उस्मानाबाद शहर : महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. क्षेत्रफळ ६३·१६ चौ.किमी. लोकसंख्या २७,२७९ (१९७१). हे सोलापूरच्या उत्तरेस सडकेने ६५ किमी., भोगावती नदीकाठी असून याचे पूर्वीचे नाव धारापूर अथवा धाराशिव होते. येथून २७ किमी. उत्तरेकडील तेर येथील उत्खननात रोमन संस्कृतीशी संबंधित अशा वस्तू सापडल्या आहेत. त्यावरून धाराशिव त्या वेळेस भरभराटीस असावे असे अनुमान निघते. तसेच शहरापासून चार-पाच किमी. अंतरावर, पाचव्या-सहाव्या शतकातील जैन व ब्राह्मण लेणी सापडली आहेत. जैनलेणी, चांभारलेणी व ब्राह्मणलेणी धाराशिवलेणी म्हणून प्रसिद्ध आहेत. चांभारलेण्यांची संख्या अकरा असून त्यांतील स्तंभ, मंडप, गर्भगृह तसेच पार्श्वनाथाची मूर्ती व इतर जिनमूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. १८६१ मध्ये नळदुर्ग जिल्हाठिकाण बदलून धाराशिवला आणण्यात आले म्हणून पुन्हा शहराला महत्त्व प्राप्त झाले. १९१० मध्ये निजाम मीर उस्मानअलीखाँ याने आपल्या राज्यारोहणप्रसंगी शहरास स्वतःचे नाव दिले. तेव्हापासून शहर उस्मानाबाद नावाने ओळखले जाऊ लागले. हैदराबाद संस्थानाच्या विभागणीनंतर, शहर महाराष्ट्रात आले (१९५६). शहर सोलापूर, तुळजापूर, लातूर, बीड, औरंगाबाद इ. शहरांशी उत्तम सडकांनी जोडलेले असून उस्मानाबादला जवळचे रेल्वेस्थानक म्हणजे १९ किमी. वरील येडशी (कुर्डुवाडी-लातूर रेल्वे) हे होय. उस्मानाबादला एक शिक्षण महाविद्यालय व एक शास्त्र-मानव्य-वाणिज्य महाविद्यालय आहे. धान्य व्यापाराची ही पेठ असून येथे रविवारी बाजार भरतो. शहरातील हजरत काझी यांचा दर्गा शिल्पदृष्ट्या उत्तम असून येथे आणि दारासुरमर्दिनी देवीच्या मंदिरात जत्रा भरतात.

शाह, र. रू.