ॲपोलोनियस रोडियस : (सु. २९५ — सु. २१५ इ.स.पू.). एक ग्रीक महाकवी. जन्म ॲलेक्झांड्रिया येथे. काही काळ रोड्स बेटावर राहिल्यामुळे त्याला ‘रोडियस‘ हे नाव मिळाले. कॅलिमाकसचा हा शिष्य. आपल्या शिष्याने महाकाव्य लिहावे हे कॅलिमाकसला पसंत नव्हते त्यामुळे ॲपोलोनियसच्याआर्गोनाउटिका ह्या महाकाव्यावर त्याने टीका केली. आर्गोनाउटिकात महाकाव्याचे तेज आढळत नसले, तरी त्यातील यासॉन व मीडीअ यांच्या प्रेमकथेत अनेक सुंदर उतारे आढळतात. व्हर्जिलने आपल्या ईनिड ह्या लॅटिन महाकाव्यात त्यांचे अनुकरण केले आहे.
हंबर्ट, जॉ. (इं.) पेठे, मो. व्यं. (म.)