फेल्साइट : (फेल्स्टोन). सूक्ष्मकणी वा अदृश्यकणी वयनाचा (पोताचा) सिकत (सिलिकेचे प्रमाण जास्त असलेला) अग्निज खडक. व्यापकपणे वा सैलपणे वापरली जाणारी ही संज्ञा प्रथम पॉर्फिरी खडकांतील सूक्ष्मकणी आधारकासाठी (ज्यात मोठे स्फटिक रुतलेले असतात अशा भागासाठी) वापरली होती (१८१४). ज्याच्यातील आधारक द्रव्य विकाचीभवनाने (काच स्फटिकरूपात बदलल्याने) वा इतर बदलाने नंतर दाट झाले आहे, अशा जुन्या म्हणजे तृतीय काळापूर्वीच्या (सु. ६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) रायोलाइट व ट्रॅकाइट खडकांना फेल्साइट म्हणत असत. आता ब्रिटन आणि अमेरिकेत सूक्ष्मकणी व बेसाल्टी संघटन नसलेल्या ज्वालामुखी खडकांसाठी प्रत्यक्ष क्षेत्रात ही संज्ञा वापरतात. अशा प्रकारे नुसत्या डोळ्यांनी ओळखता न येण्याइतपत सूक्ष्मकणी संरचनेला ‘फेल्सिटिक वयन’ म्हणतात व असे वयन असलेल्या सिकत अग्निज खडकांना फेल्साइट म्हणतात. प्रत्यक्ष क्षेत्रात जेव्हा कणांवरून वयन अचूक समजणे शक्य नसते तेव्हा ही संज्ञा वापरणे सोयीचे असते मात्र इतर वेळी ती उपयुक्त ठरत नाही.
फेल्साइट खडक हे घट्ट व मुख्यत्वे फिकट रंगाचे असतात. त्यांमध्ये क्वॉर्ट्झ, फेल्स्पारे, फेल्स्पॅथॉइडे, शुभ्र अभ्रक इ. खनिजे व कधीकधी काचमय द्रव्यही असते. क्वचित याच्या अदृश्यकणी भागामध्ये क्वॉर्ट्झ, ऑर्थोक्लेज, प्लॅजिओक्लेज व कृष्णाभ्रक या खनिजांचे सापेक्षतः मोठे स्फटिकही असतात व अशा खडकाला फेल्साइट पॉर्फिरी म्हणतात. पारदर्शक क्वॉर्ट्झाचे असे स्फटिक असणाऱ्या खडकाला कॉर्ट्झ फेल्साइट म्हणतात व सोडा फेल्स्पार विपुल असणाऱ्या फेल्साइटाला सोडा फेल्साइट म्हणतात. रायोलाइट, ट्रॅकाइट, क्वॉर्ट्झ लॅटाइट, डेसाइट, अँडेसाइट, ग्रॅनाइट पॉर्फिराइट, ऑर्थोफायर इ. प्रकारचे खडक फेल्साइटांत येतात.
फेल्साइट खडक लाव्ह्याच्या, ज्वालामुखी खडकांच्या वा भित्तींच्या रूपांत आढळतात. पुष्कळदा ते ज्वालामुखी राख, टफ व कोणाश्म यांच्याबरोबर अंतःस्तरित झालेले (इतर थरांमध्ये थररूपात थिजले गेलेले) असतात. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास फेल्साइटातील वयन हे क्वॉर्ट्झ व फेल्स्पार यांच्यासारख्या आकारमानांच्या कणांच्या मिश्रणामुळे आल्याचे दिसते. रायोलाइट, पिचस्टोन यांसारख्या खडकांतील काचमय द्रव्याचे विकाचीभवन होऊन किंवा दाट शिलारस भित्तीच्या रूपात जलद थंड होऊन मोठे स्फटिक बनण्यास अवसर न मिळाल्याने सूक्ष्मकण निर्माण होऊन हे वयन निर्माण होते. भारतात कर्नाटकामध्ये फेल्साइटाच्या भित्ती आढळल्या असून राजस्थानच्या हिस्सार जिल्ह्यातील तुशाम (तोशाम) टेकड्यांत मालानी फेल्साइट आढळले आहेत. फेल्सिटिक म्हणजे सूक्ष्मकणी असा अर्थ रूढ झाला आहे. मात्र मूळ फेल्साइट नाव फेल्स्पारामधील फेल्स घेऊन रिचर्ड करवॅन (१७३३–१८१२) यांनी दिले आहे.
ठाकूर, अ. ना.