उदारमतवाद : समाजाच्या वा राज्याच्या कोणत्याही नागरिक व्यक्तीला किंवा सर्व नागरिकांना व्यक्तिशः स्वातंत्र्याचा हक्क मिळाला पाहिजे व त्याकरिता राज्य व सार्वजनिक संस्था यांचे धोरण व व्यवहार व्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्काला बाध येणार नाहीत, अशा पद्धतीने व धोरणाने चालले पाहिजेत, असा दृष्टिकोन म्हणजे उदारमतवाद होय. सांप्रदायिक विचारप्रणाली हे स्वरूप उदारमतवादाला नाही. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे व्यक्तित्वाचा अनिर्बंध आविष्कार हे मुख्य मूल्य होय. स्वतःस व समाजास उपयुक्त असा आत्माविष्कार करण्याची माणसात पात्रता असते ज्या संस्था व राजकीय धोरणे अशा आत्माविष्काराचे व स्वातंत्र्यावरील निष्ठेचे संवर्धन करतात, त्यांची स्थापना वा पुरस्कार करणे हेच योग्य होय, असा उदारमतवादाचा आशय आहे.

ह्या आशयास अनुसरून उदारमतवादी विचारसरणी व व्यवहार पुढील दोन मूलभूत गोष्टींवर भर देतात :(१) स्वेच्छातंत्र सत्ताधारित्वाची नापसंती व (२) व्यक्तिचा अनिर्बंध आविष्कार. धर्मसंस्थांच्या व परंपरावादी सत्ताधाऱ्यांच्या अनियंत्रित सत्तेला उदारमतवादी विरोध करीत आले आहेत. धर्मश्रद्धेऐवजी बुद्धिवादाचा आश्रय करून वैचारिक प्रचारस्वातंत्र्याला त्यांनी उचलून धरले आहे. सामाजिक व राजकीय नियंत्रण व्यक्तिनिरपेक्ष असावे म्हणजे संपत्ती, सामाजिक दर्जा इत्यादिकांवर व्यक्तींच्या व्यवहाराचे नियंत्रण करणारे नियम आधारलेले असू नयेत, व्यक्तींना समान वागणूक मिळावी, कायद्याचे राज्य असावे व देशादेशांत अनिर्बंध व्यापार चालावा.

उदारमतवादाचे प्रात्यक्षिक स्वरूप असे आहे. व्यक्तींना स्वातंत्र्याची वाढ करण्याकरिता व योग्यता दाखविण्याकरिता संधी मिळावी, म्हणून स्वातंत्र्याची अधिकाधिक समान वाटणी व्हावी आर्थिक मक्तेदारी व वरिष्ठ वर्गांचे विशेषाधिकार रद्द व्हावेत निरनिराळ्या संधींचा विस्तार व्हावा, राज्याचा हस्तक्षेपही कमी व्हावा. उदारमतवादाचे असे प्रत्यक्षीकरण झाल्याने विज्ञान, तंत्र, नवे नवे उपयुक्त प्रयोग ह्यांची वाढ होऊन इंग्लंड, पश्चिम यूरोप व अमेरिका ह्यांमध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती झाली. पश्चिम यूरोपातील आधुनिक राज्यांनी नवी धोरणे अंमलात आणल्यामुळे उद्योगी व सुशिक्षित वर्गाची वाढ झाली भांडवलशाही आर्थिक पद्धती स्थिरावली व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्राप्तीबरोबर व्यक्ती व गट यांच्यात जबाबदारीची जाणीव उत्पन्न झाली आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांत पराक्रम करण्याची प्रेरणा मिळाली. अगणित नव्या संस्था व उद्योग उभे राहिले. संकुचित दृष्टिकोन मावळू लागला आणि विश्वबंधुत्वाची भावना निपजली व निरनिराळ्या सामाजिक क्षेत्रांत एक नवीन अभिजनवर्ग तयार झाला.

