फ्लँडर्स : उत्तर यूरापेच्या ‘लो कंट्रीज’ मधील मध्ययुगीन प्रदेश. मध्ययुगात याचा विसतार फ्रान्समधील कॅले शहरापासून आग्नेयीस व पूर्वेकडे स्केल्ट नदीपर्यंत आणि उत्तरेकडे समुद्रापर्यंत होता. या प्रदेशाचे १८३० मध्ये विभाजन होऊन अधिकांश भाग बेल्जियममधील पूर्व फ्लँडर्स व पश्चिम फ्लँडर्स या दोन प्रांतांत, तर उरलेला भाग फ्रान्समधील नॉर प्रांतात (डिपार्टमेंट) व नेदर्लंड्समधील झीलंड प्रांतात विभागला गेला. फ्लँडर्स याचा अर्थ ‘पूरग्रस्त भूमी’ असा होतो.

प्राचीन काळी हा प्रदेश केल्टिक टोळ्यांच्या अधिकाराखाली होता. या टोळ्यांच्या पराभवानंतर येथे रोमन सत्तेचा उदय झाला. पाचव्या व सहाव्या शतकांत हा प्रदेश फ्रँक लोकांच्या अंमलाखाली आला. सातव्या शतकात फ्लँडर्सचा विस्तार ब्रूझ शहर व परिसरापुरताच मर्यादित होता. परंतु नंतरच्या दोन शतकांत त्याचा विस्तार होत गेला. फ्रँक सम्राट चार्ल्स द बाल्डच्या (दुसरा चार्ल्स) नेतृत्वाखाली ८४३ मध्ये व्हर्डनच्या तहान्वये फ्लँडर्स वेस्ट फ्रँकिश राज्यात समाविष्ट झाला. पुढे चार्ल्स द बाल्डची मुलगी जूडिथ हिचा पहिल्या बॉल्ड्‌विनशी (ब्रा द फेर) विवाह झाला व ८६२ मध्ये त्याची नेमणूक फ्लँडर्सचा सरदार म्हणून झाली. त्यानेच फ्लँडर्सला काउंटीचा दर्जा दिला. याच्यानंतरच्या सत्ताधाऱ्यांनी ११ व्या शतकापर्यंत एक स्वतंत्र काउंटी म्हणून फ्लँडर्सचा स्केल्टच्या पूर्वेकडे अधिकाधिक विस्तार केला. हा भाग क्राउन फ्लँडर्स म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे सहाव्या बॉल्ड्‌विनने जवळच्या एनो काउंटीची वारसदार रिचिल्डिस हिच्याशी विवाह करून एनो व फ्लँडर्स एकाच छत्राखाली आणले परंतु त्याच्यानंतर सहाव्या बॉल्ड्‌विनचा मुलगा तिसरा आर्नुल्फ व बंधू रॉबर्ट फर्स्ट द फ्रिझियन यांच्यात काउंटपदासाठी झगडा निर्माण झाल्याने हे दोन प्रदेश पुन्हा अलग झाले.

काउंटपदासाठी पुन्हा बाराव्या शतकात वादंग निर्माण झाला. त्यामुळे आर्‌त्वा व इतर काही जिल्हे, पश्चिम व दक्षिण फ्लँडर्समधील काही शहरे फ्रेंच क्राउनच्या आधिपत्याखाली आली. अशा बिकट राजकीय परिस्थितीतही गेंट, ईप्र, ब्रूझ यांसारख्या शहरांचा कापडउद्योग व व्यापार यांमुळे मोठ्या प्रमाणात विकास झाला. तेराव्या व चौदाव्या शतकांत एक विख्यात बाजारपेठ म्हणून फ्लँडर्सची प्रसिद्धी होती. कापडउद्योग हा फ्लँडर्सच्या प्रगतीचा आधारस्तंभ होता व या उद्योगामुळेच फ्लँडर्स यूरोपभर ख्याती झाली.

आठव्या बॉल्डविनच्या कारकीर्दीत एनो व फ्लँडर्सचे पुन्हा एकीकरण झाले. नवव्या बॉल्डविनची कॉन्स्टँटिनोपलचा (लॅटिन साम्राज्याचा) संस्थापक (१२०४) अशी ख्याती झाली. परंतु याच वेळी फ्रान्सच्या दुसऱ्या फिलिपने येथील अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्यास प्रारंभ केला. बॉल्डविनच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन मुलींपैकी जोन ही अधिकारावर आली. तिचे लग्न पोर्तुगालच्या पहिल्या सॅन्शूचा मुलगा फेर्डिंनांट याच्याशी झाले. त्याने सम्राट चौथा ऑटो व जॉन ऑफ इंग्लंड यांच्याशी युती करून फ्रेंचांना विरोध करण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे फ्रेंचांनी बूव्हीनच्या लढाईत (१२१४) फेर्डिनांटचा पराभाव करून त्यास अटक केली आणि जोनकडे कारभार सोपविला. यामुळे फ्लँडर्सवर फ्रेंचांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. जोनच्या मृत्यूनंतर (१२४४) मार्गारेट ही तिची बहीण सत्तेवर आली. तिच्या कारकीर्दीत (तिच्या दोन विवाहांमुळे) अव्हेस्ने व दांप्येर या दोन घराण्यांतील तिच्याच मुलांमध्ये काउंटपदासाठी कलह सुरू झाला. फ्रान्सच्या नवव्या ल्वीच्या मध्यस्थीने ग्वे ऑफ दांप्येर यास फ्लँडर्सचे व अव्हेस्ने याच्याकडे एनोचे काउंटपद देऊन हा वाद मिटविण्यात आला. ग्वे ऑफ दांप्येर याच्या कारकीर्दीत (१२७८-१३०५) फ्रान्सच्या ४थ्या फिलिपने फ्लँडर्स घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दांप्येरने इंग्रजांच्या मदतीने त्यास विरोध केला. फिलिपने काही स्थनिक लोकांच्या मदतीने दांप्येरला अटक केली. याविरुद्ध बहुसंख्य लोकांनी उठाव करून कूरट्रेच्या लढाईत फ्रेंचांचा पराभव केला. ‘बॅटल ऑफ गोल्डन स्पर्स’ म्हणून ही लढाई विख्यात आहे. या विजयामुळे फ्रेंचांचा धोका दूर झाला, परंतु त्यावेळी झालेल्या तहान्वये फ्लँडर्सचा दक्षिण भाग फ्रेंचांना मिळाला.

