रायचौधरी, अंबिकागिरि : (१८८५ – २ जानेवारी १९६७). राष्ट्रवादी असमिया कवी. ‘आसाम केसरी’ या टोपणनावानेही ते ओळखले जातात. त्यांचा जन्म रायपारा (बरपेटा) येथे प्रख्यात संतकवी शंकरदेव यांचा वारसा सांगणाऱ्या सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षणही तेथेच झाले स्वातंत्र्य आंदोलनात पडल्याने त्यांना पुढील शिक्षण मात्र घेता आले नाही. त्यांनी दोन वेळा तुरुंगवासही भोगला. ते एक नाणावलेले संगीतज्ञ, प्रभावी वक्ते व सामर्थ्यशाली कवी-लेखक होते. १९३० ते १९५० दरम्यानच्या तरुण पिढीवर त्यांच्या राष्ट्रभक्तिपर गीतांतील उत्तुंग ध्येयवाद, क्रांतिप्रवणता व दुर्दम्य आशावाद यांचा गहिरा प्रभाव होता. ज्वलंत देशभक्ती हा त्यांच्या काव्यातील स्थिर अंतःप्रवाह आहे. त्याचबरोबर समाजातील जातीयता, विषमता, अन्याय, द्वेष, पोकळ डामडौल, स्वार्थ इ. अनिष्ट प्रवृत्ती समूळ नाहीशा व्हाव्यात, असाही त्यांचा दृष्टिकोन होता. आपल्या सर्वच लेखनातून त्यांनी या भूमिकेचा प्रभावी आविष्कार केला. त्यांच्या बेदनार उल्का ह्या काव्यसंग्रहास १९६६ चा साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला.

स्थूलमानाने अंबिकागिरींच्या साहित्यिक जीवनाची विभागणी दोन कालखंडांत करता येईल : (१) स्वातंत्र्य आंदोलनपूर्व कालखंड आणि (२) आंदोलनापासूनचा म्हणजे १९२०-२१ नंतरचा कालखंड. पहिल्या कालखंडातील त्यांची भूमिका कमीअधीक प्रमाणात गूढवादी अधिष्ठान असलेल्या एका प्रेमकवीची आहे. बीणा (१९१७) व तुमि (१९१८) हे त्यांचे ह्या काळातील काव्यसंग्रह असून त्यांत प्रेम व सौंदर्य यांच्या सर्वव्यापी स्वरूपाचा प्रत्यय येतो. १९२०-२१ नंतर मात्र ते गांधीजींनी सुरू केलेल्या स्वातंत्र्य आंदोलनाने प्रभावित झाले. देशभक्तीची अत्यंत प्रखर आणि ज्वलंत भावना तसेच विषमता, जातीयता, अन्याय, द्वेष, दुष्ट रूढी यांविरुद्धच्या विद्रोहाची भावना त्यांच्या या काळातील काव्यात प्रकर्षाने व्यक्त होताना दिसते. अनुभूति (१९५०) व बंदोकी छंदरे, स्थापन कर स्थापन कर (१९५८), बेदनार उल्का (१९६६) हे त्यांचे या काळातील संग्रह होत.

काव्याव्यतिरिक्त त्यांनी प्रभावी गद्यलेखनही केले आहे. त्यांच्या गद्यातील घणाघाती सामर्थ्य लक्षणीय आहे. ते पट्टीचे वक्ते व कुशल पत्रकारही (चेतनारेका असमचे संपादक) होते. कल्याणमयी (१९३४) व जयद्रथ बध (१९६१) ही त्यांची नाटके आहेत. जगतर शेष आदर्श (१९१६) हा त्यांच्या नीतिपर निबंधांचा संग्रह तसेच देका देकारीर बेद (१९४२) आणि आहुति (१९५३) हे त्यांच्या प्रभावी गद्यलेखनाचे संग्रह होत.

तुमि मधील तुमि ह्या कवितेत त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान व आध्यात्मिक निष्ठा कलात्मकरीत्या व्यक्त झाल्या आहेत. आशय, कल्पनाविलास, संगीत, सूचकता, तेजस्विता व माधुर्य यांचा अतिशय सुंदर मिलाफ त्यांच्या ह्या सर्वोत्कृष्ट कवितेत आढळतो. चिन्मय व गूढ अशा अनंताचा साक्षात्कार ते ऐंद्रिय संवेदनांद्वारे सहज व कलात्मकतेने घडवतात. दिव्य तत्त्वाचा साक्षात्कार जीवनातून व निसर्गातून घडवणे हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय. त्यांच्या देशभक्तिपर गीतांतील वैश्विक आवाहन, ज्वलंत राष्ट्रीय भावना, ओज, लवचिक शब्दकळा इ. गुणविशेष उल्लेखनीय आहेत.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)