ॲमेझॉन : दक्षिण अमेरिकेतील प्रचंड नदी. लांबी सु. ६,३०० किमी. जलवाहनक्षेत्र सु. ७०.५ लक्ष चौ.किमी. लांबीला ही नदी फक्त नाइलच्याच खालोखाल असून जलवाहनक्षेत्र आणि समुद्रात नेलेले पाणी (सरासरी दर सेकंदास सु. १,१९,००० घ.मी., पावसाळ्यात सु. १,९८,००० घ.मी.) या दृष्टींनी ही जगातील सर्वश्रेष्ठ नदी समजली जाते. विषुववृत्तावरील तिच्या मुखाजवळ काबु नॉर्टे व पाँटा टिजोका यांच्या दरम्यानच्या माराझो बेटाचा समुद्रकिनारा व ब्राझीलच्या टोकँटीन्सच्या मुखाजवळील पारा नदीचे ६४ किमी. रुंदीचे पात्र मिळून तिच्या पात्राची रुंदी सु. ३३३ किमी. आहे. उगमापासून पेरू देशातील ईकीटॉस शहरापर्यंत तिला ‘मारान्यॉन’ व पुढे ‘ॲमेझोनस’ आणि ब्राझीलमध्ये निग्रो नदी तिला मिळते तेथपर्यंत ‘सूलिमोइन्स’ व तेथून पुढे मुखापर्यंत ‘ॲमेझोनस’ म्हणतात.
तिचा शोध लावणारा (१५००) स्पेनचा व्हिथेंते यान्येथ पिंथॉन याने तिला ‘रीओ सांटा मारिया द ला भार दुल्से’ असे नाव दिले. अँडीजवरून नापो नदीतून ॲमेझॉनमध्ये येऊन मुखापर्यंत गेलेला (१५४१) स्पेनचा फ्रांथीस्को दे ओरेयाना याला वाटेत तापुयान इंडियन लोकांशी लढावे लागले. त्यांच्या स्त्रियाही लढत असत. अशा स्त्रियांना ‘ॲमेझॉन’ म्हणत, त्यावरून त्याने या नदीलाही ‘ॲमेझॉन’ नाव दिले, असे मानतात. डोंगराळ भागात या नदीत होड्यांचा टिकाव लागत नाही म्हणून इंडियनांनी तिला ‘अमसाने’—बोटींचा नाश करणारी—असे नाव दिले असावे, असेही सांगतात. १६३८ मध्ये पोर्तुगालचा पेद्रो तेईशेईरा याने मुखापासून वर जाऊन नापो नदीमार्गाने कीटोपर्यंत प्रवास केला.
ॲमेझॉन मुख्यतः ब्राझीलमधून वाहत असली, तरी तिचे जलवाहनक्षेत्र पेरू, बोलिव्हिया, एक्वादोर, कोलंबिया व व्हेनेझुएला या देशांतही आहे. हिच्या उगमाकडील मुख्य दोन नद्या म्हणजे मारान्यॉन व ऊक्याली. अँडीज पर्वतात. १००४३’. द. व ७६०१९’ प. येथील खाणींचे केंद्र सेरॉ थे पास्कोच्या ईशान्येस सु. ६० किमी.वरील पॅसिफिकपासून फक्त १३७ किमी.वरील ४,३५० मी. उंचीवरील लौरीकोचा सरोवरात मारान्यॉन उगम पावते. हाच पुष्कळदा ॲमेझॉनचा उगम मानला जातो. तितिकाका सरोवराच्या परिसरात उगम पावणारी आपूरिमाक ऊर्फ तांबो आणि इंकांची पवित्र नदी बील्कानोटा किंवा ऊरूबांबा यांचा ११०१७’. द. व ७३०४७’ प. येथे संगम होऊन ऊक्याली नदी तयार होते. तिचा व मारान्यॉन यांचा ४०३०’. द. व ७३०२७’ प. येथे संगम होऊन मग त्या नदीला ‘ॲमेझॉन’ हे नाव मिळते. येथून पुढे ३०४५’ द. व ७२०१५’ प. येथे ईकीटॉस हे ॲमेझॉनवरील बंदर आहे. तेथपर्यंत म्हणजे ॲमेझॉनच्या मुखापासून ३,७०० किमी. आतपर्यंत सागरगामी आगबोटी येऊ शकतात. तेथून वर ७८२ किमी.