सागर बेट : भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी नदीच्या मुखाशी असलेले एक बेट. सागर हे गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील सर्वांत पश्चिमेकडील बेट असून कोलकातापासून दक्षिणेस सु. १५० किमी.वर त्याचे स्थान आहे. बेटाचे क्षेत्रफळ सु. ३०० चौ. किमी. (१९९१) असून त्यावर ४३ गावे व सु. १,६०,००० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. सागर म्हणजे समुद्र. एकेकाळी गंगेचा मुख्य प्रवाह येथेच बंगालच्या उपसागराला मिळत असावा. त्याच ठिकाणी या बेटाचे स्थान असल्याने त्यास सागर असे म्हणतात. या बेटाला ‘गंगासागर’ या नावानेही ओळखले जात असून याच नावाचे गाव बेटाच्या दक्षिण भागात आहे. अयोध्येचा राजा सगर याच्यावरून या स्थानाला सागर हे नाव मिळाले असल्याबाबतची एक कथाही येथे सांगितली जाते. बेटाच्या उत्तरेकडील भाग लागवडीखाली आणला असून दक्षिण भागात दाट जंगल आहे. त्यात कच्छ वनश्रीचे प्रमाण अधिक आहे. बेटावर लहान लहान नद्या व जलमार्ग आढळतात. मुख्य भूमीशी जोडण्याच्या दृष्टीने मुख्य भूमी व सागर बेटादरम्यान अजून तरी पुलाची सुविधा उपलब्ध नाही. बेटाला वारंवार वादळाचा तडाखा बसत असतो. इ. स. १८६४ मधील वादळात बेटावरील ५,६०० पैकी फक्त १,५०० लोक जिवंत राहिले होते. बेटाच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावर दीपगृह आहे.
हिंदूंचे हे पवित्र स्थळ असून दरवर्षी मकर संक्रांतीला बेटाच्या दक्षिण भागात जेथे हुगळी नदी बंगालच्या उपसागराला मिळते, तेथे मोठा स्नानोत्सव भरतो. येथील समुद्रस्नानामुळे पापक्षालन होते असा समज असल्याने देशभरातून हजारो भाविक या स्थळी येतात. येथील कपिलमुनी मंदिरातही दर्शनासाठी खूप गर्दी असते. येथे प्राणत्याग केल्याने मनुष्य तत्काळ परमेश्वररूपात विलीन होतो, या श्रद्घेमुळे गेल्या शतकापर्यंत अनेक स्त्री-पुरुषांनी आपला देह येथे सागरार्पण केला. येथे सन २००७ मध्ये सु. ३,००,००० भाविकांनी सागरस्नान केले.
चौधरी, वसंत