बहिःस्थ शिक्षण : (एक्स्टर्नल एज्युकेशन). स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा भरपूर प्रसार झालेला असला, तरी अद्यापही अनेक व्यक्ती शाळेत किंवा महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा व्यक्तींची सोय व्हावी म्हणून विविध राज्यांची शासने, शालांत परीक्षा मंडळे आणि विद्यापीठे यांनी शाळेत किंवा महाविद्यालयात न जाता परस्पर परीक्षेला बसण्याची संधी व सोय लोकांना उपलब्ध करून दिलेली आहे. या पद्धतीलाच ‘बहिःस्थ शिक्षण’ असे म्हणतात. शाळेत किंवा महाविद्यालयात न जाता एकदम परीक्षेस बसणे व त्या इयत्तेचे प्रशस्तिपत्रक किंवा पदवी मिळविणे म्हणजेच बहिःस्थ शिक्षण किंवा बहिःस्थ पदवी होय. 

ठराविक वयापर्यंत जर मुले काही कारणाने शाळेत जाऊ शकली नाहीत, तर सामान्यतः बाराव्या अथवा तेराव्या वर्षी त्यांना एकदम ७ वीच्या परीक्षेस बसता येते १७ वर्षानंतर १० वीच्या परीक्षेस बसता येते व श्री. ना. दा. ठाकरसी विद्यापीठासारख्या संस्थेत स्त्रियांना २१ व्या वर्षापर्यंत कोणत्याही शाळा — महाविद्यालयात नाव दाखल केलेले नसले, तरी प्रवेश परीक्षा घेऊन विद्यापीठाचा अभ्यासक्रम निवडता येतो.

बहिःस्थ शिक्षण हा अनौपचारिक शिक्षणाचा एक प्रकार आहे. भारतातील बहुतेक विद्यापीठांतून बहिःस्थ पद्धती सुरू झालेली आहे. पुणे विद्यापीठाने ही पद्धती महाराष्ट्रात सर्वात अगोदर सुरू केली. बहिःस्थ पदवीसाठी प्रत्येक विद्यापीठ आपले नियम तयार करते. सामान्यतः एखाद्या परीक्षेसाठी बहिःस्थ पद्धतीने बसायचे असल्यास नोंदणी केव्हा करावी, मूळ शिक्षण किती झाले असावे, नोकरी असवी, पदव्युत्तर पदवीसाठी पहिली पदवी त्या विद्यापीठाची किंवा तत्सम असावी, वास्तव्य त्या राज्यातील असावे, स्त्रियांच्या बाबतींत  त्या विवाहित असाव्यात, शारीरिक दृष्टया अपंग असल्यास नागरी शल्यचिकित्सकाचा तसा दाखला दिलेला असावा, इ. अटी असतात.

बहिस्थ प्रशस्तिपत्रक किंवा पदवी आणि नेहमीच्या मार्गाने घेतलेले प्रशस्तिपत्रक किंवा पदवी यांमध्ये फरक नसतो. विद्यार्थ्यासाठी अभ्यासक्रम व प्रश्र्नपत्रिका एकच असतात. त्याचे उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण करण्याचे नियमही तेच असतात. 

पुणे विद्यापीठाप्रमाणे महाराष्ट्रात श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाने स्त्रियांसाठी ‘बहिःस्थ’ आणि ‘पत्रव्यवहाराद्वारे बहिःस्थ’ अशा प्रकारचे उपक्रम सुरू करून ज्या भगिनी कधीही शाळा-महाविद्यालयांत जाऊ शकल्या नाहीत, त्यांची फार मोठी सोय केलेली आहे.

बहिःस्थ शिक्षणपद्धतीमुळे स्त्रिया, अपंग, खेड्यापाड्यांत राहणारे लोक, भारताच्या संरक्षण विभागामध्ये काम करणारे लोक, ज्यांची बदली परप्रांतात होते असे नागरिक, अशांना शिक्षणाची फार मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

गोगटे, श्री.व.