प्वेब्ला : (प्वेब्ला दे सारागोसा). मेक्सिकोतील प्वेब्ला राज्याची राजधानी. लोकसंख्या ६,४६,५९९ (१९७७ अंदाज). हे मेक्सिको सिटीच्या आग्नेयीस सु. १२५ किमी. सिएरा माद्रे पर्वतपायथ्याशी बसले आहे. स्पॅनिशांनी १५३२ मध्ये ‘प्वेब्ला दे लॉस अँजेल्स’ या नावाने याची स्थापना केली. समुद्रकाठचे व्हेराक्रूझ व पठारावरील मेक्सिको सिटी यांना जोडणाऱ्या मार्गावर हे वसले असल्याने स्पॅनिशांनी येथे सैनिकी तळ उभारला. त्यामुळे या शहराला अनेक युद्धांना तोंड द्यावे लागले. मेक्सिकोच्या स्वातंत्र्ययुद्धात १८२१ मध्ये हे मेक्सिकन क्रांतिकारक आगूस्तीन दे ईतूर्बीदे याने स्पेनकडून जिंकले. अमेरिका-मेक्सिको युद्धात १८४७ मध्ये हे अमेरिकनांच्या ताब्यात गेले. १८६२ मध्ये इग्नाथ्यो सारागोसाने येथे फ्रेंचांचा पराभव केला व त्याच्या नावावरून शहरास ‘प्वेब्ला दे सारागोसा’ हे नाव मिळाले. १८६३ मध्ये हे तिसऱ्या नेपोलियनच्या सैन्याने जिंकले परंतु १८६७ मध्ये जनरल पॉर्फीऱ्यो दीआस याने ते मुक्त केले.

येथील वास्तुशिल्पांत द. स्पेनमधील मूरिश व स्थानिक इंडियन शैलीचा सुंदर संगम आढळतो. मृत्तिकाशिल्प आणि गोमेद खड्यांवरील शिल्पांकन यांसाठी हे विशेष प्रसिद्ध आहे. येथील मध्ययुगीन कॅथीड्रलची वास्तू उल्लेखनीय आहे. येथे एक स्वायत्त विद्यापीठ आहे. हे दळणवळणाचे केंद्र असून येथे कापड, सिमेंट, काच इ. उद्योगांचा विकास झाला आहे.

शहाणे, मो. ज्ञा.