प्वेर्त रीको : (कॉमनवेल्थ ऑफ प्वेर्त रीको). कॅरिबियन समुद्रातील अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा एक स्वतंत्र सहयोगी प्रदेश (फ्री ॲसोशिएटेड स्टेट). वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील या प्रदेशात प्वेर्त रीको हे प्रमुख बेट व इतर तीन लहान बेटे असून याच्या उत्तरेस अटलांटिक महासागर, दक्षिणेस कॅरिबियन समुद्र, पश्चिमेस मोना पॅसेजच्या पुढे डोमिनिकन प्रजासत्ताक व हैती (हिस्पॅनिओला) आणि पूर्वेस ६४ किमी.वर व्हर्जिन बेटे आहेत. जवळजवळ आयताकृती असलेल्या प्वेर्त रीकोची पूर्व-पश्चिम लांबी (प्वेर्का भूशिरापासून हीग्वेरो भूशिरापर्यंत) १७८ किमी., तर उत्तर-दक्षिण रुंदी (इझाबेलापासून कोलोन भूशिरापर्यंत) ६२ किमी. असून ब्येकेस (क्रॅब आयलंड), कूलेब्रा व मोना पॅसेजमधील मोना ही तीन बेटे मिळून प्वेर्त रीकोचे एकूण क्षेत्रफळ ८,८९७ चौ.किमी. व लोकसंख्या ३३·१९ लक्ष आहे (१९७७ अंदाज). राजधानी सॅन वॉन असून लोकसंख्या ५,१८,७०० (१९७७ अंदाज) आहे.

भूवर्णन : प्वेर्त रीकोचा तीन-चतुर्थांश भाग उत्तुंग पर्वत व डोंगर यांनी व्यापला असून किनारी प्रदेश व डोंगरखोऱ्यांचा काही भाग हाच काय तो थोडा सपाट आढळतो. प्वेर्त रीकोमधून पूर्व-पश्चिम गेलेली पर्वतरांग प्वेर्त रीकोचे उत्तर व दक्षिण असे दोन ठळक भाग करते. प्वेर्त रीकोच्या पूर्व भागातील एल् यूंग्के हा पर्वत प्रसिद्ध असून मौंट पूंता हे सर्वांत उंच शिखर (१,३३८ मी.) पश्चिमेकडील पर्वतराजीमध्ये आहे. प्वेर्त रीकोच्या उत्तर भागातून दक्षिण भागापेक्षा अधिक वेगवान नद्या वाहतात. त्यांपैकी लॉईसा, बायामोन, आरेसीबा व ला प्लाता या प्रमुख नद्या अटलांटिक महासागराला मिळतात. यांपैकी एकही नदी नौवहनयोग्य नाही, तथापि जलसिंचन व वीज उत्पादन यांच्या दृष्टीने त्या उपयोगी आहेत. दक्षिण प्वेर्त रीकोमध्ये अतिशय लहान नद्या असून त्या वर्षातील बराचसा काळ कोरड्याच असतात, तथापि त्या या भागातील लोकांना व शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध करतात कारण दक्षिण भागातच अधिककरून सिंचनयोग्य जमीन उपलब्ध आहे.

हवामान : आल्हाददायक हवामान हे प्वेर्त रीकोचे ठळक वैशिष्ट्य आहे. कमी उंचीच्या प्रदेशात उष्ण कटिबंधीय, तर उंचावरील प्रदेशात उपोष्ण कटिबंधीय असे हवामान असून सबंध बेटाला ईशान्येकडून येणाऱ्या व्यापारी वाऱ्यांमुळे थंडावा मिळतो. साधारणतः जुलैमध्ये किमान तापमान २७° से., तर जानेवारीमध्ये किमान तापमान २४° से. असते. येथील तापमान १६° से.च्या खाली कधीही जात नाही. वर्षातील पाच-सहा दिवसच सूर्यप्रकाशरहित असून पर्जन्यप्रमाणही अल्पच आहे. वार्षिक सरासरी पर्जन्य उत्तरेकडे १५५ सेंमी व दक्षिणेकडे ९१ सेंमी. आहे. फेब्रुवारी-एप्रिल यांदरम्यान पर्जन्यप्रमाण अल्प असते.

प्वेर्त रीको हा हरिकेन वादळांच्या कक्षेत मोडतो. साधारणतः या वादळाचा कालावधी ऑगस्ट ते ऑक्टोबर यांदरम्यान असतो. प्वेर्त रीकोच्या इतिहासात आतापर्यंत ७० हून अधिक हरिकेन वादळे उद्‌भवली, तथापि सर्वात विनाशकारी  वादळ ‘ सॅन सिरिॲको ‘ हे असून ते प्वेर्त रीकोवर ८ ऑगस्ट १८९९ रोजी येऊन आदळले. भीषण हरिकेन वादळे १९२८, १९३२ व १९५६ मध्ये उद्‌भवली. तथापि १९६० साली उद्‌भवलेल्या ‘सॅन लोर्रेसो’ ह्या हरिकेनमुळे मात्र मुसळधार पाऊस व पूर आले, त्यांयोगे १०० वर माणसे मरण पावली आणि ७५ लक्ष डॉ. किंमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या बेटावर भूकंपही झाले. १९१८ च्या भूकंपामुळे पश्चिम प्वेर्त रीकोमधील काही शहरांचे नुकसान झाले.

वनस्पती  व प्राणी : प्वेर्त रीकोमधील मृदांचे धूपक्रियेमुळे फार नुकसान झाले असून त्या कृषियोग्य होण्यासाठी खतांची व उर्वरकांची अतिशय आवश्यकता आहे. बेटांवरील मूळची अरण्ये नष्ट होत गेल्याने आता ३०,४०० हे. क्षेत्रातच शासकीय आरक्षित अरण्ये उरलेली आहेत. उष्ण कटिबंधीय वृक्षांचे (मॅहॉगनी, एवनी, लॉरेल, सॅटिनवुड) त्यांतून उत्पादन होते. नारळ व ताडवृक्षांच्या बागांचे किनारी प्रदेशात वैपुल्य असून बांबूही मोठ्या प्रमाणावर आढळतात.


प्वेर्त रीकोमध्ये प्राणिजीवन व पक्षिजीवन अत्यल्प आहे. मुंगूस हा प्राणी ऊसमळ्यांमधील उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात आल्याने विपुल प्रमाणात आढळतो. बुलबुल, चिमण्यांसारखे पक्षी, त्याचप्रमाणे झाडावरील बेडूक येथे आढळतात.

इतिहास : कोलंबसाने १९ नोव्हेंबर १४९३ मध्ये या बेटाचा शोध लावला. १५०८ मध्ये पाँसे दे लेआँ याने जवळच्या हिस्पॅनिओला बेटावरील स्पॅनिश लोकांचे संरक्षण करण्याकरिता येथे वसाहत स्थापन केली. प्वेर्त रीको व हिस्पॅनिओला या बेटांमधील मोना पॅसेज हा जलमार्ग म्हणजे कॅरिबियन, मेक्सिकन व दक्षिण अमेरिकेन भागांतील स्पॅनिश वसाहतींकडे जाण्याचा महत्त्वाचा मार्गच होता. अमेरिकेतून याच मार्गाने स्पेनला सोने नेण्यात येई.

