सौराष्ट्र : काठेवाड सुराष्ट्र. भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील गुजरात राज्यातील द्वीपकल्प व इतिहासप्रसिद्ध प्रदेश. २००  ४१ ‘ ते २३० ८’ उ. अक्षांश व ६८० ५६’ ते ७२० २०’ पू. रेखांश यांदर म्यान विस्तारलेल्या या द्वीपकल्पाचे क्षेत्रफळ सु. ५४, ५४० चौ. किमी. आहे. दक्षिण व पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस कच्छचे आखात, उत्तरेस कच्छचे छोटे रण, ईशान्येस गुजरातची मुख्य भूमी, पूर्वेस व आग्नेयीस खंबायतचे आखात, दक्षिणेस दीव हा केंद्रशासित प्रदेश यांनी हा प्रदेश सीमित झाला आहे. सौराष्ट्राचा आकार मोटेसारखा अर्धगोलाकार आहे.

  पूर्वीपासून हा प्रदेश वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात होता. सौराष्ट्र, सुराष्ट्र, सुराष्ट्रिक, सौराज्य, सुरट्ठ, सिरस्त्रीन ( टॉलेमीने केलेला उल्लेख ), सु-ल-च ( ह्युएनत्संगने उल्लेखिलेले नाव ), मुसलमानी अमदानीत सोरठ इ. त्याची नावे प्रचलित होती. तेराव्या ते पंधराव्या  शतकांत कच्छमधून येऊन येथे स्थायिक झालेल्या ‘ काठी ’ लोकांनी मराठ्यांना राज्यविस्तारास मोठा विरोध केला होता. त्यामुळे मराठ्यांनी याला सौराष्ट्र ऐवजी ‘ काठेवाड ’ ( काठियावाड ) असे नाव दिले. ब्रिटिशांनीही तेच नाव पुढे चालू ठेवले. अद्यापही ही दोन्ही नावे रूढ आहेत. काही वेळा सिंधपासून भडोचपर्यंतच्या गुजरात राज्याच्या बव्हंशी भागाला सौराष्ट्र म्हटले जात होते. 

  भौगोलिक दृष्ट्या हे द्वीपकल्प म्हणजे एकेकाळचे लाव्हाजन्य बेट किंवा बेटांचा समूह असावा. पूर्वी कच्छचे रण व खंबायतचे आखात यांना जोडणारा पाण्याचा प्रवाह होता. तसेच सिंधू नदीचा एक फाटा या भागातून खंबायतच्या आखातास मिळत असावा, असे मत सोळाव्या व सतराव्या शतकांतील काही तज्ञांनी मांडले आहे. सिंधू नदीची शाखा तसेच लूनी, बनास, सरस्वती इ. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे आणि भूहालचालींमुळे जमीन उंचावली जाऊन ईशान्य काठेवाड व गुजरातची मुख्य भूमी १८२० च्या सुमारास एकमेकांशी जोडले गेले असावेत असे तज्ञांचे मत आहे. कच्छ ( आनर्त ) हा प्रदेशही पूर्वी सौराष्ट्राचाच एक भाग होता, असे काहींचे मत आहे. दख्खनच्या पठाराप्रमाणे या द्वीप-कल्पात बहुतेक सर्वत्र बेसाल्टचे थर आढळतात. २९ एप्रिल १८६४ २७ नोव्हेंबर १८८१ व सप्टेंबर, ऑक्टोबर १८९८ मध्ये या प्रदेशात मोठे भूकंप झाले होते. 

