सिद्घपूर : गुजरात राज्यातील एक तीर्थक्षेत्र व मेहसाणा जिल्ह्यातील तालुक्याचे शहर. मातृगया म्हणून ते विशेष प्रसिद्घ आहे. ते पालनपूर– दिल्ली महामार्गावर मेहसाणाच्या उत्तरेला सु. ५७ किमी. वर सरस्वती नदीच्या उत्तर काठावर वसले आहे. ते पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद-दिल्ली मार्गावरील एक प्रमुख स्थानक (रेल्वे स्टेशन) आहे. लोकसंख्या ५३,५८१ (२००१). स्कंदपुराणाच्या प्रभास कांडात त्याचा उल्लेख श्रीस्थळ असा केला असून अन्यत्र त्यास सिद्घक्षेत्र, सिस्थलक म्हटले आहे. सिद्घपूरचा पहिला ऐतिहासिक उल्लेख अल् बीरुनी (९७३ — १०४८?) याच्या प्रवासवृत्तांतात आढळतो. सिद्घराज जयसिंह (कार. १०९३ — ११४३) या सोळंकी राजाने तिथे रुद्र महादेवाचे भव्य व कलाकुसरयुक्त मंदिर बांधले. या राजाच्या सन्मानार्थ सिद्घपूर हे नाव प्रचलित झाले. येथे सरस्वती नदी पूर्वाभिमुख होऊन वाहते. गावापासून पश्चिमेस तीन किमी. वर मातृगया मंदिर ही मातृश्राद्घासाठी प्रसिद्घ असलेली वास्तू आहे. बिहारमध्ये गयेला पितृश्राद्घासाठी जे महत्त्व आहे, तेच या ठिकाणी मातृश्राद्घासाठी सिद्घपूरला प्राप्त झाले असून तीर्थाटनाचे ते एक ख्यातनाम स्थळ आहे.

शहर व त्याच्या परिसरात रुद्रमाळा, महादेव सिद्घेश्वर, महादेव गोविंद, रणछोडजी, सहस्रकालमाता, गोवर्धन नाथजी, स्वामी नारायण, छबिला हनुमान, गोसैन्‌जी वगैरे प्राचीन मंदिरे-वास्तू असून बिंदू सरोवर, अल्पा सरोवर व ज्ञानवापिका ही कुंडे पवित्र तीर्थे मानली जातात. भारतातील चार पवित्र सरोवरांपैकी बिंदू सरोवर येथे असल्यामुळे गुजरातच्या पवित्र स्थळांत हे दुसऱ्या क्रमांकाचे ठरले आहे. येथील मंदिरांपैकी रुद्रमाळा ह्या मंदिराच्या बांधकामास सोळंकीवंशी मूळराज याने सुरुवात केली (९४४)तथापि धरणीकंप, परकीय आक्रमणे यांमुळे हे बांधकाम अपूर्ण राहिले. पुढे बाराव्या शतकात सिद्घराज जयसिंह याने ते पूर्ण केले आणि त्याबरोबरच राजविहार नावाचे एक सुरेख जैन मंदिर आचार्य हेमचंद्रांच्या आदेशावरुन बांधले. रुद्रमाळा हे तीन मजली, १६०० स्तंभांवर आधारित असलेले मंदिर शिल्पाकृतींनी अलंकृत केलेले होते. तेथील प्रत्येक स्तंभ कलाकुसरयुक्त होता आणि मंदिराला बारा द्वारे होती. मंदिरासमोर सरस्वती घाट होता. या मंदिराच्या क्षेत्रफळाने अर्धेअधिक सिद्घपूरचे क्षेत्र व्यापले होते. त्याच्या परिसरात रुद्राची अनेक छोटी गर्भगृहवजा मंदिरे होती. तेराव्या शतकाच्या अखेरीस (१२९७-९८) उलुगू खानाने त्याची मोडतोड केली आणि नंतर अहमदाबादचा सुलतान अहमदशाह याने १४१५ मध्ये ते उद्ध्वस्त केले. सध्या तिथे फक्त प्राचीन शिल्पांचे-स्तंभांचे अवशेष आढळतात. अहिल्याबाई होळकर यांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस एक सुरेख यालीनामक धर्मशाळा बांधली (१७९५). बिंदू सरोवर रस्त्यावर लक्ष्मीनारायण, गणपती आणि कालिकामाता यांची मंदिरे आहेत. याशिवाय सरस्वती नदीकाठावर ब्रह्ममंडेश्वर, वाळकेश्वर, हिंग्लज, अर्बदेश्वर व चामकेश्वर ही शैव मंदिरे आहेत. बाबाजी दिवाण यांनी एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महादेव सिद्घेश्वर, गोविंद महादेव आणि निळकंठ महादेव ही मंदिरे बांधली. यांपैकी महादेव सिद्घेश्वर हे भव्य असून त्याच्या भोवती तटबंदी आहे, तर गोविंद महादेव हे मंदिर शहराच्या मध्यभागी असून त्यात श्रीकृष्णाच्या दोन सुबक मूर्ती आहेत.

सिद्घपूर हे मेहसाणा जिल्ह्यातील एक औद्योगिक शहर असून येथील बाजारपेठ उंझाच्या खालोखाल प्रसिद्घ आहे. शहरात सूतगिरण्या, यंत्रमाग, तेलगिरण्या, धातूचे कारखाने, छापखाने आणि अनेक इसबगोलच्या वखारी आहेत. तालुक्याच्या परिसरात बाजरी,ज्वारी, गहू, जिरा, इसबगोल ही प्रमुख पिके घेतली जातात. गुजरातमधील अफूच्या व्यापाराचे हे केंद्र असून जिरा आणि इसबगोल यांची निर्यात परदेशातही होते. ही नगदी पिके असून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. इसबगोलचा उपयोग औषधे बनविण्यासाठी होतो. राष्ट्रीयिकृत बँकेव्यतिरिक्त शहरात मेहसाणा जिल्हा सहकारी बँकेची शाखा, सिद्घपूर कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक आणि मोमीन बँक या अन्य बँका आहेत. प्राथमिक, माध्यमिक विद्यालये आणि विविध विद्याशाखांची महाविद्यालये ज्ञानदानाचे कार्य करतात. नगरपालिका (स्था. १९०५) शहराची स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, जलनिःसारण वगैरेंची व्यवस्था पाहते. हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे सर्व शासकीय कार्यालये आहेत. दरवर्षी कार्तिक शुद्घ पौर्णिमेला सरस्वती नदीच्या काठी मोठी जत्रा भरते.

सोसे, आतिश सुरेश