प्वेर्त रीकोला इंडियन लोक ‘बोरिक्वेन’ या नावाने संबोधित. अद्यापिही ते नाव स्थानिक लोकांत रूढ आहे. त्याचे राष्ट्रगीत ‘ला बोरिक्वेना’ या शीर्षकाने प्रसिद्ध आहे. कोलंबसाने या बेटाला ‘सॅन वॉन बाउतीस्ता’ (सेंट जॉन द बॅप्टिस्ट) असे नाव दिले. येथे स्पॅनिशांची पहिली वसाहत झाल्यावर हे बेट ‘सॅन वॉन बाउतीस्ता दे प्वेर्त रीको’ या नावाने ओळखले जाऊ लागले. ‘प्वेर्त रीको’ याचा अर्थ ‘समृद्ध बंदर’ असा होतो. पुढे राजधानीच्या शहराला ‘सॅन वॉन’ आणि बेटाला प्वेर्त रीको असे म्हणण्याचा प्रघात पडला. १९००–३२ या काळात अमेरिकेत प्वेर्त रीकोऐवजी पोर्तो रीको असे नाव प्रचारात होते.

सर फ्रान्सिस ड्रेक या सुप्रसिद्ध इंग्रज दर्यावर्दीने १५९५ मध्ये हे बेट हस्तगत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परिणामतः स्पॅनिशांनी पुढे ‘ला फॉर्तालेझा’, ‘एल् मॉरो’ व ‘सान क्रिस्तोबल’ अशा तीन मजबूत गढ्यांसहित शहराला भक्कम तटबंदी केली. इंग्रजांचे आणि डचांचे अनेक हल्ले या तटबंदीने स्पॅनिश-अमेरिकन युद्धापर्यंत (१८९८) पचविले.

प्वेर्त रीकोवर स्पेनचा तीन शतके अंमल राहिला (१५९८–१८९८). या काळात प्वेर्त रीकोचा स्पेनशीच व्यापार चाले. १८६८ नंतर प्वेर्त रीकोवरील प्रशासनात थोडेफार बदल दिसू लागले. त्याच वर्षी स्पेनमधील क्रांतीमुळे प्वेर्त रीकोतही एक दिवसाचा उठाव करण्यात येऊन स्वतंत्र प्रजासत्ताकाची घोषणा करण्यात आली. १८७६ च्या स्पॅनिश संविधानानुसार प्वेर्त रीकोस स्पेनच्या संसदेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले व तेव्हापासूनच प्वेर्त रीकोच्या राजकीय दर्जाबाबत प्रदीर्घ वाटाघाटी सुरू झाल्या. नव्या दर्जान्वये, प्वेर्त रीकोला स्वतंत्र विधानमंडळ मिळू शकले. त्याचे स्पेनबरोबरचे संबंध एकमेकांच्या संमतीने व सहकार्याने निश्चित होऊ लागले.

जनरल नेल्सन ए. माइल्सच्या नेतृत्वाखाली अमेरिकेन सैन्य २५ जुलै १८९८ रोजी प्वेर्त रीकोच्या दक्षिण किनाऱ्यावर ग्वानीका येथे उतरले व काही आठवड्यांतच स्पेन-अमेरिका यांमधील युद्ध समाप्त झाले. १८९८ च्या पॅरिस तहान्वये अमेरिकेला प्वेर्त रीको, ग्वॉम आणि फिलिपीन्स हे प्रदेश मिळाले आणि अमेरिकन काँग्रेसला प्वेर्त रीकोचा दर्जा ठरविण्याचे सर्वाधिकार प्राप्त झाले. दोन वर्षांच्या सैनिकी प्रशासनकाळात प्वेर्त रीकोमध्ये सार्वजनिक बांधकामे हाती घेण्यात आली, आरोग्य व स्वच्छता यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले, नगरपालिकीय निवडणुका घेण्यात आल्या तथापि प्वेर्त रीकोच्या दर्जासंबंधीचा प्रश्न अनुत्तरितच राहिला. १९०० च्या फॉरेकर कायद्यान्वये बेटावर मुलकी शासन स्थापण्यात आले. अमेरिकन अध्यक्षांनी गव्हर्नरची नियुक्ती करून उच्च विधानमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायालय यांची स्थापना केली. स्थानिक कार्यकर्त्यांतूनच विधानपरिषद निवडण्यात आली तथापि सर्व कायदेकानूंना अंतिम संमती देण्याचे अधिकार अमेरिकन काँग्रेसकडेच ठेवण्यात आले. प्वेर्त रीकनांना अमेरिकेचे नागरिकत्व नाकारण्यात आले. अमेरिकन सीनेटवर प्वेर्त रीकोचे मतदानपात्र प्रतिनिधित्व मान्य करण्यात आले नाही. अमेरिकेशी खुला व्यापार करण्याची परवानगी देण्यात आली पण अमेरिकन संघराज्याचे कर मात्र प्वेर्त रीकोनांवर लादण्यात आले नाहीत. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार प्वेर्त रीको हा अमेरिकेचा भाग नाही, ते स्वायत्त नाही व ते स्वतंत्रही नाही, असे ठरविण्यात आले. अर्थातच प्वेर्त रीकनांना हे मान्य झाले नाही. फॉरेकर कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. १९१७ मधील जोन्स कायद्यानुसार प्वेर्त रीकनांना अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करण्यात आले आणि विधिमंडळाची दोन्ही गृहे स्थानिक पातळीवर निवडण्यास प्वेर्त रीकनांना मुभा देण्यात आली तथापि अमेरिकेने नेमलेल्या गव्हर्नरच्याच हाती प्रशासकीय व न्यायिक अधिकारी नियुक्त करण्याचे अधिकार ठेवण्यात आले. याशिवाय अमेरिकन काँग्रेसला सांवैधानिक अधिकार आणि कोणताही प्वेर्त रीकन कायदा नामंजूर वा रद्द करण्याचा अधिकार होताच. प्वेर्त रीको  हा विधिसंस्थापित प्रदेश म्हणून मानण्यात येऊन त्याला लवकरच स्वतंत्र दर्जा देण्यात यावा आणि प्वेर्त रीको हा स्वतंत्र सहयोगी प्रदेश म्हणून मानण्यात येऊन त्याला विस्तृत स्थानिक स्वराज्याचे अधिकार देण्यात यावेत, अशी दोन विधेयके १९२२ साली अमेरिकन काँग्रेसमध्ये प्रविष्ट करण्यात आली. तथापि कोणत्याच विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊ शकले नाही. प्वेर्त रीकोचा गव्हर्नर म्हणून असताना (१९२९–३२) थीओडोर रूझवेल्टने (अमेरिकन अध्यक्षाचा मुलगा) प्वेर्त रीकोमध्ये शिक्षण, आर्थिक विकास, प्वेर्त रीकनांची भाषा व त्यांची संस्कृती यांचे संरक्षण व अधिक राजकीय स्वातंत्र्य, असा प्वेर्त रीकोच्या विकासाचा कार्यक्रम घोषित केला. १९३० च्या महामंदीच्या काळात प्वेर्त रीकोमध्ये राष्ट्रवाद उफाळून आला आणि अनेक हिंसक घटना घडून आल्या. पेद्रो आल्बिझू कँपोस व त्याचा ‘नॅशनॅलिस्ट पार्टी’ हा पक्ष यांनी हिंसात्मक मार्गाचा अवलंब केला. त्यांची दखल घेऊन अमेरिकन काँग्रेसमध्ये १९३६-३७ मध्ये बेटांच्या स्वातंत्र्याकरिता दोन विधेयके प्रविष्ट झाली तथापि ती संमत  झाली नाहीत. प्वेर्त रीकोला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यापूर्वी त्या बेटाची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारली पाहिजे, असे प्रतिपादन करण्यात आले.


