बिडल, जॉर्ज वेल्स : (२२ ऑक्टोबर १९०३ – ). अमेरिकन जीववैज्ञानिक व आनुवंशिकीविज्ञ (आनुवंशिक गुणधर्माच्या अभ्यासासंबंधीच्या शास्त्रातील तज्ञ). ‘जीनांची (गुणसूत्रांमध्ये म्हणजे आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सूक्ष्म घटकांमध्ये असणाऱ्या आनुवंशिक एककांची) क्रियाशीलता शरीर कोशिकांत (पेशींत) विशिष्ट रासायनिक प्रक्रिया घडवून आणण्याच्या त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते’ या शोधाबद्दल ⇨एडवर्ड लॉरी टेटम आणि बिडल यांना १९५८ च्या शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाच्या नोबेल पारितोषिकाचा अर्धा भाग विभागून मिळाला. पारितोषिकाचा राहिलेला अर्धा भाग ⇨जोशुआ लेडरबर्ग यांना आनुवंशिकीतील अन्य कार्याकरिता देण्यात आला.

बिडल यांचा जन्म वाहू (नेब्रॅस्का राज्य) येथे झाला. वाहू उच्च माध्यमिक शाळेत शिकत असताना एका शिक्षकांनी त्यांचे मन लिंकन येथील शेतकी महाविद्यालयात शिक्षण घेण्याकडे वळवले. १९२६ मध्ये त्यांनी नेब्रॅस्का विद्यापीठाची बी. एस्‌सी. पदवी मिळवली. १९२७ मध्ये त्याच विद्यापीठाची एम्.एस्‌सी. पदवी मिळविल्यानंतर कॉर्नेल विद्यापीठात त्यांना साहाय्यक शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. तेथे संशोधन करीत असताना त्यांनी १९३१ मध्ये आनुवंशिकीतील पीएच्.डी. पदवी मिळविली. त्याच वर्षी कॅलिफॉर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेची नॅशनल रिसर्च कौन्सिल फेलोशिप त्याना मिळाली आणि ते पॅसाडीना येथे राहू लागले. तेथे त्यांनी ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर या फळमाशीविषयी संशोधन केले.

इ. स. १९३५ मध्ये बिडल सहा महिन्यांकरिता पॅरिसला गेले व तेथील इन्स्टिट्यूट द बायॉलॉजी फिझिकोकेमिक या संस्थेत तेथील प्राध्यापकांबरोबर ड्रॉसोफिला माशीच्या डोळ्यांतील रंगद्रव्याबद्दल त्यांनी संशोधन केले. अमेरिकेत परतल्यानंतर हार्व्हर्ड विद्यापीठात आनुवंशिकीचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर १९३७ मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठात ते जीवविज्ञान (आनुवंशिकी) या विषयाचे प्राध्यापक झाले. या विद्यापीठात ते नऊ वर्षे होते आणि येथेच टेटम व त्यांनी मिळून पुष्कळ संशोधन केले.

आपल्या संशोधनाकरिता त्यांनी न्युरोस्पोरा क्रासा ही बुरशी वापरली. या बुरशीचे आनुवंशिक व संवर्धनविषयक गुणधर्म संशोधनास योग्य वाटल्यावरून त्यांनी ती निवडली होती. प्रयोगशाळेत बुरशीच्या संवर्धनावर पोषक द्रव्ये व क्ष-किरण यांचा होणारा परिमाम त्यांनी अभ्यासिला. क्ष-किरणांमुळे वाढ खुंटलेल्या बुरशीच्या पोषक द्रव्यात ब६ जीवनसत्त्व मिसळल्यास वाढ चांगली होते, असे त्यांना आढळले. बिडल व टेटम यांनी असे दाखविले की, क्ष-किरणांमुळे बुरशीतील विशिष्ट जीवांना हानी पोहोचते व त्यामुळे विशिष्ट एंझाइमाची (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यात मदत करणाऱ्या प्रथिनाची) निर्मिती थांबते. हे एंझाइम ब६ जीवनसत्त्वाच्या निर्मितीकरिता आवश्यक असते. या त्यांच्या संशोधनामुळे आनुवंशिकीतील मूलतत्त्वांमधील गुंतागुंत उकलण्यास मदत झाली. आणि कर्करोगावरील संशोधन कार्यात नवी दालने उघडली गेली. विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ⇨पेनिसिलिनाच्या (एक प्रकारच्या बुरशीपासून मिळणाऱ्या औषधाच्या) उत्पादनात त्यांच्या शोधामुळे चौपट वाढ करता आली.

इ. स. १९६१ मध्ये बिडल शिकागो विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवडले गेले व त्याच वर्षी ते त्याचे अध्यक्षही झाले. त्यांना नोबेल पारितोषिकाखेरीज अनेक मानसन्मान मिळाले आहेत. येल (१९४७), नेब्रॅस्का (१९४९), बर्मिंगहॅम (१९५९), ऑक्सफर्ड (१९५९), पेनसिल्व्हेनिया (१९६६) इ. विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी.एस्‌सी. पदव्या दिलेल्या आहेत. लास्कर पारितोषिक (१९५०), ॲल्बर्ट आइन्स्टाइन सायन्स पारितोषिक (१९५८), अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे नॅशनल पारितोषिक (१९५९), नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे किंबर आनुवंशिकी पारितोषिक (१९६०), प्रिस्टली मेमोरियल पारितोषिक (१९६७) इ. अनेक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लँट ब्रीडिंग, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी इ. अनेक वैज्ञानिक संस्थांचे ते सदस्य आहेत. जेनेटिक्स सोसायटी ऑफ अमेरिका आणि अमेरिकन ॲसोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थांचे अनुक्रमे १९४६ मध्ये व १९५५ मध्ये ते अध्यक्ष होते. त्यांनी ॲन इंट्रोडक्शन टू जेनेटिक्स (ए. एच्. स्टर्टेव्हंट यांच्यासमवेत १९३९), जेनेटिक्स अँड मॉडर्न बायॉलॉजी (१९६३) आणि द लँग्वेज ऑफ लाइफ (म्यूरिएल बिडल यांच्यासमवेत १९६६) हे ग्रंथ लिहिलेले असून यांतील शेवटच्या ग्रंथाला युवकांकरीता लिहिलेला उत्कृष्ट वैज्ञानिक ग्रंथ म्हणून एडिसन पारितोषिक मिळाले आहे.

भालेराव, य. त्र्यं.