प्यूरिटन पंथ : इंग्लंडमध्ये जॉन कॅल्व्हिनच्या प्रभावातून उदयास आलेला ⇨ प्रॉटेस्टंट परंपरेतील सुधारणावादी धर्मपंथ. विल्यम टिंड्ल (१४९२—१५३६) याचे ग्रीक भाषेतील नव्या कराराचे इंग्रजी भाषांतर, ऑक्सफर्ड व केंब्रिजमध्ये झालेला ग्रीक भाषेतील नव्या कराराचा सखोल अभ्यास व मार्टिन ल्यूथरच्या तत्त्वांचा प्रभाव ह्यांमुळे इंग्लंडमध्ये झालेल्या वैचारिक क्रांतीचा धार्मिक जीवनावरही परिणाम होऊन नवनव्या क्रांतिकारक गटांची निर्मिती झाली. त्यांतीलच प्यूरिटन हा एक पंथ वा चळवळ आहे.

मेरी ट्यूडरच्या रोमन कॅथलिक राजवटीत (१५५३—५८) प्रॉटेस्टंट पंथीयांचा अमानुष छळ झाला. तेव्हा त्यांच्यातील जे यूरोपात पळून गेले त्यांच्यावर कॅल्व्हिनच्या शिकवणुकीचा परिणाम झाला आणि ते इंग्लंडला परतले. यावेळी पूर्वपरंपरा चालू ठेवावी ह्या मताचा एक गट व ‘चर्च ऑफ इंग्लंड’चे प्रेसबिटेरियन चर्चच्या धर्मव्यवस्थेत रूपांतर करावे ह्या मताचा एक, असे दोन मुख्य गट निर्माण झाले. दुसऱ्या गटातून प्यूरिटन पंथ निर्माण झाला. पहिल्या चार्ल्‌सच्या राजवटीत (१६२५—४९) झालेल्या प्यूरिटनांच्या छळामुळे १६३० मध्ये काहींनी न्यू इंग्लंडला (अमेरिका) प्रयाण केले व काही राजाच्या जुलमाविरुद्ध बंडाचा पुरस्कार करणाऱ्या पार्लमेंटरी पक्षात सामील झाले. त्यानंतर झालेल्या राज्यक्रांतीत ⇨ ऑलिव्हर क्रॉमवेल (१५९९—१६५८) याच्या नेतृत्वाखाली राजाविरहित राजवट सुरू झाली. जॉन मिल्टनसारख्या थोर कवींची व विचारवंतांचीही क्रॉमवेलला साथ मिळाली. क्रॉमवेलच्या मृत्यूपर्यंतच प्यूरिटनांची राजवट इंग्लंडला लाभली.

आपले कार्य सचोटीने करणे म्हणजेच उत्पन्नकर्त्या परमेश्वराची सेवा करणे, असा प्यूरिटनांचा दृढ विश्वास होता. शील व आचार ह्या संबंधांतील समस्या ते विश्वासाच्या (फेथ) आधारानेच निवारण करीत. हा पंथ मुळात मध्यमवर्गीयांनी निर्मिला असल्यामुले कामकरी, व्यापारी वर्ग तसेच सुखवस्तू वर्गातील लोकांना तो महत्त्वाचे ऐहिक व पारलौकिक प्रश्न सोडवणारा उत्तम जीवनमार्ग वाटला. न्यू इंग्लंडमध्ये अठराव्या शतकाच्या आरंभी ह्या पंथाच्या तत्त्वज्ञानाची मांडणी करण्यात आली. पुढे जॉनाथन एडवर्ड्‌सने (१७०३—५८) तिचे सखोल विवेचन केले. सर आयझॅक न्यूटन (१६४२—१७२७) व तत्त्वज्ञ जॉन लॉक (१६३२—१७०४) ह्यांच्या मतप्रणालींचाही ह्या तत्त्वज्ञानावर खूपच प्रभाव आढळतो. सतराव्या शतकानंतर जरी हा पंथ नष्ट झाला, तरी त्यातील जीवनतत्त्वे अजूनही बुद्धिजीवी लेखकांच्या लिखाणात उत्प्रेरकासारखी (कॅटॅलिस्ट) कार्य करताना आढळतात.

इंग्लंड-अमेरिकेच्या जनजीवनावर प्यूरिटन पंथाच्या शिकवणुकीचा खोलवर परिणाम झाला. त्यांच्या प्रार्थनेचे साधे-सुबोध स्वरूप, सदाचारसंपन्न संन्यस्त जीवनाची शिकवण आणि मूळ ज्यूंच्या शब्बाथप्रथेचे (ख्रिस्ती धर्मास अनुसरून काही बदल केलेल्या स्वरूपात) पालन या गोष्टींचा तेथील धार्मिक जीवनावर आजही ठसा उमटलेला आहे. लोकशिक्षणाबाबतची जागरूकता, उच्च नैतिक जीवनाचे आदर्श व बऱ्याच लोकशाहीवादी तत्त्वांचा पुरस्कार यांचा तेथील ऐहिक जीवनावर सखोल संस्कार झाला. इंग्लंड-अमेरिकेच्या विकसित लोकशाहीवर प्यूरिटन तत्त्वांचा बराच प्रभाव पडला. अमेरिकेच्या संविधानातील सत्तावापराबाबतचे विविध निर्बंध व त्यांतून साधलेले संतुलन यांवर प्यूरिटन विचारप्रणालीचा प्रभाव पडलेला दिसतो.

संदर्भ : 1. Haller, William, The Rise of Puritanism, New York, 1938.

2. Morgan, E. S. Visible Saints : The History of a Puritan Idea, Ithaca, N. Y., 1965.

आयरन, जे. डब्ल्यू.