‘पॉप्युलर डेमॉक्रॅटिक पार्टी’ (स्था. १९३८) या पक्षाने विधिमंडळाच्या निवडणुका जिंकून तेथे आपले नियंत्रण प्रस्थापित केले. सर्वसाधारण सुधारणा व आर्थिक सुधारणा ही या पक्षाची मुख्य उद्दिष्टे होती दर्जाबाबतच्या समस्येचे निराकरण  हे या पक्षापुढील उद्दीष्ट नव्हते. या पक्षाच्या कारकीर्दीत निवडणुका आणि सार्वजनिक प्रशासन यांमध्ये  प्रामाणिकपणा आला ‘ऑपरेशन बूटस्ट्रॅप’ या आर्थिक नियोजन कार्यक्रमाद्वारे आश्चर्यकारक अशी आर्थिक प्रगती व विकास घडून आला. १९४६  मध्ये जीझस टी. पिनेरो या पहिल्या प्वेर्त रीकोनाची गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. १९४७ पासून अमेरिकन काँग्रेसने स्थानिक स्तरावरच गव्हर्नरच्या निवडणुकीस संमती दिली. त्याप्रमाणे १९४८ मध्ये ल्वी मारँ हा बहुमतवादी पॉप्युलर डेमॉक्रॅटिक पार्टीचा नेता गव्हर्नर म्हणून निवडून आला. १ नोव्हेंबर १९५० मध्ये राष्ट्रवाद्यांनी वॉशिंग्टन डी. सी. येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रूमन यांच्या खुनाचा प्रयत्न केला. १९४८ च्या निवडणुकीत विजयी पॉप्युलर डेमॉक्रॅटिक पार्टीने आपला पक्ष प्वेर्त रीकनांनी स्वतः आपल्या देशाचे संविधान बनविण्यात वचनबद्ध असल्याचे घोषित केले त्याचबरोबर अमेरिकेसंबंधीची प्रचलित आर्थिक व राजकोषीय नीती बदलावयाची नाही असेही ठरविले. अमेरिकन काँग्रसनेही याला मान्यतादर्शक असा एक कायदा संमत केला आणि प्वेर्त रीकोच्या मतदारांनी ४ जुलै १९५१ रोजी घेतलेल्या एका जनमतनिर्देशाद्वारे त्या कायद्याचा स्वीकार केला. प्वेर्त रीकोचे नवे संविधान ९२ प्रतिनिधींच्या एका  समितीने तयार केले. ३ मार्च १९५२ रोजी ते ३,७५,००० विरुद्ध ८३,००० मतांनी संमत झाले. अखेरीस २५ जुलै १९५२ रोजी ‘कॉमनवेल्थ ऑफ प्वेर्त रीको’ अधिकृतपणे अस्तित्वात आले. नंतरच्या काही वर्षांतच प्वेर्त रीकोमध्ये आर्थिक आणि सामाजिक सुधारणा वेगाने घडून आल्या. १९५६ व १९६० या वर्षांच्या दोन्ही निवडणुकांमध्ये पॉप्युलर डेमॉक्रॅटिक पार्टीला तिच्या कामगिरीबद्दल बहुमत मिळाले. १९६७ मध्ये घेण्यात आलेल्या सार्वमतानुसार ६०·५ टक्के मतदारांनी प्वेर्त रीकोचा कॉमनवेल्थचा दर्जा पुढे चालूच रहावा यास अनुक्रमे अनुसंमती (रॅटिफिकेशन) दिली, ३८·९ टक्के मतदारांनी प्वेर्त रीको हे अमेरिकेचे एक राज्य व्हावे, याला अनुसंमती दिली तर ०·६ टक्के मतदारांनी त्याच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले. १९४० ते १९५० या काळात प्वेर्त रीकनांचे अमेरिकेला जाण्याचे प्रमाण फार होते, ते एकदम कमी झाले असून बरेचजण मायदेशी परतू लागले आहेत. १९६८ च्या निवडणुकीत गेली २८ वर्षे सतत विजयश्री संपादणाऱ्या पॉप्युलर डेमॉक्रॅटिक पक्षाचा पराभव होऊन ‘न्यू प्रोग्रेसिव्ह पार्टी’चा विजय झाला व तिचा नेता ल्वी फेरे हा गव्हर्नर झाला. १९७२ च्या सार्वत्रिक निवडणुकांत पॉप्युलर डेमॉक्रॅटिक पार्टीने राफाएल एर्नान्देथ कोलॉन याच्या नेतृत्वाखाली न्यू प्रोग्रेसिव्ह पार्टीकडून गव्हर्नरपद व विधिमंडळावरील नियंत्रण पुन्हा मिळविले. तथापि १९७६ मधील निवडणुकांत पुन्हा न्यू प्रोग्रेसिव्ह पार्टीस विजय मिळून कार्लोस रॉमेरो बार्सेलो (प्वेर्त रीको हे अमेरिकेचे एक राज्य व्हावे या मताचा समर्थक) याची गव्हर्नर म्हणून निवड झाली.

प्वेर्त रीकोमध्ये १९७४ पासूनच लढाऊ राष्ट्रवादामध्ये वाढ होत असून ‘FALN’ सारख्या स्वातंत्र्यवादी सशस्त्र संघटना अमेरिकेत हिंसाचार करीत आहेत. १९७६ च्या अखेरीस जेराल्ड फोर्ड या निवृत्त होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने ‘प्वेर्त रीकोने अमेरिकेचे एकावन्नावे राज्य बनावे’ असे आवाहन केले, तर जानेवारी १९७७ मध्ये नवनिर्वाचित्त राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी ‘प्वेर्त रीकोने हा निर्णय स्वतःहून घ्यावयाचा आहे ’ असे घोषित केले. रॉमेरो बार्सेलोने १९८० मध्ये आपली गव्हर्नर म्हणून पुनर्नियुक्ती झाल्यास जनमतनिर्देश घेण्याचे आश्वासन दिले. १९७८ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या निर्वसाहतीकरण समितीने (डीकॉलनायझेशन कमिटी) प्वेर्त रीकोच्या स्वातंत्र्यांबाबत चर्चा केली. त्या चर्चेतून ‘प्वेर्त रीकनांना स्वयं-निर्णय व स्वातंत्र्य यांसंबंधीचा हक्क आहे’ असा ठराव संमत करण्यात आला.