इंग्लंडमध्ये उदारमतवादाचा सिद्धांत व राजकीय कार्यक्रम १६८८–१८६७ च्या कालावधीत मांडला जाऊन परिणतीस पावला. व्यक्तींचे हक्क राखणे व त्या हक्कांच्या रक्षणार्थ संविधानात्मक तरतुदी करणे, हे उदारमतवादाचे प्राथमिक रूप होते. धार्मिक सहिष्णुता व स्वातंत्र्य, संविधानाधीनता व राजकीय हक्क ह्या गोष्टी त्यात नमूद केल्या गेल्या. १६८८ साली उदारमतवादी क्रांती झाली. त्यामुळे राज्याची सर्वंकष हुकमत व परंपरावाद ह्यांतून सुटका झाली. अमेरिकेने राजकीय स्वातंत्र्य जाहीर केले. त्यानंतर उदारमतवादाचा दुसरा कालखंड लागतो. या कालखंडात आर्थिक व्यवहाराचे स्वातंत्र्य किंवा खुल्या व्यापाराचा सिद्धांत कार्यान्वित झाला. त्यामुळे नोकरशाहीची अर्थव्यवहारातील नियंत्रणे उठली. व्यापारी, दर्यावर्दी, दळणवळण करणारे लोक व श्रमिक ह्यांच्यावरील बंधने शिथिल झाली.

इंग्लंडमध्ये उदारमतवादाचे समर्थन व विवरण करणारे लॉक, ॲडम स्मिथ, जेरोमी बेंथॅम, जॉन स्ट्युअर्ट मिल इ. तत्वज्ञ उदयास आले. त्यांनी खुल्या व्यापाराचे अर्थशास्त्र, व्यक्तिस्वातंत्र्याचे राज्यशास्त्र व उपयुक्ततावादी नीतिशास्त्र ही निर्माण केली. विचारवंतांच्या प्रभावामुळे मतादानाच्या हक्काची प्राप्ती व विस्तार झाला.

उदारमतवाद राजकीय लोकशाही पद्धतीला पोषक असतो, हे जरी खरे असले तरी तो राजेशाहीत किंवा उमरावशाहीत अथवा अन्य राजवटीत कार्यान्वित करता येतो म्हणून लोकसत्तावादाहून उदारमतवाद पृथक् आहे, असे म्हणता येते.

इंग्लंड सोडल्यास अभिजात उदारमतवादाची मांडणी व व्यावहारिक प्रबल समर्थन अन्यत्र विशेषसे झाले नाही. इंग्लंडव्यतिरिक्त यूरोप व अमेरिका येथील राजकीय, आर्थिक व सामाजिक जीवनावर उदारमतवादाचे वारे वाहिले, ह्यात शंका नाही. यूरोपात माँतेस्क्यू, बेंजामिन काँस्तां, गटे व हेर्डर हे तत्त्वज्ञ उदारमतवादाचे पुरस्कर्ते होते.

उदारमतवादाच्या वातावरणात भांडवलशाही समाज निर्माण होऊन आर्थिक व सांस्कृतिक क्रांती झाली. परंतु बहुजनसमाजाचे जीवन कष्टाचेच राहिले. उदारमतवादात व्यक्तींवरील बंधनांचा निरास हे निषेधात्मक तत्त्व प्रधानता पावले. परंतु तेवढ्याने सामान्य जनांना संपन्न आर्थिक व सांस्कृतिक जीवन लाभले नाही. तशा जीवनाकरिता आवश्यक असलेली विधायक तत्त्वे सांगणारा क्रांतिकारक समाजवादी विचार एकोणिसाव्या शतकात वाढून प्रभावी होऊ लागला. उदारमतवादाचा प्रभाव कमी होऊन, उदारमतवादी पक्षांच्या व व्यक्तींच्या हातातील राजकीय सत्तेची सूत्रे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ढिली होऊ लागली व तशा पक्षांचा पराभव होऊ लागला. ह्यानंतर उदारमतवादाचा संपूर्ण त्याग करणारा समाजवाद पुढे आला. समाजवादात समाजहिताकरिता उभ्या रहावयाच्या संस्थांची नवीन बंधने निर्माण होणार, हे दिसू लागल्यावर उदारमतवादाचे रूपांतर लोकशाहीप्रधान समाजवादात झाले. त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ब्रिटनमधील मजूरपक्षाशी सहानुभूती असलेल्या विचारवंतांचा व मजूरपक्षीय नेत्यांचा फेबियन समाजवाद होय.

संदर्भ :1. Hobhouse, L.T. Liberalism, Oxford, 1964.

             2. Mill, J. S. On Liberty, London, 1859.

             3. Laski, H. J. The Rise of European Liberalism : An Essay in Interpretation, London,1962.

जोशी, लक्ष्मणशास्त्री