अमॅष स्पँत : पारशी धर्मात अहुर मज्दाच्या दैवी षड्‌‌गुणसंपदेस ‘अमॅष स्पँत’ ही संज्ञा आहे. जरथुश्त्रप्रणीत गाथेत अहुर मज्द खालील सहा दैवी गुणांनी स्तविला आहे : (१) वोहु मनह्-निर्मल सौमनस्यदिक्कालातीत प्रेमशक्ती. (२) अष वहिष्ठ-मानवी जीवन समृद्ध करणारी सदाचारसंपन्नता. (३) क्षथ्रवइर्य-त्रिकालाबाधित ईशसत्ता. (४) स्पँता आर्मइति-अव्यभिचारी धर्मनिष्ठा दृढ भक्तिभाव. (५) हउर्वतात-सर्वंकष पूर्णता. (६) अमॅरॅतात-अमृतत्व.

विश्वनिर्माता, विश्वनियामक, ईशशक्ती म्हणजेच अहुर मज्द होय. पुढे कालांतराने अहुर मज्द व वरील सहा दैवी गुणसंपदा यांच्यात तादात्म्य मानले गेले. ह्या तादात्म्यातून ‘हप्त अमॅष स्पँत’ ही दैवी शक्ती साकार झाली व तिची उपासना होऊ लागली. मानवी जीवन परिपूर्ण,सुखी, समाधानी व आत्मतृप्त होण्यास ही दैवी शक्ती अंगी बाणवून क्रियाशील राहिले पाहिजे, हा आशय अमॅष स्पँत ह्या कल्पनेत साकार झालेला दिसतो.

पहा : पारसी धर्म अहुर मज्द.

तारापोर, जे. सी. (इं.) सोनटक्के, ना. श्री. (म.)