राजकीय स्थिती : प्वेर्त रीकोची शासनयंत्रणा अमेरिकेच्या धर्तीवर आहे. १९५२ च्या संविधानान्वये कार्यकारी मंडळ, विधिमंडळ, न्यायांग (न्यायसंस्था) यांचे अधिकार स्पष्ट करण्यात आले आहेत. गव्हर्नरची चार वर्षातून एकदा प्रत्यक्ष प्रौढ मतदानाने निवड होत असून तो १४ सचिवांच्या कार्यकारी मंडळाचा प्रमुख म्हणून कारभार पाहतो. विधिमंडळ हे द्विसदनी असून त्याचे सिनेट व प्रतिनिधिगृह असे दोन भाग असतात. त्यांचे प्रतिनिधी ४ वर्षांतून एकदा निवडले जातात. सीनेटमध्ये २७ सदस्य, तर प्रतिनिधीगृहाचे ५१ सदस्य असतात. निवासी आयुक्ताची चार वर्षांसाठी निवड करण्यात येते. तो अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात प्वेर्त रीकोचे प्रतिनिधित्व करीत असला, तरी त्याला मतदानाचा अधिकार नसतो तथापि समित्यांच्या मतदानाचे हक्क त्याला मिळतात.

प्वेर्त रीकोमधील अमेरिकन नागरिक प्वेर्त रीकनांप्रमाणेच हक्क व अधिकार प्राप्त करू शकतात. येथील नागरिक हे अमेरिकेचेही नागरिक समजण्यात येतात. अमेरिकेचे करविषयक कायदे प्वेर्त रीकनांना लागू नाहीत. दोन्ही देशांमध्ये सीमाशुल्क नाहीत. अमेरिकेची सामाजिक सुरक्षा पद्धती प्वेर्त रीकोसही लागू आहे, तथापि बेकारी विमा तरतुदीचा लाभ प्वेर्त रीकनांना मिळत नाही. आर्थिक सहकार्य लाभ पूर्णतया प्वेर्त रीकोस मिळतात. चलन, संरक्षण, विदेशनीती, संदेशवहन आणि आंतर-राज्य व्यापार या बाबी अमेरिकेच्या संघराज्यीय क्षेत्रात येतात. स्थानिक प्रशासनार्थ प्वेर्त रीकोचे ७८ नगरपालिकीय जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. देशात चार प्रमुख राजकीय पक्ष आहेत. ‘प्वेर्त रीको इंडिपेंडन्स पार्टी’ ही संपूर्ण स्वातंत्र्यासाठी, ‘पॉप्युलर डेमॉक्रॅटिक पार्टी’ ही प्वेर्त रीकोचा सांप्रतचा दर्जा टिकविण्यासाठी, ‘प्वेर्त रीकन सोशॅलिस्ट पार्टी’ आणि ‘न्यू प्रोग्रेसिव्ह पार्टी’ ही प्वेर्त रीकोला अमेरिकेच्या राज्याचा दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील असून सांप्रत याच पक्षाचा गव्हर्नर देशाचा कारभार पाहतो.


प्वेर्त रीकोच्या नागरी व व्यापारी विधिसंहिता स्पेनच्या, तर दंडसंहिता, व्यवहारसंहिता आणि सार्वजनिक विधी हे अमेरिकेच्या नमुन्यांवर आधारित आहेत. गव्हर्नरकडून एक प्रधान न्यायाधीश व सहा सहयोगी न्यायाधीश यांचे सर्वोच्च न्यायालय नियुक्त केले जाते याशिवाय उच्च आणि जिल्हा न्यायालयेही आहेत. देशात संघीय जिल्हा न्यायालय असून त्याचे न्यायाधीश व अटर्नी यांची नियुक्ती अमेरिकन राष्ट्राध्यक्षाद्वारा करण्यात येते.

आर्थिक स्थिती : प्वेर्त रीकोची पारंपारिक अर्थव्यवस्था प्रामुख्याने निर्वाह शेतीवरच निर्भर होती. शेती हा प्रमुख उद्योग होता आणि कॉफी हे निर्यातीचे प्रमुख उत्पन्न होते. विसाव्या शतकात प्वेर्त रीकोची अर्थव्यवस्था अमेरिकेचे जकात संरक्षण, मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक आणि संरक्षण, विकास व अनुतोष यांसाठी शासनाची मदत या सर्वांमुळे अतिशय जलद विकसित होत गेली. याचा दृश्य परिणाम साखर उद्योगाची अतिजलद वाढ होण्यात झाला. १९४० च्या सुमारास या एकाच उद्योगात देशातील चौथा हिस्सा श्रमबल गुंतलेले असून या एकाच उद्योगाचा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा १६ टक्के होता. तथापि १९४० नंतरच ऑपरेशन बूटस्ट्रॅप या आर्थिक कार्यक्रमान्वये प्वेर्त रीकोचे निव्वळ उत्पन्न १९४० मधील २,२५० लक्ष डॉलरवरून १९७४ मधील ५७० कोटी डॉ.वर गेले. दरडोई उत्पन्न १९४० मधील १२१ डॉ.वरून १९७४ मध्ये १,९१३ डॉ.वर गेले. नवी घरबांधणी, सार्वजनिक इमारती, सेवासुविधांची उपलब्धता, नवे सुधारित रस्ते दळणवळणसाधने, आधुनिक कारखाने इत्यादींच्या रूपाने त्याचप्रमाणे नागरिकांच्या जीवनमानात झालेली संख्यात्मक व गुणात्मक वाढ यांवरून प्वेर्त रीकोमध्ये घडून आलेल्या आर्थिक सुधारणा दृग्गोचर होतात.

