोन भाग पडतात. भूरचनेच्या दृष्टीने याचे वायव्येकडील डोंगराळ भाग, मध्य भाग किंवा गोबीचे वाळवंट व नैर्ऋत्येकडील डोंगराळ भाग असे तीन विभाग पडतात. वायव्येकडील डोंगराळ भागात अल्ताई ही पर्वतरांग प्रमुख व सर्वांत लांब असून हिच्यातील कुइतेन (४,६८५ मी.) हे सर्वोच्च शिखर आहे. याशिवाय साइलजुमेन, खांगाई, गेंते, सायान या पर्वतरांगांचा यामध्ये समावेश होतो. याचा मध्याभाग हा विस्तीर्ण अशा गोबीच्या वाळवंटाने व्यापलेला आहे. नैर्ऋत्य भागात लहानमोठ्या डोंगररांगा असल्या, तरी पीत नदीचे खोरे शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ऑर्कॉन, केरलेन, सेलेंगा, पीत इ. येथील प्रमुख नद्या होत.
मंगोलियाचे हवामान थंड व कोरडे असून, त्यात प्रदेशपरत्वे थोडाफार फरक आढळतो. येथील पर्जन्यमान कमी असून, त्याचे सर्व साधारण प्रमाण ३० ते ३५ सेंमी. आढळते. येथे विस्तीर्ण कुरणे व डोंगराळ भागात लार्च, स्प्रूस, फर, पाइन, बर्च, ॲस्पेन इ. वनस्पति विशेष आढळतात. मेंढ्या, बकऱ्या, गाई, घोडे, उंट इ. पशुधन महत्त्वाचे आहे. अस्वल, कोल्हा, हरिण, लांडगा, बिडाल, मार्मोट इ. वन्य प्राणी तसेच सोनेरी गरूड, ग्राउझ, लावा इ. पक्षी आणि सरोवरांतून कार्पसारखे मासे या प्रदेशात आढळतात.
शेती व्यवसायाच्या दृष्टीने हा प्रदेश मागासलेला आहे. पीत नदी–खोऱ्यात व इतरत्र जलसिंचनाच्या साहाय्याने शेती केली जाते आणि गहू, ओट इ. पिके घेतली जातात. मागासलेल्या शेतीमुळे पशुसंवर्धन व तदानुषंगिक व्यवसायांना विशेष महत्त्व आले आहे. येथे कोळसा, खनिज तेल, लोहधातुक यांचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात. यांशिवाय तांबे, सोने, चांदी, इत्यादींच्या धातुकांचे व गंधकाचे साठे असल्याने खनिज संपत्तीच्या दृष्टीने या प्रदेशास महत्त्व आहे. उंट व घोडे यांचा वाहतुकीसाठी प्रामुख्याने उपयोग केला जातो. लोहमार्ग, रस्ते यांच्या सुविधांमुळे रशिया व चीनमधील शहरांशी दळणवळाण झाले आहे. रशियाशी मोठ्या प्रमाणात व्यापार होत असून लोकर, कातडी वस्तू, मांस खनिजे इत्यादींचा निर्यातीत अंतर्भाव होतो.
मंगोलियन प्रजासत्तकात मंगोल लोकांचे प्रमाण सु. ७५%आहे, तर इनर मंगोलियात ते सु. १८% आहे. काराकोरम, हूहेहोट, ऊलान ऊडे, ऊलान बाटोर, किझिल इ. या प्रदेशातील प्रमुख शहरे होत.
पूर्वीपासून या प्रदेशात हूण ऊईगुर इ. भटक्या तुर्की टोळ्यांचे वास्तव्य होते. त्यांतील हूणांनी चीनवर वारंवार हल्ले केले. तसेच तार्तरांचे व मंगोल लोकांचेही येथे वास्तव्य होते. त्यांपैकी ऊईगुर तुर्कानी या प्रदेशात प्रथम राज्य स्थापन केले (७४४-८५६). उत्तर चीनच्या भागात राज्य करणारा खीनन हाही मंगोलियातीलच होता. तार्तर व मंगोल या जमातींत वैर होते. बाराव्या शतकात प्रदेशात अनेक लहानलहान राज्ये होती. १२०६ च्या सुमारास चंगीझखानाने येथील टोळ्यांचे एकत्रीकरण करून तार्तरांचा पराभव केला व आपले राज्य स्थापन करून काराकोरम येथे राजधानी वसविली. त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार चीनपासून पश्चिमेकडे यूरोपपर्यंत केला. तेव्हा पासून मंगोलियास विशेष महत्त्व प्राप्त झाले. चंगीझखानानंतर त्याच्या वंशजांनी काराकोरम येथून पीकिंग राजधानी हलविली. तदनंतर चीनमध्ये युआन वंशाचे, रशियात गोल्डन होअर्ड, जागताई या नावे तुर्कस्तानात, तर इराणमध्ये हुलॅगिड या नावे चंगीझखानाच्या वंशजांनी राज्ये केली. मार्को पोलो हा प्रसिद्ध इटालियन प्रवासी कूब्लाईखानाच्या दरबारी होता. त्याने मंगोलियाविषयी व येथील लोकांविषयी केलेले लेखन प्रसिद्ध आहे. मंगोलियन साम्राज्याच्या ऱ्हासानंतर मात्र मंगोलियाचे महत्त्व कमी झाले. इनर मंगोलिया चीनच्या आधिपत्याखाली आला आणि सतराव्या शतकात औटर मंगोलिया काबीज करण्याचा चीनने प्रयत्न केला परंतु रशियाच्या प्रतिकारामुळे चीनला ते शक्य झाले नाही. पुढे १९२१ मध्ये औटर मंगोलियाचे मंगोलियन प्रजासत्ताक झाले व इनर मंगोलियाचा ताबा चीनकडे राहिला. १९३३ मध्ये जपानने जेहोल प्रांताचा ताबा घेतला. दुसऱ्या महायुद्धानंतर यावर चीनचा अंमल पुन्हा प्रस्थापित झाला आणि १९४५ मध्ये चीनने जेहोल व हेलुंग-जिआंग हे दोन प्रांत व मंगोलियाचा बहुतेक भाग यांचे एकत्रीकरण करून इनर मंगोलियन स्वायत्त विभाग बनविला. १९४५ पासून तानूतूव्हा (तूव्हा) हा रशियातील स्वायत्त विभाग स्थापन करण्यात आला.
ओक, द. ह.