पूना हॉर्स : पुणे येथे १३ जून १८१७ या दिवशी दुसरे बाजीराव पेशवे आणि ईस्ट इंडिया कंपनी यांमध्ये एक संधी झाला. या संधीच्या सहाव्या कलमाप्रमाणे १८ मार्च १८०३ च्या वसई तहातील अटींप्रमाणे पेशव्यांची सेना रद्दबातल करण्यात आली आणि तिच्या जागी १५ जुलै १८१७ रोजी ‘पूना ऑक्झिलियरी फोर्स’ (पुणे साहाय्यक दल) खडे करण्यात आले. वेळप्रसंगी या दलाचा वापर खुद्द पेशव्यांविरुद्धही केला जाईल, अशी एकतर्फी ताकीद संधीत घातली गेली. या साहाय्यक दलात ३,००० शिपायांचे पायदळ व ५,००० स्वारांचे घोडदळ असून त्याचे नाव ‘पूना हॉर्स’ असे होते. यातील स्वारांची भरती शिलेदारी पद्धतीने केली जाई. सर्व वरिष्ठ अधिकारी गोरे असत. हिंदुस्थानी सय्यद मुसलमान व शीख घोडेस्वारांचे त्यात प्राधान्य होते. प्रारंभी दौलत घोरपडे याने पुणे, औरंगाबाद, नागपूर, बडोदे व पुणे जिल्ह्यातील शिरूर (घोड नदी) येथे स्वारभरती केली. शिरूर येथे ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबई सेना विभागाचे मुख्य कार्यालय होते. तेथेच पूना हॉर्सचे कार्यालय होते. शिलेदाराला रु. ४० व बारगिरास महिना रु. १५ पगार मिळे. पेशव्यांकडून घेतलेल्या मुलखाची काही महसूल रक्कम (रू. २,३४,०००) दर महिन्याला पगारापोटी खर्च होई. रिसाल्यातील न्यायनिवाडा दलपंचायत करी. प्रशंसनीय कामगिरीबद्दल सोन्या-चांदीची सलकडी बहाल केली जात. निवृत्तिवेतन व इनाम दिले जाई. १८९५ मध्ये मराठा घोडेस्वारांना दलातून काढून टाकले. त्यांच्याऐवजी राजपूत, खैमरवानी व पंजाबी मुसलमानांची भरती झाली. जोधपूरच्या महाराजांनी राजपूतांच्या भरतीसाठी भक्कम आर्थिक साहाय्य दिले. १८९६ च्या पुण्यातील प्लेगची साथ इतरत्र पसरू नये म्हणून पूना हॉर्सच्या स्वारांनी पुण्याला वेढा घातला, परंतु वेढा फुकट गेला. रिसाल्यातील उत्तर हिंदुस्थानी घोडे दमदार आणि पक्क्या चालीच्या भीमथडीच्या व गंगथडीच्या तट्टांशी बरोबरी करण्यात कमी पडल्यामुळे भीम-गंगथडीची तट्टे अफगाणिस्तानात नेण्यात आली. परिणामी महाराष्ट्रातील या उत्कृष्ट तट्टांची निपज बंद पडली. १९०० साली पूना हॉर्सचे शिरूर ठाणे बंद करण्यात येऊन ते मध्य प्रदेशातील नीमच येथे नेले. त्यामुळे घोडदळाला मराठे कायमचे मुकले व शिरूर गावाचे तसेच घोड नदी तहसिलीचे अत्यंत नुकसान झाले. शिरूरी राऊतांचे तर नावसुद्धा इतिहासजमा झाले. १९०० सालच्या मध्य भारतातील दुष्काळात पूना हॉर्सने उत्तम काम केले. १९०३ साली पूना हॉर्सला ‘३४ वा प्रिन्स ॲल्बर्ट व्हिक्टर रिसाला’ हे नवे नाव देण्यात आले. त्याने पहिल्या महायुद्धात मेसोपोटेमिया व फ्रान्स येथे प्रशंसनीय युद्धकामगिऱ्या केल्या. १९२१ साली ‘३३ वा हलका

रिसाल’ पूना हॉर्समध्ये सामील करण्यात आला. १९२२ साली त्याला ‘१७ वा पूना हॉर्स’ हे नाव मिळाले परंतु १९२७ मध्ये पूना हॉर्स (१७ वा राणी व्हिक्टोरियाचा रिसाला) हेच नाव कायम करण्यात आले. १९२९–३० या काळात पेशावर येथे स्वातंत्र्य चळवळ दडपण्याकडे व अब्दुल गफारखानांच्या ⇨ खुदाई खिदमतगार या संघटनेविरुद्ध पूना हॉर्सला अप्रिय काम करावे लागले. १९६५ च्या पाक-भारत युद्धात सियालकोट रणक्षेत्रात फिलोरा येथे ले. कर्नल ए. बी. तारापोर यांच्या नेतृत्वाखाली पूना हॉर्सच्या रणगाड्यांनी पाकिस्तानचे साठ रणगाडे फोडले. ही रणगाड्यांची लढाई दुसऱ्या महायुद्धातील रणगाडालढाईपेक्षा मोठी व महत्वाची समजली जाते. या लढाईतील बहादुरीसाठी ले. क. तारापोर यांना परमवीरचक्र (मरणोत्तर) व मेजर भूपिंदरसिंग यांना महावीरचक्र (मरणोत्तर) तसेच रिसालदार मेजर अयुबखान यांस वीरचक्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. १९७१ च्या पाक-भारत युद्धात शंकरगड येथील रणगाडालढाईत पूना हॉर्सने पाकिस्तानच्या २०७ रणगाड्यांपैकी ९५ रणगाडे उद्‌ध्वस्त केले . या घनघोर लढाईत ले. खेत्रपालने सुरुंगक्षेत्रात रणगाडा घुसवून आत्मबलिदान केले. त्यांना परमवीरचक्र (मरणोत्तर) देण्यात आले. पूना हॉर्सने एकंदर अकरा रणसन्मान मिळविले. १९३३ साली ‘पूना हॉर्स’चा द्विखंडात्मक इतिहास (१८१७–१९३१) लंडन येथे प्रसिद्ध झाला होता. सध्या पूना हॉर्सचा अद्ययावत इतिहास तयार होत आहे.

दीक्षित, हे. वी.