कृषी : १९४० मधील शेतीपासून मिळणारे उत्पन्न ७१० लक्ष डॉ. होते. ते १९७४ मध्ये २,७७० लक्ष डॉ. झाले. तथापि एकूण निव्वळ उत्पन्नाच्या दृष्टीने विचार करता कृषिउत्पन्नाच्या टक्केवारीमध्ये ३२ वरून ५ पर्यंत अशी घट झाली. अद्यापही ऊस हे प्वेर्त रीकोचे प्रमुख व महत्त्वाचे पीक असून त्याखालोखाल कॉफी, तंबाखू, अननस, केळी, नारळ आणि साखर व तज्जन्य पदार्थ (रम, मळी इ.) यांचा क्रम लागतो. कृषिउत्पादनाच्या पद्धती अजूनही प्राथमिकच आहेत, तथापि ऊसमळे व तंबाखूची शेते यांवर मात्र यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. १९७४ मध्ये शासनाने कृषियोजना जाहीर केली. तीमध्ये अधिक कर्जपुरवठा, बाजारपेठांची हमी, आधारकिंमतींची निश्चितता इ. गोष्टी होत्या. अन्नधान्याची आयात मोठ्या प्रमाणावर करावी लागत असून अन्नधान्याच्या पिकांखालील जमीन वाढविण्याचे प्रयत्न (उदा., ऊसमळ्यांच्या काही भागात भातपिकांची लागवड, अनुत्पादक डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर मळ्याची शेती वगैरे) चालू आहेत. १९७८ मधील कृषिउत्पादन पुढीलप्रमाणे होते : साखर २,०१,२०० टन कॉफी १३,३६० टन, तंबाखू १,५६० टन अननस ४१ टन मळी १,८९,६३,००० गॅलन. १९७८ मध्ये पशुधन पुढीलप्रमाणे होते : गाईगुरे ५,६२,१७१ डुकरे २,७९,८०८ कोंबड्या ५८,०३,१८३.

खनिज संपत्ती : प्रतिवर्षी सु. ६०० लक्ष डॉ. किंमतीचे खनिज उत्पादन केले जात असून वाळू, चुनखडक आणि रेती ही सर्वांत महत्त्वाची खनिजे होत. सॅन वॉन व पाँसे या शहरांच्या आसमंतीय क्षेत्रात वरील खनिजांचे उत्पादन होते.

उद्योग : प्वेर्त रीकोमध्ये फारच थोड्या प्रमाणात नैसर्गिक संपत्ती आहे. तथापि तांबे व निकेल यांचे साठे शोधण्यात आले आहेत. खनिज तेल उत्पादनाची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. प्वेर्त रीकोचे परदेशी गुंतवणूकदारांना स्वस्त श्रमशक्ती व करसवलती यांमुळे वाटणारे आकर्षण १९७७ पासून कमी होत गेले. १९७८ मध्ये प्वेर्त रीकन शासनाने नवीन प्रकारच्या औद्योगिक सवलती व प्रोत्साहने जाहीर केली. त्यामुळे औषधनिर्मिती, वस्त्र व कापड आणि चर्मोद्योग या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची शक्यता निर्माण झाली. शासनाच्या वाढत्या औद्योगिकीकरण धोरणामुळे प्वेर्त रीकन अर्थव्यवस्था कृषिप्रधान न राहता उद्योगप्रधान बनू लागली. निर्मितिउद्योग हेच आता राष्ट्रीय उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार असून कापड व वस्त्रे, विद्युत् व इलेक्ट्रॉनीय उपकरणे, प्लॅस्टिके, रसायने, खनिज तेल रसायने, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ हे महत्त्वाचे उत्पादित पदार्थ होत. प्वेर्त रीको अतिशय दाट लोकसंख्येचे बेट असल्याने येथे सततची बेकारी समस्या आहे. १९७४ पूर्वी बेकारीचे प्रमाण सरासरीने १० ते १२ टक्के होते, तेच १९७८ च्या सुमारास १९ टक्के झाले. प्रतिवर्षी एकूण उत्पादनातील ८३% वाटा निर्मितिउद्योगांचा असतो. प्वेर्त रीकोमध्ये २,३०० कारखाने असून त्यांत १·५ लक्ष लोक  गुंतलेले आहेत.

प्वेर्त रीकोच्या ऑपरेशन बूटस्ट्रॅप या आर्थिक कार्यक्रमानुसार अनेक कारखाने उभारण्यात आले. याशिवाय शासनाकडून उद्योजकांना निर्मितिकेंद्रे, कारखाना उभारणीसाठी कर्ज व साधन सामग्री इ. गोष्टी पुरविण्यात आल्या. प्वेर्त रीकोमध्ये पुढीलप्रमाणे उत्पादन होते : रसायने व रासायनिक पदार्थ अन्न व खाद्यपदार्थ कापड विजेची साधनसामग्री व यंत्रे खनिज तेल आणि कोळसा उपकरणे जोडकाम केलेले धातुपदार्थ दगड, माती व काच यांचे पदार्थ कपडे व वस्त्रे आणि तंबाखू पदार्थ. प्वेर्त रीको प्रामुख्याने व्हेनेझुएलामधून बहुतेक खनिज तेल आयात करतो. बेटावर ११ साखर कारखाने आहेत. १९७७-७८ मधील रोजगारीची आकडेवारी पुढीलप्रमाणे होती (आकडे लक्षांत) : कृषी, जंगल व मत्स्यव्यवसाय ०·३९ निर्मितिउद्योग १·५६ व्यापार १·४९ शासकीय सेवा १·८० आणि इतर २·५६, एकूण ७·८०.

‘प्वेर्त रीको फेडरेशन ऑफ लेबर’ (स्था. १९५२) ही देशामधील सर्वांत मोठी कामगार संघटना असून तिची सदस्यसंख्या सु. २ लक्ष होती. ‘फ्री फेडरेशन ऑफ लेबर ऑफ प्वेर्त रीको’ (१८९९) ही दुसरी महत्त्वाची कामगार संघटना असून तिची सदस्यसंख्या १·०५ लक्ष होती. यांशिवाय अन्य सहा संघटना आहेत.

पर्यटन : १९६०–७० च्या सुमारास पर्यटन उद्योगाचा वेग मंदावला होता. तथापि त्यानंतर पर्यटन उद्योगाची मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आता तर हा उद्योग म्हणजे प्वेर्त रीकोच्या अर्थव्यवस्थेमधील परकीय चलन मिळविणारा अतिशय महत्त्वाचा घटक ठरला आहे. १९७७–७८ या वर्षात प्वेर्त रीकोला १४,७४,३४२ पर्यटकांनी भेट दिली व त्यांच्यापासून ४,८२० लक्ष डॉ. उत्पन्न मिळाले. प्वेर्त रीकोच्या अंतर्भागातील पर्वतशिखरांवरील रमणीय निसर्गदृश्ये, उत्कृष्ट पुळणी आणि स्वच्छंद मच्छीमारी ही पर्यटकांची मोठी आकर्षणे होत.

मासेमारी : प्रतिवर्षी सु. ३३० लक्ष डॉ. किंमतीचे सु. ६८० लक्ष किग्रॅ. मासे बेटावर पकडण्यात येतात. त्यांमध्ये ट्यूना माशांचे प्रमाण सर्वाधिक आहे.