वरील पाँगो दे मान्सेरीचे या मारान्यॉनच्या सु. ६०० मी. खोल व एके ठिकाणी फक्त ३० मी. रुंद घळईपर्यंत मोठ्या आगबोटीही जातात. येथून खाली ॲमेझॉन अत्यंत संथ वाहते. जगातील वाहत्या पाण्याचा सु. पाचवा हिस्सा पाणी एकट्या ॲमेझॉन संहतीतून वाहते, याचे कारण वार्षिक सु. २०० सेंमी. बारमाही पावसाच्या विषुववृत्तीय अरण्यांच्या जगातील सर्वांत मोठ्या प्रदेशाचे जलवाहन ती करते. ब्राझील व गुयाना यांचे उंच प्रदेश जवळ आल्यामुळे सँतारेमजवळ ॲमेझॉनच्या पात्राची रुंदी फक्त २ किमी. होते व खोली सु. ७५ मी. होते. तथापि ईकीटॉसजवळ तिचे पात्र समुद्रसपाटीपेक्षा फक्त ९०-९५ मीटरच उंच आहे. पात्राच्या सखलपणामुळे समुद्राची भरती मुखापासून ८०० किमी.पर्यंत जाणवते. नदी व समुद्र यांच्या पाण्याच्या संघर्षामुळे ५-७ मी. उंचीची लाट (वान किंवा घोडा) मुखापासून आत जाते. खोर्याच्या उतारापेक्षा पात्रातून वाहणार्या पाण्याच्या प्रचंड लोटामुळेच नदी वाहत राहते. ॲमेझॉनला शेकडो उपनद्या येऊन मिळतात. त्यांतील काही तिच्यासारख्याच मोठ्या व लांब आहेत. २१ उपनद्या प्रत्येकी १,१२५ किमी.हून अधिक लांब, त्यांपैकी ११ प्रत्येकी १,६०० किमी.हून लांब व ३ प्रत्येकी ३,२०० किमी.हून अधिक लांब आहेत. ही नदीसंहती ओरिनोको नदीसंहतीशी कासीक्यारे नदीमार्गे, व पॅराग्वाय-ला प्लाता संहतीशी ग्वपूरे नदी व पॅन्तानाल दलदल प्रदेशमार्गे जोडली गेली आहे.
ॲमेझॉनचे खोरे हा एक तृतीययुगीन गाळांनी भरलेला द्रोणीप्रदेश आहे. तो वरच्या भागात जास्त रुंद आहे. उत्तरेस गुयानाचा व दक्षिणेस ब्राझीलचा प्राचीन स्फटिकी खडकांचा पठारी प्रदेश आहे. अतिनूतन कालखंडात येथे एक गोड्या पाण्याचा समुद्र होता. प्लेस्टोसीन काळात केव्हातरी त्याचा अटलांटिक महासागराशी संबंध प्रस्थापित झाला आणि ॲमेझॉन व तिच्या उपनद्या अतिनूतन पृष्ठावरून खोल दरडींमधून वाहू लागल्या. सध्याची ॲमेझॉन व तिच्या उपनद्या एका मोठ्या पूर्वनिमग्न खोऱ्यातून वाहत आहेत. पर्वतांवरील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढली, तेव्हा अतिनूतन पृष्ठात क्षरणाने कोरल्या गेलेल्या दऱ्याघळ्यांतून पुराचे पाणी शिरले. ॲमेझॉनचे बरेच अरण्य या प्राचीन भूमीवर वाढलेले आहे. पेरू व बोलिव्हिया यांच्या पूर्वभागातील बऱ्याच प्रदेशावर अँडीज पर्वतावरून आलेल्या अलीकडील गाळाचे थर पसरलेले आहेत. सेन्गू नदी जेथे मिळते त्याच्या वर ॲमेझॉनच्या पात्राच्या तळाची जास्तीत जास्त रुंदी सु. १३ किमी.हून थोडी अधिक आहे. मोठ्या पुराच्या वेळी पात्र ५०-६० किमी.पर्यंत पसरते. ॲमेझॉनचा सरासरी वेग ताशी सु. २.५ किमी. असतो. पुराच्या वेळी पाण्याची पातळी १२ ते १५ मी. वाढते. ईकीटॉस येथे ती ६ मी. वाढते, तेफे येथे १३.५ मी., ऑबिडुशजवळ १० मी. व बेलेमजवळ ३.७ मी. अशी वाढते. नोव्हेंबर ते जून नद्यांना पूर येतात. ॲमेझॉनच्या बहुतेक उपनद्यांवर पुष्कळ धबधबे व द्रुतवाह आहेत. तरीही त्या बऱ्याच अंतरापर्यंत नौकासुलभ आहेत. काही उपनद्या या अडथळ्यांच्या वरच्या बाजूस पुनः वाहतुकीस उपयोगी पडतात. मादीरा
नदीवरील धबधबे व द्रुतवाह टाळून मादीरा-मामोरे लोहमार्ग झालेला आहे. कासीक्यारे नदी हा एखाद्या कालव्यासारखा जगातील एकमेव नैसर्गिक जलमार्ग आहे.
