नोगुची, हिडेयो : (२४ नोव्हेंबर १८७६–२१ मे १९२८). जपानी सूक्ष्मजंतुवैज्ञानिक आणि विकृतिवैज्ञानिक. देवी प्रतिबंधक लस शुद्ध स्वरूपात बनविणे, ओरोया ज्वरास (द. अमेरिकेतील पर्वतमय प्रदेशात बार्टोनेला बॅसिलिफॉमिस नावाच्या सूक्ष्मजंतूंमुळे उद्‌भवणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या ज्वरास) कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजंतूंचा शोध लावणे, उपदंशामुळे होणाऱ्या अंशघात आणि गतिविभ्रम (उपदंशाच्या सूक्ष्मजंतूंच्या मेरुरज्जूच्या विशिष्ट भागावरील परिणामांमुळे उद्‌भवणारे उपद्रव) या विकृतींमुळे मरण पावलेल्या रोग्यांच्या केंद्रीय तंत्रिका तंत्रातील (मज्जासंस्थेतील) स्पायरोकीटा (उपदंशाचे सूक्ष्मजंतू) शोधून काढणे ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत.

त्यांचा जन्म ईनावाशिरो (फूकुशीमा, जपान) येथे झाला. टोकियो वैद्यकीय विद्यालयात शिक्षण घेऊन त्यांनी १८९७ मध्ये पदवी मिळविली. त्यानंतर ‘एस्. किटाझाटो इन्स्टिट्यूट फॉर इन्फेक्शस डिसीझेस’ या संस्थेत त्यांनी साहाय्यक म्हणून काम केले. दोन वर्षांनंतर त्यांनी अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे स्थानांतर केले. डिसेंबर १९०० च्या सुमारास ते पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात गेले आणि तेथे त्यांनी एफ्. ई. सायमन या विकृतिविज्ञानाच्या प्राध्यापकांच्या देखरेखीखाली सर्पविषावरील संशोधनास प्रारंभ केला. १९०३ मध्ये कार्नेगी इन्स्टिट्यूशनने त्यांना कोपनहेगन येथील स्टाटेन्स सीरम इन्स्टिट्यूट या संस्थेत संशोधक साहाय्यक म्हणून विद्यावेतन देऊन पाठविले. १९०४ मध्ये ते न्यूयॉर्कमधील ‘रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च’ या संस्थेत काम करू लागले. त्यांचे बहुतेक सर्व संशोधनकार्य याच संस्थेत झाले. त्यांनी उपदंशाच्या निदानास उपयुक्त असणाऱ्या ‘वासरमान प्रतिक्रिया’ या परीक्षेच्या तंत्रात सुधारणा केली. त्यांनी उपदंशाच्या निदानाकरिता शोधलेली परीक्षा ‘नोगुची परीक्षा’ म्हणून ओळखली जाते. पूर्वी ज्यांचे संवर्धन करण्यात यश आले नव्हते असे सूक्ष्मजंतू नोगुचींनी प्रयोगशाळेत काचनलिकेत संवर्धित करून दाखविले. त्यांनी अनेक नवीन सूक्ष्मजीवही शोधून काढले. स्पायरोकीटांचे संवर्धन त्यांनीच यशस्वी रीत्या केले. बार्टोनेला बॅसिलिफॉर्मिस या रोगजंतूंचे संवर्धन करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते.

त्यांनी अमेरिकेत असताना ⇨ पीतज्वरावर संशोधन केले होते. काही सूक्ष्मजंतुवैज्ञानिकांनी प्रत्यक्ष आफ्रिकेत जाऊन या रोगावर संशोधन केले आणि त्यांनी हा रोग सूक्ष्मजंतुजन्य नसून व्हायरसामुळे होतो, असे विधान केले. ते ऐकून नोगुची या रोगावरील अधिक संशोधनाकरिता आफ्रिकेस गेले परंतु दुर्दैवाने या रोगानेच पछाडून ते ॲक्रा (घाना) येथे मरण पावले.

कानिटकर, बा. मो. भालेराव, य. त्र्यं.