अर्थकारण : १९७८ साली प्वेर्त रीकोमध्ये ११ स्थानिक बँका, २ अमेरिकन व २ कॅनडियन बँकशाखा, २ सरकारी बँका, त्याचप्रमाणे ७ बचत व पतसंस्थाही होत्या. ‘गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँक फॉर प्वेर्त रीको’ ही स्वायत्त शासकीय वित्तसंस्था असून ती देशाची मध्यवर्ती बँक म्हणून सर्व आर्थिक व्यवहार पाहते. खाजगी उद्योगांना ती अल्प व दीर्घ मुदतीची कर्जेही देते. यांशिवाय १२ विमाकंपन्या आहेत. प्वेर्त रीकोमध्ये अमेरिकन डॉलर हेच अधिकृत चलन प्रचारात आहे. १, ५, १०, २५ व ५० सेंट आणि १ डॉलर यांची नाणी तर १, २, ५, १०, २०, ५० व १०० डॉलरच्या कागदी नोटा प्रचारात आहेत. विदेश विनियम दर १ पौंड = २ अमेरिकी डॉलर असा होता (जानेवारी १९७९). १९७६ च्या अर्थसंकल्पात महसूल व खर्च अनुक्रमे २०४·४ कोटी डॉ. व १९८·१ कोटी डॉ. होते. आयातनिर्यात व्यापारावर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा मोठा प्रभाव पडलेला आहे. प्रथम प्वेर्त रीकोच्या अमेरिकेबरोबरील निर्यात व्यापारामध्ये साखर, मळी, रम मद्य, तसेच तंबाखू यांचा मुख्यत्वे समावेश होता. १९७५ पासून मात्र या व्यापार स्वरूपात बदल झाला असून साखर, रसायने, खाद्यपदार्थ, खनिज तेल, वस्त्रे आणि अनेक निर्मित वस्तू यांचा निर्यातीत अंतर्भाव होऊ लागला आहे. देशाच्या निर्यात व आयात व्यापारांमध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने, व्हेनेझुएला, नेदर्लंड्स अँटिलीस, डोमिनिकन प्रजासत्ताक, इटली, व्हर्जिन बेटे इत्यादींचा क्रम लागतो. प्वेर्त रीकोच्या व्यापाराचे स्वरूप निर्यातीपेक्षा आयात अधिक म्हणजे प्रतिकूल स्वरूपाचे असल्याने हा असमतोल अमेरिकेकडून मिळणारी कर्जे व अमेरिकेकडून होणारी नवी गुंतवणूक, पर्यटनापासून मिळणारे उत्पन्न आणि अमेरिकेतील प्वेर्त रीकनांनी मायदेशास प्रत्यावर्तित केलेला पैसा यांच्याद्वारा दूर केला जातो.

वाहतूक व संदेशवहन : प्वेर्त रीकोमध्ये साखर कारखानदारांच्या मालकीचा ९६ किमी. लांबीचा लोहमार्ग आहे. १९७४ मध्ये बेटावर १६,८२७ किमी. लांबीचे फरसबंदीचे रस्ते होते. किनारी भाग आणि बेटावरील मोकळा भाग यांमधील सर्व शहरांना व गावांना जोडणारी आधुनिक राजमार्ग व्यवस्था कार्यान्वित आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांच्या बांधकामाला उत्तेजन मिळत असून रस्ते, राजमार्ग व पूल यांच्या बांधणीसाठी १९६५ मध्ये राजमार्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. १९७७ मध्ये प्वेर्त रीकोत ८,३०,३७३ वाहने होती त्यांपैकी मोटारगाड्या ६,७२,५२४ ट्रक २१,८९४ छोट्या मालमोटारी २३,२४६ आणि इतर वाहने ४२,७०९ अशी होती. बेटावर १० बंदरे असून प्रमुख बंदरे सॅन वॉन, पाँसे व माइआग्वेस ही होत. सॅन वॉन हे तर कॅरिबियनमधील अप्रतिम व मोठ्या, सर्वऋतुक्षम अशा नैसर्गिक बंदरांपैकी एक समजले जाते. प्वेर्त रीको बंदर प्राधिकरण सर्व बंदरांची आवश्यक ती व्यवस्था पाहते. १८ अमेरिकन जहाजकंपन्यांमार्फत प्वेर्त रीको व अमेरिका यांमध्ये मालवाहतूक होते. सहा अमेरिकन व सहा परदेशी विमानकंपन्या प्रवासी, डाक आणि जलद हवाई वाहतूकसेवा उपलब्ध करतात. हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सॅन  वॉन येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून अन्य सहा शहरांमध्येही विमानतळ आहेत. अमेरिकेची केंद्रीय टपालसेवा प्वेर्त रीकोवरील सर्व शहरांना व गावांना मिळू शकते. प्वेर्त रीकन शासन ८४ केंद्रे व १,७१२ किमी. लांबीचे तारमार्ग यांसह तारसेवा उपलब्ध करते. शासकीय रेडिओ व दूरचित्रवाणी सेवा ही शैक्षणिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध असून अन्य कार्यक्रम हे व्यापारी तत्त्वावर प्रसारित केले जातात. अशी ८१ नभोवाणी केंद्रे व १७ रंगीत दूरचित्रवाणी केंद्रे आहेत. १९७७ मध्ये देशात १७·५५ लक्ष रेडिओ व ६·२५ लक्ष दूरचित्रवाणी संच होते. काइए येथे उपग्रह संदेशवहन केंद्र कार्यान्वित झाले आहे.

लोक व समाजजीवन : प्वेर्त रीकोमधील वरच्या वर्गातील लोक हे साधारणतः शुद्ध स्पॅनिश रक्ताचे समजले जात असले, तरी त्यांच्यामध्ये फ्रेंच, कॉर्सिकन व इटालियन रक्ताचे थोड्याफार प्रमाणात मिश्रण झालेले आढळते. तथापि प्वेर्त रीकन हे संपूर्ण समाजाच्या दृष्टिकोनातून पाहता श्वेत, इंडियन व निग्रो यांच्या मिश्र वंशांचे आहेत. किनारी भागात निग्रो रक्ताचा, तर डोंगराळ प्रदेशात इंडियन रक्ताचा प्रभाव अधिक जाणवतो. वांशिक भेदभाव येथे आढळत नाही. स्पॅनिश ही सर्वसाधारणपणे बोलली जाणारी भाषा असली, तरी वरच्या वर्गातील लोक स्पॅनिश व इंग्रजी अशा दोन भाषा बोलतात. विद्यानिकेतनांतून इंग्रजी भाषेचा अभ्यास सक्तीचा आहे. विसाव्या शतकापर्यंत प्वेर्त रीको बेटावरील समाज अल्पसंख्य पण संपन्न असा वरिष्ठ वर्ग व बहुसंख्य पण दरिद्री असा कनिष्ठ वर्ग, यांत विभागलेला होता. विसाव्या शतकाच्या मध्यापासून येथे मध्यम वर्गाचा उदय झाल्याचे दिसून येते. सु. ८५% लोक रोमन कॅथलिक आहेत. उर्वरित लोकसंख्येमध्ये प्रॉटेस्टंट व त्याचे उपपंथ तसेच ज्यू यांचा अंतर्भाव होतो.

