असंग: (इ. स. ५व्या शतकाचा उत्तरार्ध). एक बौद्ध तत्त्वज्ञ. हा महायानपंथातील विज्ञानवादी किंवा योगाचारपंथी होता. ⇨ वसुबंधु व विरंची हे याचे धाकटे बंधू होत. प्रथम हीनयान (श्रावकयान) पंथातील सर्वास्तिवादी मताचा असलेला वसुबंधू याच्याच विचारांनी प्रभावित होऊन विज्ञानवादी झाला. याच्या गुरूचे नाव मैत्रेयनाथ. परंपरा असे मानते, की मैत्रेयनाथ आणि असंग या उभयतांनी महायानसूत्रालंकार हा ग्रंथ लिहिला तसेच या ग्रंथातील कारिका मैत्रेयनाथाचे व त्यांवरील भाष्य असंगाने लिहिले. महायानसंग्रहयोगाचारभूमिशास्त्र व अभिधर्मसमुच्चय हे ग्रंथ असंगाच्या नावावर मोडणाऱ्या प्रमुख ग्रंथांपैकी होत.

बापट, पु. वि.