अश्मक : (१) पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रातांतील गौरी (आधुनिक पंजखोर) व सूवास्तू (आधुनिक स्वात) नद्यांच्या खोऱ्यातील एक प्राचीन देश. याच्या उत्तरेस स्वात, पश्चिमेस पंजखोर व दक्षिणेस काबूल नदी होती. या देशाची अश्वक, आश्वकायन, अस्सकेनोस, अस्सकेनोई व अस्सक अशी नामांतरे असून अश्मक म्हणजे दगडांच्या किंवा अश्वक म्हणजे घोड्यांचा देश अशी त्याची नामव्युत्पत्ती सांगतात. या देशावर सिंकदरने स्वारी केली होती. नऊ दिवसांच्या सतत वेढ्यानंतर मस्सग गाव त्याने जिंकून घेतले. या देशाची राजधानी मस्सग अर्थात मशकावती (आधुनिक मत्थनै) येथे होती.

(२) भारतातील मध्यदेशांतर्गत एक प्राचीन देश. भारतीय युद्धात कौरवपक्षात अश्मक राजा सामील असल्याचा उल्लेख आढळतो. पाणिनीच्या “आवन्त्याश्मकः” अशा निर्देशावरून पूर्वी हा देश अवंतीसमीप असावा असे दिसते. कालांतराने मात्र खानदेशापासून गोदावरी नदीपर्यंतचे आधुनिक नासिक, अहमदनगर जिल्हे, तसेच खानदेश, वऱ्हाड आणि मराठवाड्याचा काही भाग मिळून झालेल्या देशास ‘अश्मक’ नाव प्राप्त झाले. गौतमी बलश्रीच्या नासिक-शिलालेखात याला ‘असक’ तर बौद्ध वाङ्‌मयात याला ‘अस्सक’ म्हटले आहे. सातवाहन व त्यानंतर वाकाटकांचे येथे आधिपत्य होते. पैठण ही त्याची राजधानी होती. अजिंठा- -गुंफालेखात अश्मकराजांचा उल्लेख मिळतो.

शाह, र. रू. जोशी, चंद्रहास