प्वेर्त रीकनांच्या चालीरीती मूलतः स्पॅनिश असल्या, तरी अमेरिकनांच्या प्रभावामुळे व साहचर्यामुळे त्यांत बरेच बदल घडून आले आहेत. प्वेर्त रीकन नागरिक हा संवेदनशील असून सहानुभूती वा अवहेलना यांबाबतची प्रतिक्रिया तो तात्काळ व्यक्त करतो. हजारो स्त्रियाही कारखाने व कार्यालये यांमधून काम करताना दिसतात. सॅन वॉन आणि इतर सहा शहरांची महापौरपदे स्त्रिया भूषवीत आहेत. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत स्त्रिया सदस्यही असून कित्येक स्त्रिया वकील पेशात आहेत, त्याचप्रमाणे शासकीय खात्यांमधून अधिकारपदे भूषवीत आहेत.

बहुतेक ग्रामीण प्वेर्त रीकन लहानलहान घरांतूनच राहतात. शासनाकडून ग्रामीण विद्युतीकरण योजना वेगाने राबविली जात आहे. परिणामतः ग्रामीण भागातही दूरचित्रवाणीचा प्रसार झाल्याचे दिसून येते.

गेल्या काही वर्षांत स्वदेशात घडून आलेल्या आर्थिक सुधारणा व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत घटलेल्या रोजगार संधींचे प्रमाण यांमुळे प्वेर्त रीकनांचा स्थानांतरणवेग बराच कमी झालेला आहे. असे असूनही अद्यपि हजारो प्वेर्त रीकनांना न्यूयॉर्क, शिकागो व सॅन फ्रॅन्सिको ही शहरे म्हणजे स्वप्ननगरेच वाटतात. मोठ्या शहरांचा होत असलेला विकास आणि अनेक ग्रामीण भागांतून झालेली लोकसंख्येची घट, या दोन गोष्टी म्हणजे आधुनिक प्वेर्त रीकन समाजाची दोन वैशिष्ट्यपूर्ण अंगेच समजली जातात. जीवनमानात होत जाणारी लक्षणीय प्रगती तसेच सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा निर्धार यांमुळे लोकसंख्या घटकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण सुधारणा झाल्याचे आढळते.

अमेरिकेच्या सामाजिक सुरक्षा पद्धतीमध्ये प्वेर्त रीकोचा अंतर्भाव होत असला, तरी प्वेर्त रीकोची स्वतःची अशी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. तीनुसार आरोग्य, अपघात, विकलांगता व बेकारी यांचे लाभ प्वेर्त रीकनांना मिळू शकतात. १९७३ मध्ये देशात  १३,३५४ खाटांची १४९ रुग्णालये आणि ३,४७९ डॉक्टर होते. १९७६ च्या अर्थसंकल्पात २४% रक्कम सामाजिक कल्याण व आरोग्य यांवर खर्ची टाकण्यात आली. १९७७ मध्ये जन्म व मृत्यू यांचे दरहजारी प्रमाण अनुक्रमे २३·५ व ६·०० असे होते.

शिक्षण : सहा ते सोळा वर्षांपर्यंत शिक्षण सक्तीचे असून शासकीय सार्वजनिक शिक्षण पद्धती आहे. १९७७-७८ मध्ये सार्वजनिक व खाजगी शाळांमधून अनुक्रमे ६,९८,३९८ व ८६,०३७ विद्यार्थी शिकत होते. प्राथमिक शिक्षण ६ वर्षांचे, तर प्रत्येकी तीन वर्षांचे कनिष्ठ व उच्च माध्यामिक विद्यालयीन शिक्षण ६ वर्षांचे, तर प्रत्येकी तीन वर्षांचे कनिष्ठ व उच्च माध्यामिक विद्यालयीन शिक्षण यांमध्ये एकूण बारा वर्षांचा अभ्यासक्रम विभागलेला असतो. व्यवसाय शिक्षण हाही सार्वजनिक शिक्षण पद्धतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. शैक्षणिक माध्यम हे स्पॅनिश असले, तरी सर्वत्र इंग्रजी भाषा  आवश्यक आहे. देशात उच्च शिक्षण देणाऱ्या सार्वजनिक व खाजगी अशा २३ संस्था आहेत. देशात पाच विद्यापीठे असून सॅन वॉनच्या प्वेर्त रीको विद्यापीठात विद्यार्थी व अध्यापक अनुक्रमे ५०,४९२ व २,७२२ होते. बायामोन येथील विद्यापीठात ३,३०० विद्यार्थी, १२५ प्राध्यापक पाँसे येथील कॅथलिक विद्यापीठात ८,१५० विद्यार्थी, तर ३२८ प्राध्यापक आणि सॅन वॉन येथील इंटर–अमेरिकन विद्यापीठात २८,७२५ विद्यार्थी व १,१२५ प्राध्यापक आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ द सेक्रिड हार्ट’ या विद्यापीठात ५,००० विद्यार्थी व २१६ प्राध्यापक होते (१९७८). १९७० मध्ये प्वेर्त रीकोमध्ये ८८% साक्षरता होती. प्वेर्त रीकोमधील थोडी वृत्तपत्रे (५ दैनिके व ९ नियतकालिके) आणि अमेरिकन वृत्तपत्रे व नियतकालिके यांना मोठा वाचकवर्ग लाभला आहे.

गद्रे, वि. रा.

भाषा-साहित्य : प्वेर्त रीकोमध्ये स्पॅनिश आणि इंग्रजी अशा दोन भाषा बोलल्या जातात. त्यांत इंग्रजीचे स्थान दुय्यम आहे. तथापि शिक्षणसंस्थांतून स्पॅनिशबरोबर इंग्रजीचे ज्ञानही आवश्यक मानण्यात आले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून प्वेर्त रीकोत लक्षणीय स्वरूपाची साहित्यनिर्मिती झाल्याचे दिसून येते. येथील साहित्यात सामाजिक आणि राजकीय विषय प्रामुख्याने हाताळले गेल्याचे दिसते. राष्ट्राच्या तसेच व्यक्तिगत अस्मितेचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक साहित्यकृतींतून दिसून येतो. आलेहांद्रो तापिआ (१८२६-८२; नाटककार, कादंबरीकार आणि कवी); होसे गोत्ये बे अनीतेस (१८५१-८०; कवी); होसे दे द्योगो (१८६७-१९१८; कवी आणि राजकीय लेखक); एव्हारीस्तो रिबेरा शेव्हूरमत (१८९६-    ; कवी); तोमास ब्लांको गायगेल (१८९८-    ; निबंधकार आणि इतिहासकार); क्लारा लेअर (कवयित्री); फ्रांथीस्को मातोस पाओली (१९१५-    ; कवी, निबंधकार आणि समीक्षक); आबेलार्दो दीभाथ आल्फारो (१९१७-     ; कथाकार) हे काही उल्लेखनीय साहित्यिक होत.

कुलकर्णी, अ. र.

