रामनाथपुरम् : तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम् जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ठिकाण. लोकसंख्या ४५,७१८ (१९८१). हे मदुराईच्या आग्नेयीस ११२ किमी., रामेश्वरम्‌च्या पश्चिमेस ५६ किमी. व पाल्कच्या सामुद्रधुनी किनाऱ्यापासून पश्चिमेस १५ किमी. अंतरावर आहे. रामेश्वरम्‌चे रामनाथस्वामी यांच्यावरून या ठिकाणाला हे नाव पडले असावे. रामनाड या नावानेही हे नगर ओळखले जाते. या ठिकाणाचे मूळ नाव मुगवैनगरम् (मुखाजवळील नगर) असल्याचे सांगितले जाते व त्याचा संबंध रामायणाशी जोडला जातो. रामनाथपुरम्‌चा अजूनही मुगवै असा उल्लेख केला जातो. रघुनाथ सेतुपती किंवा किलाव्हान सेतुपती (१६७४–१७१०) यांनी येथे एक किल्ला बांधला व त्यानंतर तेथे एक राजप्रासाद उभारण्यात आला. आज त्यांचे केवळ अवशेषच पहावयास मिळतात.

नगरात कापड व जडजवाहीर निर्मिती आणि ताडाची पाने, चैनीच्या वस्तू, मिरची यांचा व्यापार चालतो. मदुराई-मंडपम् यांदरम्यानच्या लोहमार्गावरील व रस्त्यावरील हे प्रमुख स्थानक आहे. थयुमनावर व मुथुरामलिंगस्वामी ही नगरातील व शिव, विष्णू, सुब्रमण्यस्वामी, राजा राजेश्वरी ही तेथील राजप्रासादातील मंदिरे आहेत. त्यांशिवाय येथे एक मशीद, दोन रोमन कॅथलिक व एक प्रॉटेस्टंट चर्च आहे. रामलिंग विलास ही येथील जुनी परंतु सुंदर वास्तू आहे. संत थयुमनावर यांचे काही काळ येथे वास्तव्य होते. १८९७ मध्ये स्वामी विवेकानंद यांनी या नगराला भेट दिली होती. मदुराई-कामराज विद्यापीठाशी संलग्न असलेली दोन महाविद्यालये येथे आहेत.

चौधरी, वसंत