फेरेट

फेरेट : सस्तन प्राण्यांच्या मुस्टेलिडी कुलातील हा मांसाहारी प्राणी आहे. याचे शास्‍त्रीय नाव मुस्टेला नायग्रीपेस असे असून माणसाळलेल्या रानटी पोल कॅटपासून याची फार प्राचीन काळी मुद्दाम पैदास करण्यात आलेली आहे. शरीराचा आकार, आकारमान आणि एकंदर सवयी या बाबतींत त्याचे पोल कॅटशी साम्य आहे. इतकेच नव्हे तर या दोन जातींचे संकरण होते.

फेरेटच्या शरीरावर पिवळसर पांढऱ्या रंगाचे मऊ केस असतात आणि त्याचे डोळे गुलाबी-लाल रंगाचे असतात. शरीराची (शेपटीसह) लांबी सु. ६० सेंमी.पर्यंत असून शेपटी १५ सेंमी. असते. याचे पाय आखूड असून वजन १ किग्रॅ. पर्यंत असते व याला ३४ दात असतात. पाश्चात्य देशांत फेरेटचा उपयोग उंदीर, घुशी आणि इतर जीवजंतू यांचा नाश करण्याकरिता करतात. सशांची शिकार करण्याच्या कामीही यांचा उपयोग करून घेतात. शिकारी बरेच फेरेट आपल्याबरोबर नेतात. सशांच्या बिळांत शिरून त्यांना बाहेर काढण्यात ते तरबेज असतात. फेरेटने बिळातच ससा मारून तो खाऊ नये म्हणून त्याला मुस्की बांधलेली असते. फेरेट बहुप्रसव आहे. मादीची वर्षातून दोनदा वीण होते आणि प्रत्येक वेळी तिला ६-९ पिल्ले होतात. याचे आयुर्मान १३ वर्षापर्यंत असते. फेरेटची फार काळजी घ्यावी लागते त्याची रहाण्याची जागा स्वच्छ, कोरडी व हवेशीर ठेवावी लागते. त्याला दिवसातून दोनदा भाकरी, दूध आणि मांस भरपूर द्यावे लागते.

भट, नलिनी