श्रीरामपूर : महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील एक तालुक्याचे शहर. लोकसंख्या ३९,४९२ (१९७१). ते अहमदनगरच्या उत्तरेस सु ७७ किमी.वर वसले आहे. याच नावाच्या तालुक्याचे हे मुख्यालय आहे. शहरात महाविदयालयापर्यंतच्या शिक्षण-सुविधा आहेत. १९४७ मध्ये शहरात नगरपालिका स्थापन झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत फळभाज्या, धान्य यांचे लिलाव होतात. अलीकडे (२०००) येथे महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाची (एम्.आय्.डी.सी.) स्थापना झाली असून लहानमोठे उदयोग सुरू करण्यात येत आहेत. शहराच्या परिसरात तीन सहकारी साखर कारखाने असल्यामुळे तेथील कर्मचारी वर्ग शैक्षणिक सुविधांसाठी या शहराचा उपयोग करतात. शहरात नेहरू भाजी मार्केट हे व्यापारी संकुल आहे.
येथील आधुनिक वास्तुशैलीतील श्रीराममंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी रामनवमीला (चैत्र शु. ९) येथे मोठी यात्रा भरते. मंदिराच्या गर्भगृहात राम, लक्ष्मण व सीता यांच्या शुभ संगमरवरी मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या बाहेरच्या बाजूस विठ्ठल-रखमाई, दत्तात्रेय इत्यादींच्या स्वतंत्र मूर्ती आढळतात. मंदिराच्या प्रांगणात अग्निहोम (धुनी) आहे. रामनवमीच्या उत्सवात विविध खेळांचे आयोजन करण्यात येते. त्यांतील कुस्त्यांना विशेष महत्त्व व प्रतिष्ठा असून त्यांत भाग घेण्यासाठी अन्य राज्यांतूनही पैलवान जमतात.
देशपांडे, सु. र.