कला व क्रीडा : प्वेर्त रीकोमधील कलांच्या विकासास शासनाने खूपच हातभार लावला आहे. १९५५ मध्ये स्थापन झालेली ‘इन्स्टिट्यूट ऑफ प्वेर्त रीकन कल्चर’ ही सरकारी संस्था प्रदर्शने, संगीतसभा यांसारखे कार्यक्रम योजून व कलावंतांना बक्षिसे देऊन तेथील संगीत, साहित्य, रंगभूमी, वास्तुकला इ. कलांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करते. विविध सरकारी खात्यांमार्फत फिरती संग्रहालये, वाचनालये व नाट्यसंस्था चालविण्यात येतात. ‘डिपार्टमेंट ऑफ पार्क्स अँड रिक्रिएशन’ तर्फे नाट्यशास्त्र, लोकनृत्य व स्थानिक संगीत यांचे प्रशिक्षण दिले जाते. ‘Ateneo Puertorriquino’ ही सांस्कृतिक कार्य करणारी सर्वांत जुनी खाजगी संघटना आहे.

प्वेर्त रीकन चित्रकलेत आधुनिक कलाप्रवाहांचेही दर्शन घडते. येथील चित्रकार निसर्गवादी, दृक्प्रत्ययवादी, अप्रतिरूप अशा आधुनिक शैली हाताळताना दिसतात. हूल्यो रॉसादो देल व्हाल, फाथीस्को रोदाँ, एपिफानिओ इरीझारी इ. प्रमुख चित्रकार व लिन्झी दाएन, ईशा गीगेल इ. प्रमुख मूर्तिकार उल्लेखनीय आहेत. ‘डिव्हिजन ऑफ कम्यूनिटी एज्युकेशन’तर्फे तयार केलेल्या अनुबोधपटांना यूरोपीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळाली आहेत.

आरेख्यक कलांच्या क्षेत्रात १९४० नंतर विकास होऊ लागला. त्यांतील काही विषय ‘इन्स्टिट्यूट ऑफ प्वेर्त रीकन कल्चर’ मध्ये तसेच प्वेर्त रीको विद्यापीठात शिकविले जातात. हस्तकला व लोककलांच्या क्षेत्रांत प्वेर्त रीकोची फारशी प्रगती झालेली नाही. ‘सांतोस’ या प्रकारातील संतांच्या छोट्या व कोरीव काष्ठमूर्ती लोकप्रिय आहेत. हुवान मोरेल काम्पोस (१८५७-९६) याचे नृत्यसंगीत अजूनही लोकप्रिय आहे. राफाएल एरनान्देथ (१८९८-      ) याचे बॅलड संगीत लॅटिन अमेरिकेत लोकप्रिय आहे. जगप्रसिद्ध चेलोवादक पाब्लो कासाल्स (१८७६-१९७३) १९५६ पासून प्वेर्त रीकोमध्ये राहात होता. तेथील संगीतविश्वामध्ये त्याने नवचैतन्य निर्माण केले. दरवर्षी येथे भरणारा ‘कासाल्स फेस्टिव्हल’ हा संगीतमहोत्सव जगातील संगीतप्रेमींचे आकर्षण ठरला आहे. १९५९ मध्ये स्थापन झालेली ‘कॉन्झर्व्हेटरी ऑफ म्यूझिक’ ही संस्था संगीतशिक्षणाचे कार्य करते. डोंगराळ भागातील लोकांचा ‘डेसिमा’ व किनारपट्टीवरील नियो रहिवाशांचा ‘लीना’ हे लोकसंगीत प्रकार प्रसिद्ध आहेत.

प्वेर्त रीकोमधील खेळांवर अमेरिकेचा प्रभाव आहे. घोड्यांच्या शर्यती, मुष्टियुद्ध व कुस्ती बाराही महिने, उन्हाळ्यात बास्केटबॉल व हिवाळ्यात बेसबॉल हे खेळ खेळले जातात. पोहणे, टेनिस, गोल्फ हे खेळ तसेच कोंबड्यांची झुंज हा स्थानिक रंजनप्रकार लोकप्रिय आहे.

जगताप, नंदा

महत्त्वाची स्थळे : सॅन वॉन (लोक. ५,१८,७००-१९७७) हे प्वेर्त रीकोचे राजधानीचे शहर असून उद्योग, व्यापार, प्रशासन, शिक्षण तसेच उत्कृष्ट पर्यटन केंद्र आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ प्वेर्त रीकन कल्चर’ ही शासकीय संस्था तसेच प्वेर्त रीको विद्यापीठ येथेच आहे. येथील ‘म्यूझीयम ऑफ कलोनियल आर्किटेक्चर’, ‘म्यूझीयम ऑफ प्वेर्त रीकन आर्ट’, ‘सांतोस म्यूझीयम’ वगैरे संग्रहालये प्रेक्षणीय आहेत. शहरात ‘एलू मॉरो’ व ‘सान क्रिस्तोबल’ ह्या दोन किल्ल्यांचे अवशेष आढळतात. सॅन वॉन कॅथीड्रल, सॅन होसे चर्च, ला फॉलझा हा किल्ला (गव्हर्नरचे निवासस्थान) इ. वास्तू प्रेक्षणीय आहेत. सॅन वॉनपासून ४० किमी.वरील ‘लूकीयो बीच’ ही पुळण व तेथील मोठी हॉटेले पर्यटकांचे फार मोठे आकर्षणकेंद्र आहे. पाँसे (१,८८,५००) हे सॅन वॉनच्या खालोखाल महत्त्वाचे औद्योगिक व्यापारी शहर व बंदर असून शैक्षणिक केंद्रही आहे. येथील ‘सांता मारीआ विद्यापीठ’ व ‘म्यूझीयम ऑफ आर्ट’ ही प्रसिद्ध आहेत. या संग्रहालयात १६-१७ व्या शतकांतील यूरोपीय चित्रकृतींचा उत्कृष्ट संग्रह आहे. माइआग्वेस (९९,८००) हे प्वेर्त रीकोचे खोल पाण्याचे बंदर असून शिवणकामाचे प्रमुख केंद्र आहे. येथील अमेरिकन कृषिखात्याच्या प्रायोगिक केंद्रात पश्चिम गोलार्धातील वनस्पतींचा सर्वांत मोठा संग्रह आहे. आरेसीवो (८६,२००) हे प्वेर्त रीकोचे प्रवेशबंदर असून येथे प्वेर्त रीकोतील सर्वांत मोठी रम उत्पादन केंद्रे व इतरही उद्योग आहेत. (चित्रपत्र ३).

गद्रे, वि. रा.

संदर्भ : 1. Connors, R E. and Haener, D. R, Puerto Rico, an Island on the Move, New York, 1972.

2. Hanson, E. P. Puerto Rico : Land of Wonders, New York, 1960.

3. McKown, R. The Image of Puerto Rico, New York, 1973,

4. Wells, Henry, The Modernization of Puerto Rico: A Political Study of Changing Values & Institutions, New York, 1969.