चौदाव्या शतकात गेंट, ब्रूझ यांसारख्या मोठ्या शहरांतील धनिक वर्गाने काउंटविरोधी भूमिका घेतल्याने फ्लँडर्समध्ये एक नवीनच राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला. ल्वी ऑफ नव्हेर या काउंटने ब्रिटिश व्यापारीविरोधी धोरण अवलंबिले. परिणामतः कापडउद्योग धोक्यात येईल, म्हणून धनिकवर्गाने या धोरणास विरोध केला. याच सुमारास इंग्लंड व फ्रान्स यांच्यातील शतवार्षिक (१३३७-१४५३) युद्धास प्रारंभ झाला. त्यात काउंटने फ्रेंचांची बाजू घेतली. तथापि मोठ्या शहरांतील (कम्यून्समधील) लोकांनी याकॉप व्हान आर्तव्हेल्द याच्या नेतृत्वाखाली काउंटला विरोध केला. या लढ्यात याकॉप १३४५ मध्ये मारला जाऊन काउंटचे वर्चस्व प्रस्थापित झाले. मात्र काउंटचे क्रेसीच्या लढाईत निधन झाले.

ल्वी ऑफ माले याने आपल्या कारकीर्दीत (१३४६-८४) तडजोडीचे धोरण स्वीकारून फ्लँडर्समध्ये शांतता राखण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा याकॉपचा मुलगा फिलिप व्हान आर्तव्हेल्द याने काउंटविरोधी उठाव केला.

मालेनंतर त्याची मार्गारेट ही मुलगी सत्तेवर आली. तिने पहिला व दुसरा विवाह अनुक्रमे रूव्ऱ्ह आणि फिलिप द बोल्ड या बर्गंडीच्या ड्यूकबरोबर केला. त्यामुळे फ्लँडर्स बर्गंडीच्या आधिपत्याखाली आला. बर्गंडीच्या अंमलाखाली फ्लँडर्समधील व्यापार व ⇨ फ्लेमिश कला यांचा विकास झाला. बर्गंडीच्या फिलिप द बोल्ड (कार. १३८३-१४०४), जॉन द फिअरलेस (१४०५-१९), फिलिप द गुड (१४१९-६७) यांनी फ्रेंचांना अनुकूल असे धोरण अवलंबिले. परंतु चार्ल्स द बोल्ड (१४६७-७७) याने नेदर्लंड्स व बर्गंडी यांची एकजूट करून फ्रेंचविरोधी भूमिका घेतली. त्याच्यानंतर त्याची मुलगी मेरी गादीवर आली. तिला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. तिने १४७७ मध्ये हॅप्सबर्ग घराण्यातील माक्सिमीलिआन याच्याशी विवाह केला. हाच पुढे पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट बनला. त्यामुळे फ्लँडर्स हॅप्सबर्गच्या (ऑस्ट्रिया) सत्तेखाली आला. माक्सिमीलिआनचा मुलगा दुसरा फिलिप याच्यामुळे फ्लँडर्स १५०६ मध्ये स्पेनच्या आधिपत्याखाली गेला. हा ताबा उत्रेक्तच्या (१७१३) तहान्वये ऑस्ट्रियास मिळेपर्यंत कायम राहिला. चौदाव्या लूईच्या कारकीर्दीत फ्लँडर्सचा दक्षिण भाग हा १६६८ आणि १६७८ मधील तहान्वये ‘फ्रेंच फ्लँडर्स’ या नावाने फ्रान्समध्ये समाविष्ट करण्यात आला व उरलेला प्रदेश १७९७ च्या तहान्वये फ्रान्सला मिळाला. फ्लँडर्सवर फ्रान्सचा ताबा १८१४ पर्यंत राहिला. नंतर १८१५ मधील व्हिएन्ना काँग्रेसच्या अटींनुसार पूर्वीचा ऑस्ट्रियन फ्लँडर्स हा भाग नेदर्लंड्सला देंण्यात आला. १८३० मध्ये बेल्जियम स्वतंत्र झाल्यावर मात्र फ्लँडर्सचा बहुतक भाग बेल्जियमकडे आला. मध्ययुगापासून दुसऱ्या महायुद्धापर्यंत फ्लँडर्स त्याच्या मोक्याच्या स्थानामुळे यूरोपची संग्रामभूमी बनलेला होता.

पहा: नेदर्लंडस फ्रान्स बेल्जियम.

गाडे, ना. स.