ॲटिला : (४०६?– ४५३). प्रसिद्ध हूण राजा. वडिलांचे नाव मुंदझुक व चुलत्याचे नाव रूआ. रूआनंतर ४३४ मध्ये ॲटिला आपला भाऊ ब्‍लीडासह गादीवर आला. परंतु ४४५ मध्ये त्याने ब्‍लीडाचा खून केला असावा. बायझंटिन साम्राज्याकडून तो जबरदस्त खंडणी वसूल करी व ती चुकल्यास तो त्यांच्या प्रदेशावर हल्ला करून जाळपोळ, लुटालूट करी आणि शहरे बेचिराख करी. ४५१ मध्ये याने गॉलवर हल्ला केला तेव्हा रोमन सेनापतीने गॉथच्या साह्याने त्याचा मोठा पराभव केला. पुढील वर्षी ॲटिलाने इटलीवर स्वारी केली. तो लग्नाच्या रात्री मारला गेला असावा. रोमन इतिहासकार प्रिस्कसने केलेल्या वर्णनावरून तो कुरूप व चिडखोर असला, तरी दयाशून्य नव्हता. विद्वानांची तो कदर करी. साध्या राहणीमुळे तो हूणांमध्ये प्रिय होता.

शाह, र. रू. जोशी, चंद्रहास