  द्वीपकल्पाचा बहुतेक भूप्रदेश सस.पासून १८० मी. पेक्षा कमी उंचीचा आहे. परंतु दक्षिणेकडील बराचसा भूभाग चढ-उताराचा व कमी उंचीच्या डोंगररांगांनी व्यापलेला आहे. किनार्‍यालगतचा प्रदेश सुपीक असून त्यात कच्छ वनस्पतींची दाट अरण्ये आढळतात. मध्यभागी टेबललँडसारखा लाव्हाजन्य पठारी प्रदेश आहे. हा ‘ सौराष्ट्र पठार ’ म्हणून ओळखला जातो. या सु. ७५ ते ३०० मी. उंचीच्या प्रदेशात सु. ६० किमी. लांबीच्या व ६० मी. रुंदीच्या अनेक भित्ती आढळतात. सौराष्ट्राचा उत्तरेकडील भाग   कोरडा व वालुकामय असून काही भाग रेताड आणि खडकाळ आहे. या भागात मुख्यत्वे काटेरी वनस्पती आढळतात. दक्षिण भागात बरड व गिरनार या कमी उंचीच्या दोन समांतर डोंगररांगा आहेत. त्यांपैकी गिरनार डोंगररांग सु. १,१०० मी. उंचीची असून गोरखनाथ हे त्यातील सर्वोच्च (१,११७ मी.) शिखर आहे. याशिवाय या भागात ओसाम, वरदा इ., तर मध्य व उत्तर भागात मांडव तसेच कमळ, वंसजाळी, शत्रुंजय, सनोसर इ. डोंगर व टेकड्या आहेत. या प्रदेशातील गीरचे जंगल राखीव असून ते सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. या द्वीपकल्पातील बहुतेक नद्या मध्यवर्ती पठारी प्रदेशात उगम पावतात. भादर ही त्यांपैकी प्रमुख असून ती मांडव टेकड्यांत उगम पावते. तिच्या दोन्ही काठांवरील प्रदेश सुपीक आहे. याशिवाय सुखाभादर, अजी, मच्छू , सरस्वती, भगवा, शत्रुंजय इ. सौराष्ट्रा-तील अन्य नद्या आहेत. लालपुरी, अलानसागर, मोलदी, चंपा इ. बांधलेले तलाव या प्रदेशात आहेत. पीरम, शंखोदर, शियळ, नोरा, कारुंभार, पीरोतान ही बेटे व हंसथळ, भावनगर, सुंद्राई, धोलेरा इ. खार्‍या पाण्याच्या मुख्य खाड्या सौराष्ट्राच्या किनारी भागात आहेत. या द्वीपकल्पाचे हवामान सर्वसामान्यपणे सौम्य व आल्हाददायक आहे. जानेवारी — मार्च या काळात या भागात मोठ्या प्रमाणात दव व धुके पडते. एप्रिल — जून हा कालावधी उन्हाळ्याचा असून हवामान चांगले असते. या काळात दक्षिण भागात उष्ण वारे वाहतात. जून — ऑक्टोबर हा कालावधी पावसाळ्याचा असूनजुनागढ येथे पावसाचे प्रमाण सर्वांत जास्त असते. सप्टेंबर — नोव्हेंबरच्या  सुरुवातीपर्यंत येथील हवामान थोडे त्रासदायक असते. शेती हा मुख्य व्यवसाय असून येथील काळ्या व लाल सुपीक जमिनीमध्ये कापूस, तेलबिया, गहू, ज्वारी, ऊस, किनारी भागांत नारळ इ. पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यांशिवाय किनारी भागात मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. या प्रदेशात रजपूत, काठी, कुणबी, कोळी, ब्राह्मण, वाणी, लुहाणा, जाडेजा, मेमन, धानची इ. लोक राहतात. गुरेपालन, मीठ उत्पादन, कापूस व तेलबियांवरील प्रक्रिया, इमारती लाकूड व दगड, चुनखडक आणि वालुकाश्मांचे उत्पादन इ. व्यवसाय या प्रदेशात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. गुरेपालनामध्ये गाई, म्हशी, उंट, गाढवे, मेंढ्या, घोडे यांचे प्रमाण जास्त आहे. काठेवाडी घोडे प्रख्यात आहेत. कापडनिर्मिती, इमारती लाकडांचा व्यापार, सोन्यारुप्याच्या कलाबतूचे विणकाम, सुगंधी तेले, उटणी, अत्तरे इ.ची निर्मिती, हस्तिदंती व चंदनी कोरीव काम या प्रदेशात मोठ्या प्रमाणात होते.