मारान्यॉन हा ॲमेझॉनचा पहिला विभाग. या उगमाकडील विभागात पाऊस १५० सेंमी. पडतो. या पहाडी प्रदेशात सॅव्हाना गवताचे विस्तृत प्रदेश आहेत. त्याचप्रमाणे सूचिपर्णी वृक्ष, नेचे व भडक रंगाची फुलझाडे तेथे आढळतात. अनेक प्रकारची हरिणे व चित्रविचित्र रंगांचे पक्षी असून नदीत मासे व इतर जलचर आहेत.
सूलिमोइन्स हा ॲमेझॉनचा दुसरा विभाग. हा विषुववृत्तीय घनदाट अरण्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. कठीण लाकडाचे उंच सरळ वाढलेले वृक्ष, त्यांवर वेली व बांडगुळे यांची दाटी, थोड्या जागेत वनस्पतींच्या हजारो जाती हे या अरण्यांचे विशेष आहेत. या अरण्यांत वृक्षचर, जलचर आणि कीटक यांच्या हजारो जाती आढळतात.
ॲमेझॉनच्या उगमाकडील पेरू देशात प्राचीन काळी इंका लोक राहत असत. कूस्को ही त्यांची राजधानी होती. ऊरूबांबा नदीच्या काठी सापडलेल्या काही अवशेषांवरून त्यांच्या श्रेष्ठ संस्कृतीची साक्ष पटते. ॲमेझॉन नदीच्या पहाडी अरण्यांनी व्यापलेल्या प्रदेशात अमेरिकन इंडियन हे डोंगरी लोक राहतात. त्यांची घरे दगडमातीची असून ते शिकारीकरिता एक फुंकनळी आणि बाण वापरतात. त्यांचे कपडे लामाच्या लोकरीचे असतात. मुखापासून २,००० किमी. अंतरावरील माटू-ग्रोसू ह्या मोठ्या जंगलमय प्रदेशात दलदल, झुडपे, गवत, झाडी आढळते. परंतु लांबवर पसरलेल्या या ३ लक्ष चौ. किमी. प्रदेशाची पुरेशी माहिती उपलब्ध नाही. येथे ५० हजार रानटी इंडियन लोक असावेत असे तज्ञांचे मत आहे. उष्ण, दमट हवा आणि २०० सेंमी. पाऊस असल्यामुळे झाडांचे लाकूड कठिण असते. ह्यांच्या फळांमध्ये मेण व तेल आढळते. मुखाकडील घनदाट अरण्यांतील झाडांची उंची ३० ते ६० मी. पर्यंत असते. मॉहॉगनी, एबनी, पाम, रबर, कोको, व्हिक्टोरिया रेजीआ (या वनस्पतीची पाने ५ मी. व्यासाची व फुले ३० सेंमी. व्यासाची असतात) व इतर हजारो प्रकारच्या वनस्पती आहेत. नदीच्या दोन्ही बाजूंस पसरलेल्या पाण्यामुळे ३० ते ४० किमी. पर्यंत गाळाचा प्रदेश आढळतो. मानौसजवळ ॲमेझॉनचे खोरे १२० किमी. रुंद आहे. नदीच्या मुखाकडील प्रदेशात तिचा वेग ताशी ८ किमी. पर्यंत असतो. त्यामुळे येथे गाळ न साठता तो समुद्रात ३२० किमी. पर्यंत पसरला जातो.
अँडीज पर्वतात आणि ॲमेझॉनच्या जलवाहनक्षेत्रात सोने, हिरे, लोखंड, चांदी, मँगॅनीज, युरेनियम, रेडियम, पेट्रोलियम आदी खनिजे आहेत. या खनिजांचा अद्याप फारसा उपयोग झालेला नाही. बेलेम (पारा), मानौस, ऑबिडुश, पाराना आदी ठिकाणी व्यापार, उद्योगधंदे आहेत. रबर, इमारती व नक्षीकामाचे लाकूड, प्राण्यांची कातडी, केळी, कॉफी, कोको, नारिंग, लिंबू, तांदूळ, ऊस, कापूस आदी व्यापारोपयोगी मालाचे उत्पादन होते. याशिवाय मासेमारी व लाकूडतोड हे उद्योग चालतात.
ॲमेझॉन नदीप्रदेशात बेलेम, ऑबिडुश, मानौस, ईकीटॉस ही मोठमोठी बंदरे असून त्यांतून या नदीमार्गाने मोठा व्यापार चालतो. जलमार्गाशिवाय दुसरा सोईस्कर वाहतुकीचा मार्ग नाही. मॉहॉगनीसारख्या जड लाकडाचे ओंकडे त्यांना बालसा या हलक्या लाकडाचे ओंडके बांधून नदीतून वाहून नेतात. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील जलसंपत्ती, वनसंपत्ती, खनिजसंपत्ती, प्राणिसंपत्ती यांचा फारच थोडा उपयोग सध्या होत आहे. या सुप्त संपत्तीचा अधिक उपयोग करण्याच्या योजना आखल्या जात आहेत.
यार्दी, ह. व्यं.