फीनिक्स – २ : अमेरिकेच्या ॲरिझोना राज्याची राजधानी व मॅरिकोपा काउंटीचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ६,६४,७२१ (१९७५ अंदाज). हे सॉल्ट नदीकाठी, लॉस अँजेल्सच्या आग्नेयीस सु. ५७६ किमी. अंतरावर वसले आहे. शहराच्या ईशान्येस सु. १२० किमी. वर असलेले रूझवेल्ट धरण आणि सॉल्ट व व्हेर्डी नद्यांवरील इतर पाच धरणे यांमुळे मुबलक पाणी व विद्युत्पुरवठा उपलब्ध होतो. परिणामी येथील शेती व औद्योगिक विकास झपाट्याने झाला. लांब धाग्याचा कापूस, भाजीपाला, अन्नधान्य, लिंबू जातीची फळे, खजूर, द्राक्षे, कलिंगडे वगैरेंचे भरपूर उत्पादन येथे होते. गुरांसाठी अल्फाल्फा गवताची चराऊ राने येथे आहेत.
इंडियनांची वसती असलेल्या जुन्या कालव्याकाठच्या जागेवरच या शहराची सु. १८६८ मध्ये स्थापना करण्यात आली. म्हणूनच उद्ध्वस्त इंडियन संस्कृतीच्या अवशेषांतून उभारण्यात आलेल्या या शहराला ‘फीनिक्स’ असे यथार्थपणे नाव देण्यात आले. १८८१ मध्ये येथे नगरपालिका अस्तित्वात आली, तर १९१२ पासून ही राज्याची राजधानी बनली.
शहरात विमाने व त्यांचे सुटे भाग, कापडगिरण्या, रसायने, खनिजशुद्धी, मद्यार्क व मद्ये, वातानुकूलक इ. निर्मितीउद्योग चालतात. इलेक्ट्रॉनिक उपकरणनिर्मितीचे तसेच प्रदत्त संस्करणाचे (डेटा प्रोसेसिंगचे ) हे केंद्र असून देशातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम कारखाना येथेच आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात येथे तीन मोठे विमानतळ सैनिकी हालचालींसाठी उभारण्यात आले होते.
स्वास्थ्यविहार व पर्यटनस्थळ म्हणून हे शहर प्रसिद्ध आहे. येथील हवा आरोग्यदायी, कोरडी व उबदार आहे. हिवाळ्यात पर्यटकांचे प्रमाण अधिक असते. पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक उद्याने, वस्तुसंग्रहालये शहरात असून ‘साउथ मौंटन पार्क’ (सु. ६,००० हे.) हे जगातील सर्वात मोठे उद्यान येथे आहे. या उद्यानातच सुवर्णखाण आहे. येथील सरोवरकाठी अंतर्भागात असलेली देशातील पहिली लाटारोहण-पुळण (सर्फिंग बीच) अलीकडेच खुली करण्यात आली आहे. डेझर्ट बोटॅनिकल गार्डन्स, ॲरिझोना वस्तुसंग्रहालय, ८०० वर्षांपूर्वीचे इंडियन संस्कृतीचे अवशेष असलेले प्वेब्लो ग्रांदे वस्तुसंग्रहालय इ. प्रेक्षणीय आहेत. ॲरिझोना बायबल महाविद्यालय, ग्रँड कॅन्यन महाविद्यालय इ. शैक्षणिक संस्थाही उल्लेखनीय आहेत.
कापडी, सुलभा