इतिहास : सौराष्ट्र किंवा काठेवाडचा फार प्राचीन इतिहास ज्ञात नाही.इ.स.पू.तिसर्‍या सहस्रकापासून या प्रदेशात वस्ती असल्याचे पुरावे ⇨ लोथल, ⇨ प्रभासपाटण येथील उत्खननात आढळले असून, रंगपूर संस्कृतीविषयीही पुरावे उपलब्ध झाले आहेत.हिंदूंच्या व जैनांच्या अनेक पुराणांतून आणि ग्रंथांतून कथांच्या स्वरूपात या प्रदेशाविषयी बरीच माहिती उपलब्ध होते.सौराष्ट्राचा पश्चिम व दक्षिण भाग श्रीकृष्णचरित्राशी तसेच महाभारतातील अनेक प्रसंगांशी संबंधित असल्याची वर्णने विविध ग्रंथांमध्ये आढळतात.रेवती-बलराम विवाह, श्रीकृष्णाने जेथून रुक्मिणीहरण केले ते वेरावळ व पोरबंदर यांदरम्यानचे माधवपूर ठिकाण, श्रीकृष्णाची राजधानी द्वारका, यादवांमधील शेवटची यादवी माजल्याच्या कथा व श्रीकृष्णाच्या पायाला ज्या ठिकाणी बाण लागला व ते ज्या ठिकाणी निजधामास गेले ते वेरावळ व प्रभासपाटण यांदरम्यानचे ठिकाण इ. श्रीकृष्णचरित्राशी निगडित स्थळे या प्रदेशात आहेत.यांशिवाय जैनांची पवित्र ठिकाणे पालिताणा व गिरनार आणि सोमनाथसारखी हिंदूंची पवित्र मंदिरे सौराष्ट्रात आहेत.

