उपासमार: उपासमार या शब्दाचा धात्वर्थ अन्नावाचून मरणे असा असला, तरी व्यवहारात शरीरपोषणासाठी अवश्य असलेले अन्नपदार्थ फार काळ न मिळाल्यामुळे येणारी अशक्तता, कृशता व इतर लक्षणे दिसतात त्या अर्थी ही संज्ञा वापरतात. उपासमार आणि उपोषण यांमधील फरक लक्षात ठेवला पाहिजे. पहिली स्थिती अगतिकपणे येते तर दुसरी अवस्था व्यक्तीने जाणून बुजून घडवून आणलेली असते.

अन्न आणि पाणी यांवाचून मनुष्य दोन ते तीन आठवडे जगू शकतो. नुसते पाणी घेत राहिल्यास दोन-अडीच महिन्यानंतर मृत्यू येतो. देशभक्त जतिंद्रदास, पंजाबचे फेरूमल, आंध्राचे श्रीरामल आणि आयर्लंडचे टेरेन्स मॅक्सस्विनी यांची उदाहरणे प्रसिद्ध आहेत. विविध धर्मांत ईश्वरोपासनेचा मार्ग म्हणून उपोषण मान्यता पावले आहे. असाध्य रोगापासून सुटका होण्यासाठी अन्न वर्ज्य करून मृत्यू ओढवून घेणे या गोष्टीत पाप नाही असे मानलेले आहे.

उपासमारीपेक्षा सौम्य परंतु परिणामी घातुक ठरणारी अवस्था म्हणजे अपपोषण  होय. शरीरधारणेसाठी अवश्य असलेले अन्नपदार्थ आहारात नसले किंवा कमी पडले, तर ही अवस्था दिसते. रोजच्या आहारात प्रथिने, वसा, पिष्टमय पदार्थ, जीवनसत्त्वे, लवणे आणि पाणी यांची जरूरी असते. त्यांपैकी काही पदार्थ बऱ्याच काळपर्यंत कमी पडले अथवा त्यांचा पूर्ण अभाव असला तर अपपोषण होते. ही स्थिती दीर्घकाल राहिल्यास शरीराची उपासमार होऊन रोगोत्पत्ती संभवते.

उपासमारीची प्रमुख कारणे म्हणजे दुष्काळ आणि दारिद्र्य. लोकांना पुरेसे अन्न वेळेवर आणि योग्य प्रमाणात न मिळाल्यास त्यांची उपासमार होऊन त्यांची शरीरे अशक्त, कृश आणि पांडुरोगी बनतात व मग ती अनेक रोगांना बळी पडतात.

तसे पाहिल्यास अप्रगत देशांत तर दिवसापैकी ७० ते ९० टक्के वेळ अन्न व पाणी मिळविण्यात खर्च करूनही पुरेसे अन्न मिळू शकत नाही. दुष्काळात मिळतील ते पदार्थ, प्रसंगी झाडपाला खाऊन जीव जगविण्याचा प्रयत्न केल्याची उदाहरणे सर्वश्रुत आहेत.

बोट फुटून बुडाल्यानंतर वाताहात झालेले त्या बोटीतील प्रवासी, अथवा विमान कोसळून त्यातील प्रवासी ओसाड व निर्जन प्रदेशांत उतरल्यानंतर त्यांची अन्नपाण्यावाचून उपासमार होते आणि वेळीच सुटका न झाल्यास त्यांना उपासमारीने मृत्यू पत्करावा लागतो.

काही रोगांत अन्न गिळणे, पचविणे वा शोषून घेणे या क्रिया अशक्य झाल्यामुळे उपासमार होऊ शकते. घसा, ग्रसिका (घशापासून जठरापर्यंतचा अन्ननलिकेचा भाग), जठर आणि आंत्रमार्ग (लहान व मोठ्या आतड्यांचा मार्ग) या ठिकाणी कर्करोग झाल्यास अन्नमार्गच बंद झाल्यामुळे उपासमार होऊ शकते. तसेच पचनक्रियेत बिघाड झाल्यामुळे आहार योग्य असूनही अन्नद्रव्ये पचली व शोषिली न गेल्यानेही उपासमार होते. उदा., लहान मुलांत बालसंग्रहणी (उदरगुहीय रोग) अथवा मोठ्या माणसांत संग्रहणी  या रोगात उपासमारीची लक्षणे दिसतात.

अन्न कमी पडू लागले म्हणजे प्रथम शरीरात साठविण्यात आलेली वसा (चरबी), काही काळ अन्न पदार्थाची वाण भरून काढू शकते. वसेनंतर स्नायू व इतर ऊतकांचाही (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांचाही) नाश होऊ लागून शरीर हळूहळू कृश होत जाते. उपासमार होऊ लागली म्हणजे प्रथम २–४ दिवस अतिशय भूक लागते, आवाज व डोळे खोल जातात, पुढे भुकेचा त्रास कमी होतो परंतु मळमळ, सतत घेरी येणे, ओकार्‍या वगैरे लक्षणे दिसू लागतात.

त्वचेमधून रक्तातील द्रवपदार्थांचे बाष्पीभवन चालूच राहिल्यामुळे व त्या जागी नवीन द्रव येत नसल्यामुळे रक्त घट्ट होत जाते, त्याचा रंग काळा होतो व त्यात चयापयजन्य (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमुळे तयार होणारे) निरुपयोगी व अपायकारक पदार्थ साठू लागतात, त्यामुळे रक्ताम्लता होते (रक्त अम्लधर्मी होते).

रक्तातील द्रव कमी झाल्यामुळे वृक्काचे (मूत्रपिंडाचे) कार्य विकृत होऊन मूत्र थोडेथोडे व अतिशय घट्ट होते. त्यात प्रथिन, ॲसिटोन व इतर वसाम्लीय पदार्थ आढळतात. पुढे वृक्कशोथ (मूत्रपिंडाची दाहयुक्त सूज) होऊन मूत्रोत्पत्ती थांबल्यामुळे मूत्रविषरक्तता (रक्तात यूरिया साठल्यामुळे निर्माण होणारी अवस्था) येते. या मूत्रविषरक्ततेचा परिणाम ह्रदय, मस्तिष्क (मेंदू) वगैरे महत्त्वाच्या इंद्रियांवर होऊन, वेळीच उपचार न झाल्यास बेशुद्धी, झटके येऊन शेवटी मृत्यू येतो. शरीराची प्रतिकारकक्षमता कमी झाल्यामुळे इतर रोग– विशेषतः सांसर्गिक रोग– होऊन त्या रोगांमुळेच मृत्यू संभवतो.

जगातील, विशेषतः मागासलेल्या राष्ट्रांतील, उपासमारीचा प्रश्न सोडविण्याकरिता संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफआणि अन्न व कृषि संघटना(FAO) या दोन शाखांमार्फत सतत प्रयत्न चालू आहेत. इतर आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संघटनाही या कार्याकडे लक्ष देत आहेत.

देवधर, वा. वा.