  पूर्वीपासून हा प्रदेश अत्यंत समृद्ध असल्याचे ऐतिहासिक उल्लेख उपलब्ध आहेत. या प्रदेशात प्रवेश करण्यासाठी अनेक बंदरे सोयीची असल्याने परकीयांनी यावर अनेकदा हल्ले केल्याचे दाखले इतिहासात उपलब्ध आहेत.मौर्यकाळापासून या प्रदेशाचा सविस्तर इतिहास उपलब्ध होतो चंद्रगुप्त मौर्याने गुजरात, सौराष्ट्र हे प्रदेश जिंकून आपल्या साम्राज्यात समाविष्ट केल्याचा स्पष्ट उल्लेख रुद्रदामनच्या ⇨ गिरनार येथील शिला-लेखात आढळतो. चंद्रगुप्ताचा प्रांतिक राज्यपाल पुष्यगुप्त याने जुनागढ-जवळ सुदर्शन नावाचे सरोवर बांधले होते व त्यातून शेतीसाठी कालवे काढल्याचे उल्लेख मिळतात. सम्राट होण्यापूर्वी अशोक या प्रांताचा सुभेदार होता. पुढे त्याने आपल्या कारकीर्दीत जुनागढ येथील शिलालेखात आज्ञा खोदल्याचा स्पष्ट पुरावा उपलब्ध आहे. ग्रीक व रोमन लोक या प्रदेशाचा ‘ सौराष्ट्राने ’ असा उल्लेख करीत असत. ते व्यापारासाठी या प्रदेशांत येत होते व येथील बंदरांचा वापर करत होते, असा उल्लेख आढळतो. मौर्यांनंतर मोठ्या सत्तांपैकी शक ( क्षत्रप-प्रांताधिपती ), गुप्त ( वलभी ) वगैरेंनी सुराष्ट्र प्रदेशावर राज्य केले होते. मौर्यांचे राज्य विस्कळीत झाल्यावर शकांनी हा प्रदेश घेतला [⟶ शकसत्ता ] काही शतकांनंतर इ. स. ४०० मध्ये गुप्त घराण्यातील दुसर्‍या चंद्रगुप्ताने हा प्रदेश जिंकला. त्यानंतर मैत्रकांचे ( पाचवे शतक) येथे राज्य होते. दुसर्‍या ध्रुवसेनाच्या कारकीर्दीत (६३२—४०) चिनी प्रवासी ह्युएनत्संग या प्रदेशातील वाला येथे आला होता (६४०). येथील लोक श्रीमंत असून ते व्यापार करतात. गुजरात हा सौराष्ट्राचाच एक भाग असून त्याची सरहद्द मही नदी आहे व या प्रदेशात अनेक बौद्ध मठ असल्याचे त्याने म्हटले आहे. आठव्या ते दहाव्या शतकात सैंधव, चालुक्यांची एक शाखा, आभीर यांचे या प्रदेशावर राज्य होते. चालुक्यांच्या कारकीर्दीत गझनीच्या महमूदाने येथील प्रसिद्ध सोमनाथ मंदिर १०२५ च्या सुमारास लुटले होते. त्यानंतर मुसलमानांच्या अनेक स्वार्‍या या प्रदेशावर झाल्या. या काळात अनहिलवाड ही या प्रदेशाची राजधानी होती. १३०६ मध्ये अलाउद्दीन खल्जीने या प्रदेशावर हल्ला करून त्यावेळच्या राज्यकर्त्या वाघेलांचा शेवटचा राजा कर्ण याचा पराभव केला व तो प्रदेश जिंकून घेतला. अलाउद्दीनने या भागात खूप लुटालूट व जाळपोळ केली. मुसलमानी सत्तेच्या काळात हा सोरठ या नावाने ओळखला जात होता. १३२० मध्ये लाखा फुलाणी याने हा प्रांत जिंकला होता परंतु नंतर मुसलमानांनी पुन्हा तो घेतला. १५०९ मध्ये पोर्तुगीजांनी या प्रदेशावर हल्ला केला. त्यांनी १५३७ मध्ये बहादुरशहाचा वध करून दीव बंदरात वखारीच्या जागी किल्ला बांधला व तेव्हापासून तो १९६१ पर्यंत त्यांच्या ताब्यात होता. सोळाव्या शतकाच्या अखेरीस अकबराने गुजरात प्रदेश जिंकून घेतला होता. १७०५ मध्ये या प्रदेशात मराठ्यांचा शिरकाव झाला. पुढे कंठाजी कदमबांडे, दमाजी गायकवाड यांनी तेथे सत्ता स्थापिली (१७५१). पेशव्यांकरिता खंडणी मिळविण्यासाठी उत्तर व पश्चिम गुजरातमध्ये गायकवाड आपली फौज पाठवीत असत. तेव्हापासून काही भाग वगळता बहुतेक काठेवाड गायकवाडांच्या आधिपत्याखाली होता [⟶ गायकवाड घराणे ]. या काळातही लहानलहान जहागीरदारांच्या काही जहागिर्‍या येथे कार्यरत होत्या. १८०२ मध्ये गायकवाडांकडून हा सर्व प्रदेश इंग्रजांना मिळाला व ब्रिटिश सत्तेखाली सर्व जहागिरींची स्वायत्त संस्थाने बनली. १९४७ पर्यंत ती सर्व संस्थाने ब्रिटिश सरकारची मांडलिक होती.१८०७-०८ पासून काठेवाडमधील लहानलहान सरदारांमधील यादवीचा शेवट झाला. इंग्रजांनी गायकवाडांच्या खंडणी वसुलीपासून या सर्वांचे नुकसान होणार नाही याची हमी घेतली व गायकवाडांना द्यावयाची खंडणी   इंग्रजांच्या मार्फत भरावी असे ठरविले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर काठेवाडमधील संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आली व त्यांचे मिळून सौराष्ट्र राज्य स्थापण्यात आले. झालवाड, हलर, गोहेलवाड व सोरठ असे या द्वीपकल्पाचे चार मोठे प्रांत होते.नोव्हेंबर १९५६ मध्ये विशाल मुंबई राज्याची स्थापना झाली आणि त्यात गुजरात, सौराष्ट्र व कच्छ या प्रदेशांचा समावेश  करण्यात आला. पुढे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन सौराष्ट्र, कच्छ व गुजरात मिळून वेगळ्या गुजरात राज्याची निर्मिती झाली.

जुनागढ, भावनगर, धंधुका, लिमडी, ध्रांगध्रा, वांकानेर, द्वारका, पालिताणा, राजकोट, पोरबंदर, मोरवी, महुवा, वेरावळ, वढवाण, सोमनाथ पाटण इ. प्रमुख व इतिहासप्रसिद्ध शहरे व अनेक तीर्थक्षेत्रे या प्रदेशात आहेत. त्यांपैकी काही पूर्वीची संस्थाने होती. या प्रदेशातील प्रमुख संस्थानांच्या, प्रमुख राज्यकर्त्या घराण्यांच्या, प्रमुख शहरांच्या, तीर्थक्षेत्रांच्या व भौगोलिक प्रदेशांच्या स्वतंत्र नोंदी मराठी विश्वकोशामध्ये यथास्थळी घेण्यात आलेल्या आहेत. 

पहा : गुजरात-१ भारत महाराष्ट्र राज्य.          

चौंडे, मा. ल.